Login

मिळावे तुझे तुला आस ही ओठी १६

कमल


मिळावे तुझे तुला आस ही ओठी

भाग १६

पूर्वार्ध : पार्टीमध्ये राजीव कमलला खूप दारू पाजतो. वेद ला तिथे त्याची जुनी वर्ग मैत्रीण भेटते. ती त्याची मदत करते. वेद कमलला घेऊन पार्टी मधुन बाहेर पडतो. पूर्ण रस्त्याभर कमल बालिशपणे वागत असते. वेद तिला सांभाळून घेत असतो. दोघेही पावसात भिजतात.


आता पुढे..

कार घराच्या मुख्य दाराजवळ येऊन थांबली.

"कमल, घर आलंय." वेदने झोपलेल्या कमलला आवाज दिला. पण कमल नशेत गुंगीत होती. तिला काहीच ऐकू जात नव्हते.

"कमल.." तो तिच्या गालावर थोपटत तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता.

"अ?" कमलने डोळे उघडे करत त्याच्याकडे बघितले. तिच्या ओठांवर हसू उमलले आणि परत तिचे डोळे बंद झाले.

तिची एकंदरीत हालत बघून ती सहजासहजी उठणार नाही, हे दिसत होते.

तो गाडी बाहेर आला. तिच्या बाजूने दार उघडत तिला हाताचा आधार देत कसेतरी सरळ उभे केले.

"कमल, चालण्याचा प्रयत्न कर.." तो तिच्या खांद्याला पकडत तिला पुढे पाऊल टाकायला सांगत होता.

ती झोपेतच चालण्याचा प्रयत्न करत होती.
घरात येत कसेबसे त्याने तिला पायऱ्यांपर्यंत आणले.

"मी पडते पडते पडते.." पायरीवर पुढले पाऊल टाकता टाकता तिचा तोल गेला. घाबरत तिने आपल्या दोन्ही हातांचा वेढा त्याचा कंबरे भोवती गुंफत त्याला घट्ट पकडले. डोकं खांद्यावर टेकवले.

तिच्या अशा स्पर्शाने त्याला काहीतरी होतंय, तो तिच्याकडे ओढल्या जातोय, हृदयाचे ठोके वाढतात आहे, त्या जाणवत होते. दोघेही पावसात भिजले होते. थंडी वाजायचे सोडून तिची ती एका बाजूने मारलेली मिठी त्याला उबदार वाटत होती. तिने कायम असेच आपल्या मिठीत राहावे, त्याला एका क्षणासाठी वाटून सुद्धा गेले. तो परत तिला बघण्यात, तिचा स्पर्श अनुभवण्यात गुंतला होता.

घड्याळाचा ठोका वाजला, तसे तो भानावर आला. घड्याळात बघितले तर रात्रीचा एक वाजला होता. बरीच रात्र झाली होती, पण कमल पुढे जाईना. शेवटी तिची हालत बघता त्याने तिला आपल्या हातांवर उचलत आपल्या कुशीत घेतले. तिने आपले नाक त्याच्या छातीवर घासले. तिला तसे करतांना बघून त्याला हसू आले.

तो तिला घेऊन वरती आला. तिच्या खोली जवळ जात त्याने एका पायाने खोलीचे दार ढकलले. आतमध्ये पाय ठेवणार तोच त्याला आठवले की ती राजीवची खोली आहे. ती खोली बघून त्याचा मनात राग दाटून आला.

त्याने तिला पलीकडे विरुद्ध दिशेला असलेल्या गेस्टरूम मध्ये नेत, तिला पलंगाच्या एका बाजूने झोपवले.

"मला सोडून जाऊ नका." तिचा आवाज त्याच्या कानी पडला. तो परत जायला लागला तर तिने त्याचा हात पकडला होता. त्याने वळुन बघितले तर ती झोपेतच बडबडत होती. तो थोड्यावेळ तिथेच उभा राहिला. हळूहळू तिची पकड सैल होऊ लागली. त्याने हळूच तिच्या हातातून आपला हात सोडवून घेत, खाली बेडवर नीट ठेवला. तिच्या अंगावरुन पांघरून घातले.

"खरंच ड्रिंक करणं कधी कधी चांगलं असतं.. अधून मधून तुला पाजायला हवे." तिची गेल्या २-३ तासांपासून सुरू असलेली मस्ती, बालिशपणा आठवून त्याच्या मनात येऊन गेले. आणि त्याच्या ओठांवर हसू पसरले. त्याला काहीतरी आठवले आणि तो खोलीच्या बाहेर पडला.

"काय?"

कानावर शब्द पडला आणि तो दचकला. वळून बघतो तर त्याची बहिणाबाई वेमिका भिंतीला टेकून उभी होती.

"काय झालं?" वेद.

"तेच मी विचारतेय, काय झालं?" वेमिका

"तू इतक्या वेळ जागी कशी? उद्या कॉलेज आहे ना?" वेद.

"तेच मी विचारतेय, तू जागा कसा? आणि हे एवढा ओला कसा झाला? आणि ते आतमध्ये काय सुरू होते?"

"काय सुरू होते, म्हणजे?"

"हेच, मला सोडून जाऊ नको."

"कमल? ती नशेत आहे. तिला राजीवच्या सगळ्या वाईट गोष्टी आठवत आहेत. म्हणून ती वारंवार फक्त तेच बडबडत आहे."

"नशेत? तिने ड्रिंक घेतले?"

"पार्टी मध्ये तिला त्या लोकांनी जबरदस्ती पाजले."

"तू तर पार्टीमध्ये जाणार नव्हता ना?"

"या बहिणी सीआयडीगिरी करण्यात एकदम पुढे. नको ती प्रश्न, नको त्या वेळी तयार असतात." तो अजीब चेहरा करत तिच्याकडे बघत होता.

" महत्वाचे लोकं येणार होते, ते माझ्या पी ए ने कळवले होते. म्हणून वेळेवर गेलो." त्याने उत्तर तर दिले. पण तिचे समधान झाले की नाही तिलाच माहिती.

"अच्छा. पण राजीवने बरे तिला तुला हात लावू दिले? आणि तो कुठाय?"

"तो आहे तिथेच एन्जॉय करत. त्याने ड्रायव्हर काकांना कमलला घेऊन जायला सांगितले . पण त्यांना कमल सांभाळल्या गेली नसती. मी घरीच येत होतो, म्हणून मग मी घेऊन आलो. " म्हणत त्याने वेमिकाला (जेवढे तिला समजेल तेवढ्या) रस्त्याने कमलने केलेल्या करामती सांगितल्या. वेमिका सुद्धा ते ऐकून हसू लागली.

"हिला ना असे अधून मधुन पाजायला हवे. तेवढेच मनमोकळेपणाने तिला जगायला मिळते." वेमिका.

"माझ्या पण.." तो बोलता बोलता थांबला.

"काय झालं?"

"काही नाही. मी जया ताईला बोलावून आणतो."

"का? तुला काही हवे का?"

"कमल पण भिजली आहे. रात्रभर तसेच ओल्या कपड्यात झोपेल तर तब्बेत खराब होईल. ती अजिबात शुद्धीत नाही. जया ताई बदलून देईल. "

"तुला बरी रे तिची काळजी?"

"तू आता टोमणे मारणार आहे का? सगळ्यांसोबत चांगले वागण्याचा मी प्रयत्न करतोय ना?" त्याचा चेहरा एकदम उतरला होता.

"हो रे माझ्या भैय्या. गंमत केली. कमल माझी तरी मैत्रीण आहे. पण ती तशी तुझी कोणी नाही, आणि तुला आवडतही नाही, म्हणून म्हणाले."

" लहान आहे ती. चुकीच्या नात्यात अडकली आहे. आमचं नातं नसले तरी तिला त्रास व्हावा असे मला कधीच वाटत नाही. बरं तुझी प्रश्न संपली असतील तर मी जया ताईला बोलवायला जाऊ?"

"नको. ती झोपली असेल. मी कमलचे बदलते."

"कपडे घालून द्यायला जमेल तुला? नाही म्हणजे ती जागेवरून हलत ही नाहीये."

"ओले कपडे काढणे महत्वाचे आहे. दुसरे कपडे घालने नाही. तिला रजाई गुंडाळून देते. तशी पण तिला सवय असेलच. राजीव तिला तसेच झोपवत असेल." बोलता बोलता तिने जीभ चावली.

पण तिचे ते शब्द वेदच्या काळजावर बाणांप्रमाणे टोचले होते.

"हा जोक नाही वेमिका. बोलतांना शब्द सांभाळून वापर." तो थोड्या रागाने बोलला.

"सॉरी. चुकून बोलल्या गेले." तिला तिची चूक कळली होती.

"ती माझी कोणी नसली तरी तुझी मैत्रीण आहे ना? मला कुठल्याच मुलीबद्दल असले काही बोलले आवडणार नाही."

"हो भैय्या."

"तू तिला तिथेच तिच्या खोलीत का नाही झोपवले? तिकडेच तिचे कपडे असणार."

"मी स्वतःहून तिला त्या नरकात घेऊन जाऊ शकत नाही. माझ्या हातात असते तर.." बोलता बोलता तो थांबला.

"तर?"

"काही नाही. तुला त्या खोलीत जायचं नसेल तर तिला तू तुझे कपडे घालून दे. नाहीतर माझ्याकडे टीशर्ट आहे, ती देतो."

"मी माझा ड्रेस घालून देते. झोप तू." म्हणत वेमिका खोलीत गेली.

***

रात्री खूप वेळ वेदला झोप येत नव्हती. सोफ्यावर तो कितीतरी वेळ कड बदलत होता. वारंवार त्याला कमल त्याच्या जवळ आहे, जाणवत होते. तिचा स्पर्श तो अजूनही अनुभवत होता. त्याने घड्याळात बघितले तर पहाटेचे चार वाजत आले होते.

कमल ठीक आहे की नाही , बघायला म्हणून वेद री झोपली होती तिथे गेला. त्याने दार हळूच लोटले, आत वाकून बघितले.

"आई शपथ भैय्या, तू पण अजून झोपला नाहीये?"
वेदच्या कानावर आवाज पडला.

"वेमिका तू? तू इथे काय करतेय? अन् तू अजूनही जागी का?" वेद आतमध्ये जात म्हणाला.

"ही बघ ना मला कशी पकडून झोपली आहे. जसे की मी हीचा बॉयफ्रेंड आहे. हलता सुद्धा येत नाहीये." वेमिका हसत म्हणाली.

त्यावर वेद हसला. त्याने कमलकडे बघितले तर ती खरंच वेमिकाला पकडून झोपली होती.

"तिचं सतत तेच सुरू होते, मला सोडून जाऊ नको. म्हणून इथेच तिच्या शेजारी झोपले." वेमिका बोलत होती. मात्र वेदचे पूर्ण लक्ष कमल वर खिळले होते. त्याने सोफ्यावर असलेला एक मोठी उशी घेतली आणि कमलच्या दुसऱ्या बाजूने म्हणजे तिच्या पाठीमागे नीट ठेवली. जसे त्याने तिथे उशी ठेवली, कमलने तिची कड बदलत उशीकडे चेहरा करत, उशीवर हात टाकत, उशीला घट्ट बिलगली.

"हुश ssss! एकसारखे झोपून जाम अकडले होते." वेमिका जागेवर उठून बसत म्हणाली.

"मायेच्या स्पर्शाला आसुसली वाटतेय. हो ना?" वेमिका.

"हम्म!" कमलने कारमध्ये त्याचा पकडलेला हात, घरी आल्यावर पायऱ्यांवरून उचलून नेतांना तिने त्याला पकडून धरलेले, सगळं त्याला आठवत होते.

"ही पहिल्यांदा जेव्हा घरात आली होती, मला अजिबात आवडली नव्हती. माझ्या पेक्षा सुद्धा तीन वर्षांनी लहान आहे. एवढी लहान मुलगी, माझी आई.. कसं शक्य आहे?" वेमिका.

"तू राजीवला आपला बाप मानते?" वेदचा थोडा तिरकस सुर लागला होता.

"नाही. माझे एकच बाबा होते, आहेत. त्यांचं नाव हेमंत आहे."

"मग ही तुझी आई कशी झाली? कुठेही काहीही रिलेशन लावते आहे." वेद थोड्या चिडक्या स्वरात म्हणाला.

"हो. ही रमाआजी आणि पिहू सोबत बोलायची, मस्ती करायची. माझ्या सोबत सुद्धा बोलायला तिने खरंच खूप मनापासून प्रयत्न केले. नेहमी मला मदत करू बघत होती. आपोआपच तिच्यावरचा माझा राग गेला. आता तर माझी खूप जवळची मैत्रीण झाली आहे, अगदी कोणी नाही अशी."

"हम्म. ती एक लहान मुलगी आहे. पिहू नंतर तीच घरात सगळ्यात लहान आहे. आपल्या घरात राहते, तर आपल्या घरातील एक सदस्य आहे. बस एवढेच."

"भैय्या तुला नाही का रे आवडली कमल? एकदा बघ रे तिच्याकडे, किती निरागस आणि गोड आहे." वेमिका झोपलेल्या कमलच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.

तो चुपचाप फक्त कमलकडे बघत होता.

"भैय्या, तिच्या जीवनातील एक राजीव नावाचा पार्ट सोडला तर, ती खरंच खूप चांगली मुलगी आहे."

तरी तो काहीच बोलला नाही.

"अरे मी तुझ्यासोबत बोलत आहे."

"वेमिका, थोड्या वेळात सकाळ होईल. आपल्या खोलीत जाऊन झोप." वेद म्हणाला.

"पण ही?"

"ती झोपली आहे. जा आता."

"ठीक आहे, जया येईलच आता. तोपर्यंत तू लक्ष ठेव. नाहीतर झोपेत कुठेही चालली जायची."

"घर आपलंच आहे. जाऊ दे जिथे जायचं. आणि तसेही राजीव नाही घरात. तर काळजी करण्यासारखे काही नाही."

"हो ते पण आहे. मी जाते." म्हणत ती जांभया देत आपल्या खोलीत जाऊन झोपली.

"राजीव नावाच्या चिखलात कमळ उमलले आहे." तो तिच्याकडे बघत उभा होता. जया उठल्याची चाहूल लागली, तसे तो त्याच्या खोलीत निघून गेला.

*****

सकाळी सगळे नाष्ट्या साठी डायनिंग टेबलवर बसले होते.

"हिला काय झालं? बरं वगैरे वाटत नाही का?" डायनिंग टेबलवर डोकं ठेऊन झोपलेल्या कमलकडे बघत आजीने विचारले.

"तिचे केस सापडत नाहीये तिला." वेमिका हसत म्हणाली.

"मी खूप आवडीने वाढवले होते. मी किती काळजी घेत होती." टेबल वर झोपल्या झोपल्या कमल रडक्या आवाजात बोलत होती.

"अगं तर त्यात एवढे रडण्यासारखे काय आहे? परत वाढतील." आजी.

"मग त्यांनी परत कापले तर?" ती डोकं वर करत म्हणाली.

"मग परत वाढतील. तू काय म्हातारी झाली नाही आहे की तुझे केस वाढणारच नाही." आजी.

वेमिका तिला बघून हसू येत होते. " अजून तिचा हँगओव्हर उतरला नाहीये." ती कुजबुजत बाजूला बसलेल्या वेदला म्हणाली.

"त्यांनी माझे सगळे केस खराब केले." कमल नाक फुरफुर करत बोलत होती.

"इथे सगळं आयुष्य खराब केलेय, त्याचे काही नाही. त्या केसांसाठी रडत बसली आहे." वेद बोलून गेला. आजीने त्याला चूप बस म्हणत डोळे दाखवले.

त्याच्या आवाजाने कमल अगदी चिडीचूप झाली. ती चुपचाप समोर प्लेट मध्ये जे येत होते ते खात होती.

"जया इडली सांबार छान झाला आहे." वेमिका खाता खता म्हणाली.

"थँक्यू मॅडम." वेमिकाच्या कौतुकाने जया एकदम हुरळून गेली. पहिल्यांदा वेमिका तिच्यासोबत छान कौतुकाने बोलली होती. आजीला पण ते ऐकून बरे वाटले.

"कमल, हा लाडू, प्रसादाचा आहे. " म्हणत आजीने तिला प्रसाद द्यायला हात पुढे केला, पण कमल तिच्याच तालात होती. शेवटी आजीने तिच्या प्लेटमध्ये लाडू ठेवला.

कमलने तो लाडू भातासारखा कुचकरला आणि त्यावर सांभार ओतला. आणि वरणभातासारखा एकत्र करत खाऊ लागली.

"जया मावशी, हे भात असा कसा केला?" कमलचा चेहरा अजीब झाला होता. तोंड बेचव झाल्यासारखे दिसत होते.

ते बघून वेदने डोक्यावर हात मारला.
कमलला बघून वेमिका खी खी करू लागली.

"अग ये पोरी, अशी काय शुद्धीत नसल्यासारखी करते आहे." आजी.

"ती शुद्धीत नाहीच. रमाआजी काल ती फुल टल्ली होती." वेमिका हसत म्हणाली.

"अरे हा, राजीव आले नाही?" आजीने विचारले.

"ते साहेब रात्री तिकडेच थांबले. सकाळी कामं होती तर परस्पर तिकडे गेले. घरी आले नाहीत." छोटूने माहिती पुरवली.

"हूश sss! तेवढे तरी बरे झाले. नाहीतर ही अशी आज, त्याने घरात वादळ आणले असते." आजी सुस्कारा सोडत म्हणाली.

"पण हिने का एवढी प्यायली? आज हा असला अवतार करून बसलीये." आजी.

"रमाआजी मी नाही पिले, त्या लोकांनी मला जबरदस्ती पाजले. " कमल.

"मग काय गोंधळ घातला? राजीव चिडला नसला म्हणजे पावलं." आजी.

"मी काहीच नाही केले. मला काहीच आठवत नाही आहे. डोकं पण खूप दुखत आहे. फुटेल आता." तिने परत रडका सुर काढला.

"कमल तू घरी कशी पोहचली?" वेमिकाला तिची मस्करी करण्यात मजा येत होती.

"कुणीतरी माझा हात पकडला होता." कमल.

"कोणी? राजीवने?"

"शी. नाही. कुणीतरी देवदास होता.." कमल.

"देवदास!" वेमिका वेदकडे बघत हसू लागली.

"नाही नाही, देवदास नाही.. देवदूत. देवाने पाठवलेला, मला वाचवायला. पांढऱ्या घोड्यावर आला होता. " कमल.

"हिने परत कोणतीतरी पऱ्यांची कथा वाचलेली दिसते." वेमिका हसत म्हणाली.

"रात्री बाराचा ठोका पडला, त्याने माझा हात पकडला आणि मला त्या राक्षसाच्या गुहेतून बाहेर काढले. त्याच्या पांढऱ्या घोड्यावर बसवले. आणि मग टब्बक टब्बक.." कमल.

"तू पांढरी कार नेली होती?" वेमिका वेदला चिडवत म्हणाली.

"हिला काल पेक्षा आता जास्त चढली.. हीचा हँगओव्हर भारी आहे." तो त्रस्त नजरेने तिला बघत म्हणाला.

"कमल जा आराम कर." आजी.

"पण मला त्याचा चेहरा नाही आठवत आहे… मला बघायचं त्याला.." कमल.

"जा झोप. मग आठवेल." वेमिका.

"हे पी." वेद तिच्या पुढे एक ग्लास ठेवत म्हणाला.

"हे काय आहे?" कमल प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत होती.

"विष नक्कीच नाही." वेद तिरसटपणे म्हणाला.

"भैय्या.." वेमिकाने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला.

"जिथे विचारायचं तिथे विचारले नाही. जिथे विरोध करायचा तिथे विरोध करत नाही. प्यायचे असेल पी, नाही तर.. जा खड्ड्यात." म्हणत तो तिथून निघून गेला.

त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत कमलने गटागट त्याने दिलेले पेय पिऊन घेतले.

सगळे आपल्या खोलीत तयारी करण्यासाठी निघून गेले. कमल मात्र तिथेच टेबल वर डोकं ठेऊन झोपली होती.

वेमिका तयार होऊन कॉलेजला जायला निघाली. तेवढयात वेदचा मित्र रजत तिथे आला.

"अरे दादा, ये बस. जया नाश्ता पाणी घेऊन ये." वेमिकाने आवाज दिला.

"कसा आहेस?"

"आय एम फाईन. वेद?"

"भैय्या तुझा मित्र रजत आला आहे." वेमिकाने वेदला आवाज दिला.

"बस. येईलच तो. माझं कॉलेज आहे. मी निघते." म्हणत वेमिका बाहेर निघून गेली.


थोड्या वेळात…
"सटाssssक!" कमलने जोरदारपणे वेदच्या मित्राच्या कानाखाली वाजवली.

वेद पायऱ्या उतरत खाली येत होता, तर आवाजाने एकदम तो जागीच थबकला.

"हे यू? एका नोकरानीसाठी, त्या दोन पैशाच्या मुलीसाठी माझ्यावर हात उचलतेस? तुला माहिती नाही मी कोण आहे? " रजत रागाने कमलकडे बघत होता.

"तू असशील कोणी मंत्री संत्री अथवा अजून कोणी, मला फरक पडत नाही. पण एक लक्षात ठेवायचं, हे माझं घर आहे. आणि माझ्या घरात मुलींसोबत अशी जबरदस्ती केलेली अजिबात चालत नाही." कमल.

"मी वेदचा मित्र आहे. हे तुला महागात पडेल." रजत.

"निघायचं.." ती त्याला बाहेरचा रस्ता दाखवत म्हणाली.

वेद दुरून हे बघत होता. तो त्या दोघांजवळ आला.

"वेद, ही.."

"सांगितले ना, निघायचं म्हणुन, तर निघायचं. माझ्या घरातील, मग ते कोणीही असो, नजर वर करून सुद्धा बघायचे नाही. आता सरळ बाहेर व्हायचं." त्याचे बोलणे पूर्ण व्हायच्या आतच कमल म्हणाली.

"वेद.." रजत वेदकडे बघत होता.

वेदने त्याला जा म्हणून इशारा केला.

"वेद तू हे ठीक करत नाही आहे.." रजत.

"ओके. जा आता." वेद.

वेदने कमलचा हात पकडला आणि तिला तो वरती नेऊ लागला.

*******
क्रमशः

🎭 Series Post

View all