नाते मनामनाचे (भाग २)

नाते मनाशी मनाचे


हे नाते मनामनाचे (भाग 2)

नातीगोती


आता आरतीकाकू आणि रमोलाला एकमेकाचे चांगली सवय झाली होती. रमोला आणि आरतीकाकू एकमेकात छान मिसळल्या. अगदी दूधसाखरे सारख्या. त्यानंतर रमोलाचा प्रत्येक वाढदिवस अगदी थाटामाटात आरतीकाकूच्या स्टाईलने होत होता. . नवनवे गोडाचे पदार्थ, ओवाळणे दृष्ट काढणे न चुकता होत असे. गिफ्ट द्यायला तर आरती काकूंनी कुठलही कारण पुरत असे. त्या गिफ्ट ही इतक्या युनिट असत की कायम लक्षात रहाव्या. आरतीकाकूंमुळे रमोला आता हसायला बागडायला शिकली होती. सुट्टीच्या दिवशी त्यांच्या बरोबर शाॅपिंग, पिक्चर, नाटक बघणे किंवा फिरायला जाणे तिला आवडत होते. जणू तिच्या आयुष्यातली आईची कमी भरून निघत होती. तीही काकूंसाठी काही न काही गिफ्ट आणायची. आणि त्या देखील तिने आणलेल्या वस्तू वापरायच्या जपून ठेवायच्या. त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना रमोला माहिती झाली होती. त्या स्वतः तिला सगळ्यांकडे घेऊन जायच्या आणि तिचे खूप कौतुक करायच्या. काही नातेवाईक मात्र त्यांच्या ह्या आपुलकीच्या नात्याला नावं ठेवत होते, नाक मुरडत होते. आजूबाजूचे लोक सुद्धा त्याची जवळीक बघून जळायचे. काही ना काहीतरी बोलायचे. रमोला ला आरतीकाकूंविषयी काहीतरी सांगून तिचे मन कलुषित करायचे.

रमोला आरतीकाकुंकडे येऊन आता चार वर्षे होऊन गेली होती. रमोला आरतीकाकुंकडे सगळे शिकली, सगळा स्वयंपाक शिकली, सगळे सणवार कसे करायचे ते शिकली. नाती आणि नातेवाईक कसे जपायचे हेही तिला आरतीकाकूंमुळे समजले. आता रमोला अगदी तयार झाली होती. पण लग्नाला मात्र ती तयार नव्हती. तिला लग्नाची भिती वाटत होती. आरती काकूंनी तिला समजावले पण तिच्या मताचा ही आदर केला. पण तिला हट्टाने स्वतःसाठी घर बुक करायला लावले. तिला बचतीची सवय लावली. तिला पगार चांगला होता, पण तो इतरांना वाटण्यात जाई. काकूंनी तिला तिच्या भविष्याची सोय करायला लावली. एकट रहायचे असेल तर स्वतःची सोय स्वतः करायला हवी. त्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट करायला शिकविले. आता ती त्यांची फक्त पेईंग गेस्ट नव्हती. तिच्याकडून त्या पैसे घ्यायच्या पण तिच्याच नावावर बॅकेत जमा करायच्या.

आरती काकू आणि रमोला दोघी एकमेकांची काळजी घेत होत्या. एकमेकींना जपत होत्या. दुखले खुले बघत होत्या. रमोला तरूण होती. तब्येतीची चांगली होती. पण आरतीकाकूंचे वय सत्तरीत होते. त्यांना काहीतरी व्हायचे मग रमोलाच दवाखान्यात न्यायची. अगदी प्रेमाने हवे नको बघायची. एकदाच रमोला आजारी पडली, पण तिला एकटीने हॅंडल करायची सवयच होती. तिची काळजी कोणी घेईल, करत असेल ही तिची अपेक्षाच नव्हती. ती एकटीच डाॅक्टर कडे जाऊन औषध घेऊन आली. काकू उशीर झाला म्हणून तिचीच वाट पहात होत्या. जेवायच्या थांबल्या होत्या. आल्यावर बघितले तर त्यांना रमोलाचे अंग गरम लागले. लगेच त्यांनी तिच्यासाठी मऊभात केला. जबरदस्तीने खायला लावला. तिने औषध घेतले होते तरी रात्री तिला परत ताप चढला. रात्री बराचवेळ काकू तिच्या कपाळावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवत बसल्या होत्या. सकाळी उठून तिच्यासाठी गरमागरम काॅफी आणि मऊभात केला आणि तिला खाऊन औषध घ्यायला लावली. काकूंच्या मायेमुळे रमोला दोन दिवसांत बरी झाली आणि मनाने आणखीन काकूंच्या जवळ गेली.

क्रमशः

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

🎭 Series Post

View all