मिळावे तुझे तुला आस ही ओठी ४

चित्र विचित्र पण पवित्र नातं


मिळावे तुझे तुला आस ही ओठी

भाग ४

पूर्वार्ध:
राजीव आणि कमलच्या पहिल्या रात्री जे काही घडले त्यावरून वेद खूप रागावला होता. पण संध्याकाळी एक वेगळीच निरागस कमल त्याच्या समोर येते. रात्री राजीव घरी आल्यावर तिला वरती रूममध्ये यायला सांगतो. तेव्हा मात्र ती खूप घाबरते.

आता पुढे…


"मला काहीही ऐकायची सवय नाही. जे म्हटल्या जाते ते लगेच व्हायला पाहिजे." राजीव थोडा रागाने बोलला.

फ्रिज मधुन पाण्याची बाटली घ्यायला आलेला वेद बाहेरचा गोंधळ ऐकून हॉलमध्ये आला. कमल त्याला पाठमोरी उभी होती.

"वरती चलायचं, लवकर." राजीव अक्षरशः ओरडला.

त्या आवाजाने कमलचा थरकाप उडाला होता.
वेदने तिच्याकडे बघितले तर मागून तिची साडी ओली झाली होती. ते बघून ती किती घाबरली आहे, वेदला त्याचा अंदाज आला होता.

साडी ओली झाली हे लक्षात येताच कमल साडीचा पदर पकडत, वळून पाठीमागे हात लावत आपल्या पायांकडे बघत होती. आणि तिच्या लक्षात आले तिने काय केलेय. मान वरती केली तर वेद तिच्याकडे बघत होता. उरात भीती, थरथरणारे अंग, ओले झालेले कपडे आणि पाय, ते बघून घरातील सगळे काय म्हणतील? आणि पुढल्या काही क्षणानंतर मिळणार आहेत त्या नरक यातना.. तिच्या डोक्यात, मनात काय काय होत असेल?
तिची वेदच्या नजरेला नजर मिळाली आणि तिला आता रडु फुटले. अश्रू गालांवरून भरभर ओघळू लागले. पण रडण्याचा आवाज निघायला नको म्हणून तिने हातांनी आपले तोंड दाबून धरले.

"कमल पाच मिनिटात रूमध्ये पाहिजे." राजीव बोलला आणि वरती आपल्या रुमकडे जाऊ लागला.

"तिची तब्बेत बरी नाही." वेद राजीवला उद्देशून म्हणाला.

वेदचे ते शब्द ऐकून कोणीतरी तिच्या घावांवर फुंकर घालत आहे, असे तिला जाणवले.

"मग?" राजीव कुत्सितपणे म्हणाला.

" तिला ताप आहे. आजीजवळ आराम करू देत." वेद.

घरातील सगळे त्या दोघांकडे बघत होते.

"माझ्या बायकोसोबत मी काय करायचं, हे सांगणारा तू कोण?" राजीव.

"बायको आहे म्हणून जीव घेणार का ?" वेद.

"हो. मला जे वाटेल ते करेल. माझ्या आयुष्यात बोलण्याची गरज नाही." राजीव.

"माणूस आहे की है.." बोलता बोलता वेद चूप झाला.

"आधीच सांगितले आहे, माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही. ती वेमिका, मुलांसोबत फिरत असते. मी काही बोलतो काय?" वेमिकाकडे बघत राजीव म्हणाला.
ती खाऊ की गिळू नजरेने त्याला बघत होती.

"हा वेदभार्गव, नावच फक्त मोठे आहे, बाकी दर्शन खोटे. चोवीस तास दारूत बुडालेला असतो. नाहीतर हातपाय आपटत घरातील वस्तू तोडत असतो. मी काही बोलतो काय? नाही ना? मग माझ्या गोष्टींमध्ये तोंड खुपसायचं नाही." राजीव.

ते ऐकून वेदला खूप राग आला होता. पण त्याचे लक्ष कमलकडे गेले. तिला बघून त्याचा राग शांत झाला.

"असं का होतंय? का तिच्या डोळ्यातील अश्रू बघितले की त्रास होतोय? मला तर ती थोडी सुद्धा आवडली नाही. तिच्या सारख्या पैशांसाठी आपली पातळी सोडून वागणाऱ्या लोकांचा मला किती तिरस्कार आहे. तरी का मला तिच्या डोळ्यात अश्रू आवडत नाहीये?" तिला बघतांना त्यांना डोक्यात हजार प्रश्न निर्माण होत होते. पण राजीव इकडे ऐकत नाहीये बघून त्याला संताप होत होता.

"माझ्या घरात असे चालणार नाही." वेद.

"माझ्या घरात? बापरे! घाबरलो हा मी." तो राक्षसी हसू आणत म्हणाला.

"हो. हे घर माझं आहे. " वेद

"अच्छा बरं ते घरात.. बरं ते जाऊ दे. मला सांग तू ही तोडफोड करतोय, त्याचे पैसे कुठून येतात? या ज्या तू दारूच्या कॉस्टली बॉटल्स सजवून ठेवल्या आहेत, त्याचे पैसे कुठून येतात?" राजीव कुत्सितपणे हसत म्हणाला.

"३० टक्के शेअर्स माझ्या नावावर आहेत." वेद.

"हो?" राजीव जोरजोराने हसू लागला.

"तुझ्या नावावर कंपनीचा जो भाग आहे, ते ऑफिस डुबत चालले आहे. जसे सुरू आहे तसे राहिले तर लवकरच बंद पडेल. लॉसमध्ये चाललाय. वरून त्याचा पण टॅक्स मीच भरतोय. राधिकाला वचन दिले आहे म्हणून, नाहीतर कधीच रस्त्यावर फेकले असते. आला मोठा माझे घर सांगणारा."

"मिस्टर राजीव.." वेद आता चांगलाच चिडला होता. तो हाताच्या मुठी आवळू लागला.

"वेद, शांत हो." आजी मध्ये पडली.

"नाय नाय, घाबरु नका मी काय असं करणार नाही. फक्त लक्षात ठेवायचं, मी आणि माझ्या बायकोमध्ये पडायचं नाही. मी माझ्या बायकोसोबत कसेही वागेल, तुम्हाला कोणालाच त्यात बोलायचा हक्क नाही. लक्षात ठेवायचं." बोलत एकदा राजीवने कमलकडे बघितले आणि ताडताड वरती निघून गेला.

कमल सगळ्यांकडे बघत बघत हळू हळू पायऱ्या चढत होती.

"रमाआजी, हा मरत का नाही?" वेमिका.

"वेमिका, तोंड सांभाळून. त्याने लाज विकली म्हणून आपण आपले संस्कार विसरायचे नाही." आजी रागावली.

ते ऐकून वेमिका पाय आपटत आपल्या खोलीत चालली गेली.
वेदने एक बाटली उचलली आणि बाहेर लॉनमध्ये जाऊन बसला.

इकडे राजीवच्या पाठोपाठ कमल खोलीत गेली.

"तयार राहायला सांगितले होते." राजीव कमलवर डोळे रोखत म्हणाला.

"ते.. ते.. कपडे खूप लहान.." तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते.

"अर्ध्या तासात आंघोळ करून तयार व्हायचं." राजीवचा भेसूर आवाज आला.

ती मान हलवत चुपचाप बाथरूममध्ये गेली.

**

"मॉम, यू स्पॉइल अवर लाईफ.." रागाने आकाशाकडे बघत वेदने तोंडाला बाटली लावली आणि गटागट एक एक घुट घशाखाली उतरवू लागला.

बाटली संपली, तसा तो उठला आणि आपल्या खोलीकडे जायला निघाला.

इकडे कमल आंघोळ करून बाहेर आली. तिने राजीवने आणलेला शॉर्टपिस, त्यावर एक लांब पायघोळ जाळीचे जॅकेट घातले होते.

"हम्म, बरं दिसतेय." तो तिच्या पूर्ण अंगावरून नजर फिरवत म्हणाला. तो काही व्हिडिओ बघत सोफ्यावर बसला होता.

त्याच्या त्या नजरेने तिला कसेतरी झाले.

"जॅकेट काढ."

पण ती तशीच चुपचाप खाली बघत उभी होती.

"लवकर." त्याचा आवाज थोडा मोठा झाला.

तिने घाबरत जाळीचे जॅकेट काढले.

"थोडे शेपमध्ये आणावे लागले. जेवण वाढव."

तिने होकारार्थी मान हलवली.

"बाहेर कॉर्नरमध्ये बर्फाची पेटी आहे. त्यातून बर्फ घेऊन ये." तो एक पेग बनवत म्हणाला.

ती मान हलवत बाथरूमकडे जायला निघाली.

"तिकडे कुठे जातेय? बाहेर लेफ्ट कॉर्नरला."

"ते कपडे घालायला."

"असंच राहायचं. बाहेर कोणी नाही. झोपलेत सगळे. "

घाबरतच तिने बर्फाचा ट्रे उचलला आणि बाहेर जायला दार उघडले. तिचे बाहेर जाणे आणि वेदचे त्याचा खोलीकडे येणे, एकत्र आले.

वेदला बघून ती दारातच थबकली. वेदला समोर बघून, आपण कुठल्या कपड्यात आहे, हे तिच्या लक्षात आले. लाजेने ती तिच्या हातांनी ड्रेसचा गळा नीट करण्याचा प्रयत्न करत होती. सोबतच आपल्या हातांनी आपले उघडे अंग लपवण्याचा तिचा केविलवाणा प्प्रयत्न सुरू होता. पण तो ड्रेसच इतका खुला खुला होता की कितीही प्रयत्न केला तरी काहीच लपत नव्हते.
पण वेदचे मात्र सगळं लक्ष तिच्या डोळ्यांकडे होते.

"आईस क्युब्ज.." राजीवचा आतून आवाज आला.

आवाज ऐकून तिच्या पुढ्यात उभा असलेला वेद, बाजूला झाला.

घरातील लाइट्स बंद झाले होते. कुठूनतरी मंद मंद डिमलाईटचा प्रकाश तेवढा येत होता.

कमल जागा शोधत चाचपडत बर्फाची पेटी शोधत होती.
वेद पण तिच्या मागे मागे जात होता. तिच्या लक्षात आले तसे ती एका जागी थांबली आणि वेदकडे बघू लागली. तर तो त्याचा तोल सांभाळत तिच्याजवळ येत होता. ते बघून तिला त्याची भीती वाटत होती. तो जसे जसे तिच्या जवळ जात होता, तसे तसे भीतीने तिच्या हृदयाचे ठोके वाढत होते. त्याला जवळ येताना बघून ती मागे मागे जात होती. शेवटी मागे भिंत आली आणि ती तिथेच अडकली. आता वेद तिच्या खूप जवळ गेला होता. त्याचा तोल गेला आणि तो तिच्या अंगावर पडणार तोच त्याने आपल्या एका हाताने भिंतीचा आधार घेत तोल सांभाळला.

"काही पाहिजे काय?" ती घाबरत हळू आवाजात म्हणाली.

"शss!" त्याने तिला चूप राहण्याचा इशारा केला.
त्याने तिची वेणी हातात घेतली.

"क.. काय.. करताय?"

"शss!" त्याने परत बोट दाखवत तिला चूप राहायला सांगितले.

तिच्या वेणीचा बांध खोलत, सगळे केस मोकळे केले. केसांचे दोन भाग करत दोन्ही खांद्यापासून पुढे आणले. मोकळे करत ओढणीसारखे खांद्यावर पसरवून दिले. आता पोटापर्यंत तिचे शरीर झाकल्या गेले होते. त्याने एकदा तिच्याकडे बघितले आणि आपल्या खोलीत निघून गेला.

ते बघून तिच्या डोळ्यात परत आसवे दाटून आली होती. स्वतःचा तोल सांभाळत, तिच्या शरीराला थोडासाही स्पर्श न होऊ देता, त्याने तिच्या शरीरावर लज्जेची चादर ओढली होती.

बर्फ घेऊन परत जातांना ती वेदच्या खोलीकडे बघत होती. पण त्याच्या खोलीचे दार आतापर्यंत बंद झाले होते. ती चुपचाप खोलीत निघून आली.

"एसी बंद कर आणि खिडक्या उघड." राजीव पोटात ग्लास रिचवत म्हणाला. ती चुपचाप त्याचा सगळ्या आदेशांचे पालन करत होती.

इकडे वेद झोपायचा प्रयत्न करतच होता की त्याला पैंजणचा आवाज येऊ लागला. तो आवाज ज्या लयीत येत होता, ते त्याला खूप अस्वस्थ करणारे होते. तो आपल्या कानांवर उश्या ठेवत कान दाबण्याचा प्रयत्न करत होता. पण आता घुंगरूच्या आवाजासोबत आता आणखी बरेच आवाज त्यात मिसळू लागले होते. आणि एक शेवटची जोऱ्याची किंकाळी ऐकू आली.

इकडे कमलचे डोळे आसवांनी भिजले होते.
तिकडे वेदच्या डोळ्यांचा कोनातून पाणी येत त्याची उशी भिजवत होते.

********

आता रोजचा दिवस असाच जाऊ लागला होता. दिवस कमलच्या कन्हण्याने तर रात्र किंकाळ्यांनी जात होती.

*******

आठ- दहा दिवसांनी…

सकाळी कमल छान तयार होऊन, पायऱ्या उतरत खाली येत होती. तिच्या ओठांवर एक छान हसू पसरले होते. तिचा चेहरा खूप प्रसन्न दिसत होता.

आज पहिल्यांदा ती घरात अशी प्रसन्न हसतांना दिसत होती. सगळे अवाक् होत तिच्याकडे बघत होते.

******

क्रमशः



🎭 Series Post

View all