Jan 23, 2022
वैचारिक

मन

Read Later
मन

मानवी मन हे शिशिर ऋतूमध्ये पानगळती झालेल्या झाडासारखी असतं. त्या झाडाला दुःख असतं की ज्या पानाफुलांच्या सहवासात ते राहिलं ती त्याला सोडून गेली, पण त्याला वसंतात येणाऱ्या नव्या पालवीचा आणि फुलोऱ्याचा आनंद असतोच.

 

 मानवी मन सुद्धा असच काहीसं असतं. भूतकाळातील वाईट गोष्टीचं, एखाद्या अनायासे झालेल्या चुकीचं किंवा एखाद्या व्यक्तीच्या सहवासातून लांब गेल्याचं दुःख असतं. काही गोष्टी आठवणीच्या गोड कूपीमध्ये बंद करून तर काही गोष्टी विसरून येणाऱ्या आयुष्याची उत्सुकता असावीच नाही का!

या जगात वाऱ्याहुन वेगवान जर कोण असेल तर ते मन आहे. गवताहूनही ज्याची संख्या अधिक असेल तर ती विचारांची असते. 

विचारांचा सारा खेळ मन नावाच्या मैदानावर खेळला जातो. तिथं मनच स्पर्धक आहे. त्यामुळे विचार बदला जग आपोआप बदलेल.

 

 कोणत्याही गोष्टीचं अधिक दुःख करू नये कारण दुःखालाही किंमत असतेच. दुःख सोसल्याशिवय सुखाची चव समजत नाही.

 

रेल्वेच्या खिडकीतून डोकावून पाहिलं तर भलेमोठे डोंगर सुद्धा ओंजळीत मावतात. आयुष्यातील संकटांचं सुध्दा असच काहीसं असेल. आयुष्यात संकटं , आव्हानं आ वासून उभी आहेत, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर तीसुद्धा तुमच्या ओंजळीत नक्की मावतील.

 

 

 

 मनात येणाऱ्या विचारांच्या गर्तेत आपण विसरून जातो की जीवनात काय महत्वाचं आहे. जर काही महत्वाचं असेल तर ते आत्मसमाधान आहे. आणि ते समाधान जीवनात अनेक रंग भरतं.

 

कमवलेली नाती आणि जिंकलेली मने कधीच गमावू नका. नाती वेगळीच असतात, ना जातीची ना धर्माची, कधीकधी ती रक्ताचीही नसतात , ती केवळ मानलेली असतात. 

 

स्वप्नांशी शर्यत करताना आपल्या तत्वांचा विसरू पडू देऊ नका. तत्वांना फॉलो करा. स्वतःसाठी स्वतः बनवलेली तत्त्वेच आपल्या यशाचा राजमार्ग निश्चित करतात.

 

यशाच्या वाटेवर धावत धावत आपण खूप पुढे निघून जातो. मागे वळून पाहिलं तर राहतात त्या फक्त तत्वांच्या खुणा आणि त्यांनाच आदर्श मानून कितीजण तरी यशाचे मार्ग शोधत असतात. आपल्याला फॉलो करत असतात. तत्वांचा विसर पडणे म्हणजे स्वतःतील स्वतःला विसरून जाणं होय. 

 

प्रत्येक क्षण जगून घ्या. भूतकाळातील वाईट गोष्टी विसरून जा. भविष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला की आयुष्य सोपस्कर बनून जाईल.

©️

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

.

Student

.