Aug 09, 2022
प्रेरणादायक

मैलाचा दगड

Read Later
मैलाचा दगड

मैलाचा दगड

बाबल्याचा बाप मेला त्या धसक्याने त्याच्या आयशीने हाथरुन धरलं नि सहाएक महिन्यात तीही बाबल्याच्या बापाकडे निघून गेली.

बाबल्या कोकणरेल्वेत चहा कॉफी विकून आपलं पोट भरु लागला. त्याच्या मामाच्या पोरीशी लक्ष्मीशी त्याचं लग्न झालं. वर्षभरात पाळणा हलला. दोनाचे सहा हात झाले. लक्ष्मीही लोकांच्या शेतात मजुरीला जायची पण पिंकी झाल्यापासून तिला घरातून बाहेर पडता येत नव्हतं. 

कोरोना आल्यापासना रेल्वे यायच्याजायच्या बंद झाल्या होत्या त्यामुळे बाबल्याचा धंदाही बसला होता. घरात होतं नव्हतं ते किडूकमिडूक संपलं. लक्ष्मीने बाबल्याला वाण्याच्या दुकानावरून उधार किराणा आणायला पाठवलं. पहिली दोन महिन्याची उधारी साचली होतीच त्यामुळे बाबल्याने तोंड पसरताच एखाद्या कुत्र्यावर धोंडा मारावा तसं त्याला वाण्याने हाकललं. 

बाबल्या रिकामी पिशवी घेऊन घरी आला. बायको काय बोलणार ही भिती मनात होतीच त्याशिवाय बायकोची हतबलताही त्याला जाणवत होती. 

बाबल्याच्या हातातली रिकामी पिशवी पाहून बाबल्याची बायको लक्ष्मी माजघराकडे वळली. तिने पदराने आपले डोळे टिपले ते बाबल्याच्या नजरेतून सुटले नाहीत. त्याला स्वतःच्या नाकर्तेपणाची चीड आली. त्याची लहानगी पुढे आली व म्हणाली,"बाबांनू,खाऊ." बाबल्याने तिच्या दोन्ही गालांची पापी घेतली व तिरीमिरीत घराबाहेर पडला.

लक्ष्मीने बाहेर येऊन पाहिलं तर तिला बाबल्या कुठे दिसला नाही. तिच्या काळजात कालवाकालव झाली. "बाय माजे खय गेले खय हे म्हनाचा. माझा कुकु ठीक तर सगळा ठीक. उपासी रवान दिस काडू पन माझो घो माज्या डोळ्यासमोर व्हयो." असं स्वतःशी बोलत तिने पिंकीला कडेवर घेतलं नि ती बाबल्याला साद घालत निघाली. 

वाटेत तिला मोरजकरांची म्हातारी दिसली.

"इतक्या न्हिमराची खय चललस लक्षुमी?"

"आकाबायनु,आमच्या हेंका बघलास? रासन हाडूक पाठवललय. ता गावला नाय म्हनान डोसक्यात राग घालून खय गेले जानाकोन."

"गो बाय. ता रासन गरीबांका खय गावता! गरीब लोका हे शिरिमंतांका कार्ड देतत नि शिरिमंत लोका ता धान्य हाडून सनवार करतत. गरीबांच्या हातीर चार पैसं घालतत की झाला. ता जावंदे. तुझ्या घोवाक बघलय मिया. शेतातल्या बाईर जाईत व्हतो."

झालं म्हातारीचं शेवटचं वाक्य पुरं व्हायच्या आधी लक्ष्मीने शेताकडे धाव घेतली. शेतात तरवा ढोपरापर्यंत वाढला होता. मेरेवर चारही चांगलीच फोफावली होती. सरपटणाऱ्या जीवाणूंच भय न बाळगता ती वाऱ्याच्या वेगाने धावत सुटली.

 अर्ध्या वाटेवर आली तसं चिखलात पाय सटकून पडली. पिंकीला मात्र तिनं गच्च धरलं होतं. पिंकीच्या नाकातनं शेंबडाच्या धारा गळत तिच्या ओठावर आल्या होत्या. लक्ष्मीचं तिथे लक्ष नव्हतं. चिखलातून ती कशीबशी उठली. साडी पुरी चिखलाने बरबटली. चिखलाच्याच हाताने तिने बटा बाजुला सारल्या व विहिरीच्या दिशेने पावलं टाकू लागली. 

तिच्या मनात नको ते विचार येत होते. गेल्या पंधरवड्यात रजनीच्या नवऱ्याने नोकरी सुटली म्हणून त्याच विहिरीत जीव दिला होता. सकाळी प्रेत फुगुन वर आलं होतं. लक्ष्मीला रजनीचा कुंकू पुसलेला चेहरा न् बांगड्या फोडलेले गोरेपान हात आठवले. तिने फोडलेला हबंरडा आठवला तसं तिच्या काळजात धस्स झालं.

 तिने 'अवो पिंट्याचे बाबा' करून घातलेली आर्त साद हिरव्या शेतात घुमली. विहीरीजवळ येताच तिला काठावर वाकून बघत असलेला बाबल्या दिसला. तिने त्याला साद घालायचा प्रयत्न केला पण तिच्या तोंडून शब्दच फुटेना. पायांत मणाचं ओझं आलं. 

पुरं आभाळ गरगर फिरल्यासारखं झालं. डोंगररांगा,आजुबाजूचं शेत,पक्षी सारे काही गाडीच्या टायरवानी गरागरा फिरु लागले नि लक्ष्मी तिथेच धाडकन कोसळली तसं शेतात नडणी करणाऱ्या शांतारामने उभं राहून पाहिलं व विहिरीवर उभ्या असलेल्या बाबल्याला आवाज दिला,"बाबल्या रं,तुझी बाईल पडली बघ की चक्कर येऊन. धाव बेगिन." पिंकीला मात्र लक्ष्मीने सोडलं नव्हतं. 

बाबल्याने शांतारामाची साद ऐकली नि धावत लक्ष्मीजवळ आला. बाजुच्या डबक्यातलं नितळ पाणी त्याने लक्ष्मीच्या तोंडावर मारलं नि लक्ष्मी न् पिंकीला मिठी मारुन रडू लागला. 

"लक्ष्मी,माजी बाय ती. शुद्धीवर ये गे बाय. मिया पुन्यांदा असो पळपुटो इचार नाय करुचय. तुजी शपथ घेतय." गार पाण्याने व बाबल्याच्या मिठीने लक्ष्मी भानावर आली. 

बाबल्याला बघून तिला परत हुंदका आला. बाबल्याने तिचे पुढे आलेले केस कानामागे केले व तिला सावकाश उभं केलं. पिंकीच्या नाकाची धार आपल्या शर्टाला पुसली. तिला कडेवर घेतलं व लक्ष्मीला हाताला धरुन घराकडे घेऊन आला.

 न्हाणीतल्या कढत पाण्याने त्याने लक्ष्मीला आंघोळ घातली. लक्ष्मी नव्या नवरीसारखी लाजली. बाबल्याने तिचे केसही धुतले. तिला ल्हानपणी आई डोक्यावरून न्हाऊमाखू घालायची ती आठवण आली आणि आता आई नाही या आठवणीने परत हुंदका आला. बाबल्या म्हणाला,"लक्ष्मी,येइत ते परिस्थितीक आपुन दोन हात करुया. कोरोना येवंदे नायतर तेचो बापूस येवंदे. आता भियाचा नाय."

डब्यात सुरय तांदूळ होते. त्यातले पेलाभर घालून पेज केली. पिंकीला भरवता भरवताच पिंकी निजली तशी लक्ष्मीने तिला गोधडीवर घातली. दोघंही मग पेज जेवले.  खारातली कैरी तोंडाला घेतली. 

लक्ष्मी म्हणाली,"माज्या बोलन्याचा वाईट वाटून घेव नको हा. माका कोन हा तुमच्याशिवाय?"

"गो माका तरी कोन असा तुझ्याशिवाय!" बाबल्या म्हणाला.

इतक्यात दारात सुबला आला. 

"हय सो आज?" बाबल्या म्हणाला.

"चाय ठेवतय हां", लक्ष्मी म्हणाली. बाबल्याच्या घरची परिस्थिती  सुबल्याला ठाऊक होती. तो म्हणाला,"नुको चाय. निकतो घराकडसून चाय घिऊन इलय. येक काम होता. तुमी दोगा करशात काय?"

"काम तर सांगा भावजींनू," लक्ष्मी पुढे सरुन म्हणाली.

"जिल्हयाच्या हास्पितलात जेवान करुचेसाठी दोन मानसा व्हयी हत. जेवान आपला सदीचाच, डाळ,भात,भाजी,चपाती असा. त्याचा काय हा कोरोनाचे भयान थयले आचारी पळान गेले. तुमी आता काम करशात तर तुमका परमनंटव करतीत," सुबल्या बोलला.

"आमी दोगाव तयार आसव,"लक्ष्मी बोलली.

"गो काय बोलतहस काय! थय गेलाव नि आपनाकव कोरोना झालो मगे.."

"काय्येक कोरोना फोरोना आपल्या वाऱ्याक येवचो नाय. दरवरसा भगवतीआईची वटी भरतय. ती तेका बरुबर पायाखाली घालतली. माझो इसवास हा माजे भगवती आईर. पन पिंक्याचाचा काय करुचा?"लक्ष्मी म्हणाली.

"वैनीं,तेका आमच्या घराकडे हाडून सोड. माझ्या दोन पोरांवांगडा खेळीत बसात."

दुसऱ्या दिवसापासून लक्ष्मी नि पराग दोघंही पहिल्या गाडीने जिल्ह्याच्या इस्पितळात जाऊ लागली. लक्ष्मी व बाबल्याला कामाचा उरक होता. लक्ष्मीच्या हाताच्या अप्रतिम चवीमुळे हॉस्पिटलच्या स्टाफला व रुग्णांना तिच्या हातचे जेवण आवडू लागले.

दोन महिन्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने त्यांना कायमस्वरूपी कामावर ठेवून घेतले. इतरांसाठी कर्दनकाळ ठरलेला कोरोना हा बाबल्या व लक्ष्मीच्या जीवनातील मैलाचा दगड ठरला.

------सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now