मिळावे तुझे तुला आस ही ओठी १२

Chitra Vichitra Prem


वेद लॅपटॉपमध्ये ऑफिसचे काही काम करत बसला होता. काम करता करता रात्रीचे बारा कधी वाजले त्याला कळलेच नाही. बसून बसून पाठ अकडली म्हणून तो थोड चालायला टेरेसमध्ये आला. थंडीचे दिवस असल्यामुळे बाहेर बरीच थंडी होती. कमलने तिथे खूप कुंड्या जमावल्या होत्या. त्यात तिने बरीच फुलझाडं लावली होती. त्यांचा सुगंध हवेत मिसळला होता. बाहेर त्याला खूप प्रसन्न वाटत होते.

फिरता फिरता त्याचे लक्ष तुळशीच्या झाडांकडे गेले.

"एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा.." तो तुळशीचे एक एक करत झाड मोजू लागला. त्याला तुळशीची एवढी सारी झाडं बघून हसू आले. कारण त्यानेच कधीतरी कमलला तुळशीची खूप रोपं लावायचा सल्ला दिला होता.

हसतच तो आपल्या खोलीकडे वळला तर टेरेसच्या एका कोपऱ्यात त्याला कोणीतरी आहे असे जाणवले. तिथे जाऊन बघितले तर कमल आपले दोन्ही पाय पोटाशी घेऊन झोपली होती. तिला तिथे बघून तो अचंभित झाला. तो तिच्याजवळ तिथे खाली गुढग्यावर बसला.

"कमल.." आवाज देत त्याने तिच्या खोलीकडे बघितले तर दार बंद होते. दिवे पण बंद होते.

"कमल उठ, कमल." तो आवाज देत होता पण ती काहीच उत्तर देत नव्हती की काहीच हालचाल करत नव्हती. तिला तसे बघून आता त्याला भीती वाटायला लागली होती.

"कमल.." आवाज देत त्याने तिच्या डोक्याला धरून आपल्या मांडीवर घेतले.

"अंग तर गरम वाटतेय. कमल उठ. " म्हणत त्याने तिच्या गालांवर थोड्या चापट मारल्या.

"उम्म.." तिने डोळे उघडत त्याचकडे बघितले.

"इथे काय करतेय? आतमध्ये जाऊन झोप."

"ते साहेबांनी बाहेर काढले." ती झोपेच्या ग्लानीत होती.

त्याने रागाने एक कटाक्ष राजीवच्या खोलीकडे टाकला आणि कमलला आपल्या हातांवर उचलून आपल्या कुशीत घेतले.

"आsss!" ती झोपेतच थोडी कळवळली. त्याने तिच्याकडे बघितले तर तिचे डोळे बंद होते.

वेद तिला आपल्या खोलीत घेऊन आला. पलंगावर झोपवले. तिच्या अंगात हुडहुडी भरली होती. त्याने तिच्या अंगावर दोन रजया टाकल्या. तिने त्यांना छातीशी कवटाळून घेतले आणि एका कडावर होत झोपली.

"कुठे जाऊ नकोस. मी आलोच."

पण कमल काहीच बोलली नाही.

"कमल, इथेच झोप. जाऊ नकोस कुठे.." तो तिच्या गालांवर थोडेसे मारत म्हणाला.

"अ?"

"जाऊ नको."

"म्म.." ती तापामुळे ग्लानीत होती.

त्याने खोलीचे दोन्ही दार नीट बंद केले आणि तो खाली जाऊ लागला. जाता जाता त्याला राजीवच्या खोलीतून घोरण्याचा आवाज येऊ लागला. ते ऐकून त्याला तिथेच जाऊन त्याला चांगले चोपून काढावे, असे वाटून गेले. पण सध्या कमलजवळ जाणे त्याला गरजेचे वाटले. आणि तो खाली गेला.

"कमल, उठ.." त्याने परत तिला थोडे हलवले.

"अsss…"

" तुला ताप आहे. औषध द्यायचे. हे दूध पिऊन घे." तो तिच्या खांद्याला पकडत तिला उठवून बसत म्हणाला.

पण ती कुठे सरळ बसते? तापामुळे तिच्यात बसण्या इतकी शक्तीच नव्हती. बसल्या बसल्या तिने त्याच्या खांद्यावर मान टाकली.

"कमल, थोडतरी पी.." म्हणत परत त्याने तिचं डोकं सरळ करत पकडून धरले आणि दुसऱ्या हातातील दुधाच्या पेल्याला तिच्या ओठांना लावले.

तिने कसेबसे अर्धा पेला दूध संपवले.

"नको." म्हणत तिने पेल्याला हाताने दूर सारले. आणि परत तिने त्याच्या खांद्यावर मान टाकली. तिच्या केसांचा रेशमी स्पर्श त्याच्या मानेला होत होता. त्याने तिच्याकडे बघितले तर ती बिनधास्त झोपली होती. तिच्या वेनीचे केस थोडे सैल झाले होते. वेणीतून निघालेले काही तिच्या गालांवर, गळ्यावर, खांद्यावर रुसून बसल्या सारखे दिसत होते. धनुष्य बाणासारख्या त्या दोन भूवयांमधील छोटीशी लाल चटकदार टिकली त्याच्याकडे खुदकन हसून बघत आहे, असे त्याला वाटले. त्याने पण प्रतिउत्तरदाखत टिकलीकडे हसून बघितले.

त्याने घड्याळात बघितले तर दूध पिऊन दहा मिनिटे झाली होती. थोड्या वेळाने त्याने तिला तापाचे औषध दिले. तिचं डोकं उशीवर नीट ठेवत तिच्या अंगावर पांघरून घातले.

"सस्स.." ती थोडी कळवळली. जेव्हा त्याने तिला कुशीत उचलून घेतले होते, तेव्हा सुद्धा ती कळवळली होती, त्याला आठवले.

त्याने लगेच पांघरून काढून बघितले तर नेहमीप्रमाणे त्याला तिच्या अंगावर ओरबडण्याचे निशाण दिसले.

"शीट.." हाताची मुठ आवळत त्याने हात भिंतीवर मारला. त्याचा डोळ्यात राग साठू लागला होता.

"पिहू.."

त्याने तिच्याकडे वळून बघितले तर ती झोपेत काहीतरी बडबडत होती. आणि मग खुद्कन हसली. तिच्या ओठांवरील हसू बघून त्याच्या ओठांच्या कडा सुद्धा रुंदावल्या.

त्याने ड्रॉवरमधुन मलम काढला आणि हळूवार फुंकर मारत लावू लागला.

तिच्या पोटावर पण दोन तीन ठिकाणी निशाण होते. बऱ्याच वेळ त्याचा हात पुढे जात नव्हता.

"का माझे हात बांधून ठेवले? " त्याला खूप असहाय्य वाटत होते.

"आss.."
कमलने झोपेत आपल्या पोटावर खाजवले. तिने परत त्या जखमेवरच खाजवल्यामुळे आता त्यातून थोडे रक्त येऊ लागले होते.

भरल्या डोळ्यांनी त्याने हळूवारपणे तिच्या पोटावरील साडीचा पदर दूर केला. बोटांवर मलम घेत हळूवारपणे लावत त्यावर थोडे पावडर टाकले. ते करतांना चुकून त्याचा हात तिच्या मांडीवर पडला. ती परत कळवळली. तिच्या आवाजाने त्याच्या लक्षात आले तिथे मांडीवर पण तिला लागले आहे.

त्याने तिची पायकडून साडी वर केली. तिथे पण त्याने थोडे मलम लावत त्यावर पावडर पसरवले.

औषधामुळे तिला आता बराच घाम आला होता. झोपेतच तिने अंगावरील पांघरून पायाने दूर लोटले. तो सोफ्यावर झोपल्या झोपल्या तिला बघत होता. कधीतरी रात्री त्याचा डोळा लागला.

दरवाजा उघडण्याचा आवाजाने त्याला जाग आली. बघतो तर कमल बाल्कनीचा दरवाजा उघडत होती. त्याने घड्याळाकडे बघितले तर सकाळचे पाच वाजत आले होते.

"काय झालं? बरं वाटत नाही का?" तो जागेवर उठून बसत म्हणाला.

"बरं वाटते."

"झोप थोड्या वेळ. "

"जाते बाहेर."

"तो अजूनही घोरत पडला आहे. तिकडे वेमिकाच्या खोलीत नाहीतर इकडे गेस्ट रूम आहेत, तिथे आराम कर."

"नको. साहेब रागावतील. त्यांनी मला तिकडे कुठेच जयाचे नाही म्हणून ताकीद दिली आहे. कोणाला कळायला नको की मी बाहेर झोपली होती."

ते ऐकून वेदला राग आला.

"एवढया थंडीत काल बाहेर का झोपली होती?"

"साहेबांनी रूम बाहेर काढलं."

"का?"

"हे पहिल्यांदा नव्हते. मी बरेचदा टेरेसवर झोपत असते."

ते ऐकून त्याला धक्का लागला.

ती इकडे तिकडे बघत होती. तिला पुढे बोलल्या जात नव्हते.

"का बाहेर काढले?"

"ते काल मला बरं वाटत नव्हते. ते एक व्हिडिओ..
त्यांच्या मनासारखे …" कमलला पुढे बोलल्या जात नव्हते.

"आज तर त्याला मी सोडणार नाही.." रागाने लाल होत तो राजीवला मारायला उठला..

"आमच्या मध्ये तुम्ही पडू नका. मला चालणार नाही." ती गंभीरपणे म्हणाली.

तिच्या शब्दांनी त्याला राग येऊ लागला होता.

"तू अशी वागतेस, म्हणूनच त्याची हे सगळे करण्याची हिंमत होते. अत्याचार करण्यापेक्षा अत्याचार सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो." तो रागात म्हणाला.

"मी परत तुम्हाला सांगतेय, तुम्ही या विषयात पडू नका, भार्गव." म्हणत ती बाहेर निघून गेली.

चिडत चिडत तो रजई घडी करू लागला.पलंगावरची चादर नीट करून लागला. त्याला कमल अजूनही तिथेच झोपली आहे असा भास होऊ लागला. अचानकच त्याचा राग कमी होऊ लागला. अतिशय हळूवारपणे त्याने त्याचा पलंग नीट करून ठेवला.

सकाळी लवकरच तयारी करत तो ऑफिसमध्ये निघून गेला.

संध्याकाळी परत आला तर त्याला घरात कोणीच दिसले नाही. त्याने वाकून किचनमध्ये बघितले. रोज कमल तिथे त्याचसाठी चहा करतांना दिसत. आजी ती तिथे नव्हती. तो चुपचाप आपल्या खोलीत निघून आला.

त्याला काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते. मन का लागत नाहीये, त्याचेच त्याला कळत नव्हते. त्याने गळ्यातील टाय काढून सोफ्यावर फेकला. शर्टच्या कॉलरचे बटण काढले तेवढयात त्याला पिहूच्या हसण्याचा आवाज आला. तो लगेच टेरेसमध्ये गेला. पण तिथे कोणी नव्हते. तो हिरमुसला. पण तो का हिरमुसला त्यालाच कळले नाही.

"ही चीटींग आहे." कमलचा आवाज त्याच्या कानावर पडला. त्याने लगेच टेरेसच्या एका कोपऱ्यातून खाली वाकून बघितले. तर घरातील पूर्ण महिला मंडळ घराच्या मागच्या अंगणात जमले होते. जमिनीवर काहीतरी रेघोट्या ओढल्या होत्या. आणि त्यात वेमिका एका पायाची लंगडी करत उड्या मारत होती. पिहू बाजूला उभी टाळ्या वाजवत होती. आजी त्यांना काहीतरी सांगत होती. तर कमल वेमिकाच्या पुढे दोन्ही हात पसारून उभी तिला पुढे जाऊ देत नव्हती.

"अस्स नाही बा, ही चीटींग आहे."

"तू एक्स्पर्ट आहेस, आम्ही पहिल्यांदा खेळतोय. हो ना ग पिहू?" वेमिका.

पिहू तोंडावर हात ठेवत हसत होती.

आतापर्यंत शांत शांत असलेले घर एकदम बोलकं वाटू लागले होते. त्यांना असे खेळताना बघून त्याच्या ओठांवर हसू पसरले.

त्याला आता कपडे पण बदलायचे जीवावर आले होते. शर्टच्या बाह्य फोल्ड करत तो भरभर पायऱ्या उतरून खाली मागच्या अंगणात आला. आणि एका खांबाला टेकून त्यांचा खेळ बघत उभा होता.

"आता बघाच, कशी हरवते ते.." म्हणत कमलने साडीच्या मिऱ्या थोड्या वरती करत कंबरेत खोचल्या.
पायाची लंगडी करत ती उड्या मारत खेळ खेळत होती.

"ओ ओ ओ चेन्नई एक्सप्रेस..यार पिहू आपल्याला ही हरवणार. रमाआजी, हिला सांग ना थोडंसं हर म्हणून. " वेमिका. आजी सुद्धा त्यावर हसू लागली.

"ये कमल बघ भैय्या, त्याचे लग्न झाल्यावर त्याच्या बायकोला तो असेच बघत बसेल.. किती क्यूट दिसतोय." वेमिकाचे लक्ष वेदकडे गेले तर ती त्याला बघून म्हणाली.

"खरंच किती गोड दिसत आहेत. साधा पांढराच शर्ट, पण किती खुलून दिसतोय. पहिल्या दिवशी घरात आले तेव्हा बघितले होते तर कसलं झापरं पोरगं दिसत होते. स्वतःच्या मेहनतीच्या कमाईचे काही वेगळेच आपले तेज चेहऱ्यावर येत असते. फारच हँडसम वाटत आहेत, अगदी त्या.. अह दुसऱ्या कुणासारखे नाही. कुणासोबत तुलनाच होऊ शकत नाही. त्यांच्यासारखे तेच.." कमल स्वप्नवत त्याला बघत होती.

"काय रे वेद, तुला पण खेळायचे काय?" आजीने त्याची मस्करी केली.

"अ हो, म्हणजे नाही." आजीच्या बोलण्याने तो एकदम दचकला.

"ते चहा हवा होता." वेद पटकन बोलून गेला.

"भैय्या तू चहा पितो?" वेमिका आश्चर्यचकित होत म्हणाली.
"ऑफिस मध्ये कुणी चहा पिणारी भेटली की काय?" वेमिका त्याला चिडवत होती.

" असं काही नाही. ते भूक लागली होती म्हणून म्हणालो."

"आपण चहा पार्टी करूयात. तुम्ही इथेच बसा, मी आलेच. जाऊ नका.." आवाज देत कमल आतमध्ये पळाली. जवळपास ती एक ट्रे घेऊन आली.

"आपण इथे पायऱ्यांवरच बसुयात. छान मज्जा वाटेल." म्हणत तिने आजी आणि वेदच्या हातात चहा दिला.

"मी नाही पीत चहा." वेमिका.

"ही तुझी कॉफी आणि हे पिहूचे दूध." म्हणत तिने दोघींना त्यांचे त्यांचे मोठे मग दिलेत.

"आणि ही पालक भजी." कमल सगळ्यांमध्ये भज्यांचा ट्रे ठेवत म्हणाली.

"ईsss किती ऑईली असेल ते.." वेमिका नाक मुरडत म्हणाली.

"तुला बाहेरचे पिझ्झा बर्गर चालते हा? त्याने काही होत नाही. आणि हे घरचे, मी बनवलेले लगेच ईsss करतेय." कमल.

"ये वेमिका एक तर खाऊन बघ, प्लीज प्लीज प्लीज.." कमल.

"माझ्या हाताचं कोणालाच खायचं नसतं." कमल हिरमुसली. तिचा चेहरा लहानसा झाला.

"वाह भारीच. आणि पालकामुळे त्याची पौष्टिकता पण वाढलीय." वेद एक भजा खात म्हणाला.

"खरंच?" कमलच्या डोळ्यात चांदण्या चमकू लागल्या. त्या चमकणाऱ्या चांदण्या बघायला त्याला खूप छान वाटत होते.

त्याने फक्त होकारार्थी मान हलवली.

सगळेजण थोड्यावेळ गप्पा मारत तिथे बसले होते. गप्पा तर महिला मंडळ करत होत्या. वेद फक्त ऐकत होता. अधूनमधून चोरून कमलकडे बघत होता.

आजी संध्याकाळचा देवाजवळ दिवा लावायला आत गेली तर वेमिकाचा फोन आला म्हणून ती हॉलमध्ये गेली.

"चला पिहू बाळा, आता अभ्यासाला बासुयात. चला पळा आतमध्ये. मी हे घेऊन येते." कमल.

पिहू तुरुतुरु आतमध्ये पळाली.

कमल चहाचे कप जमा करत होती.

"कमल!" वेदने आवाज दिला.

"ह?"

"ताप नाही ना आता?"

तिने नकारार्थी मान हलवली.

"तू खोली बाहेर अगदीच बिनधास्त झोपली होतीस. तू झोपली असताना मी रात्रभर त्याच खोलीत होतो, तुला भीती नाही वाटली?" वेद.

"एक गोष्ट सांगू? कोणाला सांगू नका."

"हो."

"ती एकच भुतियायी खोली आहे. तिथेच सगळं भूत, पिशाच्च आहेत. ती एक खोली सोडली तर हे घर मंदिर आहे. मग मला बाहेर झोपताना भीती का वाटेल? मी तर बघतच असते, साहेब मला रागावून बाहेर केव्हा हाकलतात. त्यांना वाटते त्यांनी शिक्षा दिली. पण त्यांना काय माहिती मी स्वातंत्र्य उपभोगत असते." ती खुदकन हसत म्हणाली.

तिला हसतांना बघून तो पण हसला.

"ना हे शरिर माझे राहिले आणि नाही काही गमवण्यासारखे माझ्याजवळ आता उरले आहे. त्यामुळे आता घाबरायचे कशाला? कमल.

"काल तू ज्या बेड वर झोपली होती, आता तो तुझा आहे. ते बाल्कनीचे दार नेहमी उघडे राहील. कधीही रूममध्ये येऊन झोप. पण कधीच तिथे बाहेर झोपू नकोस. बाहेर खूप थंडी आहे. मच्छर आहेत. तब्येतीला काही झालं तर.."

ती बऱ्याच वेळ त्याचा डोळ्यात बघत होती. कदाचित काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करत होती.

त्याच्या शब्दात तिला काळजी जाणवली. आणि होकारार्थी मान हलवत ती आतमध्ये गेली.

******

"भैय्या तुझा मित्र रजत आला आहे." वेमिकाने वेदला आवाज दिला.

"बस. येईलच तो. माझं कॉलेज आहे. मी निघते." म्हणत वेमिका बाहेर निघून गेली.

थोड्या वेळात…
"सटाssssक!" कमलने जोरदारपणे वेदच्या मित्राच्या कानाखाली वाजवली.