Login

मृगजळ (भाग २) जलद कथा ( सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे)

जीवन एक मृगजळ
मृगजळ ( भाग २ )
( सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे)

जीवन आणि प्रतिक्षाच्या लग्नाला दोन वर्षे झाली. प्रतिक्षा आणि रमोला आता तिकडे चांगल्याप्रकारे रूळल्या. जीवन आणि रणजितचे स्वभाव, आवडीनिवडी सगळे काही प्रतिक्षाच्या तोंडपाठ झाले. प्रतिक्षाच्या हाताच्या जेवणाला चव होती. तिच्या हातचे सुग्रास खाऊन दोघेही चांगले गोल गरगरीत झाले. रणजित प्रतिक्षाला मावशी म्हणत होता. प्रतिक्षाने ही रणजितशी चांगले वागून, प्रसंगी त्याला चार गोष्टी सांगून रूळावर आणले होते. त्याचा हट्टीपणा उद्धटपणा कमी झाला होता. जीवन मात्र रमोलाशी अंतर ठेऊनच वागत होता. लग्नाला दोन वर्षे झाली तरी त्याने अजून रमोलाला दत्तक घेण्याबद्दल विचार केला नव्हता. प्रतिक्षाने काही विचारले की तो "नंतर बघू " म्हणून टाळत होता. रणजित आणि रमोला मध्ये दोन वर्षाचे अंतर होते. रणजित रमोलापेक्षा लहान होता. काही कारणाने रणजित रडायला लागला की जीवनचा जीव खालीवर होत असे. तो रणजितला जवळ घेऊन त्याला माया करत असे. पण रमोला रडली तर तिकडे जीवनचे लक्षही नसे. अशावेळी रमोलाला बाबांची उणीव जाणवायची आणि ती उदास व्हायची. खरेतर तिला बाबा नीट आठवत ही नव्हते. ती चार पाच वर्षांची असताना आजीकडे रहायला आली. आणि ती सात वर्षांची असताना तिच्या आईबाबांचा घटस्फोट झाला. तिलाही वाटायचे आपलेही बाबा असते तर आपले लाड झाले असते, आपल्याला बाबाचे प्रेम मिळाले असते. अशावेळी प्रतिक्षा रमोलाला समजून घ्यायची आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करायची, पण… . तरी रमोला उदास व्हायची.

लग्नाला दोन वर्षे झाल्यावर प्रतिक्षाने नोकरी करायचे ठरवले. तिला जीवनने अगदी हसत होकार दिला. रमोला आता थोडी मोठी झाली होती. आणि दिवसभर ती शाळेतच असायची. प्रतिक्षाने प्रयत्न केला. तिला एक चांगली नोकरी मिळाली. सकाळी दहा ते दुपारी चार. ती नोकरी करायला लागल्यावर जीवनही तिला मदत करण्यासाठी घरात थोडे काम करू लागला. तशीही त्याला सवय होतीच. जीवनाचे पाहून मुले देखील स्वतःचे काम स्वतः करण्याचा प्रयत्न करत, पण दोघेही लहान होती. मग प्रतिक्षा रमोलाला आणि जीवन रणजितला मदत करत असे.

सगळे छान चालले होते. एक दिवस जीवनला अपघात झाला. त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागली. दोन महिने पायाला जपावे लागणार होते. पाय खाली टेकता येणार नव्हता. प्रतिक्षाला चार महिन्यात नोकरी सोडावी लागली. दिवसभर जीवनचे करून प्रतिक्षा थकून जात होती. त्यामुळे तिला रमोलाचा अभ्यास घ्यायला, तिच्याकडे बघायला सुद्धा वेळ मिळत नसे. त्यामुळे रमोला आणखीन एकटी पडल्यासारखी झाली. फक्त एक रणजितच तिला साथीदार होता. तो ही कधी कधी त्याच्या आईच्या आठवण काढून व्याकूळ होत असे. दोघेही शिकत होती. बरोबर खेळत होती बरोबर मोठी होत होती. दोघांची एकमेकाला चांगली सोबत होती. जीवनच्या अपघातामुळे तो चिडचिड करायला लागला होता. त्याची चिडचिड जास्त रमोलावर निघत होती. कधीकधी तो खूप ओरडून रमोलाशी बोलत होता. रमोलाला त्याचे खूप वाईट वाटत असे. पण ती सगळे गुपचूप राहून सहन करत होती. ती रडली तर रणजित तिचे डोळे पुसत असे, पण तिच्याकडे बघायला प्रतिक्षाला वेळ नसे. तीन महिने जीवन घरीच होता. पण अजूनही तो वाॅकर घेऊनच चालत होता. तसाच कामाला जात होता. पण या तीन महिन्यात ही त्याने कोणाला काही कमी पडू दिले नाही.


जीवन नीट झाल्यावर प्रतिक्षाने परत नोकरी सुरू केली. यावेळी मात्र ती जास्त वेळ बाहेर रहात होती. तिला घरी यायला उशीर होई. आल्यावर ती दमून जात होती. जीवन तिला मदत करू शकत नव्हता. त्यामुळे प्रतिक्षावर कामाचा खूप ताण पडत होता. आणि तिची चिडचिड रमोलावर निघत होती. रमोलाच्या दुःखात आणि एकाकीपणात भर पडत होती. आणि रमोला प्रतिक्षा पासून मनाने दूर जात होती. कधीकधी फारच त्रास झाला तर रमोला आजीला पत्र लिहीत असे, पण पाठवत मात्र नसे. फक्त तिचे मन मोकळे होई, हलके होई. पण रमोला दुखावली जाते आहे, आपल्यापासून मनाने दूर जाते आहे हे प्रतिक्षाच्या कधी लक्षात आले नाही. एकदा प्रतिक्षा पुरणपोळी करत होती. रमोला तिला आज पुरणपोळी खायला मिळणार म्हणून खुश होती. पण प्रतिक्षाचा मूड मात्र नेहमीसारखा नव्हता. ती काहीतरी किरकोळ कारणावरून रमोलाला खूप बोलली. " नुसती खायला कहार आणि सुईला भार आहेस तू. इतकी मोठी झाली तरी काही शहाणपण आले नाही तुला. तिकडेच होस्टेलमध्ये ठेवायला हवे होते तुला. म्हणजे समजले असते. " प्रतिक्षा बोलून गेली, पण रमोलाच्या मनाला खोल जखम झाली. प्रतिक्षा बोलली त्याचा अर्थ कळण्याइतकी रमोला आता मोठी झाली होती. यावर्षी ती शाळा संपवून काॅलेजमध्ये प्रवेश घेणार होती. चांगले फिजिओथेरपिस्ट होण्याची रमोलाची इच्छा होती. त्यासाठी ती प्रयत्न करत होती.


क्रमशः

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज