मी कात टाकली.भाग-1
©®राधिका कुलकर्णी.
मुक्तांगण महिला सेवा समितीच्या प्रांगणाला आज उत्सवाचे स्वरूप आले होते.संपुर्ण पटांगण फुलांच्या माळा आणि पताकांनी सुशोभित केले गेले होते.सर्व महिला कार्यकर्त्या उत्साहात आपल्याला दिलेली कामे पार पाडत होत्या.प्रवेशद्वारावर मुक्तांगणच्या कार्यक्रमाची तपशीलवार माहिती येणाऱ्या जाणाऱ्यांना कळेल अशा स्वरूपात एका मोठ्ठ्या फलकावर लावण्यात आली होती.प्रवेशद्वाराची कमानही फुलांच्या माळा अंब्याची तोरणे आणि लाईंटींगनी सुशोभित केली होती.सर्व परीसरात शांत मंजुळ सनईचे सुर ऐकु येत होते..ह्या सगळ्या लगबगीचे कारणही तसेच खास होते.
आज मुक्तांगण महिला सेवा समितीचा वर्धापन दिन महोत्सव होता.जवळपास चाळीस वर्षांपुर्वी ह्याच दिवशी रूस्तमशेठंनी ह्या महिला समितीची स्थापना केली होती.एक दोन गरजू अनाथ स्त्रीयांना मदत करता करता हे इवलेसे रोपटे आज एका वटवृक्षात रुपांतरीत झाले होते आणि आज हजारो गरजु महिला ह्या समितीच्या आश्रयाने मानाचे जीवन स्वयंपुर्णतेने जगत होत्या.
समाजाने,परिवाराने टाकलेल्या दुर्लक्षित केलेल्या कितीतरी अनाथ पोरक्या स्त्रीयांना आज मुक्तांगणने हक्काचे माहेर देऊ केले होते.मुक्तांगणच्या छायेने त्यांना फक्त आश्रयच दिला नव्हता तर त्यांच्या अंगी असलेल्या उपजत कलागुणांना वाव देऊन त्यातुन उत्तमोत्तम वस्तु त्यांच्याकडुन बनवुन त्यांना विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्द्ध करून दिली होती.त्यांच्या प्रॉडक्ट्सना एक ब्रँड व्हॅल्यु मिळवुन देऊन पार सातासमुद्रापलिकडेही त्याची विक्री होऊन ह्या सर्व स्त्रीयांना स्वत:च्या अर्थाजनाचे खुले व्यासपिठच उघडे करून दिले होते.
दुग्ध शर्करा योग म्हणजे समितीच्या सर्वे सर्वा ज्येष्ठ ट्रस्टी सौ.मुक्ता तारे ह्यांच्या आत्मकथनपर पुस्तकाचे विमोचनही आज ह्याच कार्यक्रमात होणार होते.
महिला सेवा समितीचे फाऊंडर मेंबर समितीचे मायबाप,बंधु,सखा सारे काही असलेले रूस्तम शेठ ह्यांच्या हस्तेच ह्या पुस्तकाचे विमोचन होणार होते.
आपल्या लाडक्या मुक्ता ताईंची आत्मकथा आज जगापुढे पुस्तक रूपाने प्रसिद्ध पावणार म्हणुन सर्वच महिलांना विशेष कुतुहल आणि उत्सुकता होती..
सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत रंगमंच सजला तसे सर्वांचे पुष्पगुच्छ हार घालुन औपचारीक स्वागत झाले.
आणि आता तो क्षण समीप येऊन ठेपला ज्याची सर्वांना आतुरतेने प्रतिक्षा होती.
मुक्तांगणचे फाऊंडर मेंबर ट्रस्टी आणि सर्वेसर्वा
साधारण पंच्याहत्तर ते ऐंशीच्या घरात असलेलं उमदे तरूण व्यक्तिमत्त्व रूस्तमशेठ आता डायसवर आले.तरूण हे संबोधन ह्यासाठी कारण ह्या वयातही त्यांचा कामाप्रती उत्साह अगदी तरूणांना लाजवेल असाच होता.
पांढराशुभ्र सलवार कमीज.अत्यंत शांत धीर गंभीर मुद्रा.साडेसहा फूट उंची,गौरवर्ण आणि भव्य भालप्रदेशावर पांढऱ्या भस्माचा टिळा असे भारदस्त व्यक्तिमत्त्व म्हणजे रूस्तम शेठ.
आपल्या प्रसन्नमुद्रेवर किंचित स्मित आणुन त्यांनी सभोवार बघितले.विनम्रपणे हात जोडुन सगळ्यांना अभिवादन करून त्यांनी आपल्या भाषणाला सुरवात केली.सगळा भगिनीवर्ग त्यांचे भाषण तल्लीनतेने ऐकत होता.
सगळ्या महिलावृंदाला आणि अतिथीगणांना संबोधित करून झाल्यावर आजच्या दिवसाच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर ते येऊन पोहोचले.त्यांचा ऊर अभिमानाने भरून येत होता.होऽऽऽ..कारणही तसेच होते.आज त्यांच्या मानस कन्येच्या म्हणजेच मुक्ताच्या पुस्तकाचे विमोचन त्यांच्याच हातून होणार होते.
एका पित्याचा ह्याहून मोठा सन्मान तो काय असु शकत होता!!!!!
एकीकडे चेहऱ्यावर हसु आणि दुसरीकडे डोळ्यात आनंदाश्रु अशी त्यांची अवस्था होती.
रूस्तमशेठ मुक्ता बद्दल भरभरून बोलत होते तर
मुक्ताचे डोळे मात्र पाणावले होते.
मन नकळतपणे पंचवीस तीस वर्ष मागे स्वत:च्याच भूतकाळात गेले……..………...
~~~~~~~~~~~~~~~~
मीट्ट काळोख पसरलेला चहुकडे.डोळ्यात बोट घातले तरी हे आपलेच बोट आहे का हा प्रश्न पडावा इतका अंधार माजलेला.
मुक्ताचे सारे अंग वेदनेने ठणकत होते.क्षणभर आपण कुठे आहोत ह्या जाणीवेच्याही पार पल्याड गेली होती तिची स्मृति..
वेदेनेने कण्हत कुंथत कसेतरी तिने डोळे उघडझाप करून उघडायचा प्रयत्न केला.दाराच्या फटीतुन अलगद येणारी तिरिपही डोळ्यांना सहन होत नव्हती.
दिवस-रात्र,वेळ-वार,तारीख-महिना ह्या कशा-कशाशी कित्येक दिवसात तिचे नातेच तुटले होते जणु.
स्वत:ला प्रयत्नपुर्वक मानेला एक जोराचा हिसडा देत बोटे भूमीवर घट्ट रूतवुन त्याच्या आधाराने उठुन बसायचा तिने प्रयत्न केला तशी कमरेतुन एक तीव्र सणक गेली वेदनेची आणि ती पुन्हा कोलमडून जमिनीवर पडली.तिची वेदना तिच्या आक्रसलेल्या कृष चेहऱ्यावर उमटली तरीही धीर करून तिने डोळे उघडले.मेंदुवर जोर देऊन आठवायचा प्रयत्न केला.
किती दिवस झाले मी अशी ह्या अंधार कोठडीत खितपत पडुन आहे?
गवतावरच्या गंजीवरून महतप्रयासाने वेदनेला दूर सारून ती उठुन बसली.गवतावर सगळीकडे रक्ताचे डाग पडले होते.तिच्या अंगावरही बऱ्याच जखमा होत्या आेरबाडल्याच्या.ठिकठिकाणी काळेनिळे चट्टे उमटलेले.कमरेखालचा भाग तर जणु सून्न पडला होता.
खोलीभर एक कुबट वास पसरलेला होता.तिला आत्ता कुठे त्या दुर्गंधीची जाणीव झाली.
अंगावरच्या फाटक्या ओढणीने तिने आपले नाक दाबले.आणि अंधारातच त्या बंद खोलीचा मागोवा घेऊ लागली.
चारीबाजुंनी बंद भिंतीला फक्त एक छोटी लाकडी खिडकी होती पण ती ही बाहेरच्या झाडीझुपटींनी पुर्ण झाकुन गेलेली होती.
दरवाजा…!!!
नीट डोळे ताणुन बघितल्यावर भिंतीच्या एका गोल दिवडीत एक मजबूत लाकडी अगदीच खूजा,लहान दिंडी दरवाजा बाहेरून जाड जुनाट साखळ्ंयांनी घट्ट कुलूपबंद केलेला होता.
ती कशीबशी अंगात अवसान आणुन उठली आणि खुरडत खुरडतच दरवाजापर्यंत पोहोचली.दरवाजावर थाप मारून अंदाज घेण्याचा प्रयत्न केला पण पलिकडे कोणतीही सजीव हालचाल जाणवत नव्हती.
ती हताशपणे तिथेच दरवाजाला टेकुन बसली.थोडावेळ गेल्यावर त्या खोलीतल्या एक एक गोष्टी तिच्या नजरेला अंधुक अंधुक दिसु लागल्या.दरवाज्याला लागुन दुसऱ्या कोपऱ्यात एक मडक दिसत होतं.बहुदा तिला तहान लागली तर पाण्याची सोय म्हणुन तो माठ ठेवला असावा.
ती खुरडतच त्या गाडग्याजवळ पोहोचली.त्यात पाणी होतं.बाजुलाच एक तुटका प्लॅस्टीकचा ग्लास पडलेला होता.तिने त्या ग्लासाने मटक्यातुन पाणी काढले आणि थोडे चेहऱ्यावर शिंपडले तशी तिला तरतरी आली.उरलेले दोन घोट पाणी गळ्याखाली उतरवले आणि ती तिथेच बसुन विचार करू लागली.आपण इथे ह्या अवस्थेत कसे आलोय???
~~~~~~~~~~~~~~~~
मुक्ता जेमतेम सतरा अठरा वर्षांची अनाथ पोरं.
आपल्या मामा-मामीच्या आश्रयाने रहात होती.
लहानपण तसे चारचौघां सारखेच होते.
आई वडील आणि एकुलती एक मुक्ता.रोजंदारीवरचेच काम पण खाऊन पिऊन समाधानी होते
आई लोकांची पडेल ती काम करायची.वडीलही मोलमजुरी करायचे.पण प्रचंड दारू प्यायचे.दारूच्या नशेत रोज आईला मारहाण आणि शारीरिक बळजबरी करायचे.मुलगी झाली म्हणुन त्यांचा प्रचंड राग आई लेकीवर.
पण आई मात्र खूप जपायची मुक्ताला.आपली जी अवस्था आहे तशी लेकीची होऊ नये म्हणुन ती सतत झटायची.मुक्ताचे शाळेचे वय होताच तिने तिला म्युनसीपालटीच्या शाळेत घातले.
"मुक्तेऽऽऽ,बघ शिकुन मोठी व्हयं,आपल्या पायावर ऊभी ऱ्हाय.माझ्यासारखे हाल तुझे होऊ नये गं बाईऽऽऽ..तेव्हा रोज बिनचुक शाळंला जायचं,मास्तर काय शिकवत्यात त्ये न्यीट ध्यानात ठुवायचं,आन्ंऽऽ रोज मन लावुन अभ्यास करायचं,ऱ्हाईल का ध्यानात???"
लहानग्या मुक्ताला आपल्या आईचे हे शब्द रोज कानावर पडुन पडुन पाठ झाले होते.ती ही रोज न चुकता शाळेत जायची.
सकाळी आईच्या बरोबरीने ती ही उठायची.
सकाळी उठुन सगळ्यात पहिले ती एक काम अगदी रोज न चुकता करायची ते म्हणजे सगळ्या आळीभर फिरून खूप सारी फूले गोळा करून ओच्यात वेचुन आणायची.त्याचे छान सहा सात हार ओवायचे.एक हार घरच्या अंगणातल्या तिच्या गणोबाला.
होऽऽऽ हा फक्त तिचाच गणोबा कारण मुक्ताची आई खूप छान मातीचे गणपती बनवायची.तिचे बघुन बघुन मुक्ताही गणपती बनवायला शिकली.पण घरातला गणपती नऊ दिवसांनी तळ्यात विसर्जीत व्हायचा आणि मग मुक्ताला खूप रडू यायचे म्हणुन मग तिने एक मुर्ती स्वत:साठी बनवुन ती अंगणातल्या लिंबाखाली एक शेणाने सारवलेल्या चौथऱ्यावर विराजमान केली.मग रोज त्याच्या सोबत गप्पा काय,अभ्यास काय,सगळे तिकडेच.
आणि रोज न चुकता त्याला सुवासिक फुलांचा हार घालण्याचा नियम काही मोडला नाही तिचा.तर असा एक हार गणोबाला,एक तळ्याखालच्या पिंडीला,एक बाईंना द्यायला,एक आईला एक स्वत:ला,एक नंदा तिची शाळेतली जीवलग मैत्रिण आणि एक केदारला.
केदार म्हणजे तिचा मामेभाऊ.वयातही काही फार अंतर नव्हते दोघांत.फार फार तर तीन चार वर्ष इकडेतिकडे.
तिचा आपल्या भावावर फार जीव.सगळे हार करून झाले की पटकन आंघोळ की लगेच घरच्या गणोबाला एक हार घालणार.आईच्या डोक्याला एक गुंफुन मग लगेच पाठीवर शाळेचे दप्तर अडकवुन ऊड्या मारतच शाळेकडे निघणार.
वाटेत तळ्यावरच्या महादेव पिंडीवर एक हार चढवुन बाहेरच्या पारावर तिचा भाऊ केदार बसलेलाच असायचा.ती त्यालाही रोजच्या सवयीने एक हार द्यायची.मग दोघे मिळुनच शाळेला जायचे.
केदार तो हार त्याच्या मनगटावर बांधुन रस्ताभर त्याला हुंगत रहायचा.जाईचा तो सुगंध धुंद करून सोडायचा.
ती केदारला म्हणतही असे,"काय रे केदारऽऽ असा मनगटावर का बांधुन घेतोस?"
त्यावर तो म्हणे," अगंऽ मला कुठे लांब वेण्या आहेत तुझ्यासारख्या डोक्यात माळायला म्हणुन मी मनगटावर बांधतो.आणि ते मागल्या आळीतले सर्जाकाका नाही का असाच हातावर तर बांधतात गजराऽऽऽ..!!"
त्यांचे नाव एेकताच चपापुन तोंड दाबत हळू आवाजात मुक्ता केदारला म्हणते,"अरे केदार त्या सर्जाकाकाच नाव काढु नकोसऽऽ.आई सांगते की ते वाईट चालीचे आहेत.त्यांच्या नादी लागायचे नाही म्हणुन.तु त्यांची नक्कल करून असा गजरा नको बाबा बांधुस मनगटावर…"
त्यावर केदार म्हणतो,"वाईट चालीचे म्हणजे नेमके काय?ते तर मस्त खुषीत असतात.मी बघतो ना रोज सकाळी पहाटं पहाटंच त्या चमेलीबाईच्या माडीवरून खाली उतरत असतात.मला बघुन हसुन कधी कधी गोळी पण देतात खायला.खूप चांगलेत ते.उगाच आत्या नावे ठेवते त्यांना."
गप्पांच्या नादात शाळा यायची.शाळेत गेल्याबरोबर एक हार नंदाला आणि उरलेला बाईंना दिला आणि त्यांनी तो हसतमुखाने त्यांच्या केसात माळला की कोण आनंद व्हायचा मुक्ताला.
अभ्यासात मुक्ताला प्रचंड गोडी.बाईंचे पण तिच्याकडे विशेष लक्ष असायचे.परिस्थितीने खालावलेली असुनही नेहमी प्रसन्न हसतमुख राहणारी गोड मुक्ता अभ्यासातही वर्गातल्या इतर उच्चभ्रू मुलांपेक्षा काकणभर सरसच होती.त्यामुळेच की काय वर्गात ती सगळ्यांची लाडकी होती.शाळेतल्या विविधगुणदर्शन कार्यक्रमात आईने शिकवलेला मातीचा गणपती बनवुन तर तिने सगळ्यांची शाबासकी मिळवली होती.
नंदा मुक्ताची वर्गमैत्रिण.तिचे वडील पोलीस खात्यात होते. तिची आणि हीची खासी गट्टी.
कधी कधी घरातल्या वडीलांची आईला मारहाण,अपरात्री कसलेतरी पडद्याआडचे आईचे आवाज,कधी मारल्याचे आवाज आणि हुंदके.आणि पहाटे केव्हातरी जाग आल्यावर स्वप्न वाटावे असे स्वत:ला पुन्हा आईच्या कुशीत बघुन सुखावणारी मुक्ता आपली सगळी भीती,चींता,दु:ख नंदाजवळ बोलुन दाखवे.
वडिलांच्या मारण्याने आईच्या अंगावरचे काळेनिळे डाग बघुनही आपण काहीच करू शकत नसल्याची तीची असाहयता ती आपल्या ह्या मैत्रिणीजवळ व्यक्त करी.
त्यावर नंदाही तिला हेच समजावत असे, "हे बघ मुक्तेऽऽऽ तुला जर वाटत असेल नाऽऽऽ आईचे हाल कमी व्हावे तर तु शिकुन लई मोठ्ठी ऑफीसर बन मग बघ तुझ्या आईला कित्तीऽऽऽ आनंद होईल."
त्यावर मुक्ताही म्हणे,"होऽऽ मगऽ मी होणारच आहे मोठ्ठी साहेबीण बाई.मग बघ कसे तालावर नाचवते एकेकाला."
~~~~~~~~~~~~~~~~~~
अशीच तीन चार वर्ष गेली.मुक्ता आता चौथीत इयत्तेत आली.
मधल्या काळात नंदाच्या वडीलांची बदली होऊन ती ही शाळा सोडुन परगावी निघुन गेली.
मैत्रिण निघुन गेल्यावर मुक्ताचा एकटीचा प्रवास सुरू झाला….
एक दिवस शाळेतुन घरी आली तर नेहमी सत्ताड उघडे असणारे घराचे दार बंद.तिने आश्चर्यातच दारावर थाप मारून आईला जोरजोरात आवाज दिले पण कोणी एक नाही नी दोन नाही.मग काळजीने दप्तर तिकडेच फेकुन तिने शेजारच्या भागामावशींना बोलावले.रडत रडतच आई दार उघडत नाही सांगीतले तसे त्याही हातातले काम टाकुन आश्चर्यानेच तिच्याबरोबर आल्या.
एवढ्याश्या त्या वस्तीत कुणाच्याच घराची दारे कधीही बंद नसत.दिवसाढवळ्या तर नाहीच नाही.कुठे बाहेर जायचे झाले तरी आत्ता येते सांगुन दाराला फक्त कडी लावुन लोकं बिनधास्त एकमेकांच्या भरवशावर घर उघडी टाकुन जात असत त्यामुळे भरदिवसा मुक्ताच्या घराचे दार आतुन बंद ही गोष्ट काही भागाबाईंच्या डोक्यात फीट बसेना.तशाच तरातरा हातातले काम सोडुन एका हाताला मुक्ताला धरून त्याही दरवाजाशी आल्या.खरचच दार आतुन बंद होते.किती आवाज दिले तरी कोणी प्रतिसाद देत नाही म्हणल्यावर त्यांच्या मनात भीती दीटुन आली पण ती चेहऱ्यावर दिसु न देता त्या मुक्ताला म्हणाल्या,"मुक्ते जा बघु आमच्या घरून तुझ्या काकास्नी बोलवुन आण."
ती धावतच भागा मावशीच्या घरी त्यांच्या नवऱ्याला बोलवायला गेली.तोवर ह्यांनी खिडकीत मान उंच करून बघायचा प्रयत्न केला आणि जे दिसलेऽऽ तेऽऽ पाहुनऽऽ त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली………….!
-----------------------(क्रमश:-1)--------------------------------
(क्रमश:-1)
©®राधिका कुलकर्णी.
नमस्कार मंडळी…..!
नविन कथेसह तुमच्यासमोर सादर होत आहे.
"मी कात टाकली"
काय दिसले असेल भागामावशींना बंद दाराआड?
मुक्ता त्या अंधार कोठडीत कशी आली?
तिचा घर ते अंधार कोठडी हा चित्तथरारक प्रवास जाणुन घ्यायचा असेल तर पुढील भाग वाचायला मुळीच विसरू नका.
कसा वाटला आजचा पहिला भाग?
हे ही कमेंट्सद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या,नावासहीत ही कथा शेअर करायला माझी हरकत नाही.)
धन्यवाद.
@राधिका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा