मिळावे तुझे तुला आस ही ओठी १०

दारू पिणे वाईटच


मिळावे तुझे तुला आस ही ओठी

भाग १०

पूर्वार्ध

राजीव काही कामा निमित्त पंधरा दिवसांसाठी बाहेर देशात जातो. तो बाहेर गेल्यामुळे सर्वांच्या आनंदाला उधाण आले असते. वेमिका भावनिक होत वेद वर बरेच आरोप करते. कमल तिला सांभाळून घेते.

आता पुढे…

संध्याकाळची वेळ होती.

"जया लवकर कमलला फोन दे." पलीकडून फोनवर वेमिका बोलत होती.

"कमलताई वेमिका मॅडमचा फोन आहे. मी बघते पिहूला. तुम्ही जावा, खूप अर्जंट काही आहेत म्हणल्या." जया पिहूला आपल्या कडेवर उचलून घेत म्हणाली.

कमलने फोन घेतला.

"हॅलो वेमिका, मी कमल. काय झालं?"

"कमल ऐक. आधी सगळं शांतपणे ऐक. घरात आरडाओरडा करू नकोस."

"हो."

"भैय्या इथे हॉस्पिटलमध्ये आहे. लवकर इथे ये. आणि हो रमाआजीला यातले काही सांगू नको. " वेमिकाने तिला हॉस्पिटलचा पत्ता सांगितला.


"रमाआजी, वेमिकाला प्रोजेक्टचे काही काम आहे. तिने मला आताच बोलावले. जया मावशी पिहूकडे लक्ष द्या. ड्रायव्हर काका गाडी काढा, पटकन.." कमलने पायात चपला सरकवल्या आणि पळत बाहेर पडली.

"सावकाश जा." आजीने आवाज दिला.

"हो. येते." गाडी रस्त्याने निघाली.

"भार्गवला काय झालं असेल? तब्येत बरी नसेल काय? की एक्सिडेंट? नाही नाही." तिच्या डोक्यात भीतीने घर करायला सुरुवात केली होती.

"काका लवकर चला."

"हो बस आलोच आहे."

कार हॉस्पिटल समोर पोहचली.

"कमल ताई, कोण आहे इथे?" ड्रायव्हर काकांनी न राहवून विचारले.

"वेदभार्गव."

"वेद बाबा?"

"हो. काका घरी काही सांगू नका."

"हो. काही लागलं तर सांगा, मी इथेच आहो." ड्रायव्हर.

"बरं." म्हणत कमल भराभर, जवळपास पळतच खोली क्रमांक शोधत आतमध्ये गेली. लिफ्ट होती पण त्याची सुद्धा तिला वाट बघावल्या गेले नाही. ती पळत जात तिसऱ्या मजल्यावर पोहचली. एका खोली बाहेर तिला वेमिका दिसली. कमल तिच्याजवळ गेली. काही विचारणार तोच तिचे लक्ष दारावर असलेल्या छोट्या काचेकडे गेले. वेमिका त्यातून आतमध्ये बघण्याचा प्रयत्न करत होती.

आतमध्ये वेद पलंगावर झोपला तो खूप हातपाय झाडत होता. तो खूप अस्वस्थ होता. तो ओरडतो आहे, त्याचा चेहऱ्यावरून जाणवत होते. आणि चेहऱ्यावर भयंकर काही त्रास होतोय, दिसत होते. दोन लोकांनी त्याचे पाय आणि हात पकडुन ठेवले होते.

"वेमिका, भार्गवला काय झालं?" कमल.
तिला बघावल्या जात नव्हते. आणि वेमिकाचे उत्तर ऐकायच्या आतच ती दार उघडून आतमध्ये गेली.

"कमल थांब." वेमिका म्हणतच होती की ती आतमध्ये पोहचली सुद्धा होती.

"तुम्ही बाहेर जा. आमची ट्रीटमेंट सुरू आहे." एक नर्स तिच्याजवळ येत म्हणाली.

"मला एकदा बघू द्या. मग मी जाते." कमल काकुळतीने म्हणाली. आणि नर्सचे काहीही एक न ऐकता ती वेदच्या पलंगापुढे जात उभी राहिली. वेदला त्या अवस्थेत रडू कोसळले. आवाज येऊन नये म्हणून तिने आपल्या तोंडावर हात दाबून धरला.

आरडाओरडा सुर असताना वेदचे लक्ष कमलकडे गेले. तिच्या डोळ्यात त्याला पाणी दिसले. ते त्याला असह्य वाटू लागले. त्याचे ओरडणे एकदम बंद झाले.

"मॅडम, प्लीज बाहेर जा. थोड्या वेळाने तुम्ही भेटू शकतात." नर्स.

"नो. वेट. त्यांना राहू द्या." डॉक्टर म्हणाले.

थोड्याच वेळात वेदचे हातपाय आपटने कमीत होत थांबले. तो बराच शांत झाला होता. एकटक तिच्याकडे बघत तो चुपचाप बेडवर पडून होता. त्याचे केस विस्कटलेले, कपडे अस्ताव्यस्त, डोळ्यात पाणी दाटले होते. ते बघून तिला काहीच सुचत नव्हते. ती त्याचाकडे बघत उभी होती.

"सध्या काही देऊ नका. जस्ट कीप वॉच ओन हीम. " डॉक्टर त्याची नस तपासत म्हणाले आणि बाहेर निघून गेले. त्या पाठोपाठ बाकीच्या नर्स पण बाहेर पडल्या.

"मॅडम, डॉक्टरांनी बोलावलंय." नर्स वेमिकाला निरोप देऊन गेली. तसे वेमिका डॉक्टरला भेटायला गेली.

जसे ते सगळे बाहेर गेले, क्षणाचाही विलंब न करता ती भराभर बेडला बांधलेले वेदचे पाय सोडू लागली. तिच्या डोळ्यातील पाणी ओघळत त्याचे पाय भिजवत होती.

"ही लोकं खूप वाईट आहेत. आपण दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊ. असे कोणी बांधून ठेवते काय? " ती त्याचे बांधलेले हात सोडत म्हणाली. तो चूप, फक्त तिच्या कृतीकडे बघत होता.

"चला." ती त्याला चूप बसलेले बघून म्हणाली.

"नाही तेव्हा त्रास सहन करायचा नाही म्हणून एवढे मोठमोठे भाषण देतात. आता ती लोकं कशी वागत होती, तर तोंडातून एक शब्द नव्हते काढत. मुळात कोणी तुम्हाला असे बांधून ठेऊच कसे शकतात?" कमल.

"दारू सोडायची तर एवढे करावे लागेल." तो शांतपणे म्हणाला.

तिला काहीच कळले नव्हते. ती प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत होती.

इकडे वेमिका डॉक्टरच्या केबिनमध्ये गेली.

"या बसा मिस वेमिका."

"थँक्यू डॉक्टर. डॉक्टर काही फरक पडतोय का?"

"हो तेच डिस्कस करायचे आहे. त्या आता आलेल्या मॅडम कोण? मिसेस वेदभार्गव?" डॉक्टर.

"ह?" ती थोडी गडबडली.

"त्यांच्या येण्याने बराच फरक पडला आहे."

"शी इज फॅमिली." वेमिकाने उत्तर दिले.

"ओके. चार दिवसांपासून आपली ट्रीटमेंट सुरू आहे. हळूहळू फरक पडतोय. पण तरीही संध्याकाळ नंतर त्यांना कंट्रोल होत नाही. बहुतेक त्यांना ड्रग्स घेण्याची पण सवय असावी."

"नाही डॉक्टर. भैय्या फक्त अल्कोहोल घेत होता." वेमिकाने माहिती पुरवली.

"हो. मी असे म्हणत नाही आहे ते रेगुलर बेसिसवर ड्रग्स घेत होते. बहुतेक कधीकधी रात्री जेव्हा त्यांना झोप येत नसावी, तेव्हा घेत असावे."

"ओह!"

"म्हणूनच दिवसाच्या सवयीवर त्यांचा कंट्रोल बसला आहे. पण रात्र होत आली की त्यांचे डोकं दुखायला लागते. आणि ते एवढे असते की त्यांना ते असह्य होते. आम्ही प्रयत्न करतोय, पण तरीही त्यांना रात्री झोपेचे औषध द्यावे लागते."

"ओके."

"अल्कोहोल डिसऑर्डरमध्ये आम्हाला फॅमिलीचा पण सपोर्ट हवा असतो. त्याला फॅमिली थेरपी म्हणतात. म्हणून आम्ही तुम्हाला बोलावून घेतले होते. त्यांनी फॅमिलीमध्ये फक्त तुमचं नाव दिले होते."

ते ऐकून तिला पाच सात दिवस आधीच तो दिवस आठवला जेव्हा ती वेदला भावाच्या नात्यावरून खूप काही बोलली होती. ते आठवून तिला आता खूप वाईट वाटत होते.

" हा तर मला हे सांगायचं होते, आता थोड्या वेळपूर्वी मिस्टर वेद आऊट ऑफ कंट्रोल झाले होते. आम्ही अल्मोस्ट त्यांना बॉडी माईंड नम होण्यासाठी इंजेक्शन देणारच होतो. पण त्या मॅडमला बघून ते शांत होऊ लागले होते. त्यांचे पल्स रेट नॉर्मल व्हायला लागले. जे नंतर तुम्ही बघितलेच, ते आपोआप स्थिर झाले."

"हो. तर मग काय करायचं?"

"या मॅडम रात्री इथे राहिल्यात तर ट्रीटमेंटमध्ये मदत होईल, असे वाटते आहे. आम्हाला आजची नाईट ऑब्जरव करायचे."

"म्हणजे नक्की काय करायचं?"

"जास्त काही नाही. फक्त त्या मॅडमला त्यांचा सोबत राहायचे आहे."

"ओके. मी बघते."

"थँक्यू." डॉक्टर म्हणाले.

"बस माझ्या भैय्याला या त्रासातून सोडवा."

"येस. त्यांची स्वतःची इच्छा असल्यामुळे, लवकरच होईल."

वेमिका केबिन मधुन सरळ वेदच्या खोलीत आली.

"हे दारू सोडायला, अशी कशी ट्रीटमेंट देत आहेत. मी तर असे ते पागलखाण्यात बघितले आहे." कमल.

"तू कधी पागलखाण्यात गेली होती?" वेमिका डोळे मोठे करत, आ फाडत तिच्याजवळ येत म्हणाली.

वेदला वेमिकाला बघून हसू येत होते.

"टीव्हीत बघितले, ते खाल्लंय तिने." तो हसत म्हणाला.

"आय स्वेअर कमल, मी घाबरले होते. मला वाटले तू आग्र्यातून पळून आली आहेस." वेमिका हसत होती.

"मी जोक नाही केला आहे. यांना आता कसे बांधून ठेवले होते, तू बघितले नाहीस?" कमल.

"कमल, भैय्या खूप वर्षांपासून ड्रिंक करतो. तो जेवण कमी अन् ड्रिंकच जास्त करत होता. मग इतक्या वर्षांची सवय अशी सहजासहजी चार दिवसात जाईल काय?"

"हो पण तरीही, असे हातपाय बांधणे किती योग्य वाटते? थोडं प्रेमाने वागू शकतात ना?" कमल.

"प्रेमाने वागायला ते भैय्याची बायको ऑर प्रेयसी आहेत काय?" वेमिकाला खूप हसू आले होते.

कमल रागाने तिच्याकडे बघत होती.

"बेबी, ते डॉक्टर आहेत. पेशंटसाठी जे योग्य असते , तेच ते करत असतात."

"पण हे दारू बंद करायला असे हॉस्पिटलमध्ये कोण येते? आमच्या गावातील कधी कोणी गेले नाही." कमल.

"मग कुणाची सुटली काय दारू?" वेमिका.

कमलने नकारार्थी मान हलवली.

"मग, म्हणून हॉस्पिटलमध्ये यावे लागते. आणि इथे खासकरून या गोष्टींचीच ट्रीटमेंट होते. ते सगळे डॉक्टर्स यात पारंगत आहेत." बोलता बोलता वेमिका तिचा हात पकडत तिला बाहेर घेऊन आली.

"पण हे अचानक इथे का आले? घरी तर ठीक होते." कमल.

"पाच दिवस आधी ऑफिसमध्ये त्याची तब्बेत खराब झाली होती. आपल्याला कोणाला काहीच माहिती नाही. प्रोजेक्टच्या कामाने बाहेर चाललोय, असे सांगून तो इथे आला आहे."

"बघ कमल, तो काहीतरी चांगली गोष्ट करण्याचा प्रयत्न करतोय. त्याने अल्कोहोल सोडावे, तुला नाही वाटत का?"

"हो वाटते. दारू पिणे वाईटच."

"हो ना. मग त्यात आपण त्याला मदत करायची. डॉक्टरांनी सांगितले की घरातील कोणीतरी रात्री इथे त्याच्याजवळ हवे आहे. मी थांबले असते, पण माझी उद्या सकाळी परीक्षा आहे. रमाआजीला सांगू नाही शकत."

"हो. त्यांना आता या वयात त्रास होईल."

"हो म्हणूनच त्याने आपल्या कोणाला काही सांगितले नव्हते. ते तर त्याने कॉन्टॅक्टमध्ये माझे नाव लिहिले होते म्हणून नर्सने
मला फोन केला होता. आज मला इथे थांबणं शक्य नाही. तू थांबणार काय? तसे पण राजीव इथे नाही. तर तू थांबू शकते."

"हो मी थांबते. पण रमाआजी?"

"मी तिला सांगते, माझी मैत्रीण हॉस्पिटलमध्ये भरती आहे. तिच्या घरचे येईपर्यंत तू थांबली आहे."

"ठीक आहे. पिहूकडे लक्ष देशील."

"हो ग बाई. बघ रात्री त्याला थोडा जास्त त्रास होतो. काही बोलला, चिडला तर सांभाळून घे."

"हो. तू नको काळजी करू. तू अभ्यास कर."

"ठीक आहे. येते मग मी."

"ड्रायव्हर काका आहेत बाहेर. "

"बरं." म्हणत वेमिका वेदला भेटून चालली गेली.

"तू इथे?" परत कमलला तिथे आलेले बघून वेद म्हणाला.

"मी इतकी खराब दिसते काय? की मी तुम्हाला तुमच्या डोळ्यांसमोर नको असते?" कमल.

"हो. तू हे घर सोडून जाणे, माझं स्वप्न आहे."

"वाट बघा."

"तू घरी जा."

"नाही. मी इथेच थांबणार आहे."

"आगाऊपणा करायचा नाही. चुपचाप घरी जायचं." तो थोडा रागाने म्हणाला.

"आणि मी का म्हणून तुमचं ऐकायचं? हम आपके है कौन?"

त्या वाक्याने तो चूप बसला.

"इथे तुम्ही काल नर्स, डॉक्टर लोकांना खूप त्रास दिलात म्हणे. म्हणून आज मी थांबणार आहे, त्यांचं रक्षण करण्यासाठी."

आपल्या अर्ध्या चेहऱ्यावर हात ठेवत तो खूप हसत होता.

"ते तिकडे कॉर्नरमध्ये आरसा आहे. जा बघ आधी स्वतःला." वेद आपले हसू दाबत म्हणाला.

" प्रत्येक ठिकाणी शक्ती उपयोगी नसते. कधी कधी डोकं पण वापरावे लागते."

"तू आता जोक मारू नकोस, माझे पोट दुखत आहे." तो खळखळून हसत होता. तिला पण त्याच्याकडे बघून आता हसायला येत होते.

आता हळूहळू चंद्र वर येऊ लागला होता. रात्र दाट होऊ लागली होती. तसतसा वेदचा त्रास वाढायला लागला होता. डोकं तडकायला सुरवात झाली. आणि थोड्या वेळातच तो डोकं धरून ओरडू लागला. कमलला खूप भीती वाटत होती.

"डॉक्टर, बघा ना, त्यांना काहीतरी त्रास होतोय. काही औषध द्या." कमल डॉक्टरकडे जात म्हणाली.

"आज औषध नाही देणार. आज आम्ही ऑब्जरवेशन करतोय." डॉक्टर म्हणाले.

"अहो त्यांना त्रास सहन होत नाहीये. आजपुरती द्या." कमल काकुळतीने म्हणाली.

"मिस कमल, आता औषध दिले तर ते शांत होतील. पण किती दिवस असे औषधांच्या भरवशावर झोपणार. शेवटी ते पण घातक आहे. कधी कधी औषधांपेक्षा पण आपलं प्रेम, आपली माया, जास्त असरदार ठरते."

"म्हणजे?"

"तुम्ही त्यांच्यासोबत गप्पा मारा. तुमच्या काही छानछान आठवणी असतील त्या बोला. थोडक्यात त्यांना बिझी ठेवा. म्हणजे त्यांचं त्या दुखण्याकडे दुर्लक्ष होईल."

"मी काय बोलू? माझ्याकडे तर त्यांच्या काहीच आठवणी नाहीत." स्वतःशीच विचार करत, मान हलवत ती खोलीत निघून आली.

नर्स लोकांनी त्याला परत बांधून ठेवले होते. ते बघून तिला वाईट वाटले.

कमल आतमध्ये आलेली बघून नर्सने रूमचा लाईट बंद केला. डिम लाईट सुरू करत ती बाहेर निघून गेली.

वेद डोक्याच्या त्रासामुळे कण्हत होता. तिला काय करावे काहीच कळत नव्हते. तेवढयात तिला वेद आणि आजीचे बोलणे आठवले. ती पलंगाजवळ जात त्याच्याजवळ बसली. त्याच्या चेहऱ्याजवळ खाली झुकली.

"भार्गव!" ती त्याच्या कपाळावर जमलेल्या घामाच्या बिंदुंवर हळूवारपणे फुंकर मारत म्हणाली.

त्या फुंकरच्या स्पर्शाने तो त्याने डोळे उघडले.

"डोकं खूप दुखत आहे?"

त्याने पापण्यांची उघडझाप करत हो सांगितले.

"हे पिणार?" ती त्याच्यापुढे ग्लास धरत म्हणाली.

"मला हैवान नाही बनायचं." तो कसाबसा बोलला.

त्या वाक्याने तिच्या डोक्यात प्रकाश पडला. काही दिवसांपूर्वी तिनेच दारू पिणाऱ्या लोकांना हैवान म्हटले होते. तेच त्याने मनावर घेतले होते. तिच्या त्या शब्दांसाठी तो इतका त्रास सहन करत होता. तिचे हृदय दाटून आले.

तिने त्याचा चेहरा आपल्या दोन्ही हातात पकडला. तिच्या स्पर्शाने त्याचे डोळे आपोआप मिटल्या गेले. त्याच्या कपाळावर, मानेवर जमा झालेला घामावर ती हळूवारपणे फुंकर मारत होती. हळूहळू त्याच्या पायांची आदळआपट मंदावू लागली. त्याच्या चेहरा आणि मानेवरचा घाम हळूहळू साडीच्या पदराने टिपायला तिने सुरवात केली. तसे त्याचे पाय स्थिर झाले. तिने त्याचे बांधलेले हात सोडले. एक हात नीट सरळ ठेवला. दुसरा हात आपल्या हातात घेतला.

"निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई.." तिने गायला सुरुवात केली.

ते शब्द ऐकले आणि त्याच्या बंद डोळ्यांच्या कोनातून अश्रू बाहेर पडू लागले.

"शsss! नाही. अजिबात नाही." ती त्याचे डोळे पुसत म्हणाली.

"झोपायचा प्रयत्न करा." ती त्याचा कानाजवळ झुकत हळू आवाजात म्हणाली.

"निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई.." तिने परत गायला सुरुवात केली. त्याच्या केसांमधून हात फिरवत ती ते गात होती.

ती कधी त्याच्या केसांमधुन मायेने हात फिरवत होती तर कधी त्याचा हाताला कुरवाळत होती. तर कधी त्याच्या हृदयावर हात ठेवत त्याच्या कमीजास्त होणाऱ्या ठोक्यांचा अंदाज घेत होती.

_________


"गूड मॉर्निंग मिस्टर वेदभार्गव!" सकाळी साडेपाचच्या सुमारास नर्स आतमध्ये येत म्हणाली.

"शss!" त्याने नर्सला हळू बोलण्याचा इशारा केला. तशी ती हसली.

"यू आर वेरी लकी मिस्टर वेदभार्गव, तुम्हाला खूप प्रेम करणारी वाइफ भेटली आहे. रात्रभर जवळपास २०-२५ वेळा तरी त्या ते गाणं गात बसल्या होत्या, अगदी न थांबता." नर्स त्याच्या छातीवर डोकं ठेऊन झोपलेल्या कमलकडे बघत म्हणाली.

ती माझी बायको नाही, त्याला सांगावेसे वाटले पण आवाजाने कमल उठायला नको म्हणून तो चूप बसला.

"तुम्ही झोपल्याचे खात्री झाली, तसे नंतर मी डिस्टर्ब करायला आले नाही. नंतर मॅडम कधी झोपल्या माहिती नाही."

नर्स बोलत होती, पण तो कमलकडे बघत होता. ती त्याचा छातीवर झोपली होती, म्हणून त्याला तिचा चेहरा नीट दिसत नव्हता. तिच्या डोक्यातून हात फिरवायचा त्याला मोह झाला. पण तिची झोप खराब होईल म्हणून त्याने आपला मोह आवरता घेतला.

"सध्या तुम्हाला कुठल्या मेडिसिनची गरज तर नाही. डाक्टर राऊंडला आले की तपासातील." ती त्याचा बीपी मोजत म्हणाली.

"ओके. तोपर्यंत डोन्ट डिस्टर्बचा बाहेर बोर्ड लावा." तो हळू आवाजात म्हणाला.

"ओके सर." ती त्याच्याकडे बघत छान हसली. आणि बाहेर निघून आली.

पहिल्या दिवशी घरात आलेली कमल, त्याला सगळं आठवत होते. आणि कधीतरी परत त्याला झोप लागली.

*********

दोन दिवस कमल हॉस्पिटलमध्ये होती. पण नंतर राजीव परत आल्यामुळे तिला जाता आले नाही. पण एव्हाना घरी आजीला वेद बद्दल माहिती पडले होतेच. एकदा ती सुध्दा त्याला भेटून आली होती. तर डॉक्टरांनी त्याच्या ९० टक्के सुधारणा झाल्याचे सांगितले होते. दोन दिवस वेमिका त्याच्याजवळ थांबली होती. तिने त्यांचे लहानपणीचे, जेव्हा त्यांचे बाबा हेमंत होते तेव्हाचे सगळे फोटो सोबत नेले होते. रात्रभर जुन्या आठवणींवर बोलत दोघेही गप्पा मारत होते. आणि त्यातच मग वेद झोपी जात होता.

*******
आज हॉस्पिटल मधून वेदला सुट्टी झाली होती.

वेद दारात आला तर कमलने वेमिकाला काही इशारा केला. तसे तिने आजीच्या हातात औक्षणचे ताट दिले. आजीच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता. त्याने वेमिकाकडे बघितले तर ती पण खुश दिसत होती. कमलकडे बघितले तर ती दूर कोपऱ्यात उभी होती. तिच्या पण डोळ्यात आनंदाचे सितारे चमकत होते. आजीने औक्षण करत त्याला आतमध्ये घेतले.

"या, मोठी जंग जिंकून आलात?" वेदला घरात येताना बघून राजीव छद्मीपणे हसत म्हणाला.

" मी काही खूप ग्रेट आहे किंवा खूप मोठं असे केले आहे, असे म्हणणार नाही. पण स्वतःतील वाईट गोष्टी खास करून ज्याने दुसऱ्यांना त्रास होतो त्या गोष्टी दूर करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो. आणि तुम्ही पण प्रयत्न करून बघायला हवा. इट्स फील ग्रेट!" म्हणत तो आपल्या खोलीत गेला.

*******

असेच पुढे दिवस जात होते. वेद ऑफिसमध्ये रमत चालला होता. त्याचा कामावर हात बसू लागला होता. आणि मुळात काम करतांना तो आनंदी होता. ठप्प बसू बघणारी कंपनी हळूहळू वर जात होती. तो कामात खूप व्यस्त झाल्यामुळे आता त्याचे चिडणे, तोडणे, फोडणे सुद्धा कमी झाले होते.

********

"वेमिका काय झालं आहे? एवढी का रडते?" कमल.

"मी संपवून टाकेल स्वतःला.." वेमिका.

******

क्रमशः




🎭 Series Post

View all