आपल मन आणि आपण

"तुमच्यापैकी कोणी यातून गेलय का?" " कोणी असा अनुभव घेतला आहे का?" सानिका ची गाडी नेहमीप्रमाणे सुपरफास्ट येऊन वर्गातल्या आपल्या मैत्रिणींना धडक दिल्याप्रमाणे प्रश्न विचारून मोकळी झाली. आपल्या मनाला दिशा दिली की स्वप्रेरणा मिळतेच.
"तुमच्यापैकी कोणी यातून गेलय का?" " कोणी असा अनुभव घेतला आहे का?"
सानिका ची गाडी नेहमीप्रमाणे सुपरफास्ट येऊन वर्गातल्या आपल्या मैत्रिणींना धडक दिल्याप्रमाणे प्रश्न विचारून मोकळी झाली.
सानिका, हुशार, चुणचुणीत, थोडी आगाऊ पण सगळ्यांची आवडती, मास मीडिया च्या दुसऱ्या वर्षाला होती. तिच्या वर्गातली मुले आणि मुली आपापल्या घोळक्यात बसलेल्या. तीची अशी एन्ट्री कोणालाच नवी नव्हती. रोज नवा विषय घेऊन ती अशीच यायची आणि मग त्या विषयावर सगळे चर्चा करायचे..
" कशाबद्दल बोलते आहेस तू सानिका?" मंजिरीने विचारले.
" अग येताना ट्रेन मधे एक गोष्ट वाचली. तुम्हाला पण माहित असेल. आफ्रिकेत एका आदिवासी भागात एखाद्या झाडाला मारायचं असेल म्हणजे तोडायच असेल तर ते लोक कापत नाहीत त्या झाडाला.." - सानिका
"मग काय करतात?"
" गावातले सगळे एकत्र येतात. त्या झाडाभोवती रिंगण बनवतात. आणि त्या झाडाला खूप शिव्या देतात. नको नको ते बोलतात. पूर्ण रात्र हे सुरू असते. सकाळी सगळे आपल्या घरी निघून जातात. आणि ते बिचारे झाड हळू हळू कोमेजून मरत.
मला तर हे सगळे खूप भयानक वाटले. असे वाटले की एका झाडा सोबत असे होते मग माणसांसोबत पण होत असेल का अस?
म्हणून मी आल्या आल्या प्रश्न विचारला."
"काहीही तुझे. हे तर झाडाबद्दल होते ना. मग यात माणसे कशी आली? "- मंजिरी
" थांब. तुला एक उदाहरण देते. माझा छोटा भाऊ शाळेत आहे. त्याच गणित खूप कच्च आहे. काल मला तो म्हणाला की ताई मला सतत आमच्या गणिताच्या टीचर बोलतात की तुला हे येत नाही , एवढं सोपे पण येत नाही, किती वेळ लागतो सोडवायला आणि असेच काही. मग माझे मित्र पण चिडवतात की तुला येणारच नाही. आता मला पण वाटायला लागलेय की मला गणित येणारच नाही. कसे होईल माझे? ... त्याला तर मे समजावले. पण हे त्या झाडासारख नाही का? - सानिका
" माझ्या आईची मैत्रीण मागे एकदा घरी आली होती. " - ऋतुजा बोलू लागली. " खूप शांत आणि कमी बोलणारी ही मावशी नीट पाहिले तर कशातच लक्ष देत नव्हती. बोलण्यात , खाण्यात कशातच. मग आली तशी घाईत निघून गेली. उशीर होईल, घरी काम आहे म्हणून." " ती गेल्यावरच आईचं बोलणे मला अजून आठवतेय. आई म्हणाली माझी ही मैत्रीण तिच्या घरी म्हणजे माहेरी खूप लाडकी होती. सगळी कामं करायची. घरातली - बाहेरची, अभ्यासात पण हुशार आणि चित्रकला, हस्तकला, गायन अजून काय काय. आजूबाजूचे सगळे पण खूप कौतुक करायचे. सगळ्यांना मदत करायची ती. दिसायला पण सुंदर आणि राहायची पण टापटीप. सगळ्यांना वाटायचं की जिथे लग्न होऊन जाईल तिथे पण सगळे असेच कौतुक करतील. पण लग्न झाले. तिकडच्या घरी सगळे करून पण तिला काम पुरून उरायच. सतत काही न काही काम सांगितले जायचं आणि नीट करत नाही, काही येत नाही, अगदी कशावरून पण तिचा सतत अपमान करत राहायचे. तिचा तिला वेळच नव्हता. मग हॉबीज काय नी टापटीप राहणे काय. सगळेच गेले. आणि आता सतत दडपणाखाली असते. ना अर्थार्जन करू शकली नाही नीट राहू शकली." " हे पण उदाहरण या झाडासारख म्हणायचं का ग?"
" हम्म्म.. " - सानिका " अजब असते ना. जी मुलगी माहेरी सगळी कामं करते, नीट राहते, हुशार असते, आवडती असते, सगळ्यांसाठी आनंदाने करते तीच सासरी गेल्यावर तेच काम करते ना. मग तिथे ती नीट करत नाही असे कसे होईल? आधी वेळ पुरून उरून ती स्वतःसाठी वल काढू शकत होती ते तिला नंतर जमू नये असे कसे?"
वृषाली, वर्गातली हुशार , समजूतदार मुलगी. आता तिने चर्चेत भाग घेतला. " सोपे आहे. आपण सिरियल नाही का बघत. नवीन लग्न होऊन आलेल्या स्त्री ने आपले ऐकावं आणि आपलेच वर्चस्व राहावं यासाठी असते सगळे. मग पहिल्यापासूनच तिला सगळे येत असताना पण ते कसे नीट येत नाही हेच सांगितले जाते. काय करता येत नाही हेच दाखवले जाते. आणि आम्हाला जे आवडते ते करायचं हे बिंबवयला सुरुवात होते. सुरवातीला सगळ्यांना आपलेसे करून घेण्याच्या नादात ती नवीन नवरी हे करत जाते आणि मग कालांतराने तिला बाकीचे बोलतात तेच खरे वाटू लागते. यात ती स्वतःचे स्वत्व विसरून जाते."
आतापर्यंत बाजूला बसून नुसते ऐकणाऱ्या मुलांना पण आता या विषयात इंटरेस्ट वाटू लागला. सौरभ बोलू लागला.
" माझे बाबा खूप जॉली माणूस तेवढाच कर्तृत्ववान. कोणत्याही परिस्थितीत पटकन आणि अचूक निर्णय घ्यायची क्षमता. गेल्या वर्षी त्यांना प्रमोशन साठी सिलेक्ट केले होते. शेवटच्या क्षणाला दुसराच बाहेरचा माणूस बॉस म्हणून आला. आणि सगळ्यांच्याच डोक्यावर बसला. प्रत्येकाच्या कामात काहीही चूक नसताना चूक दाखवायची. तुम्ही काम नीट करत नाही असा ओरडा करायचा. तुम्हाला काम कसे करता येत नाही आणि मीच कसा लायक आहे हे सतत बोलायचं असे करून त्याने दहशत निर्माण केली अक्षरशः. त्याच्या पुढे कोणीच निर्णय पण घ्यायचे नाहीत आणि काही सुचवायचं पण नाही असे सुरू केले. बाबा सांगतात ऑफिसमध्ये आता सगळे फक्त दिलेलं काम करून बाजूला होतात. स्वतः कोणीच डोके चालवत नाही अगदी बाबा सुद्धा. केव्हा केव्हा बाबांना पण स्वतःच्या क्षमतेवर शंका येते हल्ली. त्यामुळे घरी निर्णय घेताना पण ते ठाम पणे घेऊ शकत नाही आहेत. "
" हो ना, लहान मुलांना जेव्हा सतत तुला हे येत नाही किंवा जमणार नाही असे सांगितले जाते तेव्हा ती मुले पण ते काम सोडून देतात. हळू हळू आपल्याला हे येणारच नाही असे त्यांना वाटू लागते. "- मानस म्हणाला.
मुलांचा गोंधळ सुरू होता. आवाज वाढत चालला होता. दिशा टीचर, सगळ्यांची लाडकी आणि योग्य मार्गदर्शन करणाऱ्या, तिकडून जात होत्या. आवाज ऐकून त्या आत आल्या. नक्की का गोंधळ होतोय हे लक्षात आल्यावर त्यांनी बोलायला सर्वात केली.
दिशा टीचर- " मानसिक खच्चिकरण असे म्हणतात याला."
" आपले वर्चस्व टिकून राहावे, दुसऱ्याने आपली जागा घेऊ नये ही भीती, माझे तेच खरे हा अहंकार, आणि समोरच्या व्यक्तीने नेहमी आपल्या अधीन राहावे ही विकृती, या सगळ्यातून दुसऱ्याच मानसिक खच्चिकरण करून त्याला विचार करण्यासाठी मन आणि बुद्धीचा वापरच करू न देणे हा या सगळ्याचा बेस आहे. एकदा का या विळख्यात कोणी अडकले की मानसिक दृष्ट्या खचत जातो. आपल्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत , क्षमता आहेत त्याच विसरत जातो. आणि मग खेळ सुरू होतो फक्त दुसऱ्याने सांगितलेलं काम किवा नेमून दिलेलं काम यंत्र सारखं करायचा. आपली बुद्धी न वापरता एखाद्याच वर्चस्व लादून घ्यायचा. "
" आपण तर साधे लोक आहोत. ख्यातनाम लोक, म्हणजे सेलिब्रिटी यांचं वय्यक्तिक आयुष्य जेव्हा तिखट मीठ लावून , किंवा काहीही नसताना उगाच चव्हाट्यावर आणले जाते तेव्हा त्यांना किती त्रास होत असेल. परदेशात हे सर्रास होत असत. यात कित्येक सेलिब्रिटीज डिप्रेशन मध्ये जाऊन आयुष्य गमवून बसलेत."
आतापर्यंत गप्प असलेली मानसी आता बोलू लागली.
मानसी - " म्हणजे या सगळ्यातून असा अर्थ निघतो की सतत मिळणारे अपशब्द, निंदा, कोणीतरी सतत गाजवलेले अधिकार, यामुळे आत्मविश्वास कमी होतो. आपण काही करू शकत नाही असे वाटणे वाढते. सगळ्या नकारात्मक भावना आपल्या सुप्त मनात बिंबल्या जातात. हळू हळू आपण निष्क्रिय होऊ लागतो. आला दिवस गेला दिवस एवढच आयुष्य राहते. काही नवीन , विशेष आणि उत्पादनक्षम करण्याची क्षमता निघून गेलीय असे वाटू लागते."
गौरव -" हो. मग आनंद ओरबाडून घेण्याचे प्रयत्न सुरू होतात. जेव्हा , जिथून ,जसा आनंद मिळेल तो घ्यायचा आणि पुन्हा आपल्या कोशात जायचं. नेमून दिले आहे ते जसे चा तसे काम यंत्रवत करायचं. आपली कार्यक्षमता विसरायची, कार्यक्षेत्र संकुचित करायचं, आपल्यातले गुण विसरायचे."
संपूर्ण वर्ग सुन्न झाला होता.... आज आपल्यावर असलेली जबाबदारी त्यांना कळली.
आज जगभर हेच होते आहे. वाचकहो. वर्गातील मुलांसारखे तुम्ही सुन्न नका होऊ. ईश्वराने आपल्या प्रत्येकाला काही न काही भरभरून दिले आहे. कोणत्या न कोणत्या क्षेत्रात आपण पुढे नक्कीच जाऊ शकतो. पण आपल्या आजूबाजूच्या नकारात्मक वातावरणामुळे आपण आपल्यातील गुण आपले ध्येय विसरून गेलो आहोत. माझ्या वाचकांना एकच विनंती आहे. हा लेख वाचून तिथेच सोडून देऊ नका. आपल्या किंवा आपल्या आजूबाजूच्या कोणाच्या आयुष्यात असे काही घडले असेल / घडतं असेल तर या निराशावाद मधून , नकारात्मक वातावरणातून लगेच बाहेर पडा. जग खूप सुंदर आहे. अनेक संधी तुमची वात बघत आहेत. कोणीच केव्हाच सगळ्यांना संतूष्ठ करू शकत नाही. तेव्हा तसा प्रयत्न करत राहून आपला मौल्यवान वेळ वया घालवू नका. आपली कर्तव्ये करतानाच आपल्याला आवडते ते केले की आनंद आपोआप मिळतो. परिपूर्ण कोणीच नसतो म्हणून अनुभव घ्यायला सर्वात करा.नुसता विचार नाही तर कृती करा. खरंच चुका झाल्या तर त्यातून शिका पण तुमचा आत्मविश्वास घालवायला उगाच कोणी काही सांगत असेल तर दुर्लक्ष करा. एका सर्वेक्षणात मोठ्या सेलिब्रिटी चे आयुष्य असेच खराब झालेल्यांना जेव्हा त्यांचेच कर्तृत्व सांगितले गेले तेव्हा ते पुन्हा क्रियाशील झाले. आपल्या शक्ती आणि गुण ओळखून काम सुरू करा. यश आपलच आहे.
मी पण हे अनुभव घेतले आहेत. आपण यातून गेला असाल/ जात असाल तर / बाहेर आला असाल तर कॉमेंट मध्ये नक्की लिहा. सगळ्यांनाच त्याचा सकारात्मक फायदा होईल.