Login

मी कात टाकली भाग -4

मुक्ताच्या आयुष्यातील संघर्षाची प्रेरणादायी कथा.

मी कात टाकली भाग - 4

©®राधिका कुलकर्णी.

केदार आतुन धगधगत होता पण भागामावशीने धमकावल्या प्रमाणे जर खरच घरी तक्रार केली तर लेने के देने पड जायेंगे हा विचार करून तो काही काळ गप्प होता.पण मनात मुक्ताला मिळवायचे विचार काही केल्या जात नव्हते. त्याच विषयाचा विसर पडावा म्हणुन नाही नाही ते नाद लावुन घेतले होते त्याने.

दिवसभर पाराखालच्या एका घळीत काही निरूद्योगी लोक गैरमार्गाने हातभट्टी चालवायचे.

तिकडेच चीलम गांजाची नशा करत हा ही पडून असायचा.

मग जेव्हा भुकेची जाणीव होई तेव्हाच घराची आठवण येई त्याला.मामा तर केदारच्या काळजीने खंगत चालला होता दिवसेंदिवस.

पुर्वीसारखे कष्ट होत नव्हते त्याच्याच्याने.

वाटायचे पोरगा तरणा झाला की हाताशी येईल पण कसचे कायऽऽऽ.केदारची दिवसेंदिवस वाईट मार्गाने पडणारी पावले न जाणो त्याच्यावर कधी काय बालंट आणेल ह्याच विवंचनेत मामाला अन्न गोड लागायचं नाही.

मुक्ताला मामाची चिंता कळत असुनही ती ही ह्या बाबतीत मामाची कोणतीच मदत करू शकत नव्हती ह्याचे तिलाही खूप वाईट वाटे मनातुन. तरी ती मामाला शक्य तितके आपल्या मायेच्या शब्दांनी हलकं करायचा प्रयत्न करायची.

एक मात्र झालं...जसा केदारचा घरातला वावर कमी झाला मुक्ताला सुटकेचा श्वास घेता येऊ लागला घरात नाहीतर सतत मानगुटीवर  केदारच्या अस्तित्वाची भीती असायची.ती अस्वस्थता तिला स्वस्थ जगु देत नसे……

पण सध्या तरी ह्या सावटापासुन ती निश्चिंत होती..

      ~~~~~~~~~~~~~~~~~

दिवस महिने असेच पुढे सरकत होते.

मुक्ता आता दहावीच्या वर्गात आली होती.ह्यावर्षी बोर्ड परिक्षा त्यामुळे सगळ्यांनाच अभ्यासाचा अतिरिक्त भार पडत होता.

मुक्ताला दिवसभर घरातल्या कामांमुळे अभ्यासाला वेळच मिळायचा नाही मग रात्रीचा दिवस करून सगळ्यांची निजानिज झाली की छोट्याश्या बाटलीत तेल घालुन त्या बत्तीच्या दिव्यात ती तिचा सगळा अभ्यास पुर्ण करायची.पुन्हा सकाळी लवकर उठुन मामीला रोजच्या कामात मदत करणे चुकायचे नाहीच.अशी सगळी तारवरची कसरत चाललेली असायची.तरीही त्यात तिला आनंद मिळायचा कारण शिकणं हा तिचा ध्यास होता.जीवनात काहीतरी वेगळे करायचे असेल तर संघर्ष अटळ आहे ह्याची तिला पुरेपुर जाण होती.

ARISE,AWAKE 

       AND 

  STOP NOT 

       TILL 

THE GOAL IS REACHED……

हे स्वामी विवेकानंदांचे हे वाक्य मुख्याध्यापकांच्या केबीनमधे भिंतीवर लावलेले ती नेहमी वाचत असे.मुक्ताने ते स्वत:साठी चांगलेच लक्षात ठेवले होते.त्यामुळे त्यातुन प्रेरणा घेत आता कितीही संकटे येवोत किंवा कितीही संघर्ष करायला लागो हार मानायची नाही हे तिने मनाशी पक्के केले होते.

म्हणता म्हणता वर्ष संपत आले.मुक्ताची बोर्ड परिक्षा निर्विघ्नपणे पार पडली.सगळे पेपर मुक्ताला समाधानकारक गेले होते.

मुख्याध्यापकांनी स्वत: प्रत्येक परीक्षेनंतर तिचे सगळे पेपर्स घरी सोडवुन घेतले होते..मुक्ताने सगळेच पेपर्स अतिशय उत्तम पद्धतीने सोडवले होते.एकंदर चित्र बघता ह्या वर्षी मुक्ता त्यांच्या शाळेचे नाव पंचक्रोशीत गाजवणार ह्यात त्यांना तिळमात्र शंका नव्हती.निकाल ही फक्त औपचारिकता होती त्यांच्यासाठी.आत्ताच तिला तसे बोलुन दाखवले नसले तरी मुख्याध्यापकांना तिचा निकाल काय लागणार ह्याचा आधीच अंदाज आला होता.तिच्या प्रगतीकडे पाहता तीच्याबद्दल फार समाधानी होते मुख्याध्यापक सर.ती एक ना एक दिवस ह्या गावाचेही नाव उज्वल करेल असे त्यांना मनापासुन वाटे…

फक्त तिला ह्याच पद्धतीने पुढे जाऊ दिले तर….!

       ~~~~~~~~~~~~~~~~~~~

म्हणता म्हणता तीही प्रतिक्षा संपली आणि तो दिवस उगवला ज्याची मुख्याध्यापक सर आणि मुक्ताला प्रकर्षाने वाट होती.

आज दहावी परीक्षेचा निकाल लागणार होता.

सगळ्यांनाच उत्सुकता लागुन होती तशी ती मुक्तालाही होती.

त्याकाळी निकाल न्युजपेपरमध्ये जाहीर व्हायचे.

मुक्ताकडे काही वर्तमानपत्र येत नसे.त्यामुळे तिने आपला हॉल-तिकीट नंबर सरांकडे देऊन ठेवला होता.

अखेर सकाळी सकाळी मुख्याध्यापक सरांचा माणुस बोलावणे करायला मुक्ताच्या मामांकडे आला.मुक्ता मामाबरोबर घाईघाईने हातातले काम टाकुन सरांकडे गेली.

ती घरी जाताच सरांनी खूप उत्साहात पेढ्याचा अख्खा पुडाच तिच्या हातात ठेवला.तिला आनंद तर झाला पण आपल्याला किती मार्क मिळाले हे काही अजुनही समजले नव्हते.

मग तिने भीतभीत धीर करून सरांना प्रश्न केला,"गुरूजी मला किती मार्क पडलेत?मी चांगल्या मार्कांनी पास तर झालेय नाऽऽऽ??"

त्यावर मुख्याध्यापकांनी वर्तमानपत्रच तिच्यापुढे धरले.मामाला तर काही समजत नव्हते.मुक्तानेच तिचा नंबर तपासला तर ती एकोणनव्वद पुर्णांक अडुसष्ठ (89.68%) टक्के गुण मिळवुन सगळ्या शाळेत पहिली आली होती.

तिचा आनंद गगनात मावेना.मामालाही मुक्ताच्या यशाने भरून आलं.पोरीवर इतकी एकावर एक संकटं येऊन गेली तरीही तिने आपला शिक्षणाचा ध्यास न सोडता किती छान यश संपादन केले.

मामाची मान आज अभिमानाने उंचावली होती.

खर तर हे सगळे केदारने करणे अपेक्षित होते मामाला.एक वडील म्हणुन ही सुप्त इच्छा कोणत्या पालकाला नसते परंतु मुलाने तर शरमेने मान खाली घालायची पाळी आणली होती गावात.जो तो त्याच्या टारगट वागण्याची तक्रार करे मामाकडे पण हतबलते शिवाय त्याच्याही हाती काही नव्हते.

मात्र आज पोरीने तिच्या उत्तुंग यशाने मामाची शरमेने झुकलेली मान पुन्हा उंचावली होती. मामाला जणु आभाळ ठेंगणे झाले जेव्हा रस्ताभर जो भेटेल तो तिचे आणि मामाचे जोडीने अभिनंदन करू लागला.

आनंदातच दोघेही घरी आले.मुक्ताने आनंदातच पहिला पेढा देवापुढे अन् दुसरा पेढा मामा मामीला भरवला.पाया पडुन आशिर्वाद घेतला.मामाने तोंड भरून आशिर्वाद दिला.

मामीनेही आशिर्वाद दिला पण दुसऱ्याच क्षणी ती जे वाक्य बोलली ते ऐकुन मुक्ताचे पाय जमिनीवरच थिजले.

मामी म्हणाली,"लई साळा साऽऽऽळा कवतिक करत होती नाऽऽ,झाली एकदाची शाळा शिकुन.आता गप गुमान घरी राहुन सगळी काम शिकुन घ्यायची.लगीन झाल्यावर तेच कामी येणार हाय.हे शिक्षण बिक्षण काय बी कामाच न्हाय.बाईचा साऽऽरा जल्म चूल पोतेऱ्यातच जातोय काय समजलंऽऽऽ!!"

तिला तर काही सुचेचना मामीची कोणत्या शब्दात समजुत काढावी??

फक्त दहावी झाली म्हणजे शिक्षण संपले असे नसते.पुढे पण खूप शिकावे लागते तेव्हा कुठे चांगली मानाची नौकरी मिळेल.आपले दिवस सुधरतील.

पण गावाबाहेर कधी पाऊलही न ठेवलेल्या मामीला हे कोण समजावणार..!!!

वाद घालणे तर मुक्ताला कोणी शिकवलेच  नव्हते.

आताही तिने सौम्य स्वरात मामीला समजावुन सांगायचा प्रयत्न केला," अगंऽऽऽ मामी आत्ता तर फक्त दहावीच झाली.अजुन पुढे पंधरावी पर्यंत शाळा असते.तालुक्याच्या गावी आहे पुढची शाळा.मला पुढे पण शिकायचे आहे अजुन.संपुर्ण पंधरावी पर्यंत शिकले तरच चांगली नौकरी मिळलं."

ते ऐकताच मामीचा पारा सातव्या आसमानात चढला.आज मुक्ताच्या आयुष्यातला इतका आनंदी दिवस असुनही त्याची थोडीही जाण न ठेवता तिने आपला आवाज चढवत मामाकडे रोख करून म्हणाली,"हे बगाऽऽ मी आताच सांगुन ठुते,तरण्या ताठ्या पोरीला एकटी दुकटी मी अजाबात तालुक्याच्या गावी शिकायला जाऊ द्यायची न्हाय...उद्या काही ऊच-नीच झाली तर लोक कुणाला बोल लावतील…??

आणि एवढं शिकलेल्या पोरीला कोण पोरगा पसंत करनं लगीन कराया….?ते काही नाही.तुम्हाला सबुत दिला म्हुन मी इतके दिस गप ऱ्हायले पण आता न्हात्या धुत्या पोरीला मी घराबाहेर जाऊ द्याची न्हाय म्हंजे न्हायऽऽ..उद्यापासुन तु बी माझ्या संगट वावरात यायचं..कायऽऽऽ,कळलं काऽऽऽ???"

मामीने आपले खडे बोल सुनवुन तिकडेच विषयाचा तुकडा पाडला.आणि तरातरा स्वैपाक खोलीत गेली.

मुक्ताचे तर डोळेच भरून आले.मामाकडे असहाय्यतेने एक कटाक्ष टाकत तिने आपली वेदना व्यक्त केली पण ह्यावेळी मामालाही मामीचे बोलणे काहीसे पटले असावे कारण  त्याने मामीला कोणताही विरोध दर्शवला नाही उलट मान खाली घालुन एेकुन घेतले मामीचे सगळे बाेलणे.

मामाच्याही मनात थोड्याफार फरकाने असेच विचार येत होते…"दुसऱ्याची पोरं,काहीकरता काही झालं तर समाज आपल्याच तोंडात शेण घालेल.गावात जितकी शाळा आहे तितकी तिची इच्छा म्हणुन शिकायला आपण परवानगी दिलीच की... !"

मामाच्या मनात असे सगळे चाललेले…..

पुढे तालुक्यातल्या मोठ्या शाळेत शिकवायचा खर्च उचलायची एक तर मामाची आर्थिक परिस्थिती नव्हती आणि दुसरे म्हणजे त्यांच्या समाजात मुली जास्त शिकत नसत.जास्त शिकली म्हणजे नाकापेक्षा मोती जड होईल म्हणुन पोरींची लहान वयातच लग्न लावुन दिली जात असत.त्यामुळे अशी तशी एक दोन वर्ष गेली की चांगला पोरगा पाहुन तिचे लग्न उरकुन द्यावे असाच मामाचाही विचार होता पण आता मुक्ताचा पुढे शिकायचा विचार आणि त्यावर आपल्या बायकोच्या इतक्या तिखट प्रतिक्रीयेमुळे मुक्ताचा पडलेला उदास चेहरा पाहुन मामाचीही 'इकडे आड तिकडे विहीर' अशी अवस्था झाली.

एकिकडे पोरीसाठी जीव तुटत होता तर दुसरीकडे बायकोच्या पुढे जाऊन काही निर्णय घ्यायची त्याच्यात ताकद नव्हती.

मामाही काही न बोलता मूग गिळुन गप्प बसला हे पाहुन मुक्ताला तर रडू आवरेना.

तसेच स्वत:ला सावरत माझा रिझल्ट बाकी मैत्रिणींना सांगुन येते असा बहाणा करून मुक्ता घराबाहेर पडली.

एकटीच आपल्या जून्या घरी जिथे ती आपल्या आईसोबत रहायची तिकडे आली.लिंबाखाली तिचा गणोबा आजही तसाच बसलेला होता.तिने एक नजर त्याच्यावर टाकली आणि आत्तापर्यंत साचवलेले सगळे अवसान गळुन पडले.ती गणोबा समोर मन रिते होईस्तोवर रडली.

"जर मला पुढे शिकुच द्यायचं नव्हत तर मग इतके तरी शिकायला कशाला मदत केलीस….??"

"तेव्हाच शाळा सुटली असती तर आत्तापर्यंत मनाची समजूत घातली असती मी..पण इतक्या मेहनतीने आज अख्ख्या गावात/शाळेत पहिली येऊनही जर मी पुढे शिकू शकणार नसेल तर काय उपयोग ह्या शिक्षणाचा अन् माझ्या दिन रातच्या मेहनतीचा...सांग नाऽऽ गणोबा..??"

"तुला खरच मला त्रास देऊन आनंद मिळतो का रेऽऽ??"

"तसे असेल तर सांग ..तुझ्या आनंदासाठी मी हे ही सहन करेल पण पुन्हा आयुष्यात कधी मला सुखाची एक झुळूक पण देऊ नको मग.तू असा तात्पुरते सुख देतोस आणि त्याचा आनंद अजुन पुरता उपभोगायच्या आत लगेच त्यावर दु:खाचे विरजण घालतोस.त्यापेक्षा नको ते औट घटकेचे सुख मला...मी दु:खातही राहीन समाधानाने.."

आज तिचा बांध फुटला होता.जे जे काही ती आपल्या मामा मामीला बोलु शकत नव्हती ते सगळे ती आपल्या गणोबा जवळ व्यक्त करून मन मोकळे करत होती.

गणोबाजवळ आपले मन हलके केल्यावर जरा शांत झाली तशी ती हलकेच घराच्या खिडकीशी गेली.आजही आपली आई इथेच कुठेतरी वावरतेय असा तिला भास व्हायचा.तिने खिडकीशी जाऊन आईला आपला दहावीचा निकाल सांगितला….,"आईऽऽ ऐकतेस नाऽऽ !

मी दहावीत अख्ख्या शाळेतुन पहिली आलेय..तुझी इच्छा होती नाऽऽ मी खूप शिकुन मोठ्ठी व्हावे.तर बघ त्याची पहिली पायरी आज मी ओलांडली.पुढे काय होईल मला माहित नाही पण मी नक्की काहीतरी वेगळे करून दाखवेन हे वचन देते,मी तुला आज."

"आईऽऽ! मी तुझी इच्छा पुर्ण करायचा नक्की प्रयत्न करेन..मला फक्त तुझा आशिर्वाद दे.मला माहितीय तु जिथे कुठे आहेस तिथुन माझ्याकडे बघत आहेस.मला सगळ्या संकंटाशी लढायची ताकद दे आणि सतत त्यातुन मार्ग काढुन पुढे जायची हिंम्मत पण दे.."

आईशी आणि गणोबाशी बोलुन तिचं मन आता स्थिर झाले तसे ती पुन्हा घराकडे जायला निघाली.रात्रभर डोळ्याला डोळा नव्हता तिच्या.मन उदास होते.इतकी चांगली बातमी मिळुनही ती तो आनंद मनापासुन व्यक्तही करू शकत नव्हती.विचारांच्या नादातच कधीतरी तिचा डोळा लागला….

     ~~~~~~~~~~~~~~~

दुसऱ्या दिवशी सगळ्या वर्तमानपत्रातुन मुक्ताच्या उत्तुंग यशाची बातमी फोटोसहीत छापुन आली.जो तो तिचे कौतुक करत होता पण मामीला मात्र त्याचे कुठलेच कौतुक नव्हते.तिला ह्यातच आनंद होता की आता ही पोरगी चोवीस तास दावणीला बांधलेल्या जनावरागत आपल्या दिमतीला हजर राहील.आता सगळ्या कामाचा भार तिच्यावर टाकुन मस्त आरामात जगायची स्वप्न मामी मनोमन पाहू लागली.तिचं एक मन तर तिलाच केदारची बायको करून कायम स्वरूपी आपल्या घरात सून म्हणुन बंदिस्त करून घ्यायचा विचार करत होतं.कामाला वाघ तरी स्वभावाने गरीब गाय अशी सून तिला शोधुनही सापडणार नव्हती.जिथे आपलं पोरगंच उलट उत्तर करतय तिकडं त्याची बायको कशाला आपला मान ठेवील????

पण मुक्तीच त्याची बायको बनुन आली तर आपल्या उपकाराच्या ओझ्याखाली जलमभर वाकून राहील.मामीचे मनात मांडे खाणे सुरू होते……

तर मामीच्या विचाराने कालपासुन अस्वस्थ झालेली मुक्ता मुख्याध्यापक गुरूजींकडे बातमी वाचायला जाते सांगुन घराबाहेर पडली ते थेट गुरूजींच्या दारात जाऊन पोहोचली.सरांनी आल्याबरोबर तिला पेपरात तिच्या फोटोसहीत छापून आलेली बातमी दाखवली.

त्याबरोबर सैरभैर झालेली मुक्ता आत्तापर्यंत राखलेला संयम सोडुन रडायला लागली.

सरांना कळेना अचानक मुक्ताला रडायला काय झाले…वर्तमानपत्रात फोटो छापुन आलेला बघुन जिकडे आनंद व्हायला हवा तिकडे मुक्ता मात्र धो धो रडत होती.

त्यांनी मुक्ताला जवळ बसवुन मायेने चौकशी केली.काय झाले विचारले तसे तिने काल घडलेला सगळा वृत्तांत मुख्याध्यापकांच्या कानावर घातला…

"गुरूजी मला नाही वाटत मी पुढे शिकु शकेन.मामा मामींची परगावी राहुन शिकायला परवानगी नाही."

"माझ्या आईची फार इच्छा होती की मी शिकुन खूप मोठ्ठी ऑफिसर बनावी पण आईचे हे स्वप्न स्वप्नच राहणार असे वाटतेय…..!!"

मुक्ताने रडतच गुरूजींना आपले दु:ख व्यक्त केले.

गुरूजींना आत्ता तरी काही मार्ग दिसत नव्हता पण तरीही तिचे सांत्वन करण्यासाठी ते म्हणाले,"हे बघ बाळ मुक्ताऽऽऽ...इच्छा तेथे मार्ग असतो…

'Where there is will,there is way..!'

निघेल काहीतरी मार्ग.असा धीर सोडायचा नाही बाळ. तुझी आई वरून तुला असे मुळुमुळु रडताना बघितली तर काय वाटेल तिला..??

तुला आईला खुष करायचेय नाऽऽऽ?मग पुस ते डोळे."

"मी उद्याच तालुक्याच्या गावी चाललोय.तिकडे चौकशी करून येतो.बघु काही वेगळा मार्ग सापडतोय का..मी आहे नाऽऽ..!!"

"तशीच वेळ आली तर मी बोलेन तुझ्या मामा मामींशी.आता रडायचं नाही..छान हसुन दाखवा पाहु मुक्ताबाई….!!!"

'मुक्ताबाई' ह्या संबोधनावर ती खुदकन हसली.इतक्या मायेने तिला फक्त तिची आईच मुक्ताबाई म्हणायची.

आज सरांमधेही तिला आपल्या आईची तिच प्रेमळ छबी दिसत होती.

-----------------------(क्रमश:4)-------------------------------------

क्रमश:-4

©®राधिका कुलकर्णी.

नमस्कार वाचक मंडळी….!!

मुक्ताची पुढे शिकायची इच्छा पुर्ण होईल की मामीच्या मनातली सुप्त इच्छा फळद्रूप होईल????

काय होईल मुक्ताच्या आयुष्यात नेमके…?

हे जाणुन घ्यायचे असेल तर पुढचा भाग वाचायला विसरू नका.हा भाग कसा वाटला हे कमेंट मधे जरूर कळवा.

लेखनवितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासहीत कथा,नक्की शेअर करू शकता.

धन्यवाद.

@राधिका.

🎭 Series Post

View all