मिंधा

Mindha


मिंधा
अलक

आई सिद्धेश ला ओरडून बोलत होती,तिला त्याच्या वागण्याचा खूप राग आला होता...

तो जे म्हणाला त्यामुळे आई बाबा खूप दुखावले होते...

आई, "सिद्धेश मिंधे आम्ही नाही हो ,मिंधा तू आहेस ,कारण तू आज ही आमच्याच पैश्यावर ह्या घरात जगत आहेस...तुझी एक पै ही आम्हाला माहीत नाही...की आम्ही तुला मागितली नाही...ना आम्ही तुझ्या घरात रहात आहोत "

तितक्यात सिद्धेशची बायको आणि मुलगा त्या आवाजाने बाहेर येतात..

सिद्धेश चा मुलगा हळूच त्याच्या आईला विचारतो,"आई हा मिंधा म्हणजे काय ग ? "

सिद्धेश बायको मुलाला, "मिंधा म्हणजे चांगला माणूस ,एक कर्तबगार मुलगा जो आपल्या मेहनतीवर मोठा होतो आणि तो जो आपल्या हिमतीवर जगतो, तो जो खूप स्वाभिमानी असतो, जसे तुझे बाबा आहेत ."

मुलगा ,"मग आई मी ही बाबांसारखा मिंधा होईल मोठा झाल्यावर "

त्याचे हे निरागस पण कटू भाबडे बोलणे ऐकून सगळीकडे शांतता पसरली...


आता हे ऐकून सिद्धेश खजील झाला होता, त्याला त्याची चूक भविष्यात किती महाग पडणार होती हे लक्षात आले...आपलेच गुण जर आपल्या मुलाने घेतले तर पुन्हा मीच मिंधा ठरेन..त्याला कोणताच जाब विचारता येणार नाही.. ना आई सारखे मान उंच करून बोलता येईल..जर तसे होऊ द्यायचे नसेल तर मला काही काम धंदा करावा लागेल...माझ्या मुलाला माझा गर्व वाटेल तसे मलाच आधी वागावे लागेल...