Mar 03, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

मिळावे तुझे तुला आस ही ओठी ११

Read Later
मिळावे तुझे तुला आस ही ओठी ११


मिळावे तुझे तुला आस ही ओठी

भाग ११

पूर्वार्ध :
वेद अल्कोहोल सोडण्याचा प्रयत्न करत असतो. पण ते त्याला जमत नाही. म्हणून तो हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी जातो. त्यात वेमिका आणि कमल त्याला मदत करतात.

आता पुढे…

"कमल तू प्लीज बाहेर जा. मला तुझ्यासोबत बोलायचं नाही." खोलीमध्ये येणाऱ्या कमलला बघून वेमिका म्हणाली.

तरी कमल तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आतमध्ये आली.

"कमल, तुला समजत नाही का?" वेमीका जोराने ओरडली.

तिच्या आवाजाने वेद आणि आजी वेमिकाच्या खोली जवळ धाऊन आले. आतमध्ये जाणार तोच वेदने आजीला अडवले आणि आतमध्ये नको जाऊ खुणावले. दोघेही तिथेच भिंतीच्या आडोशाला उभे राहिले.

"कमल, जवळ येऊ नको. मारेल मी." परत वेमिका ओरडली. तरी कमल तिच्या जवळ जात होती. तिने रडत चिडत आजूबाजूला असलेल्या सगळ्या उश्या कमलला मारून फेकायला सुरुवात केली. कमलने पळत जात तिला करकचून मिठी मारली. जसे कमलने तिला जवळ कुशीत घेतले तसे वेमिका जोरजोराने, हुंदके देत रडत होती.

तिला रडताना बघून आजी आतमध्ये जाऊ लागली.

"आजी थांब. तू मोठी वेगळ्या काळातली म्हणून आणि मी भाऊ म्हणून वेमिका आपल्यासमोर मनमोकळे बोलू शकणार नाही. आणि जोपर्यंत ती बोलणार नाही आपल्याला तिचा त्रास कळणार नाही. बघतेय ना काही दिवसांपासून कशी वागते आहे? त्या दोघी समवयीन आहेत. महत्वाचे म्हणजे मैत्रिणी आहेत. कमलला बोलू देत. आपण इथेच थांबू. जास्तीच काही झाले तर जाऊयात." वेदने आजीला समजावले.

कमलने तिला खूप रडू दिले. फक्त तिच्या पाठीवर मायेने हात फिरवत होती. हळूहळू वेमिकाचे रडणे कमी होऊ लागले.
कमलने तिला पाणी दिले. त्यानंतर वेमिका थोडी शांत झाली.

"काय झालं?" कमलने विषयात हात घातला.

"मी.. मी जगणार नाही. मी मरेल. मी सुसाईड करेल." वेमिका परत हुंदके देत बोलत होती.

ते ऐकून आजीच्या काळजात धस्स झाले. वेदला पण धक्का बसला.

"बरं. ठीक आहे." कमल तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.

"ही ठीक आहे म्हणतेय?" आजी परत आतमध्ये जायला निघाली. वेदने तिचा हात पकड नाही म्हणून खुणावले.

" हे बघ तू स्वतंत्र भारतील स्वतंत्र मुलगी आहे. तुला हवे ते करण्याचा हक्क आहे. पण आत्महत्या का करायची त्याचं कारण तरी सांगशील काय? नाही म्हणजे ते काय आहे ना, जर कारण न सांगता आत्महत्या केली तर मग पोलीस घरातील सर्वांवर शक करतात. मर्डरचा आरोप पण करतात. कधी कधी तर जेलमध्ये पण टाकतात. आता बघ तू आधीच इतकी श्रीमंत, त्यांना वाटू शकते कोणी पैशासाठी मर्डर केला असेल. आजीला सांभाळावं लागते, प्रेशर येते म्हणून मर्डर केला म्हणून आजीने मर्डर केला असेल. भार्गव तुझा भाऊ म्हणून इस्टेटीत हिस्सेदारी नको म्हणून मर्डर केला म्हणू शकतात. मी, मी तर घरात नवीन आहे, त्यात गरीब घरची, म्हणून माझ्यावर डाऊट घेऊ शकतात. आणि आम्ही तिघेही मग तुरुंगात. मग पिहूला कोण सांभाळणार?" कमल डोळ्यात अश्रू (खोटे खोटे) आणत बोलत होती.

"या जालीम दुनियेतून तू सुटशिल ग, पण आम्ही जेलमध्ये चक्की पिसत बसू. भार्गवची अख्खी जवानी यातच खराब होईल. जेल मधुन आल्यावर तुला वहिनी पण चांगली भेटणार नाही. पिहू आम्हाला घरा बाहेर काढेल. आम्हाला समाज खुनी खुनी म्हणून जगू देणार नाही." कमल रडत रडत बोलत होती.


"आणि तुला माहिती सुसाईड केल्यावर पोस्टमार्टम करतात. तेव्हा आपल्या बॉडीला पूर्णपणे नागडे करतात. आपण आयुष्यभर आपले शरीर इतकं सांभाळत असतो, झाकून ठेवत असतो, त्याची ऐसी की तैसी करतात. अगदी जनावरासारखे आपल्या शरीराला हाताळतात. अन् तो डॉक्टर साळुंखे तर कसले कसले केमिकल्स टाकतो आपल्या शरीरावर, डोळ्यात, कानात , नाकात. ईssss."

"एक मिनिट, हा डॉक्टर साळुंखे कोण आहे?" वेमिका डोळे मोठे करत विचारत होती. ते ऐकून वेमिकाचे अश्रू कधीच बंद झाले होते. ती अजब नजरेने कमलकडे बघत होती.

"तुला नाही माहिती डॉक्टर साळुंखे? एवढा वर्ल्ड फेमस डॉक्टर आहे." कमल आणखी तिची उत्सुकता ताणून धरत म्हणाली.

"सांगते की नाही आता?"

"ए सी पी प्रद्युम्नचा मदतगार, फॉरेन्सिक डॉक्टर. CID नाही बघितले काय?" कमल.

"कमल, तू आता मार खाशील. ते सगळं ऐकून मी किती घाबरले होते." वेमिका कमलच्या पाठीवर फटके देत म्हणाली.

"मी सुसाईड करेल, हे ऐकून जीव इथे माझ्या घशात येऊन अडकला आहे. हृदय कधी पण बंद पडेल. तुला बोलायला कसेच काही वाटले नाही." कमलने परत तिला करकचून मिठी मारली.

"आता बोल काय झाले आहे? हे बघ मनातलं नेहमी बोलायचं असतं. होऊ शकतं कदाचित मार्ग निघणार नाही पण मन हलकं होतं. आणि मी तुला शब्द देते कोणाला काहीच सांगणार नाही. सांग मला आता." कमल आपले डोळे पुसत म्हणाली.

"करणने माझ्यासोबत ब्रेकअप केला." वेमिका.

"हा करण कोण? करण अर्जुन मधला सलमान काय? की दिल मिल गयेचा करण तो डॉक्टर?" कमल.

"तू ना खूप फटके खाशील. ते किती मोठे ॲक्टर आहेत. ते कुठे मी कुठे?"

"मग हा करण काय आहे? फेमस नाही?"

"नाही. माझ्या कॉलेजचा मुलगा. आम्ही सेम कॉलेजला आहोत. तो टेक्सटाइलला आहे मी डिझायनिंग मध्ये."

"धत्! तो कोणी स्पेशल नाही? अन् तू त्याच्या साठी सुसाईड करणार होती? बरं पुढे सांग."

"दोन वर्षापासून आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. माझं त्याच्यावर खुप प्रेम आहे. पण त्याने पाच दिवस आधी आमचे नाते तोडले."

"का?"

"कारण.." तिला पुढे बोलल्या जात नव्हते.

"कारण काय?" कमल तिच्यावर नजर रोखत म्हणाली.

"कारण मी त्याला फिजिकल व्हायला नकार दिला."

"फिजिकल म्हणजे?"

"शारीरिक संबंध, जे आपण लग्नानंतर करतो, त्याला मी नकार दिला."

"शाबास मेरी शेरणी." आनंदाने कमलने बसल्या बसल्या एक उडी घेतली.

"तुला आनंद होतोय?"

"हा मग? बरं झाले सगळं व्हायच्या आधीच त्याच्या मनातील कळले. नंतर त्याने किती घाण घाण मागण्या केल्या असत्या? वेमिका हे शारीरिक संबंध खूप घाण असते. खुप ञास होत असतो. जीव जातोय असे वाटते. जे पुरुष शारीरिक संबंधाना नात्यात जास्त महत्त्व देतात, त्या नात्यात खरं प्रेम नसतं."

"पण त्याच्यावर माझं प्रेम होतं. मी त्याला म्हणाले लग्नानंतर तू म्हणशील ते करेल पण आता नको. पण त्याने ऐकले नाही." ती रडत बोलत होती.

"त्या दिवशी साहेबांबद्दल तूच मला समजावत होतीस ना की त्यांनी माझ्यासोबत का लग्न केलंय? मग आता तूच वेडेपणा करत आहेस? आणि त्या नालयाकासाठी तू तुझा जीव देत होतीस, ज्याला प्रेमाची ए बी सी डी पण माहिती नाही? तू अशी तीन दिवसापासून रडत बसलीये बघून त्या रमाआजींनी किती पारायण केलेत. सगळ्या पोथ्या वाचून काढल्या, आता उरली पण नाही कोणती. किती जप केले. अन् मनात काही नवस बोलले असतील तर ते वेगळे. तो तुझा भैय्या, रात्र रात्र झोपत नाही. इथे तुझ्या खोली बाहेर गस्त घालत फिरतो. तू दिसली नाहीस तर घरभर शोधतो. ती छोटी छकुली मी दिदुला त्रास नाही देणार, पण तिला माझ्या सोबत बोलायला सांग म्हणून रडत रडत झोपी जाते. या कुणाचे तुला प्रेम दिसले नाही? हो कसे दिसणार? कारण त्यांनी तुला आय लव्ह यू नाही म्हटले ना? भैय्याने तुला मिठीत नाही घेतले ना? सुसाईड करायच्या आधी तुला या सगळ्यांनी तुझ्यासाठी जागलेल्या रात्री आठवल्या नाहीत? ही लोकं तुझ्याशिवाय कसे जगातील? विचारही आला नाही?" कमल गंभीरपणे बोलत होती.

"प्रेम असे नसते वेमिका. प्रेम मरायला नाही जगायला शिकवते. तुझ्या डोळ्यातील अश्रूंनी त्याचा कंठ दाटून येतो. तुझ्या ओठांवरील एका हसू साठी तो आकाशपाताळ एक करतो. तुझ्या एका सुखासाठी, आनंदासाठी तो आपला जीव ही देतो. ते खरं प्रेम आणि तो खरा आशिक. प्रेमात शारीरिक ओढ नसते. मनाची ओढ असते. शरीर कुठेही असले तरी मनाने ते बांधले असतात, नेहमीसाठी. प्रेम पूजा असते वेमिका, बिजनेस नाही की तू मला हे दे मी तुला ते देतो." कमल शांतपणे बोलत होती.

"मला सगळं समजले. मी परत कधीच असे वागणार नाही. पण काय करू हृदय अजूनही दुखत आहे."

"करीनाने शाहिदला एक मस्त उपाय सांगितला होता. आपण ते करून बघुया."कमल.

"काय?"

"तुझ्याकडे त्या करणचा फोटो असेलच. तो आण, त्याला बघून मस्त शिव्यांची लाखोली वाह. मग त्याला फाडून फ्लश करून टाक."

वेमिका हातात एक बॉक्स घेऊन आली. तिने तो कमलला दिला.

"अय्या हे एवढे फोटो? यांनी तर कमोड चोक होईल. मग तर उद्याचा मोठा प्रोब्लेम होईल." ती डोळे मोठे करत, आ फाडत म्हणाली.

"कमल.." वेमिकाने बाजूची उशी उचलली आणि तिला मारू लागली. कमलने पण एक उशी उचलली आणि तिला मारू लागली. दोघीही पलंगावर उभ्या एकमेकींना मारत होत्या.

"मी जेवायचं ताट घेऊन येते. किती दिवसांपासून नीट जेवली नाहीये. हे आवर थोडेसे, मी आलेच." म्हणत कमल खोली बाहेर पडली. तर तिला आजी आणि वेद दिसले.

"हा? छुपे रूस्तम, तुम्ही चोरून आमचं बोलणं ऐकत होते?" कमल त्या दोघांना बघत म्हणाली.

आजीने काही न बोलता तिला कुशीत घेतले. वेद कृतार्थ नजरेने तिला बघत होता.

"लहान वयातच खूप मोठी झाली ग." आजी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाली.

"रमाआजी, परिस्थिती खूप मोठी शिक्षिका असते." कमल.

"खुप गोष्टी माहिती तुला तर. किती छान समजावले." आजी.

"टीव्हीचे संस्कार झालेत माझ्यावर.." कमल हसत म्हणाली.

"बरं मी तिच्यासाठी जेवायचं घेऊन येते. तुम्ही पण आराम करा." म्हणत ती चालली गेली.

"वेमिका.." वेद आपले दोन्ही हात पसरून तिच्यापुढे उभा होता.

"भैय्या.." ती पळत जात त्याच्या मिठीत शिरली.

"आय एम अल्वेज विथ यू." तिच्या कपाळावर कीस करत तो म्हणाला.

*******
कधी गोड कधी कडू, असेच दिवस पुढे जात होते.

*******

वेद लॅपटॉपमध्ये ऑफिसचे काही काम करत बसला होता. काम करता करता रात्रीचे बारा कधी वाजले त्याला कळलेच नाही. बसून बसून पाठ अकडली म्हणून तो थोड चालायला म्हणून टरेसमध्ये आला. थंडीचे दिवस असल्यामुळे बाहेर बरीच थंडी होती. कमलने तिथे खूप कुंड्या जमावल्या होत्या. त्यात तिने बरीच फुलझाडं लावली होती. त्यांचा सुगंध हवेत मिसळला होता. बाहेर त्याला खूप प्रसन्न वाटत होते.

फिरता फिरता त्याचे लक्ष तुळशीच्या झाडांकडे गेले.

"एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा.." तो तुळशीचे एक एक करत झाड मोजत होता. त्याला तुळशीचे एवढे सारे झाडे बघून हसू आले. कारण त्यानेच कधीतरी कमलला तुळशीची खूप रोपं लावायचा सल्ला दिला होता.

हसतच तो आपल्या खोलीकडे वळला तर टेरेसच्या एका कोपऱ्यात त्याला कोणीतरी आहे असे जाणवले.

******

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Megha Amol

❤️

//