मिळावे तुझे तुला आस ही ओठी २

चित्र विचित्र प्रेम


मिळावे तुझे तुला आस ही ओठी

भाग २

पूर्वार्ध :

घरातील सर्व जेवण करत असतात तेवढयात ५० वर्षीय राजीव एका १७ वर्षीय मुलीसोबत लग्न करून येतो. ते बघून घरातील सर्वांना धक्का बसतो. रागाने वेदच्या हातातील ग्लास फुटतो. सगळ्या काचा हातात घुसतात. आणि तो तसाच घराबाहेर पडतो.


आता पुढे…


वेदचा तो अवतार बघून आधीच घाबरलेली कमल आणखीच जास्त घाबरली होती. भीतीने तिचे अंग थरथरत होते.

"सगळा मूड खराब केला. सुट्टीच्या दिवशी पण मनासारखे जगता येत नाही." बडबडत वेमिका आपल्या खोलीत निघून गेली.

कमल एका जागी उभी सगळ्यांना फक्त बघत होती.

"ये इथे बस माझ्याजवळ." आजीने तिला आपल्याजवळ बसवले.

"पिहू, बाळा बघ कोण आलंय?" आजीने आवाज दिला तसे लहानगी पिहू पळतच आजीजवळ गेली.

"रमाआजी, ही कोण आहे?" पिहू कमलला निरखून बघत म्हणाली. कमलच्या लांब केसांची रेशमी वेणी बघून तिला फार मजा वाटली. ती हळूच तिच्या जवळ गेली. आणि तिच्या केसांना हात लावू की नको विचारात असतांनाच शेवटी तिने हातात वेणी घेतली.

"रमाआज्जी, किती मऊ मऊ आणि मोठ्ठे आहे." ती वेणी सोबत खेळत म्हणाली. ते ऐकून कमल खुदकन गालात हसली. आणि तिने पिहूला उचलून घेत, आपल्या मांडीवर बसवले.

"रमाआज्जी ही छान आहे. मला आवडली." पिहू.

"ही आता तुझी आई आहे." आजी.

"ही माझी आई नाही. माझी आई ती आहे." पिहू एक चंदनाचा हार घातलेल्या फोटोकडे हात दाखवत म्हणाली.

"ही शी आहे." म्हणतच पिहू कमलच्या मांडीवरून झटकन खाली उतरली आणि गुरफटून बसली.

"राधिकाला जाऊन जास्त दिवस झाले नाही. पोर अजून काहीच विसरली नाही." आजी पिहूच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाली.

"ते रमाआजी मला आताच पहिल्यांदा भेटली ना, म्हणून त्यांना माहिती नाही मी कोण आहे. हो ना रमाआजी?" कमल पिहूच्या हाताला पकडत म्हणाली.

"हो." आजीने मान डोलावली.

"मी आणि पिहू तर मैत्रिणी आहोत. बघा आम्ही सारख्या सारख्याच आहोत. फक्त माझे केस पिहुच्या केसांपेक्षा थोडे लांब आहे, इतकंच. हो ना पिहु?" कमलने परत पिहुला आपल्या कुशीत घेतले.

"खरंच तर आहे. कमल लहानच आहे. पिहु नंतर घरात आता सगळ्यात लहान तीच आहे." आजी त्या दोघींकडे बघत विचार करत होती. पण कमल राजीवची बायको, या विचाराने तिला खूप वाईट वाटत होते.

"अय्या, खरंच? तू माझी फ्रेंड आहे?" पिहुच्या डोळ्यात आनंदाच्या चांदण्या चमकू लागल्या.

"हो. आपण दोघी बेश.. बेश्.."

"बेस्ट फ्रेंड्स." पिहु उत्साहाने ओरडली.

"हो हो तेच, बेस्ट फ्रेंड." कमल तिच्या गालाची एक पापी घेत म्हणाली.

आता दोघींच्या आता छान गप्पा रंगल्या होत्या. दोघीहीजणी खळखळून हसत होत्या.

किती तरी वर्षांनी घरात असा हसण्याचा आवाज फिरत होता. आजी कितीतरी वेळ आनंदाने दोघींकडे बघत बसली होती.

"कमल, चल मी तुला माझी खेळणी दाखवते." कमलचा हात पकडत पिहु तिला ओढत घेऊन जाऊ लागली. कमल आजीकडे बघत होती.

"जया, जा कमलला घर दाखव." आजी म्हणाली.

पिहु आणि कमल पुढे पुढे तर जया त्यांच्या मागे मागे जात होती. पिहुने कमलला पूर्ण घर दाखवले.

"बापरे पिहु, कहाणी घर घर की मध्ये दाखवतात तसेच घर आहे. अगदी राजवडाच." कमल चौफेर बघत म्हणाली.

"ताई, वरती चला, आणखी आहे." जया म्हणाली.

"बापरे मावशी माझे तर आताच पाय दुखले. वरचे घर आता नंतर बघू." कमल.

ते ऐकून पिहु खुदकन हसली.

नंतर दोघीजणी पिहुच्या खोलीत आल्या. पूर्ण खोली छान छान खेळण्यांनी भरली होती.

"बापरे पिहु, तू एकटी इथे झोपते?" कमल तिथे ठेवलेला मोठा पलंग बघत म्हणाली.

"ही ही ही." पिहु आपले दोन्ही हात तोंडावर ठेऊन हसत होती.

"मी रमाआजी जवळ झोपते. इथे फक्त खेळते." पिहु.

कमलचा दिवस तर छान गेला होता. आता रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. प्रत्येकजण आपापल्या सोयीने जेवण करून गेले होते. राजीवने सुद्धा जेवण आटोपले. कमलला त्याच्या खोलीत लवकर यायला सांगून, आपल्या खोलीत निघून गेला. काही न बोलता तिने होकारार्थी मान हलवली.

"मी तुम्हाला काय म्हणून आवाज देऊ?" कमल थोडी गोंधळली वाटत होती.

"रमाआजी. आपण फ्रेंड्स आहोत ना. मग माझी रमाआजी मी तुझ्यासोबत शेअर करू शकते. हो ना रमाआजी?" एका क्षणात पिहु उत्तरली.

"हो." आजी हसत म्हणाली. पिहुचा उत्साह, आनंद ती कोणाचे काय नाते हे सांगण्याचा नादात पडली नाही. मनाचं मनाने जुळलेल्या नात्यालाच ती श्रेष्ठ मानत होती.

"बरं पिहु, चला ब्रश करून या. सुट्टी संपली. उद्या शाळा आहे. लवकर उठायचं." आजी जयाला इशारा करत म्हणाली.

"मी आणि कमल माझ्या खोलीत झोपणार." पिहु.

" आज ती थकली आहे ना.." आजी.

"नाही. मी तिच्याजवळच झोपणार." पिहु हट्ट करू लागली.

"मला रात्री एकटीला भीती वाटली तर? मी तर रोज तुझ्यासोबत झोपते ना?" आजी.

"अरे हो, हा पण प्रोब्लेम आहे. कमल मला आजीजवळ झोपावे लागेल. रात्रीतून तिला काही लागले तर?"

कमलने हसत मान डोलावली.

जया पिहुला घेऊन आतमध्ये गेली.

"सगळे एकत्र जेवत नाहीत?" कमल सगळे गेलेले बघून आजीला म्हणाली.

"नाही ग. प्रत्यकजण त्यांचा कामात खूप व्यस्त झालेत." आजी.

"आणि ते, ते भार्गव? ते घरी परत आले नाहीत? त्यांच्या हाताला खूप लागलं होतं." कमल.

"राग शांत झाला की येईल तो परत." आजी.

"खुप रागीट आहेत काय?" कमल. तिच्या चेहऱ्यावर घाबरलेले भाव जमा झाले होते. ते बघून आजी थोडी हसली.

"हो म्हणजे तो थोडं लवकर चिडतो. रागही खूप येतो. पण गोड आहे माझा नातू." आजी.

"अच्छा." कमल कसंनुस हसली.

"त्याच्या लहानपणापासूनच काय काय घडत गेले. ते सगळं बघून तो थोडा कठोर झाला आहे. पण असा रागीट नाही." आजी.

"म्हणजे काय झाले?" कमल.

"राधिका माझी मुलगी. मला एक मुलगा पण आहे. पण तो तिकडे अमेरिकेत स्थायी झाला. वेदचे बाबा हेमंत, म्हणजे राधिकाचे पहिले पती. खुप हुशार, खूप शांत आणि सालस व्यक्ती. खुप मेहनतीने एवढा मोठा बिजनेस उभा केला. वेमिका झाल्यावर एका अपघातात ते गेले. राधिका कोलमडून पडली. पण नंतर स्वतःला सावरत ती बीजनेस बघू लागली. मग त्यातच तिची ओळख राजीव सोबत झाली. आणि दोघांनी लग्न केले. काही वर्षांनी पिहु झाली. त्यानंतर राधिका सतत आजारी राहू लागली. आणि आता काही महिन्यांआधी ती आम्हाला सोडून गेली." आजीने थोडक्यात सांगितले.

"अच्छा म्हणूनच.."

"कमल.." राजीवचा एक कडक आवाज आला.

"नंतर बोलू. जा आता." आजी.

"रमाआजी मला इथेच तुमच्याजवळ आवडले. मी इथेच थांबू?" आतापर्यंत खळखळणारा तिचा चेहरा, आता उतरला होता.

"तुमचं लग्न झाले आहे. त्या नात्याने त्याने बोलावले तर तुला जावे लागेल." आजीला काय बोलावं सुचत नव्हते.

"पण लग्नासारखं काहीच तर झाले नाही. ना हळद झाली, ना चुडा भरला, ना आंतरपाट धरला, ना सप्तपदी चालली, ना मी हातांना मेहंदी लावली, नाही वाजंत्री वाजली." कमल.

" कुठल्या पेपरवर हस्ताक्षर केले होते काय?" आजी.

कमलने नकारार्थी मान हलवली.

"माई म्हणली आता साहेब तुझा नवरा आहे." कमल.

"माई म्हणजे कोण?" आजी.

"माझी आई." कमल.

"मग तिने सांगितले आहे तर झाले असेल."

"पण लग्न असं कुठं असतं? ते सीरियलमध्ये दाखवतात तसे असते. सगळीकडे आनंद आनंद असतो. पण मला तर तसा काहीच आनंद झाला नाही. साहेब पण माझ्यापेक्षा मोठे आहेत."

आजीला तर काय बोलावे कळत नव्हते. त्या निरागस मुलीला बघून आजीच्याच डोळ्यात अश्रू जमा होऊ लागले.

"तुझी माई काय म्हणाली?"

"साहेब जे म्हणतील, ते ऐकायचं आणि तसं वागायचं."

"कमल.." राजीव ओरडत खाली बघत होता.

"राजीव, मी म्हणते कमल आजच आली आहे. तिच्यासाठी घर नवीन आहे तर इथे खाली पिहु जवळ झोपू देत." आजी त्याचाकडे बघत म्हणाली.

"कमल.." आजीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्याने परत आवाज दिला. त्याचे डोळे लाल लाल दिसत होते.

"हो." घाबरत कमल चुपचाप वरती त्याच्या खोलीत गेली.

आजीने पदराने आपले डोळे टिपले आणि ती पिहु जवळ निघून आली.

दुसऱ्या दिवशी सकाळी थोड्या उशिराने वेद घरी आला. आणि सरळ वरती आपल्या खोलीकडे जायला निघाला.

"चालता येत नाही. खुप दुखत आहे." कमलचा रडत कण्हण्याचा आवाज आला. तसे वेद जागीच थबकला आणि त्याने वळून राजीवच्या खोलीकडे दारातून आत बघितले.

"आजी, ताईसाहेबची हालत खूप खराब आहे. अंगात खूप ताप भरला आहे. पहिल्यांदा होते, त्यांना सहन झाले नाही." जया रक्ताने लाल झालेली पलांगवरची चादर आणि कमलच्या मानेवर असलेले ओराबडण्याचे निशाण दाखवत म्हणाली.

"पोरीला क्रीम लावून दे आणि गरम पाण्याच्या पिशवीने अंग शेकून दे. काही खाऊन झाल्यावर तापाचे औषध देते, दुखणं थोडे कमी होईल. " आजी कमलच्या डोक्यावरून हात फिरवायला गेली तर ती आपला चेहरा चादरीत लपवत थोडी मागे सरकली.

"अग पोरी, मी आहे, रमाआजी." आजी मायेने कोमल आवाजात म्हणाली. तसे तिने आपली मान वर केली.

कमल पलंगावर बसली होती. चादर, ब्लँकेट सगळं छातीशी गोळाकरून, स्वतःला त्यात लपवण्याची प्रयत्न करत होती. केस विस्कटलेले होते. ओठांजवळ हिरवंनिळ होऊन ते सुजल्यासारखे झाले होते. डोळ्यातून कितीतरी अन्गिणत अश्रुंच्या सुकलेल्या धारा दिसत होत्या.

जयाचे एक एक शब्द ऐकून, त्या चादरीची अवस्था बघून आणि कमलचा तो निस्तेज चेहरा, घाबरलेली अवस्था बघून रात्री तिच्यासोबत काय काय झाले असेल, सगळं वेदला त्याचा डोळ्यांसमोर दिसू लागले होते. आपोआप त्याच्या हाताची मुठ्ठी आवळली गेली. राजीवचे क्रूर रूप आठवून त्याने जोऱ्याने पंच भिंतीवर मारला. त्याचा आवाज इतका जोरदार झाला होता की कमल घाबरून दचकली. तिचे डोळे अश्रूंनी काठोकाठ भरले. ती भरल्या डोळ्यांनी वेदकडे बघत होती. हात भिंतीवर मारल्याने बँडेज असलेल्या हातातून परत रक्ताच्या धारा वाहू लागल्या.

"जया हिला सांभाळ. मी वेदला बघते." कमलला जयाच्या स्वाधीन करत आजी बाहेर आली.

*****

क्रमशः





🎭 Series Post

View all