मिळावे तुझे तुला आस ही ओठी ७

नकळत उमलानारे प्रेम


मिळावे तुझे तुला आस ही ओठी

भाग ७

पूर्वार्ध:
कमलने आपले आयुष्य नव्याने सुरू केले. तिचे वेद सोबत थोडे भांडण झाले होते. त्यानंतर वेद घरातून गायब होता. हळूहळू कमलचे वेमिका सोबत बोलणं सुरु होते. घरातील महिला मंडळचे बऱ्यापैकी जमायला लागले.

आता पुढे..

"रमाआजी दोन दिवसांपासून भैय्या नाही दिसला ग?" नाश्ता करतांना वेमिका इकडे तिकडे बघत म्हणाली.

वेमिकाने विचारले तसे कमलच्या सुद्धा लक्षात आले की टेरेसवर तिच्यासोबत झालेल्या वादा नंतर वेद घरात तिला दिसला नव्हता.

"सकाळी सकाळी बाहेर पडतो ते रात्री ११ नंतरच घरी येतोय. माहिती नाही काय करतोय? विचारले तर नीट सांगत पण नाही." आजी.

"मला त्याची फारच काळजी वाटते. कसं होईल या मुलाचे, देवालाच काळजी." आजी हात जोडत म्हणाली.

"रमाआजी, देवाने तुझी प्रार्थना ऐकली. तिकडे बघ." वेमिकाने आजीला पायऱ्यांकडे बघ म्हणून खुणावले.

वेदने अगदी फॉर्मल कपडे घातले होते. खुप छान तयार झाला होता. पायऱ्या उतरत खाली येत होता.

"रमाआजी, तुला लवकरच नात सूनबाई येते बघ. नक्कीच प्रपोज करायला चालला आहे बहुतेक." वेमिका.

"तुझ्या तोंडात गूळखोबरं, असेच होऊ दे बाई. एकदा का याला सांभाळणारी घरात आली की.."

"तू डोळे मिटायला मोकळी." आजीचे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच वेमिका आपली बत्तीसी दाखवत म्हणाली.

"त्याचं पोरगं बघूनच, नंतर तुझं, नंतर या पिहुचं पोरगं बघूनच डोळे मिटेल." आजी.

"जाम लंबा प्लॅन आहे तुझा तर.." तिने डोक्यावर हात मारला.

"ही असली आगाऊ नातवंडं असली की असेच प्लॅन करावे लागतात." आजी पण हसत म्हणाली. वेमिकाने तोंड वाकडे केले.

"ये कमल बघ, भैय्या काय चिकना दिसतोय." म्हणत वेमिकाने वेदला बघून सिटी मारण्यासाठी बोटं तोंडात पकडली. पण सिटी काय वाजेना.

"एक मिनिट.." म्हणत कमलने एका झटक्यात वेदकडे बघत सिटी मारली.

सिटीचा आवाज ऐकून वेद जागीच थबकला आणि दोघींकडे बघू लागला.

"कमल मेलीस तू आता.." वेमिका.

"पण मी तुझ्याकडुन केले होते तसे.." कमल.

वेदने एक कडक कटाक्ष कमलवर टाकला आणि आजीजवळ आला.

"खुप छान दिसतोय. कुणाची नजर नको लागायला." आजी त्याच्या गालाला बोटांच्या चिमटीत पकडत लोभ करत म्हणाली.

"हे ब्रो, सुपर कडक हा.." वेमिका.

तो हसला. " बरं ते सिटी कोणी मारली होती?"

वेमिकाने लगेच कमलकडे बोट दाखवले.

"मी नाही, म्हणजे मीच, पण मी नाही ही.." कमल बडबडत होती. त्याने डोळे फिरवले.

"बरं मोहीम फत्ते करून ये हं. सूनबाई घरात आलीच पाहिजे." आजी.

"काय? कोण सूनबाई?" वेद.

"हीच तर म्हणाली, तू कुठल्या तरी मुलीला प्रपोज करायला चालला." आजी वेमिकाकडे बघत म्हणाली.

"मला एवढीच फालतूची कामं आहेत काय?"

"मग तू एवढा तयार झाला आहेस. तेच वाटणार ना? कॉलेजचे सेमिनार सोडले तर मला तू असा तयार झालेला कधी दिसलाच नाही. कॉलेजच्या ट्रॅडिशनल डेजला सुद्धा तू बोर कपड्यांमध्ये जायचा." वेमिका.

"हे प्रपोज वगैरे करण्याचे पोरकट खेळ मी नाही खेळत."

" प्रेमात पडला की ते पण खेळशील." वेमिका खांदे उडवत म्हणाली.

त्याने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.

"रमाआजी, मी आपल्या कंपनीचा म्हणजे माझ्या नावावर जी कंपनी आहे, त्याचा आजपासून चार्ज घेतोय. आधीसारखे तिला परत उभे करणार. जसे बाबांनी केले होते तसे." वेद.

ते ऐकून आजीच्या डोळ्यात आनंदाश्रू जमायला लागले.

"हो रे माझ्या पिल्ल्या, तू खूप यशाची शिखरे गाठशील." आजी आपले डोळे पुसत म्हणाली.

"भैय्या, एकदम फाडू डिसिजन. आता आपल्याला काही लागलं तर कोणाची वाट बघावी लागणार नाही." वेमिका आनंदात त्याला मिठी मारायला गेली, पण जागीच थांबली. किती वर्ष झाले होते, त्याने तिला आपल्या कुशीतच घेतले नव्हते.

"येस वेमु." म्हणत त्यानेच तिला आपल्या कुशीत घेतले.
तिने सुद्धा त्याला गच्च पकडून घेतले.

"कमलचा पायगुण चांगला लागला." आजी.

"काय? काम करायला मी जातोय, त्यात हिला का क्रेडिट?" वेद चिडक्या नजरेने कमलकडे बघत म्हणाला.

"ती घरात आली आणि गोष्टी बदलू लागल्या, म्हणून म्हणाले. बाकी काही नाही. पण बाळा, खूप छान निर्णय घेतला. तुला या वेशात बघून डोळे सुखावले." आजी.

"माहिती नाही ग आजी, कितपत सफल होईल. पण प्रयत्न पूर्ण करेल." वेद.

"प्रामाणिकपणाने मेहनत करशील तर नक्कीच यशाची उंच शिखरे गाठशील. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आपलं गमावलेलं तू सगळं परत आणशील." आजी.

तो छान हसला. " बरं येतो." म्हणत त्याने आपली बॅग उचलली आणि घराबाहेर पडू लागला.

"थांबा, एक मिनिट." कमल हातात कुंकवाचे ताट आणि सोबत दहीसाखर घेऊन आली.

"नवीन सुरुवात करतात आहे ना.. रमाआजी हे घ्या." कमलने आजीच्या हातात ताट दिले.

आजीने त्याच्या कपाळावर कुंकवाचा छोटा टिळा लावला आणि दहीसाखर खाऊ घातले.

"मी पण बेस्ट विशेष देणार." वेमिकाने त्याला दहिसाखर खाऊ घातले.

"मी पण , मी पण." छोटी पिहू सुद्धा नाचू लागली.

"कमल, मला उचलून घे." पिहूने आदेश सोडला.

सगळे हसू लागले.

कमलने तिला आपल्या हातांवर उचलून घेतले.

पिहूने त्याला चमच्याने दहिसाखर भरवले.

कमल तिला डोळ्यांनी काही इशारे करत होती.

"त्याला पप्पी देऊ?" पिहू कमलचे इशारे बघून मोठ्याने म्हणाली.

"नाही, भैय्या रागावेल." पिहू छोटासा चेहरा करत म्हणाली.

"भैय्याची ही छोटीशी परी आहे ना? मग भैय्या का रागावणार?" वेद पिहूच्या गालावर पापी करत म्हणाला. आणि त्याने आपला गाल तिच्या पुढे केला. हे सगळं करतांना त्याचे सगळं लक्ष कमलकडे होते. जसे त्याने पिहूच्या गालावर पापी केली, तसे कमलच्या ओठांवर गोड हास्य लकेर उमटली होती.

ते बघून पिहू खूप आनंदली. तिने त्याच्या गळ्याभोवती आपले दोन्ही हात गुंफले आणि त्याच्या गालावर एक छोटीशी पापी दिली.

"रमाआजी, येतो." म्हणत तो आनंदाने घराबाहेर पडला.

"बस त्याने पहिल्याच दिवशी कोणाची फाईल नाही फाडली म्हणजे मिळवले." वेमिका मस्करीच्या सुरात म्हणाली.

कमलला ते ऐकून हसू येत होते.

"गप ग बदमाश. चांगलं चांगलं बोल." आजी पण हसत होती.

"हो हो. तसा तो खुप हुषार आहे. उगाच आपल्याकडे इतक्या ट्रोफिज आणि मेडल नाहीत. त्याचा रूममध्ये आहेत, एका कपाटात, बघशील." वेमिका कमलला म्हणाली.

"रमाआजी मी पण निघते कॉलेजला." बोलता बोलता वेमिका सुद्धा घराबाहेर पडली.


******

कमल आता पिहूचा गृहपाठ घेऊ लागली. आधी अजिबात अभ्यासाला न बसणारी पिहू उत्साहाने अभ्यास करत होती. कमल सुद्धा तिला छोट्या छोट्या गोष्टी स्वरूपात अभ्यासाचे शिकवत होती.

पिहूचा अभ्यास आटोपला होता. पिहू बाहेर खेळण्यासाठी हट्ट करू लागली. दूध वगैरे पिऊन पिहू, कमल आणि जया बाहेर लॉनमध्ये गेल्या. कमल आणि पिहू पकडा पकडी, लपाछपी असे खेळ खेळत होत्या. दोघीही खेळण्यात गुंग झाल्या होत्या.

आता दोघींचा आंधळीकोशिंबीर खेळ सुरू झाला होता. त्यात जया सुद्धा त्यांच्यासोबत सामील झाली होती. सगळ्यांचे आळीपाळीने डोळ्याला पट्टी बांधणे सुरू होते. आता कमलवर खेळी आली होती. जयाने तिच्या डोळ्याला पट्टी बांधली.

"कमल, कमल.." पिहू उड्या मारत, टाळ्या वाजवत तिला आवाज देत होती.. अधूनमधून जया सुद्धा तिला आवाज देत होती. आवाज येईल त्या दिशेने कमल वळत होती. आता पिहुला खूप मजा येत होती. ती लांब लांब पळत आवाज देत होती. कमल त्या त्या दिशेने जात होती.

"सांभाळून.."

आवाजा सोबतच कमलचे डोकं पुढे आपटले. पण तिचे कपाळ मुलायम असे काहीतरीवर आदळले होते. आणि आवाज पण तिला ओळखीचा वाटला. तिने झटकन डोळ्यांवरिल पट्टी काढली. बघते तर समोर एक मोठा खांब होता आणि तिच्या कपाळा समोर हाताचा पंजा होता. ज्यामुळेच खांबावर डोकं आपटता आपटता वाचले होते. तिने वळून बाजूला बघितले तर वेद तिच्याकडे बघत उभा होता.

"कमल हारली, कमल हारली. पिहू जिंकली." पिहू टाळ्या वाजवत आनंदाने हसत हसत उड्या मारत होती. तिला खळखळून हसतांना बघून वेद आणि कमलच्या ओठांवर सुद्धा हसू पसरले.

"लागले असते. लक्ष ठेवून खेळत जा." वेद.

त्याच्या आवाजात तिला काळजी जाणवली. आनंदने तिच्या अंगावर शहारे आले. त्या चार शब्दांनी कमल सुखावली.

"दर्द से डर नही लगता भार्गव बाबू, प्यारसे लगता हैं." ती अगदी सोनाक्षी सिन्हाची हुबेहूब नकल करत म्हणाली.
आणि त्यानंतर लगेच तिच्या अंगात अमिताभ बच्चन आले, "हाईं.." ती बोलतांना थोडी कंबरेत वाकली होती.

ते बघून वेदला हसू आले. हसतच तो घरात गेला. ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बऱ्याच वेळ बघत उभी होती.

"जया मावशी पिहूकडे लक्ष द्या. भार्गव आताच ऑफिसमधून आलेले दिसतात आहे. मी त्यांना चहा देऊन येते." कमल थोडे मोठ्याने बोलत आतमध्ये पळत गेली.

"आहो ताई, वेद दादा चहा नाही घेत." जया सांगतच होती की ती आतमध्ये पोहचली सुद्धा होती.

दारावर थाप पडल्याचा आवाज आला.

"उघडच आहे." आतून वेदने आवाज दिला.

"ते तुम्ही थकले असणार तर चहा आणला होता." चहाचा ट्रे घेऊन आतमध्ये येत कमल म्हणाली.

"मी चहा घेत नाही." म्हणत त्याने दोन बर्फाचे क्यूब ग्लासमध्ये टाकले. त्या बर्फाच्या आवाजाने कमल घाबरली आणि तिचे हात थरथरू लागली. त्यामुळे तिच्या हातातील ट्रे हलू लागला.

ग्लास हातात घेत ओठांना लावणार तोच कपाच्या होणाऱ्या आवाजामुळे त्याचे लक्ष कमलकडे गेले. त्याने हातातील ग्लास बाजूला ठेवला आणि तिच्याजवळ गेला.

"केअरफुली, पडेल ते." म्हणत त्याने तिच्या हातातील ट्रे घेतला आणि बाजूला टेबलवर ठेवला.

"काय झालं?" वेद.

"ह? काही नाही." तिचे अजूनही लक्ष त्या भरलेल्या ग्लासकडेच होते.

"काही काम होते?" वेद.

"नाही. ते मी , मला माहिती नव्हते तुम्ही चहा घेत नाही." ती टेबलवरचा ट्रे उचलत परत जायला निघाली.

"हम्म." वेद.

काहीतरी आठवून ती परत फिरली.

"आज मला चहा आणायला उशीर झाला. उद्या लवकर आणला तर घेणार काय? चहा पिल्यावर तुम्हाला खूप फ्रेश वाटेल. सगळा थकवा दूर होईल. " ती खूप आशेने त्याच्याकडे बघत म्हणाली.

"हम्म.." तो एक भूवयी उंचावत तिच्याकडे बघत होता.

"हम्म म्हणजे हो ना? ठीक आहे मी उद्या लवकर घेऊन येईल."

तो काहीच बोलला नाही.

ती परत जायला वळली. तिला परत काहीतरी आठवले आणि तर परत फिरली.

"आता काय?"

"ते आज तुम्ही आज ऑफिसमध्ये किती फाईल्स फडाल्या?" ती पटकन बोलली.

"काय? फाईल्स फाडायला मी तुला मूर्ख दिसतोय?"

"अ हो.. नाही.." ती चाचरत म्हणाली.

"मी का फाईल्स फाडू?"

"तुम्ही फाडली काय, तेवढे सांगा?"

"नाही."

"मी जिंकले.." ती स्वतःशीच पुटपुटली.

"काय? काय म्हणाली?"

"ते वेमिका म्हणाली जर भैय्याने आज एकही फाईल फाडली नाही तर समजून जायचं भैय्याने पहिली लढाई जिंकली."

"मी काय तुम्हाला तोडफोड करणारा वाटतो काय?"

"हो.."

ते ऐकून त्याने डोक्यावर हात मारला. ती ट्रे घेऊन तिथून पळाली. जरा भराभर चालल्यामुळे तिची वेणी सुद्धा तिच्या लयीत चालण्याच्या लयीत साथ देत होती. तो बऱ्याचवेळ पाठमोऱ्या तिच्या आकृतीकडे बघत होता.

****

दुसऱ्या दिवशी वेद ऑफिसमधून आला तसेच पाठोपाठ कमल त्याच्यासाठी चहा घेऊन गेली. त्याच्या खोलीत गेली तसे समोरचे दृश्य बघून तिच्या ओठांवर खूप गोड हसू पसरले. डोळ्यात आनंदाचे सितारे चमकू लागले.

******
क्रमशः

******





🎭 Series Post

View all