Aug 05, 2021
ललित

मन

Read Later
मन
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

\" मन\"

\"मनाच्या गाभा-यात डोकावणं
नाही सोपं त्यात वसणं.
जसं दिसे ग वाळवंटात,
सावलीला उंबराचं फुलणं.\"

* निसर्गानं मानवाला एक अमुल्य देणगी दिलेली आहे...ते म्हणजे \"मन\".प्रत्येक चेह-यागणिक मनाच्या गाभा-याची बांधणी अगदी वेग-वेगळ्या पद्धतीची असते.काही मनं अगदी प्रशस्त असतात तर काही अगदीच लहान असतात.

* खरतर मनाचा गाभारा बघणं, त्यात शिरणं,आतील खोली, रूंदी, कोपरे,कोनाडे तपासून बघणं हे काही ये-या गबाळ्याचं काम नाही. कोणाच्याही मनोगाभा-यात चटकन शिरकाव करण्याची कला फारच थोड्या लोकांना अवगत असते. काही वेळेस \"मी..मी\"म्हणवणारेही मनोगाभा-याबद्दल अचूक अनुमान वर्तवतांना सपशेल तोंडघशी पडतात. कारण कोणालाही, केव्हाही शंभर टक्के विश्वासानं दुस-याच्या मनाचा तळ फुटपट्टीच्या भाषेत मोजून सांगताच येणार नाही.

* रोजच्या व्यवहारातसुद्धा हे मन दुस-यांचं अनुमान सपशेल खोडून कशी त्यांची फजीती उडवतं हे चौकस नजरेनं भवताली बघीतलं असता सहज लक्षात येतं.

* माणसाचं मन लक्ष्मीसारखं चंचल असतं. कुठल्या क्षणाला कुठला विचार,आपल्या वहीत नोंदवेल, काय करायचं ठरवेल, काय नाकारेल हे \"एक आत्मा तनू दोन\" असं म्हणणारेही छातीठोकपणे सांगू शकणार नाही.

* मनाचा अभ्यास करणं ही एक कला आहे त्यासाठी खूप साधना करावी लागते. बुद्धी,ऋजुता, प्रसन्न चेहरा या तिकाटण्यावर उभं राहून सहज समोरच्या व्यक्तिच्या मनात डोकावता येतं.आत्मविश्वासानं आणि जिद्दीनं या तिकाटण्यावर उभं राह्यला हवं.

* मनाचे पापुद्रे प्रसंगागणिक बदलतात. त्यामुळेच कुठली व्यक्ती कोणत्या क्षणी कसा निर्णय घेईल याचाही अंदाज करता येत नाही. तसेच परीस्थितीनुरूप मनाच्या आवडीही बदलतात. कधी वादळाचा मोह मनाला पडतो,कधी प्रेमात सर्वस्व झोकून देण्याचा मनस्वीपणाही आवडतो.तर...कधी नैराश्य्याच्या हिंदोळ्यावर एकटच बसण्याची वाईट सवयही त्याला लागते. म्हणूनच मनाचा नेमका चेहरा ओळखणं कठीण.

* पुष्कळदा माणसाचं मन प्रेमाच्या धुंदीत स्वतःला विसरून जगत असतो. प्रेमाच्या उबेत स्वतःला गुरफटून घेउन नकोनकोसे होणारे क्षण सहज तोडून टाकतो.\"
\" प्रेम हवं मला\" हा एकच ध्यासमनाला लागलेला असतो. जळी-स्थळी-काष्ठी पाषाणी...प्रेममुर्तीचा ध्यास कोरतो. तिची पुजा करतो. भलेही सगळी दुनिया त्याच्या विरूद्ध उभी ठाकली तरी।...
\"प्रेमच हवं मला आता,
प्रेमच माझं जीवन,
प्रेमासाठीच दिलं मी
जीवन माझं दान.\"
असं म्हणणारं मन मागं फिरणार तरी कसं? नव्हे मागं परतण्याच्या वाटा त्यानं स्वतःच केव्हाच तुरपून बंद केल्या आहेत.

* प्रेमाच्या प्राप्तीसाठी घोर तपश्चर्या करणा-या या मनाला निसर्ग हसून खुणावतो, साद देतो. रंगबिरंगी फुलपाखरं, फुलं प्रेमाचाच फेर धरून नाचतात. आणि मनाची क्षुधा शांत करण्याचा प्रयत्न करतात.लता वृक्ष हिरव्याकंच पानांच्या सळसळीतून निष्पाप प्रेम व्यक्त करतात.

*निसर्गाचा स्वभावही न्याराच.ह्या फाटक्या भणंग प्रेमविराला आपल्या कणा-कणातून प्रेमाचा साक्षात्कार घडविण्याचा तो अटोकाट प्रयत्न करीत असतो. निसर्ग निर्मळ आणि निरपेक्ष प्रेमच देणार.या भणंग प्रेमवीराला निसर्गाकडून निरपेक्ष प्रेमाचीच ओटी हवीय आणि तो ती निसर्गाकडून घेणारच यात शंका नाही. कारण प्रेमवेड्या मनानं आधीच सांगीतलेलं आहे
\"प्रेमाच्या त-हा,
प्रेमाच्या गावी
प्रेमाची निर्मळता,
निसर्गाच्या गावी.\"
*याच प्रेमवेड्या मनाला जेव्हा वादळाचं वेड लागतं तेव्हा ते स्वस्थ बसायला तयारच नसतं. साहसाची सातत्यानं आतुरतेनं वाट बघत घरट्यात बेचैन होऊन बसलेलं असतं. उषेच्या संध्येच्या अलवार चाहुलीचं त्याला आकर्षणच वाटत नाही. रणरणत्या उन्हाचा रुक्षपणाही नकोसा होतो. हवं फक्त वादळ. हव्या त्याच्याशी कानगोष्टी. त्याच्या हातातहात देऊन भन्नाट वेगानं भूत-वर्तमानाच्या चौकटीला ओलांडून भविष्याला धडक द्यायची तीव्र इच्छा मनाला स्वस्थ बसू देत नाही.
\" हव्या जीवनात वादळी सरी,
नको बंध रेशमांचे.
हवी वादळाची संगत,
नको ओझं प्रेमळ श्रुंखलेचं.\"

असं हे वादळवेडं मन आकाशाला भिडण्याचं स्वप्न उराशी बाळगून आयुष्याचा प्रवास त्याच धुंदीत करतं. आकाशाची निळाई,त्याची उंची, त्याची विशालता सारच कसं मनाला मोहून टाकतं आणि उत्साहीत करतं. या निळ्या आभाळाची निळाई कवेत घेण्याचं साहस फक्त वादळातच असतं.या नभाची विशालता जवळून बघण्याचा मान फक्त वादळालाच मिळतो.नभाची उंची गाठण्याचं वेड आणि जिद्द वादळातच असते. म्हणूनच हे वादळ मनाभवती सतत रूंजी घालत असतं

* जेथे जेथे धाडस दिसेल तेथे तेथे वादळाची उपस्थिती हमखास असतेच हे मनाला पाठ झालय. धाडसाचं बीजच मुळी वादळात आहे.भूत-वर्तमान-भविष्य असं काळाचं बंधन वादळाला नसतं.तो ख-या अर्थानं जो क्षण जगतो तो क्षण खरा.तेच त्याचं आयुष्य.तोच त्याचा वर्तमान काळ.

* या वादळाची वागणूकही न्यारीच असते.वेगाचं विलक्षण वेड त्याला असतं. नव्हे वेग या वादळातच अंतर्भुत असतो. या वेगानीच तो सगळ्या क्षणांवर चालुन जात असतो.त्यामुळे सगळे क्षण त्याचे हक्काचे असतात.

* भटक्या मुसाफिराची जात वादळाच्या जातीशी काहीशी मिळती जुळती आहे. मुसाफिरालाही वादळाप्रमाणे घरट्याची कल्पनाच करता येत नाही.आकाशाचे छप्पर आणि भुईचं अंथरुण हेच त्याचे संगेसोबती. वादळ आणि मुसाफिराचं आयुष्य वेगवान असतं, एकेक पापुद्रा काढुन वेगळा दाखवावा इतकं सुटं आणि स्वच्छ.आलेल्या क्षणांची नोंद त्यात असली तरी पराजयाची नोंद ठेऊन खंत करत बसण्याइतकी सवडच नसते त्यांना.

* मुसाफिराला बदलत्या दिवसागणिक वेगवेगळ्या मनाची ओळख होत असते.वादळ भेटताच मनोमन मोहरून जाणारा मुसाफीर हळव्या क्षणांसाठी कुठेही थांबायला तयार नसतो. संथ चालीतील जीवन नाकारून हे मन वादळाची वाट बघत गवाक्षात उभं आहे. त्याची भेट होताच घरटं सोडून भन्नाट पळणार आहे त्या वादळासारखं भविष्यकाळाच्या दरवाज्यावर दस्तक देण्यासाठी.

*असं वादळानी वेडावलेलं मन कधी कधी नैराश्याच्या झुल्यावर एकाकी डुलत बसून रहातं. दुःखाचा क्षण मनाचा लचका तोडून जखमी करतं.या जखमेतून ठिपकणा-या रक्तातून मनोव्यथा साकारतं. ती साकारलेली मनोव्यथा स्वतःच वारंवार वाचण्याची वाईट खोडही त्याला लागते.
\"ठिबकणा-या व्यथेचे तुकडे
जोडून-जोडून केली चादर
या चादरीत उबच मिळत नाही.
गुदमरतो,चाचपडतो...मी
कारण यातला एकही तुकडा माझा नाही.
माझ्यातूनच जन्मलेल्या या व्यथेचा मी कोणी नाही...मी कोणी नाही
मी आहे -----एकाकी निर्जन वाटेवरील
एक प्रवासी.\"

* नकाराचा स्वर अहोरात्र आपल्या गात्रांमधून घुमवीत मन जगत असतं. मग निसर्ग त्याचा पुढे शत्रु म्हणून उभा रहातो. पक्षी आपले सुस्वर बंद करतात, फुलं रंग पुसतात. भवताली तयार झालेले उदास वातावरण शालीसारखं अंगाभवती गुंडाळून खुरडत मन खुरडत चालत रहातं. प्रेमाला, वादळाला जवळ येऊच देत नाही. या गोष्टी मनाच्या अस्तीत्वाच्या समाप्ती च्या खुणा आहेत.
मन खरच कसं... असतं
सुखाच्या घागरीत डुंबणारं,
दुःखाच्या तळ्यात बुडणारं.
आशेच्या झुल्यावर झुलणारं,
निराशेच्या कड्यावर एकटच फिरणार.\"

* मनाला दुःखाच्या,निराशेच्या गर्तेत कोसळण्याआधी वादळावर स्वार व्हायला शिकवलं पाहिजे तरच आयुष्याची इमारत मजबूत बांधणं शक्य आहे.
------------------------------------------
लेखिका... मीनाक्षी वैद्य.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now