मिळावे तुझे तुला आस ही ओठी २२

हसती रहे तू हसती रहे..
मिळावे तुझे तुला आस ही ओठी

पूर्वार्ध:
कमल भूत चित्रपट बघते. त्यामुळे ती बरीच घाबरली असते. रात्री सुद्धा तिला झोप येत नाही. वेदला तिची परिस्थिती कळते आणि तो तिच्या बाजूला येऊन झोपतो.

आता पुढे…

भाग २२

कमलने डोळे किलकिले करत उघडले तर आजूबाजूला बऱ्यापैकी अंधार जाणवत होता. तिच्या कुशीत तोच लोड होता जो वेद रात्री घेऊन झोपला होता. बाजूला बघितले तर वेमिका झोपली होती. आळोखे पिळोखे घेत ती परत झोपायला डोळे मिटणार तोच तिचे लक्ष समोर असलेल्या घड्याळात गेले.

"बापरे नऊ." ती ताडकन जागेवर उठून बसली. तिला आसपास खूप शांतता जाणवली.

"बापरे पिहूला शाळेसाठी उशीर होईल." स्वतःशीच बडबडत, आपले केस नीट करत ती हॉल बाहेर पडत होती तर तिला जया दिसली.

"जया काकी, मला उठवले का नाही. आता सगळाच उशीर होईल." कमल.

"वेद दादांनी उठवायचे नाही म्हणून ताकीद दिली होती." जया.

वेद नाव ऐकून तिच्या ओठांवर आपसूकच हसू पसरले. परत तिला रात्रीचा तो गोड वेद आठवला.


"बस एक.. एक लास्ट.."

"नो."

"येस."

"नो नो नो.."

"येस येस येस."

"बोलत काय बसले, तिकडे पिहू वाट बघत असेल." बडबडत कमल आतमध्ये जाऊ लागली तर तिला डायनिंग टेबल जवळ आवाज ऐकू आला तशी ती तिथे थांबली. आतमध्ये बघितले तर वेद पिहूला नाश्ता भरवत होता. रमाआजी दोघांजवळ बसल्या मस्त गप्पा करत बहीण भावाचे कौतुक बघत होत्या.

"सॉरी रमाआजी मला उठायला उशीर झाला." कमल त्यांच्याजवळ जात म्हणाली.

" अग ठीक आहे. फार काही बिघडलेले नाही." आजी हसत म्हणाली.

"ए कमल, इट्स ओके." पिहू मिटक्या मारत म्हणाली.

त्यावर सगळे हसू लागले.

"तू अशीच कधी कधी उशिरा उठ. मग बघ मला कोण खाऊ घालतेय. माझा भैय्या. आय लव्ह यू भैय्या." पिहू वेदच्या कंबरेला बिलगत म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता.

"तू मला रोज खाऊ घालशील काय?" पिहू.

"रोज?" त्याच्या चेहऱ्यावर बरेच प्रश्न दिसत होते.

राजीव पुढे राहिला तर त्याला तिला खाऊ घालणं जमणार नव्हतं, हे आजी आणि कमलला त्याच्या चेहऱ्याकडे बघून कळले होते.

"ना बाबा, पिहुला मीच खाऊ घालणार. मला पिहू शिवाय अजिबात करमत नाही." कमल वेदकडे बघत मग पिहुला म्हणाली.

"आता काय करू? बरं भैय्या तू कधी कधीच खाऊ घाल हा." पिहू गोड हसत म्हणाली.

"ओके. बरं आज शाळेत सोडायला मी येऊ का?" वेद.

" तुझ्या बाईक वर.." पिहू.

"नको. बाईक साठी तू लहान आहेस." वेद.

पण पिहू हट्ट करू लागली.

"वेमिकाला सोबत घेऊन जा. ती पिहूला पकडून बसेल." आजीने सुचवले.

आजी वेमिकाला उठवायला गेली. पण तो ढाराढुर झोपली होती. उठायला तयार नव्हती..

"पिहूचे मन नको मोडायला. कमल तू जा सोबत." आजी.

"मी? कसे?" कमल कधी वेद कधी आजीकडे बघत होती.

"तू तिच्या मागे तिला पकडून बस. जा पटकन तयार होऊन ये." आजी.

"ह?" ती वेदकडे बघू लागली.

त्याने होकारार्थी मान हलवली.

"येssss यीप्पीsssss!" पिहू आनंदाने उड्या मारू लागली.

अगदी दहा मिनिटातच कमल छान तयार होऊन आली. तिने आकाशी कुर्ता चुडीदार घातले होते. त्यावर फिक्कट गुलाबी ओढणी दोन्ही खांद्यावरून घेतली. केस मागे क्लच मध्ये अडकवले. कानात छोटे छोटे झुमके, हातात नेहमीचे सोन्याचे कडे, गळ्यात हिऱ्यांचे पेंडंट असलेले मंगळसूत्र, ओठांवर असल्या नसल्यासारखे लिपस्टिक, डोळयात काजळाची रेघ, कपळवर छोटी चंद्रकोर. साधीच पण तरीही ती खूप सुंदर दिसत होती. पायऱ्या उतरत खाली येत होती तर वेद भान हरपून तिला बघत होता.

"उशीर तर नाही झाला ना?" कमल खाली येत म्हणाली.

"ह?" वेदला काहीच ऐकू गेले नव्हते.

"नाही, वेळेत तयार झाली. पिहू बाळा जा स्कूलबॅग घेऊन ये." आजी म्हणाली.

तिघाही त्याच्या बाईकजवळ आलेत. चांगल्या चांगल्या गाड्यांना लाजवेल अशी त्याची बाईक होती. वेदने हेल्मेट घातले आणि बाईकवर बसला. कमलने पिहुला त्याच्या मागे बसवले. आणि नंतर ती बसायचा प्रयत्न करत होती.

" दोन्ही कडून पाय टाकून माझ्या सारखीच बस." वेद.

"ते कसेतरी वाटतेय."

"कंफर्टेबल वाटेल. आणि इकडे सगळे असेच बसतात. ट्राय कर."

"खरंच?"

"हो."

कमल आपला कुर्ता सांभाळून, दोन्हीकडे पाय टाकत पिहुला नीट पकडून बसली.

"रमाआज्जी बाय.." पिहू आनंदाने आजीला मागे वळून टाटा करत होती. आणि वेदची बाईक पुढे निघाली.

"कमल मी भैय्याला पकडले आहे. तू मला पकडून बस हा, नाहीतर पडशील." पिहू.

ते ऐकून कमलला हसू आले. "हो ग माझी नकटू बाई.

नेहमीच बंद कार मधून जाणाऱ्या पिहुला बाईकवर मोकळ्या हवेतून जायला खूप मजा वाटत होती.

वेदने गाडी शाळेच्या पार्किंग एरियामध्ये लावली. कमल पिहूचा हात पकडत पुढे तर वेद त्यांच्या मागे चालत होता. 'माझा भैय्या , माझा भैय्या ' करत रस्त्याने भेटणाऱ्या सगळ्यांना पिहू वेदची ओळख करून देत होती. वेद तिच्याकडेच बघत तिचे हावभाव टिपत होता. वेद तिच्यासोबत असल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.

पिहुकडे वेद नेहमी राजीवची मुलगी म्हणुच बघत होता. ती लहान आहे म्हणून त्याने तिला जाणवू दिले नसले तरी असे फार अंगाखांद्यावर खेळवले सुद्धा नव्हते. राजीवची मुलगी म्हणून तो तिचा तिरस्कार करत नव्हता तरी तिच्यावर त्याचे फार प्रेम पण नव्हते. पण कमल आल्यापासून नात्यांकडे, लोकांकडे बघण्याचा दृष्टीकोन त्याच्याही नकळत बदलत चालला होता, त्याला कळले सुद्धा नव्हते.

पिहूच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघतांना, त्याला जुन्या काही गोष्टी आठवू लागल्या होत्या. 'दा दा दा दा' करत लहान पिहू हसत हसत रांगत त्याच्या पायाजवळ येत त्याच्या पायाला पकडून उभे राहण्याचा प्रयत्न करत होती. तर त्याने तिचा हाताला पकडत तिला दूर केले होते. एकदा तिने त्याला कडेवर घे म्हणून हट्ट धरला होता. तिच्याकडे दुर्लक्ष करत तो तिला रडतं सोडून निघून गेला होता. तिच्या एका वाढदिवसाला पळत पळत हातात त्याच्यासाठी चॉकलेट घेऊन येणारी पिहू त्याला आठवली. तिने चॉकलेट भरले हात लावले, कपडे खराब केले म्हणुन तो तिच्यावर ओरडला होता. तरी सुद्धा आज ती किती अभिमानाने सर्वांना सांगत होती की हा माझा भैय्या आहे. ते बघून त्याच्या डोळ्यांची कोन जड होत समोरचे त्याला धूसर दिसू लागले होते.

"खरंच या सगळ्यात पिहूचा काय दोष होता?" त्याचे मन त्याला विचारू लागले होते.

नातं निभवण्यासाठी, जपण्यासाठी ती खरंच रक्तचीच असावी लागत नाही. हे तो कमलकडून शिकत होता.
जिचा बाप रोज रात्री तिला कुस्चकरून टाकतो, त्याच्याच मुलीला ती अगदी फुलाप्रमाणे जपत होती.
नात्यांचे मिश्रण करणे किती चुकीचे आहे. प्रत्येक व्यक्ती आणि त्याचे अस्तित्व वेगळे आहे, त्याला आता समजत होते.

वेद मागे येत नाही आहे, हे कमलला जाणवले. तसे तिने मागे वळून बघितले तर वेद तिला एकाच जागी थांबलेला दिसला. त्याचा चेहरा तिला उदास जाणवला.

"काय?" डोळ्यांनी इशारा करत कमलने विचारले.

"नथिंग." नकारार्थी मान हलवत त्याने त्याच्या ओलसर पापण्या पुसल्या.

"पिहूsss!" खाली गुडघ्यांवर बसत, आपले हात पसरवत वेदने तिला आवाज दिला.

आपल्या हातातील लंचबॅग तशीच खाली ठेवत, छोट्या छोट्या पावलांनी तुरुतुरु पळत येत ती त्याला बिलगली. त्याने तिला आपल्या छातीशी घट्ट पकडून घेतले.

"सॉरी बच्चा."

"तू रडतोय भैय्या? काय झाले?" छोट्याशा पिहूच्या चेहऱ्यावर त्याला मोठी काळजी दिसत होती.

" नथिंग. ते डोळ्यात कचरा गेला."

"अच्छा. भैय्या तू सुपरमॅन आहेस. मला शाळेत तो टिंकु खूप त्रास देतो. माझ्या खोड्या काढतो. तू त्याच्या सोबत ढिश्युम ढिश्युम करशील काय?"

ते ऐकून त्याला हसू आले. त्याने होकारार्थी मान हलवली.

"भैय्या तू माझा खूप खूप फेवरेट आहे." म्हणत तिने त्याच्या गालावर छोटेसे किस केले.

"तुला माहिती तू खूप गोड आहेस."

"मला माहिती आहे."

"अच्छा. कसं काय?"

"कमल रोज मला माझी गोडूली, माझी गोडूली करत इथे इथे माझ्या पप्प्या घेत असते." ती खुदकन हसत म्हणाली. वेद कौतुकाने कमलकडे बघत होता.

"बेल वाजली. मी जाते. बाय भैय्याssss!" आपली बॅग सांभाळत ती आतमध्ये पळाली सुद्धा. ती दिसेनाशी होयीपर्यंत वेद तिथेच उभा होता.

"काय झालं? सगळं ठीक आहे ना?" कमल त्याच्याजवळ येत म्हणाली.

"अ.. हो. मी पिहूच्या टीचरला भेटून येतो." म्हणत तो सरळ स्टाफ रूमकडे जायला निघाला.

"हे अचानक एकता कपूरच्या सीरियलचे हिरो कसे काय झाले?" ती विचार करत बाईक जवळ त्याची वाट बघू लागली.

वेद पिहूच्या टीचर सोबत बोलून परत आला.

"काय बोलायला गेले होते?" कमल.

"ते पिहूला कोणी टिंकू त्रास देतो म्हणाली, तर ते सांगून आलो.

ते ऐकून तिला हसू आले.

"अरे काय लहान मुलांमध्ये पडता? त्यांचं त्यांचं ते निपटवून घेतात."

"असं कसं? उगाच काही मारामारी केली तर लागायला नको. लक्ष द्या एवढेच सांगून आलो."

तिने होकारार्थी मान हलवली.

"निघायचं?" वेद.

"हेल्मेट?"

"रस्ता मोकळा आहे."

"तर? तुम्ही तर गाडी चालवत आहात ना?"

तो हसला. त्याने चुपचाप हेल्मेट घातले. बाईक वर बसत बाईक सुरू केली आणि कमलची बसण्याची वाट बघत होता.

मघाशी बसतांना ती पिहूला पकडत बसली होती. आता न पकडता कसे बसावे, तिला जमत नव्हते. ती तिचा हात त्याच्या खांद्या पर्यंत नेत होती, परत मागे घेत होती. असे ३-४ दा झाले. वेद साईड मिरर मधुन बसण्यासाठी तिचा सुरू असलेला खटाटोप बघत होता.

" मला पकडून बसू शकते. "

ती त्याच्या खांद्यावर हात ठेवत गाडीवर चढून बसली. नंतर थोडी मागे सरकुन बसली.

वेदने गाडीचा गेअर टाकला आणि गाडी समोर धावू लागली.

आधी अवघडून बसलेली कमलला आता मोकळं वाटू लागले. तिचा एक हात अर्धवट हवेत पसरवत ती मुठीत हवा पकडू बघत होती. तिच्या चेहऱ्यावर स्वातंत्र्य मिळाल्यासारखे भाव दिसत होते. वेद साईड मिरर मधुन तिलाच बघत होता. हवेमुळे बरेच केस तिच्या चेहऱ्यावर येत होते. ते ती दूर करण्याचा प्रयत्न करत. परत ते जसेच्या तसे होत. मध्येच ती खुदकन हसत. परत मुठीत हवा पकडण्याचा तिचा खटाटोप सुरू होत.

वेदने गाडी मुद्दाम दूरच्या पण नयनरम्य वळणाने घेतली. दुतर्फा हिरवीगार झाडं पसरली होती. रस्त्याने पण तसे फार कुणी नव्हते. कमल दूर बसली असून सुद्धा त्याला ती त्याच्या जवळ वाटत होती. गार वारा अंगाला स्पर्शून जात होता. त्याने अंगावर गोड शिरशिरी येत होती. कमल डिस्टर्ब होणार नाही लक्षात घेऊन तो अगदी व्यवस्थित गाडी चालवत होता.

तिला बघून त्याच्या डोक्यात साथिया.. हसती रहे तू हसती रहे.. गाण्याने फेर धरला.

"वेद, हे काय तू एकदम फिल्मी वागतोय? त्यात पण हिंदी रोमँटिक गाणं?शोभते काय तुला?" तो स्वतःशीच हसला.

हसता हसता अचानक कमल एकदम शांत झाली. त्याने गाडी थांबवून मागे वळून बघितले तर एक आजीबाई टोपले घेऊन बसलेली दिसली. कमल तिच्याकडेच बघत होती.

"एक मिनिट." म्हणत त्याने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली.

कमल उतरली नंतर तो उतरला. गाडीला स्टँड वर लावले. "आलोच." म्हणत तो त्या आजीबाई जवळ गेला.

" दादा वैनीच्या डोक्यात माळायला गजरा घ्या." ती आजीबाई हातात एक गजरा दाखवत म्हणाली.

गजरा बघून त्याला आता कळले होते , कमल का खट्टू झाली. तिचे लांब केस कपातांनाची ती त्याला आठवली.

"दादा एकतरी गजरा घ्या. अजून बोहनी पण नाही झाली. वैनी पण खूप खुश होतील."

"कोण? कोण होईल?"

"त्या वैनी, तुमची बायको. " ती कमलकडे इशारा करत म्हणाली.

"कमल, माझी बायको?" त्या शब्दानेच त्याला हसू आले. पण काहीतरी परिपूर्ण होतेय, अशी जाणीव होऊ लागली.

"सगळे गजरे द्या." तो म्हणाला.

"सगळे?" ती आजीबाई आवसून बघत होती.

"हो." त्याने त्याच्या पाकिटातून दोन हजार रुपये काढत तिला दिले.

"आहों दादा, याचे इतके पैसे नाही." आजीबाई म्हणाली.

"तुम्हाला माहिती नाही तुम्ही किती मोठा आनंद वाटत आहेत. खूप किमती आहे माझ्यासाठी."

"वैनी लई भाग्यवान हायेत. असेच जन्मोजन्मी सोबत रहा." म्हणत तिने सगळे गजरे बांधून दिले.

"चार दिसाची पण कमाई एवढी नाही." आजीबाई म्हणाली.

"मग चार दिवस थोडा आराम करा. तुमच्या नातवांसोबत खेळा." तो हसत म्हणाला.

"व्हय व्हय. खाऊ घेऊन जाते." आजीबाई आनंदाने म्हणाली.

वेद गजरे घेऊन कमल जवळ आला आणि गजरे तिच्यापुढे धरले.

"पण.." कमल.

" लहान केसात पण खूप शोभून दिसतात. ती दुपारी कोण येते? हा कुमकुम, ती माळते ना.. छान दिसतात."

कमलला ते ऐकून हसू आले.

"पण एवढे सारे?"

"हा. संध्याकाळी बायका येणार आहेत, त्यांना द्या. तसेही मुलींना गजरे आवडतात."

हसतच तिने त्याच्या हातातून गजऱ्यांची पिशवी घेतली.

थोड्याच वेळात दोघेही घरी परत आले. आल्या आल्या कमलने एक ओले फडके घेतले आणि त्यात ती ते नीट ठेवत होती. वेदने एकदा तिच्याकडे बघितले आणि तो आपल्या खोलीकडे जाऊ लागला.

"भैय्या ऑफिस मधून लवकर येशील. भजनाची तयारी करायची आहे." वेमिकाला माहिती होते तो काही येणार नाही तरीही उगाच तिने त्याला आठवण करून दिली.

"मी आज ऑफिसला जात नाही आहे. काही फाईल्स चेक करायच्या, ते घरीच करेल." वेद पायऱ्या चढता चढता म्हणाला.

"काय?" वेमिकाला हा धक्का सहन झाला नाही, आणि तिच्या हातातील कॉफीचे मग खाली पडले.

"आई आई आईsss ग.." गरम कॉफी तिच्या पायावर पडल्यामुळे तिच्या पायाला चटके बसले.

"अरे भैय्या असे धक्के नको देत जाऊ, मेले असते ना मी आता. अगं कमल, भैय्या वेडावला.." तिने रडका सुर काढला. ते ऐकून कमलने डोक्यावर हात मारला.

*******

क्रमशः

********

🎭 Series Post

View all