हे नाते मनामनाचे (भाग ३) अंतिम

नाते मनाशी मनाचे


हे नाते मनामनाचे ( भाग ३) अंतिम

नातीगोती

दिवसेंदिवस काकू थकत होत्या. त्यांना सारखे काही ना काही बारीक सारीक होत होते. पण त्या डाॅक्टर कडे जायचा कंटाळा करायच्या. एक दिवस आरती काकूंनी त्यांच्या जवळच्या काही नातेवाईकांना घरी बोलवून घेतले. आणि स्वतःचे विल (मृत्यूपत्र) काय आहे ते सांगितले. त्यांनी आजपर्यंत कुणाकडेही काही मागितले नव्हते. त्यांना पैशाची कमतरता कधीच भासली नाही. नवरा सरकारी खात्यात इंजिनिअर होता. त्यांनीही पाळणाघर चालवून खूप पैसा मिळवला होता. आरती काकूंनी त्याची बॅकेत साठवलेली रक्कम जी काही लाखात होती, ती त्यांचे पुतणे आणि पुतणीच्या यांच्या नावावर केली होती. आणि त्यांचे घर त्यांच्या बहिणीच्या मुलाच्या नावावर केले. तेही त्यांच्या पुतण्यांना आवडले नाही. सगळे त्यांच्यावर तुटून पडले, पण त्या ठाम होत्या. त्यांनी त्यांचा निर्णय बदलला नाही. एका पुतण्याने सोन्याचा विषय काढला. त्या पटकन म्हणाल्या, " माझे विल मृत्यूनंतरचे आहे. मी आत्ताच कोणालाही काही देत नाहीये. माझे सोने कोणाला द्यायचे ते मी ठरवले नाहीये. माझ्या आजारपणात ते मला उपयोगी पडेल. "
" बघ नाहीतर कुणाची तरी परक्या माणसाची दया येईल तुला. आणि देऊन टाकशील. " एक पुतण्या.

" इथे कोणीही परके नाहीये. आणि तुम्हाला मिळाले ना तुमच्या वाटणी चे. मग शांत रहा. " आरती काकू.
" पण ही तर परकीच आहे की. " काकूंची पुतणी.

" तुमच्यासाठी असेल माझ्यासाठी नाही. नशीब समजा मी सगळं तिच्या नावावर केले नाही. " काकू चिडलेल्या बघून सगळे गप्प बसले.

खाणेपिणे झाल्यावर सगळे आपापल्या मार्गाने निघून गेले. खायचे करण्यापासून मागचे आवरण्यापर्यंत सगळ्यात रमोलाचा मोठा हातभार होता. बिचारी दमली होती. बाकीचे नुसतेच बघे. ना एक सून कामाला आली न पुतणी पुढे आली. सगळे गेल्यावर आरती काकूंनी कपाटातून काही कॅश काढली आणि रमोलाच्या हातात दिली. म्हणाल्या, " मी माझ्या पुतण्यांना ओळखते. मला काही झाले तर एकजण जबाबदारी घेणार नाही. तुझ्यावरच ढकलतील गोड बोलून. आणि ह्या पैशाबद्दल कुणालाही काही माहिती नाही. तू उद्याच्या उद्या हे पैसे तुझ्या बॅकेत टाक. "

" काकू हे नको. आपले नाते ह्याच्या पलिकडे आहे. " रमोला.
" हो ग. पण मला काही झाले तर लागतील ना. असू देत. आणि तू पेईंग गेस्ट चे दिलेले पैसे पण मी तुझ्या नावाने बॅकेत टाकलेत. हे त्याच पासबुक. " काकू म्हणाल्या आणि रमोला कडे बघून हसल्या आणि म्हणाल्या "आपल्या माणसाकडून कुणी पैसे घेत का? " रमोला त्यांच्या गळ्यात पडली. काकूंनी तिला एवढे प्रेम दिले तेच तिच्यासाठी खूप होते.

त्यानंतर काही महिन्यांनी काकूंना सिव्हीअर हार्ट अटॅक आला आणि त्यांना दवाखान्यात ठेवावे लागले. रमोलाने त्यांना एडमिट केले आणि त्यांच्या पुतण्यांना कळवले. कुणीही आले नाही. सगळ्यांनी काही ना काही कारण सांगितले. दवाखान्यात अर्जंट पैसे भरायचे होते. रमोलाने काकूंनी दिले होते ते पैसे भरले. त्यांची औषध आणली. आणि दोन रात्र त्यांच्याजवळ बसून काढली. तिसऱ्या दिवशी पहाटे काकूंची प्राणज्योत मालवली. रमोलाने कळवल्यावर काही वेळातच सगळे हजर झाले. रमोला एकटीच रडत होती. काकूंच्या अंगावरील सोन्याच्या बांगड्या, पाटल्या, गळ्यातील चेन आणि अंगठी काढून घेण्यासाठी सगळ्यांची लगबग सुरू होती. कोणाच्या डोळ्यात साधी करूणा सुद्धा दिसत नव्हती. काकूंना अंत्यविधीसाठी नेल्यावर ती घरी आली. आपले सामान आवरले. आणि किल्ली काकूंच्या भाचाकडे देऊन निघून गेली. काकूंच्या आठवणीने तिच्या डोळ्यातले पाणी मात्र थांबत नव्हते. एकदा मागे वळून पहात तिने डोळे पुसले. ना जाताना तिला कोणी पैशासंबंधी काही विचारले नाही काकूंविषयी काही बोलले. पुतणी ने कपाटाच्या किल्या मागून घेतल्या. हे काकूंचे रक्ताचे नातेवाईक होते.

समाप्त

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

🎭 Series Post

View all