मिळावे तुझे तुला आस ही ओठी ८

नात्यांची सुरुवात


मिळावे तुझे तुला आस ही ओठी

भाग ८

पूर्वार्ध

वेद त्याचे ऑफिस परत नव्याने सुरू करतो.

आता पुढे…

पिहू रमाआजी सोबत देवळात गेली होती.
कमल पेपर मधील कथांची पुरवणी वाचत सोफ्यावर बसली होती. पण तिचे सगळे लक्ष घड्याळात होते. बाहेर गाडी थांबायचा आवाज आला. तिने खिडकीतून वाकून बघितले तर वेद होता. त्याची बाईक स्टँडवर लावत होता. त्याला बघून आपोआप तिच्या ओठांच्या कडा रुंदावल्या. ती पळतच स्वयंपाकघरात गेली आणि लगेच गॅसवर चहासाठी पातेले ठेवले. मागे बघत बघत ती चहा करत होती. थोडे आले किसून त्यात घातले. नंतर खलबत्त्यात इलायची कुटली, ती पण त्यात घातली. समोर खिडकीत गवतीचहाच्या हिरव्यागार पाती हवे सोबत डोलत होत्या. ते घ्यायला म्हणून तिने कात्री हातात घेतली. पण अस्ताला जाणाऱ्या सूर्याने खिडकीतून कमलकडे डोकावले, तसे तिने हसत हातातील कात्री बाजूला ठेवली. जसे वेद त्याच्या खोलीत जायला पायऱ्या चढतांना दिसला, तिने गॅस बंद करत चहा कपमध्ये ओतला. आणि भरभर चालत त्याच्या खोलीकडे जाऊ लागली.

आतमध्ये जाणार तोच तिने आधी दारावर थाप मारली.

"ये, दर उघडच आहे."

ती पटकन आतमध्ये गेली. वेद तिला पाठमोरा उभा होता. तिला ग्लासमध्ये काहीतरी ओतण्याचा आवाज आला.

"आजही उशीर झाला." ती खिन्न झाली. आणि परत जायला मागे फिरली.

"पाणी पितोय." तिच्या कानावर शब्द आलेत. आनंदाने वळत त्याचा जवळ जात त्याच्या समोर चहाचा कप धरला. चहा देताना तिचे लक्ष त्या सजवून ठेवलेल्या बाटलांच्या कोपाऱ्याकडे ( छोटा मिनी बार) गेले. तर ते तिथे नव्हते. तिने पूर्ण खोलीभर नजर फिरवली. तिला कुठेच ते दिसले नाही. ते बघून तिच्या डोळ्यात सितारे चमकू लागले. ओठांवर गोड हसू उमलले. नुसती ओठच नाही तर तिचे मन सुद्धा हसत होते. तो सगळा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता.

चहा पिता पिता वेद तिच्याकडेच बघत होता. त्याच्यापासून पण तिच्या चेहऱ्यावरील आनंद लपला नव्हता.

"तुला ड्रिंक केलेले आवडत नाही?" वेद.

तिने नकारार्थी मान हलवली.

"ते घेतल्यानंतर माणूस हैवान बनतो." तिच्या डोळ्यात आता वेदना दाटून आल्या होत्या.

"घरं उध्वस्त होतात. नाती मातीमोल होतात." ती पायाच्या अंगठ्याने जमिनीवर काहीतरी करत बोलत होती. बोलतांना कुठेतरी हरावल्यासारखी वाटत होती.

"चहा कडू आहे. बहुतेक जयाताई साखर घालायची विसरली." विषय बदलायला तो उगाच काहीतरी म्हणाला.

"हा? मी तर घातली होती. दाखवा." म्हणत तिने त्याच्या हातातून कप घेतला. आणि नाकाने त्याचा वास घेऊन बघत होती.

"साखर बरोबरच आहे." ती कप त्याच्या पुढे धरत म्हणाली.

त्याला ते बघून खूपच हसू आले.

"सीरियल मधल्या नायिका चहा पिऊन बघतात. " वेद.

"हा, मग नायक म्हणतो आता गोड झाला. " कमल.

"हो."

"त्या पागल आहेत." ती हसत म्हणाली. त्यावर तो पण खळखळून हसला.

"बरं उद्यापासून दोन कप चहा आणत जा. "

"अय्या, एवढा आवडला तुम्हाला चहा? मला माहिती आहे मी खुप छान चहा करते. पण तुम्हाला एवढा आवडेल, असे वाटले नव्हते. तुम्ही पिणार असेल तर मी दोन काय चार कप करून आणेल."

"एक मी तुझ्यासाठी म्हणालो होतो." तो बिचाऱ्या नजरेने तिच्याकडे बघत होता.

आता मात्र तिला खूप लाजाल्यासारखे झाले होते. पलीकडे खिडकीकडे बघत त्याच्यापासून आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत होती.

"लाजातांना गोड दिसते." त्याच्या मनाने ग्वाही दिली.

"पण मला का गोड वाटली? वेद उगाचच तुझ्या डोक्यात काहीही येतं." त्याचं दुसरं मन बोलू लागलं.

"पिहू दिसत नाही?" त्याने उगाच विषय बदलला.

"रमाआजी सोबत देवळात गेलीय."

"वेमिका?"

"तिचा काहीतरी खूप महत्वाचा प्रोजेक्ट आहे तर अभ्यास करतेय."

"तुम्ही आता कंपनीचे बॉस झालात ना?" तिने कुतूहलाने विचारले.

"हा म्हणजे कंपनी आपली आहे. पण मीच शिकतोय."

तो "आपली" शब्द तिच्या हृदयाला हळूवारपणे स्पर्शून गेला. ग्रीष्मात थंड हवेची झुळूक यावी असे तिला जाणवले.

"ऑफिसला तुम्ही बाईकने जातात?"

"हो? काही प्रोब्लेम आहे का?"

"ते टीव्ही मधले बॉस असे कार मधुन उतरतात. मग डोळ्यांवरचा गॉगल काढतात आणि जोड्यांचा टकटक आवाज करत आतमध्ये जातात." कमल स्वप्नवत बोलत होती.

"आणि मग एखादी धांदरट मुलगी त्याला धडकते आणि दोघं प्रेमात पडतात." वेद.

"हो हो, अगदी बरोबर. तुम्ही पण टीव्ही बघतात हा? छुपे रूस्तम." ती भुवया उंचावत म्हणाली.

तिचे भाव बघून त्याला हसू आले.

"तसे तुम्ही बाईकवर पण छान दिसतात. एखादी धांदरट गोड मुलगी पडेल तुमच्या प्रेमात आणि तुम्ही पण.." कमल पुढे बोलता बोलता थांबली.

"मग त्यावर एक टीव्ही सीरियल काढू. त्यात आपल्या घरातलेच घेऊ." वेद.

"रमाआजीला खाष्ट सासू दाखवू." वेद.

"आणि मग त्या तुम्हाला काठीने चोपून काढतील." बोलता बोलता ती स्वतःच खूप हसू लागली. तिच्यासोबत तो पण हसू लागला.

त्याला सुद्धा आश्चर्य वाटत होते की तो असे उगाच , ज्यात काहीच अर्थ नाही, ते कसे काय बोलू शकतो.

"बापरे, पोट दुखतेय माझे आता." ती पोट पकडत हसत हसत म्हणाली.

"कमल.." राजीवचा आवाज तिच्या कानावर पडला तसे एका क्षणात तिचे हसू गायब झाले. आणि ती पुढे काहीच न बोलता क्षणात बाहेर पडली सुद्धा.

राजीवचा आवाज आला तसे वेदच्या डोळ्यात सुद्धा राग साठू लागला होता. हातातील कप तो फेकणारच होता की काहीतरी अनुभवून त्याने तो बाजूला ठेऊन दिला.

*********

कमलची आता दिनचर्या ठरली होती. राजीव सोडेल तेव्हा सकाळी उठायचं. कधी तिची सकाळ पहाटे ५ ला होत तर कधी आठ वाजता. वेळ ठरलेली नव्हती. पण जेव्हा उठेल तेव्हा छान तयार होऊन ती खाली येत. देवा जवळ दिवा लावत. कोपऱ्यात छोटीशी पण सुबक रांगोळी काढत. गाडीमधून पिहूला शाळेत सोडायचे. आजीच्या सोबतीने अशीच काही छोटी मोठी कामे करायची. थोडा टीव्ही बघायचा. अधूनमधून पुस्तकं वाचायची. पिहूचा अभ्यास घ्यायचा. तिच्या सोबत खेळायचे. वेमिका सोबत थोड्या गप्पा मारायच्या. असा काय तो तिचा दिवस जायचा. रात्र मात्र अजूनही तशीच भयावह होती. आठवले तरी तिच्या अंगावर काटे यायचे.

*********

"हा सचिन समजतो काय स्वतःला? मनात येईल तेव्हा सांगणार का?" वेमिका काहीतरी शोधत बडबडत होती.

"इतका पसारा?" कमल वेमिकाच्या खोलीत येत खोलीची हालत बघून अवाक् झाली. कारण नेहमी तिची खोली अतिशय नीटनेटकी राहत. आज पाय ठेवायला जागा शोधावी लागत होती.

तिच्याकडे दुर्लक्ष करत वेमिका आपलीच बडबड करत फेकफाक करत होती.

" काय झालं? हा सचिन कोण? अन् त्याने काय केलेय?"

"माझा मास्तर.."

"हा? त्यांचं नाव तुम्ही असं घेता?" कमल अवाक् झाल्यासारखी तिच्याकडे बघत होती.

"मग तो करतोच तसे कामं. प्रोफेसर आहे पण भयंकर तिरसट. मग सगळे असेच म्हणतात."

"यंग आहे?"

"यंग असता तर आमचे दुःख समजले नसते त्याला? ४५ वर्षाचा म्हातारा आहे." वेमिका तोंड वाकडं करत म्हणाली.

कमलला हसू आले.

"हसू नकोस."

"मग?"

"त्याची आणखी नावं सांगितली ना तर पोट फाटे पर्यंत हसशील." हसत वेमिका म्हणाली.

"जाऊ दे , आपले काम मागे पडेल." कमल.

"कोणते काम?" वेमिकाला काही कळले नव्हते.

"हेच जे तू आता करत होती.."

"कोणते?"

"फेकाफेकीचे.."

"मी माझी फाईल शोधतेय. सापडत नाहीये."

"कशी होती? मी पण शोधू लागते."

वेमिकाने तिला फाईल बद्दल सांगितले. आता दोघीही मिळून सामानांची फेकाफेकी करत होत्या.

"नाही सापडली." दोघींनी पूर्ण रूम पसरवून ठेवली.

"बाहेर शोधू. दुसऱ्या खोल्यांमध्ये असू शकते." कमल.

"तिकडे कशी जाणार?"

"महत्वाची आहे म्हणतेय ना, शोधून येऊ."

दोघींनी मिळून खालच्या सगळ्या खोल्यांमध्ये फाईल शोधली पण सापडली नाही.

"वरती बघुया." कमल.

"नको. मी वरती फार कमी जाते. तिथे नसेल." वेमिका.

"मग आता?"

"त्या सचिनने तीन दिवसात सबमिशन ठेवले आहे." वेमिका त्रासिक स्वरात म्हणाली.

"मग परत करून घे."

"अगं वीस डिझाईन्स काढायचेत. ते काय खायचं काम नाही."

"पण मग उपाय काय त्यावर?"

त्यावर वेमिकाने लहान मुलांसारखा भोंगा पसरला.

"दिदू रडतेय." पिहू हसत टाळ्या वाजवत होती.

कमलला पण हसू येत होते.

"ये पियुडी चल तिकडे जा." वेमिका.

पिहू तिला वाकडे तिकडे तोंड करत चिडवु लागली.

"मी मारेल." वेमिका.

तशी पिहू पळाली.

ही लहानगी, भावंडांची भांडणं आजीला मात्र खूप छान वाटत होती. घर घरासारखे भासत होते.

"काही दिवस आधी ते बायकांचे चित्र काढत होती, ते काय?" कमल.

"ये बायका नाही त्या.."

"हो हो जे काही आहे, पण तेच होते काय?"

"हो. ते सबमिट करायचं आहे. मग पूर्ण स्टुडंट्स मधुन पाच डिझाईन सिलेक्ट करतील. आणि मग त्या डिझायनरकडे जातील. आणखी बरंच काही आहे."

"अच्छा. तू मला त्या बायका काढून दे. मी त्यांना कपडे घालून देते."

ते ऐकूण वेमिकाने डोक्यावर हात मारला.

"अगं मी फॅशन डिझायनिंग करतेय ग. "

"हो हो, माहिती. पण मग आता वेळ नाही ना. तुला तुझी कुठली मैत्रीण मदत करत असेल तर बघ मग."

"सर्वांनाच काही ना काही कामं आहे."

"मग बघ मीच उरली आहे. ह म्हणजे आता अगदी पैकीच्या पैकी गुण मिळणार नाही कदाचित. पण नापास तरी होणार नाहीस."

"मी प्रत्येक सेमीस्टरमध्ये युनिव्हर्सिटी टॉपर राहिले आहे." वेमिका बिचारा चेहरा करत म्हणाली.

"बघ बाबा. मी कपडे घालून द्यायला तयार आहे. आणि डिझाईन थोडी इकडे तिकडे गेले तर सांगून द्यायचं हेच फॅशन आहे. तसेही ते फॅशन डिझायनर असेच करत असतील. "

वेमिकाला हसू आले. " तू फारच बिनधास्त आहेस ना."

"काय करू? दुसरं काही हातात पण नाही." कमल थोडी भावुक झाली.

"आणि डिझाईनचे काय?"

"मी टीव्हीमध्ये खूप बायकांचे कपडे बघितले आहे. "

"अगं नट्या तरी म्हण. पार त्यांची इज्जत काढली यार तू."

कमलला हसू आले.

"हा हा त्याच त्या. दोघी तिघिंच्या डिझाईन मिळवून एक डिझाइन तयार करते."

"वाह! डोकं तर खूप आहे."

"ही ही ही. मी कलेक्टर बनू शकते. "

"ही ही ही.." वेमिकाने सुद्धा बत्तिसी दाखवली.

"मला थोडं समजावून सांग. आणि उद्या कॉलेजला जयाच्या आधी २० पेक्षा जास्तच बायका काढून ठेव म्हणजे काही चुकलं तर, जास्तीचे असलेले बरे. मी कपडे बनवते. कॉलेज मधून आल्यावर काहींना तू तयार कर. दोनच दिवसात होऊन जाईल." कमल तिचा आत्मविश्वास वाढवत म्हणाली.

"बरं ठीक आहे. परत उद्या मी कोणाकडे माझी फाईल गेली काय त्याची चौकशी पण करते."

"हो ठीक आहे."

दोघीही सगळा पसारा एकीकडे करत एका कोपऱ्यात जाऊन बसल्या. वेमिका तिला थोडं थोडं समजावून सांगत होती.

दिवसभर कमल तर रात्र जागून वेमिकाने दोन दिवसात ड्रेस डिझाइनची फाईल पूर्ण केली. काही गोष्टींमध्ये थोडे कमीजास्त झाले होते. पण फाईल वेळेत देता आली, त्याचे समाधान होते.

********

आज सुट्टीचा दिवस म्हणून आजीने विनवणी करत सर्वांना एकत्र जेवायला बसवले होते. आश्चर्य म्हणजे राजीव आणि वेद दोघंही जेवायला आले होते.

"एक मिनिट." सगळे जेवायला बसणार तोच कमलचा आवाज आला. ती हातात एक मोठे पातेले घेऊन येत होती.

"साहेब, मी तुमच्यासाठी खीर बनवली आहे." ती राजीव जवळ जात म्हणाली.

"म्हणजे सर्वांसाठीच." पिहूचा उतरलेला चेहरा बघत ती म्हणाली.

"मला नको." राजीव करड्या आवाजात म्हणाला.

"साहेब, थोडी तरी घ्या." म्हणत आग्रहाने ती त्याच्या ताटात खीर वाढू लागली.

"नाही म्हटले तर कळत नाही का?" त्याने ओरडतच तिच्या हातातल्या पातेल्याला धक्का मारला. ते गरम खीरीचे भांडे तिच्या पायावर पडले.

"माई ग!" ती विव्हळली.

ते बघून वेद राजीवला काहीतरी बोलणार तोच आजीने त्याचा हात धरून ठेवला आणि डोळ्यांनीच नको म्हणून खुणावले. तसा तो चूप बसला.

आजीने जयाला इशारा केला तसे ती पिहुला आतमध्ये घेऊन गेली.

कमलचा पाय चांगलाच भाजला होता. वरून ते भारी भांडे, अंगठा थोडा चिरला गेला होता. त्या वेदनेने तिच्या डोळ्यात पाणी जमू लागले. तिने मान वर करून बघितले तर वेद तिच्याकडेच बघत होता. त्याला बघून तिने पटकन आपले डोळे पुसून घेतले.

"मिस्टर राजीव." वेमिका पुढे बोलणार तोच आजीने तिला डोळे दाखवले. तशी ती पण चूप झाली.

"मी फक्त कूकच्या हातचं खातो. बाकी मला कुणाच्याही हातचं आवडत नाही." राजीव.

"पण ती तुमची बायको ना? किती आवडीने बनवले होते." वेमिका आता मात्र चूप बसली नाही.

"बायको असू देत किंवा आणखी कोणी. जे नाही आवडत ते नाही आवडत. पुढे लक्षात ठेवायचं." तो जागेवरून उठत कमलला उद्देशून म्हणाला.

"सगळा मूड खराब केला." चिडतच त्याने कोणालातरी फोन केला. " सगळं रेडी ठेव." म्हणत बाहेर पडला.

"पायावर थोडं पाणी घे." आजी तिचा हात पकडत म्हणाली.

"मी ठीक आहे, जाते. तुम्ही जेवण करा." म्हणत ती थोडी लंगडत लंगडत पाय धुवायला बाथरूममध्ये गेली.

"माझं झालं." वेद उठून चालला गेला.

"अरे भैय्या." वेमिकाने आवाज दिला.

"जाऊ दे. शांत बसला , तेच खूप झाले. नंतर जेवेल." आजी.

कमलने पाय धुवून घेतला. पण तिला चालतांना त्रास होत होता. ती भिंतीला पकडून चालत होती. तोच तिचा तोल गेला. ती पडणार होतीच की कोणीतरी तिच्या हाताला धरून तिला आधार देत तिला सरळ उभे केले.

******

क्रमशः


🎭 Series Post

View all