Login

मी कात टाकली भाग -9

मुक्ताच्या संघर्षपुर्ण आयुष्याची रोमहर्षक चित्तवेधक कथा.

मी कात टाकली भाग - 9

©®राधिका कुलकर्णी.

केदारला पोलिस पकडुन नेले त्यालाही दोन महिने उलटुन गेले होते.

मुक्ता घर आणि बाहेरचे काम संभाळुन बारावीचा अभ्यासही करत होती.तिची तारेवरची कसरत करता करता खूप दमछाक होत होती पण त्याला पर्यायही नव्हता.दिवस महिने असेच पुढे चालले होते..

एक दिवस मामी डोकं दुखतय म्हणुन वावरातुन लवकर घरी आली तर पोस्टमन अंगणाच्या फाटकात एक पत्र टाकुन गेला होता.

मामी तर अशिक्षित वाचायला येत नव्हते.पत्र कोणाचे ही उत्सुकता काही गप्प बसु देईना मग मुक्ती यायची वाट न बघता ती शेजारच्याच एका शाळेत जाणाऱ्या मुलाला बोलावुन घेतली.त्याला पत्र वाचुन दे म्हणाली तसे त्या पोराने ते पत्र वाचुन दाखवले.

पत्र केदारचे होते.तालुक्याच्या जेलमधुन त्याने आपल्या मायला पत्र लिहीले होते.पत्राचा मजकुर खालीलप्रमाणे होता.

प्रिय माय,

केदारचा सादर परणाम (प्रणाम).

हे पत्र म्या तालुक्याच्या जेलातुन धाडतोय.मला हिकडच ठेवलय.तु कशी हायेस?

तुला त्या मुक्तीच लईच कवतिक हाय पर तुला ठाव हाय का मला अटक कुणामुळे झाली?

तुझ्या लाडक्या मुक्तीमुळं.

हिकड आणताना पोलीसला खोदुन इचारलं तवा त्यातल्या एका शिपायान सांगितल कोणतरी पोरगी सुगावा सांगत आली होती पोलीस टेशनात...

मी घरला आल्याची वर्दी तिनेच पोलिसात दिली म्हुन पोलीस घरला येऊन मला घेऊन गेले.हे काम तिचेच असल असा दाट संशव हाय मला.तिच्यामुळच मला सात महिन्याची शिक्षा झालीय.

एकदा ती शिक्षा संपवुन मी डिसंबरात घरला आलो की माझ लगीन त्या मुक्तीशी लावुन दे.

ती मला लई आवडती पर म्या तिला सोडणार नाही.तिच्यामुळे मला जेलात सडाव लागलय ह्याचा बदला घेतल्या बीगर मला चैन पडनार न्हाय.आता लगीन करूनच तिचा बदला घेनार म्या.

एकदा का ती माझी बायकु झाली की मंग तिला माझ्याविना पर्यावाय उरनार नाही तवा तिला दाखवीन केदार काय चीज हाय.

पर तु आत्ताच तिला ह्यातलं काय बी बोलु नगं.लई हुशार डोस्क्याची हाय.बुक वाचुन जरा जास्तच मिजास आलीय तिला.लगेच नवीन कायतरी युगत लढवल मला बाहेर घालवायची.मी सुटुन आलो की मग बग कशी सरळ करतो तिला तोवर तु संभाळुन रहा.

माय मी तर ह्या बारीला ठरूनच आलो होतो की आता समदे वाईट वंगाळ धंदे सोडुन नीट रहायच,तुझी सेवा करायची.बा ची कमी पुरी करायची पर ह्या मुक्तीनं माझ्या सगळ्या मनसुब्यावर पानी फिरवलं अन् तुज्या लेकराला तुज्यापासनं येगळं केलं..!!

तु काळजी घे सवताची.मुक्तीला पत्राबद्दल काय बी सांगु नगं.पत्र वाचुन लागलीच फाडुन टाक..माझी काळजी करू नगस.मी लवकरच घरला येईन.आल्यावर भेटुच.

तुजा,

केदार.

पत्र वाचुन मामीची मतीच सुन्न झाली.खरच केदार म्हणतो तस मुक्तीनेच पोलीसात कळवलं आसनं का?

अन् हे जर खर आसन् तर मग ती हाय अन् म्या हाय ..नाय तिला काम करू करू फुकली तर नावाची मामी न्हाय.माज्या पोराला माह्यापासुन तोडती काय ही आता बघतेच हिला….!

मामीच टाळकच सरकल होतं केदारच्या पत्राने.

तिला मनोमन खूप आनंद झाला जेव्हा नवरा मेल्यावर केदार खूप दिवसांनी घरी परतुन आला.तिला वाटलं होत पोराच लगीन लावुन दिलं तर बायकोच्या नादान हा घरात टिकुन राहीलं.वावराचं काम बघल.आणि मुक्तीसारखी गरीब गाय सून मिळाली की ती मान वाकुन काम बी करल अन् पैका बी मिळवन..पण मामीच्या ह्या सगळ्या इराद्यावर केदारच्या जाण्याने पाणी पडले होते.त्यात केदारच्या पत्राने ती आग अजुनच शिलगवली.आता गोड बोलुन काट्यानं काटा काढायचा असे मामीने मनाशी त्याच दिवशी पक्के केले.

इकडे ह्या सगळ्यापासुन अनभिज्ञ मुक्ता वावरातुन घरी आली.मामीला झोपलेलं बघुन तिने मायेन चौकशी केली.हात पाय धुवुन मामीला आलं ठेचुन चहा करून दिला.तिचे डोके चेपुन दिले.घरातली बाकीची कामे उरकुन सैपाक केला.मामीला घाईने आधी जेवु घातले.जेवण पोटात गेल्यावर मामीचे डोके दुखणेही थांबले.पण मनातला दाह काही शांत होईना.

तिची तीच संभ्रमात पडायची.एकीकडे मुक्ताचे मायेने आपुलकीने सगळे करणे आठवले की वाटायचे नाही..पोरीला किती माया आहे आपल्या बद्दल ती न्हाई अस करणार पण दुसऱ्याच क्षणी तिच्यातली आई जागी होई आणि त्याबरोबर तिची सूडबुद्धीही…

केदारची कटकट विनासायास मिटली ह्या आनंदात मुक्ता पडेल ते काम करून मामीला खुष ठेवायचा आतोनात प्रयत्न करत होती.

कारण आता बारावीच्या परीक्षेला तिला तालुक्याला जाऊनच पेपर्स लिहावे लागणार होते.अकरावी सारखे पेपर्स सरांकडे आणुन लिहायची सोय आता होणार नव्हती त्यासाठी अाधीपासुनच मुक्ता मामीला प्रेमाने वळवण्याचा प्रयत्न करत होती परंतु केदारच्या पत्राने अगोदरच तिच्या सगळ्या विचारात काटे घालुन ठेवले होते.मामीचे मत केदारने कलुषित करून ठेवलेय हे त्या बिचारीला कुठे ठाऊक होते.??

तिचे सगळे रूटीन आता फिक्स होते.पहाटे चारला उठुन घरची कामे उरकुन सरांकडे शिकवणी उरकुन वावरात जायचे.वावरातुन घरी येऊन पुन्हा उरलेली कामे सैपाकपाणी उरकुन मामीला झोप लागली की गुपचूप अभ्यासाची पुस्तके वाचणे.

इकडे असे तसे एक-दोन दिवस सरले आणि मामीने आपल्या खुनशी डोक्यातुन मुक्ताला त्रास द्यायची नवी युक्ती शोधुन काढली.

वावरातुन येताना एक क्विंटल ज्वारीच पोतं घेऊन आली.मुक्ताला काही कळेचना इतकी ज्वारी कोणी दिली आपल्याला..?मनातल्या मनात विचार चालुच होता तेवढ्यात तो माणुस पोतं पडवीत टेकवुन निघुन गेला.

तिने मामीला उत्सुकतेनेच विचारले त्यावर मामी बोलली," मागल्या आळीतल्या पाटलाकडं कसलातरी कार्यक्रम हाय त्याला ज्वारी निवडुन हवीय एक दिवसात.पैक बी देतो म्हनलाय चांगले.मग मी म्हनल आपनच करू,,, बर केलं न्हवं म्या??"

मामीने मानभावीपणे उलट प्रश्न विचारून मुक्तालाच खिंडीत पकडले.

मुक्ताला पुर्ण कल्पना होती की मामी तर काही ताटभर ज्वारी पण निवडायला हात लावणार नाही.म्हणजे हे काम पण आता आपल्याच ऊरावर आले…….

आलिया भोगासी असावे सादर…..!

म्हणत मुक्ताने रात्रभर जागुन ते सगळ पोतभर जोंधळं निवडुन ठेवले.आजचा एक दिवस अभ्यास बुडला तरी उद्या त्याची कसर भरून काढु असा विचार करून तिने काम हातावेगळे केले.ज्वारी निवडून होईपर्यंत पहाट झालेली होती.तिची पुर्ण पाठ बसुन बसुन आखडुन गेली होती.पाच मिनीटही धरणीला पाठ टेकायला मिळाली नाही तिला.आता झोपले तर सगळ्या कामांना उशीर होईल म्हणुन ती लगेच बाकीची कामे करायला उठली.आज काम करताना रोजच्यासारखा वेग येत नव्हता तरी ती जीव ओढुन एक एक काम करत होती.

सकाळी रोजच्यावेळी मामी उठली तर पोत होत तसच नीट लावलेल पाहुन तिने रागातच विचारले,"काय ग अजुन जवारीला हातबी लावलेला दिसत न्हाय मग रात भर काय केलेस?"

त्यावर मुक्ता हलक्या आवाजात मामीला चहा देत बाेलली,"सगळी ज्वारी रातभर जागुन निवडुन ठेवलीय मामी."

मामीला विश्वासच बसेना.तिने बाजुला जेव्हा काड्या खड्यांचा गोळा केलेला कचरा बघितला तेव्हा तिला आश्चर्यच वाटले.पोरगी हाय का भूत..!! इतक्या वेगाने काम केले,नीट तरी केलेय का!!

म्हणुन तिने पोत उघडून बघितले तर खरच स्वच्छ दिसत होती ज्वारी.आता तर तिला पैसे कमवायची ही नवीच कुंजी मिळाली. मुक्तासारखी कामाला वाघ घरात असताना मला इतके दिवस हे का नाही सुचले असाही विचार  मामीच्या स्वार्थी डोक्यात आला.मग हे सत्र असेच चालु राहीले.कधी डाळ,कधी गहू,ज्वारी,बाजरी कधी काय तर कधी काय मामी घरी निसायला आणु लागली.दिवसभर वावरात मजुरी करून पुन्हा घरकाम करून थकलेल्या शरीराला घडीभर सुद्धा आराम मिळेना झाला मुक्ताला.त्यात खाण्याचीही आबाळ व्हायची.ह्या सगळ्यात मुक्ताची तब्ब्येत हळुहळु खंगत चालली होती पण मामीला फक्त पैसा दिसत होता.पोरीसाठी जराही दयामाया तिच्या मनात उमटत नव्हती.असेच सहा/सात महिने गेले.मुक्ताचा चेहरा दिवसेंदिवस निस्तेज होत चालला होता.कधीकधी अभ्यास करता करताच गंधे सरांच्या घरी तिला डुलक्या येवु लागायच्या पण दिवसभरात फक्त गंधे सरांकडे जो काय अभ्यास ती करायची तेवढाच काय तो अभ्यास व्हायचा नंतर तर तिला दिवसभर उसंत मिळत नसे त्यामुळे कितीही झोप येत असली तरी डोळ्यावर पाणी मारून मारून ती नेटाने अभ्यास करायची.म्हणता म्हणता सात महिने झाले.डिसेंबर महिना उजाडला.तिचा सगळा अभ्यास पुर्ण होऊन आता सर तिच्याकडुन रिव्हीजन पेपर्स सोडवुन घेत होते.तीन तासाचा पेपर दाेन तासात सगळा सोडवुन होत नसे कारण ऑप्शनला दिलेले प्रश्नही तिला सोडवायचे असत त्यामुळे पेपरला तीन पेक्षाही जास्त वेळेची गरज लागायची पण वेळेत रोजंदारीवर जाणे भाग असल्याने ती जेवढे होईल तेवढे पेपर्सचे प्रश्न सोडवुन बाकी पेपर दुसऱ्यादिवशी सोडवे.तसे करण्याने एका दिवशी एक पेपर सोडवुन होत नसे.सर तिला सांगायचे की जास्त दगदग करू नको.तुला सगळे येतेय.पेपर नाही सोडवुन झाला एका दिवसात तरी काही फार फरक पडत नाही.पण पटेल ती मुक्ता कसली.तिला एक काम दिलेल्या वेॆळेत आपण करू शकत नाही ह्याचे खूप वाईट वाटायचे.

दिवसभर सततचे काबाडकष्ट,घरातले काम,त्यात मामी हे अतिरीक्त धान्य निवडीचे काम आणायची,ह्या सगळ्यात मुक्ता शारीरिक,मानसिकदृष्ट्या खंगत चालली होती.परिश्रमाने थकलेल्या शरीराला झोप आवश्यक असते पण ती झोपही तिला मिळत नसे.तरी ती कसाबसा सगळा गाडा ओढतच होती.

कोवळी मुक्ता कमी वयात पोक्त झाली होती.सतत उऩ्हात काम करून त्वचा रापली होती,निस्तेज झाली होती.खायला पुर्ण अन्न नाही आणि मणामणाचे कामाचे आेझे ओढुन ओढुन मुक्ताचे बोलके डोळे खाेल गेले होते.शरीर कृश झालेले….

एकदा गंधे सरांकडे पेपर सोडवता सोडवताच भोवळ येऊन पडली मुक्ता.सर तिला अशी तोंड जमिनीवर पडलेली पाहुन घाबरले.आपल्या बायकोला बाेलवुन त्यांनी तिला भिंतीलगत सरळ झोपवले‍.डोळ्यावर चेहऱ्यावर पाण्याचा हपका मारला तशी तिने हालचाल केली.सरांनी लगेच डॉक्टरला बोलावले.डॉक्टरांनी तपासल्यावर सांगितलेले निदान असे की ती गेले दोन दिवस उपाशी होती.पोटात अन्न नाही आणि देहाला विश्रांती नाही.सततच्या श्रमाने अशक्तपणामुळे तिला ही चक्कर आली होती.सरांनी अगोदर बायकोला सांगुन चहा करवला.चहात पोळी बुडवुन तिला खायला घातली.तिला आपल्या घरीच आराम करायला सांगुन ते लगोलग ती काम करत असलेल्या वावरात गेले.

तिथल्या मुकादमाला घडलेला प्रकार सांगुन हे ही सांगितले की ह्याबाबतीत तिच्या मामीला कळु देऊ नका.

तो अख्खा दिवस तिने सरांकडेच विश्रांती घेतली.दुपारी कधीतरी तिला जाग आली.आपण कुठे आहोत हेच तिला समजेना.जेव्हा डोळे नीट उघडले तेव्हा डोळ्यासमोरची एक अंधुकसर आकृती स्पष्ट होत गेली.गंधे सर समोर दिसताच सरांकडे आपण असे झोपलेलो पाहुन तिला ओशाळायला झाले.ती लगेच धडपडत सावरून उठुन बसली.तसे सरांनी तिला खुणेनेच बसायला सांगितले.

गंधे सरांच्या पत्नी तिच्यासाठी गरम वरण भात घेऊन आल्या.कितीही गरीबी असली तरी मनाने स्वाभीमानी मुक्ताने कधीही आपल्या घरच्या परिस्थितीची सबब सांगितली नव्हती. आपण उपाशी आहोत किंवा थकलेले आहोत अशी कुठलीही कारणे ती सांगत नसे.आपल्या त्रासाबद्दलही ती कधीच बोलत नसे.

पण आज डॉक्टरांमुळे तो उलगडा झाला होता.तिला सरांकडे जेवणे बरेही वाटत नव्हते पण सरही वडिलांच्या मायेने करताहेत हे जाणुन तिने निमुटपणे जेवायला सुरवात केली.

तोपर्यंत तिला वेळेचेही भान नव्हते अचानक तीन वाजताची अजान ऐकु आली तशी ती ताडकन उठली..बाऽऽऽपरे…..!! अाज आपण वावरालाही गेलो नाही.आता मामीला कळले तर ती काय करेल देवच जाणे..इतक्या वेळ मी कुठे होते विचारले तर काय सांगू मामीला.गेल्या दोन वर्षापासुन लपवलेले गुपीत आज नक्की उघडे होणार..डोक्यात जसजसे हे सगळे विचार येऊ लागले तसतशी ती जागीच थरथरायला लागली.मामीचा तो रागाने लालबुंद चेहरा तिच्या डोळ्यासमोर येऊन ती ताटातले अन्न तसेच टाकत जायला निघाली...सरांना तिच्या मनात काय चालले असणार ह्याच लगेच अंदाज आला तसे ते मुक्ताला अडवत म्हणाले,"अहो मुक्ताबाईऽऽऽ इतकी जगाची चिंता करणे थांबवा आता.जरा स्वत:च्या तब्ब्येतीकडेही लक्ष द्या.आज काय घडले तुम्हाला माहिती आहे का???"

मुक्ता प्रश्नार्थक नजरेने सरांकडे बघत होती.मग सर पुढे बोलत तिला म्हणाले,"आज सकाळी पेपर सोडवता सोडवताच तुम्ही चक्कर येऊन पडलात.डॉक्टरने इंजक्शन दिले,गोळ्याही दिल्या आहेत.तुम्हाला प्रचंड अशक्तपणा आलाय.तुम्ही दिवस दिवस उपाशी असता त्यामुळे हे घडलेय.आता अंगात ताकदच राहीली नाही तर तुम्ही काम कसे करणार अन् अभ्यास तरी कसा करणार मला सांगा?"

आणि काळजी करू नकाऽऽ मी मुकादमाला सांगुन आलोय.तो कुणाला काही सांगणार नाही तेव्हा आता जरा शांत व्हा.

ते सगळे ऐकुन आणि गंधे सरांची आपुलकीची वाक्य ऐकुन मुक्ताच्या डोळ्याला धारा लागल्या.

इतके मरमर घरासाठी झटुनही मामीने कधी बोटभर शब्दाने आपली चौकशी केली नाही पण गंधे सर मात्र परके असुनही मुलीगत माया करताहेत.

तिला गहीवरून आले त्या शब्दांनी.मनाने कितीही स्थीर असली तरी आज मात्र ती भावुक झाली गंधे सरांपुढे.

सरांच्या पत्नीने मायेने तिला गोंजारत आपल्या उराशी कवटाळले.तिचा बहर ओसरल्यावर सरांनी विचारणा केली,"मुक्ताऽऽ खर खर सांग,तु जेवत का नाहीस?उपाशी का राहतेस दिवस दिवस?"

आता ह्यावर ती काय उत्तर देणार होती.मामीचे गाऱ्हाणे करायचे नव्हते तिला.मान खाली घालुन ती गप्प उभी राहीली.सर समजुन चुकले तिच्या मौनातला अर्थ.

"ठिक आहे.जे झाले ते झाले.आता इथुन पुढे असे करायचे नाही.फेब्रुवारीत तुझ्या प्रिलिम परीक्षा आहेत.त्या झाल्या की मार्चमधे फायनल बोर्ड एक्झाम.जर तु तब्ब्येत तोपर्यंत सुधरवली नाहीस तर ऐन परीक्षेत आजारी पडशील,चालेल का तुलाऽऽऽ?????"

आजारी शब्द नुसता ऐकुनच मुक्ता घाबरली.

बारावी परीक्षा हे तिचे धेय्य होते.पुढच्या उज्वल भविष्याच्या दालनात प्रवेश करणाऱ्या ताळ्याची एकमेव चावी म्हणजे बारावीचे मार्क्स होते तिच्यासाठी त्यामुळे ह्या परीक्षेत कुठलीही अडचण येणे मंजुरच नव्हते तिला.

ती ताबडतोब म्हणाली,"नाहीऽऽ नाऽही सर..,,

आता मी नक्की स्वत:ची काळजी घेईन.रोज जेवत जाईल.मला बोर्डाच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवुन पास व्हायचेय त्यासाठी मी नक्की स्वत:कडे लक्ष देईन.."

सगळे बोलणे झाले तसे ती घरी जायला निघाली.मनात हाच विचार की आजची मजुरी मिळाली नाही ह्याचे काय कारण सांगावे मामीला.मजुरी हातात पडली नाहीतर मामी किती कहार करेल.काय करावे ??

विचार करतच ती निघाली एवढ्यात सरांनी तिला थांबवले.

तिच्या हातात औषध-गोळ्यां साेबत पन्नासची नोट कोंबत सर म्हणाले,"आजची मजुरी म्हणुन मामीला दे तुझ्याऽऽ.आणि ह्या गोळ्या रोज जेवणा नंतर आठवणीने घ्यायच्या. विसरायचे नाही.आणि ते टॉनिक रोज रात्री झोपताना एक झाकण प्यायचे.त्यामुळे ताकद येईल तुला.राहील ना लक्षात..??"

सर विचारत होते पण मुक्ता मात्र नि:शब्दपणे पाणावलेल्या डोळ्यांनी सरांकडे पहात होती..

जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे।

निराधार आभाळाचा तोच भार साऽहे।।

खरच किती खऱ्या आहेत ह्या ओळी.........

माझ्यासारख्या निराधार मुलीला जेव्हा कुठुनच मायेचा ओलावा मिळत नाही तेव्हा देवच कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन देवदूतासारखा पाठिराखाा पाठवत असेल का माझ्यासाठी…..??!! 

नि:शब्दपणे मुक्ता घराकडे चालू लागली.

    ~~~~~~~~~~~~~~~~~~

मुक्ता आपली नेहमीची कामे नेटाने आेढत होती.कितीही स्वत:कडे लक्ष देईन म्हणाली असली तरी मुक्ताला क्षणभरही उसंत मिळत नसे स्वत:साठी कामाच्या रगाड्यातुन.मामी तर मुद्दामुन सूड उगवायला तिला जास्तीची कामे लावत होती.तिला खायलाही कसे उरणार नाही ह्याची जातीने काळजी घेई मामी.

मुक्ताला तर ह्या सगळ्या सासुरवासाची जणु सवयच झाली होती.तिला आता फक्त आपली परीक्षा हे एकच धेय्य डोळ्यापुढे दिसत होते.त्या धुंदीत बाकी सगळ्या कष्टांचा,मामी करत असलेल्या जाचाचा तिला जणु विसरच पडत असे.

पण भविष्यात पुढे काय वाढुन ठेवले होते ते तिला कुठे माहित होते.तिच्या आयुष्याचे नष्टचक्र कधी संपणार हे त्या विधात्यालाही माहीत होते की नाही देवच जाणे……..!

डिसेंबर संपुन जानेवारी महिना उजाडला.आणि तो काळा दिवस उगवला ज्याची मुक्ताला जराही कल्पना नव्हती……..

-----------------------(क्रमश:-9)------------------------------------

क्रमश: -9

©®राधिका कुलकर्णी.

नमस्कार मित्रहो……!!

मुक्ताच्या आयुष्यातली वादळे शमता शमत नाहीएत.

अजुनही एक त्सूनामी तिच्या आयुष्यात शिरकाव करायला सज्ज झालेय..काय आहे ते वादळ???

त्यानंतर मुक्ताच्या आयुष्याची दशा आणि दिशा काय असेल हे जाणुन घ्यायचे असेल तर पुढचा भाग नक्की वाचा.

हा भाग कसा वाटला ते कमेंट्समधे नक्की सांगा.

माझ्या नावासहीत ही कथा नक्की शेअर करू शकता..

धन्यवाद.

@राधिका.

🎭 Series Post

View all