Oct 26, 2020
स्पर्धा

मी कात टाकली भाग -10

Read Later
मी कात टाकली भाग -10

मी कात टाकली भाग -10

©®राधिका कुलकर्णी.

 

आज मामी जरा जास्तच खुष दिसत होती.कुठुन तरी रवा तूप साखर आणुन मुक्तीला रव्याचा शीरा करायला सांगितला.मुक्ताला कळत नव्हते आज मामीला काय झालेय.गोडाचा शीरा कोणाकरता केलाय..कोणी पाव्हणा येणार आहे का?

पण कोण?? विचार करता करताच मुक्ताच्या डोक्यात सनकन एक विचार चमकुन गेला.केदार तर सुटुन येत नसेल???

पण मामीला कुठुन कळले?

सध्या कुठुन कळले हा मुद्दा महत्त्वाचा नव्हता. पण मनात आलेला विचार जर खरा असेल तर आता माझे कसे होणार?

त्या वासनांध राक्षसाच्या सानिध्यात एक क्षणही एकत्र रहाणे अवघड आहे..काय करावे.घरातुन पळुन जावे का? पण जाऊन जाऊन कुठे जाणार?मला तर घर ना दार….,ना कोणी जवळच,नात्या गोत्याचं.इथे राहुन निदान इतक तरी शिकु शकले एकदा गाव सोडलं तर माझा वाली कोण..???

तिच्या मनात एक ना अनेक प्रश्नांनी गर्दी केली. तरीही सगळी मनातली आंदोलने बाजुला ठेवत शांततेने तिने मामीला विचारले,"मामीऽऽऽ,,आज काही खास हाय का?गोडाच करायला सांगितलस ते?"

त्या प्रश्नावर मामीही उत्तरली,"तुला ग काय करायच्या नसत्या चौकशा??धु म्हनलं की धुवायचं,जास्ती प्रश्न इचारायच न्हाय..काय समजलं..कोण येनार ते आल्यावर कळलचं."

मामीच्या उत्तरानं मुक्ता गप्प झाली असली तरी तिच्या डोक्यातला भूंगा काही विचार करायचे थांबवेना.तिचा मनातला संशय खरा ठरतोय की काय ही शंका तिलाही भेडसावु लागली.

 

अखेर तेच घडल ज्या शंकेने मुक्ताचं मन पोखरत होत.जेलची शिक्षा संपवुन केदारच घरी आला होता.

मामी खूपच आनंदात होती.आता केदारसाठी तिने पाहिलेली सारी स्वप्ने पुर्ण होणार म्हणुन ती हरखुन गेली होती तर मुक्ता आपण आता कायमचे ह्या बेडीत अडकुन पडणार ह्या कल्पनेने हताश झाली होती.इतकी मेहनत घेतली अभ्यासासाठी आणि 'हत्ती गेला अन् फक्त शेपूट राहीले' असताना हे नविन संकट का समोर येऊन ऊभे ठाकले असे झाले तिला.

आता मामीबरोबर वावरात जायला लागले तर सकाळच्या शिकवणीलाही सुट्टी पडणार कायमची.

परीक्षा तोंडावर असताना हा काय ताप लागला मागे म्हणुन मुक्ता व्यथित झाली होती.

उद्यापासुन तिच्या आयुष्याची दोरी मामी आणि केदारच्या हाती जाणार होती.ती फक्त कळसुत्री बाहुलीप्रमाणे त्या दोघांच्या तालावर नाचत राहणार होती.तिचे भविष्य अंधारात दिसत होते.त्या सगळ्या विचारांनी मुक्ता कोलमडुन पडली.तिला दु:खावेग आवरेना.भांडी घासता घासता आपल्या फुटक्या नशिबाला दोष देत तिने मुक्तपणे रडून घेतले.कोणादेखत रडण्याचे स्वातंत्र्यही बिचाऱ्या मुक्ताजवळ उरले नव्हते.आता फक्त एक मायेचा आधार तिला दिसत होता तो म्हणजे गंधे सर,ज्यांच्याजवळ आपले दु:ख ती व्यक्त करू शकत होती.पण तिकडे जायची संधीही तिला उद्यापासुन मिळेल की नाही ह्याची शाश्वती नव्हती..विचारांच्या ताणात कधीतरी डोळा लागला मुक्ताचा..

     ~~~~~~~~~~~~~~~~

दुसरा दिवस.मुक्ता नेहमी प्रमाणे वावरात निघाली तसा केदार म्हणाला,"चल म्या सोडतो सायकलवर.एकटी नग जाऊस."

"बापरेऽऽ!!! आज ह्याला बरी माझी इतकी काळजी आली?"

मनातल्या मनात विचार आला तिच्या पण वरकरणी काही न बोलता ती गप उभी राहीली. पण मामीला केदार मुक्ताची काळजी करतोय हे आवडले नसावे,ती लगेच म्हणाली,"एऽऽ पोरा..आरंऽऽ तिला काय धाड भरलीय,रोज तर जातीय की एकलीच.आजही जाईल तिची ती… तु येऽऽ,चाऽऽ घे.मग वावरात जाऊ संगटच.

मी आजच्या दिस येते.मग उद्यापासन शाेधते दुसरं काम."

मायच्या टोकण्यामुळे मुक्ता सोबत जायची संधी हुकली म्हणुन मनातल्या मनात केदार चरफडत  होता तर मुक्ता मात्र खुष होती.द्वेषाने का हाेत नाही पण आज मामीमुळेच केदारच्या तावडीतुन ती वाचली होती.

मनोमन देवाचे आभार मानत ती एकटीच जायला निघाली.केदार तिच्या पाठमोऱ्या कमनीय आकृतीला हावरटपणे बघत राहीला.

ती गेली तसे मामीने केदारला घरात बोलावले.जराशा नाराजीतच तो घरात आला.तसे मामी केदारला चहा देत बोलली,"हे बग केदार म्या काय सांगते ते ध्यानात घे.तुला मुक्तीचा काय सूड उगवायचा ते उगव पण अशी घाई करून चालणार नाही.मला दिसतय तु सारखा तिच्या आगंमागं करत असतोयस पर अस वागुन पोरगी मिळणार न्हाय.तिला प्रेमाने जींक अगुदर.जास्त जवळ जवळ करशील तर ती तुला कचऱ्यावानी किंमत देईल.तवा जरा सबुरीन वाग.तिच मन जिंक मग ती सवताहुन तुला आपलसं करन.काही घुसतय का टक्कुऱ्यात??"

केदार काही न बोलता नुसता घुम्यासारखा ऐकतोय हे पाहुनच मामीने विचारले तसे त्याने मानेनेच होकार दिला.खरे तर कधी एकदा मुक्ताला जवळ करतो असे झालेले त्याला पण जोवर मुक्ती स्वत:हुन तयार होणार नाही बळजबरीत मजा न्हाय हे आईचे म्हणणे त्यालाही थोडे थोडे पटले होते.नाईलाजाने का होईना स्वत:च्या मनावर ताबा ठेवणे त्याला भाग पडले.

इकडे मुक्ता धावतच सरांच्या घरी पोहोचली.

केदार पाठीमागुन आला तर आपण कुठे गेलो हे त्याला कळु नये म्हणुन ती धावतच पोहोचली.पळत पळत आल्याने तिला चांगलीच धाप लागली होती.तिला धापा टाकताना पाहुन सरांनी विचारले,"काय गंऽऽ अशी वाघ मागं लागल्यागत का धावत आलीस?"

त्यावर थोडा दम खाऊन तीने उत्तर दिले,"सऽऽरऽऽ…..केऽदारऽऽ…….केदार प…..परतऽऽ आ..लाऽऽय सर…!!!

आऽऽ..ता माझऽ का…..ही खर नाही….!!

उद्यापासुन मामी माझ्या सोबत असणार वावरात जायला..माऽऽऽझी शीकवणीऽ…...नाही व्हायची उद्यापा….."

वाक्यही पुरे करू शकली नाही मुक्ता.ढसढसा रडायला लागली ती सरांसमोर…

सरांनाही तिची कशी समजुत घालावी समजेना.तिला प्यायला पाणी देऊन ती जरा शांत होताच ते म्हणाले,"असे हताश व्हायचे नाही.मामीला तुझ्या वावरात काम मिळाले तर तुम्ही एकत्र जाताल पण तिकडे काम नाही मिळाले तरऽऽऽ?"

खरच हा प्रश्न विचार करण्याजोगा होता. म्हणजे मामी जर दुसऱ्या वावरात गेली तर आपल्या मार्गात तिचा अडथळा येणार नाही..

"पण जर तिला माझ्या सोबतच काम मिळाले तरऽऽ?"

ह्या प्रश्नाने ती पुन्हा विचारात पडली.तसे सर म्हणाले," काळजी करू नकोस बाळऽऽ.तो मुकादम माझ्या ओळखीचा आहे.मी बोलतो त्याच्याशी आणि ही अडचण सोडवतो हंऽऽ.नको जास्त विचार करूस.काढुया मार्ग...आता डोळे पुसा पाहु मुक्ताबाई आणि लवकर लवकर अभ्यासाला लागा."

सरांच्या प्रेमळ आश्वासनाने तिचे समाधान झाले तसे आपले दु:ख सावरत ती शांत चित्ताने पेपर लिहू लागली.

    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

घरात एक माणुस वाढलं तस मुक्ताच्या घरकामातही वाढ झाली.सगळी कामे दोन ऐवजी तिन माणसांची करावी लागत त्यात मामी केदार आल्यापासुन जास्तच टेचात वागत होती त्यामुळे सगळे उरकण्यात आधीपेक्षा जास्त वेळ जाऊ लागला मुक्ताचा.

सततच्या परीश्रमांनी मुक्ताची तब्येत पुन्हा एकदा बिघडली.ती पुन्हा घरातच चक्कर येवुन पडली.अंग तर तापल्या तव्यागत चटकत होते. मामी घाबरून गेली.तिने केदारच्या मदतीने तिला उचलुन घरात आणुन झोपवले.

डॉक्टरला बोलावले तर त्यांनीही अशक्तपणामुळे घेरी आल्याचे सांगितले.ताप कमी व्हायच्या गोळ्या लिहुन दिल्या.

केदारला मामीने गोळ्या आणायला पाठवले.

केदार गोळ्या घेऊन आला.दोन दिवसांनी गोळ्यांमुळे तिचा ताप उतरला तरीही अशक्तपणा तसाच होता.पण घरात राहुन आराम करण्याची चैन तिला परवडणारी नव्हती आणि मामी नसताना घरात एकटीला राहणे तिला प्रचंड धोकादायक वाटत होते हे एक कारण तर होतेच पण दुसरे त्याहुनही महत्त्वाचे कारण म्हणजे तीच्या घरी राहण्यामुळे अभ्यास बुडत होता जे तिला कदापीही मंजुर नव्हते त्यामुळे अखेरीस हिय्या करून तिसऱ्या दिवशी ती कामासाठी बाहेर पडली.

पण गेल्या दोन दिवसात केदारने संधी मिळुनही तिला कुठलाच त्रास दिला नव्हता.उलट तिची काळजी घेत होता.तिला वेळेत गोळ्या द्यायचा.मामी काम न करता झोपुन राहीली म्हणुन कटकट करायला लागली की तोच मामीला समजावुन गप्प बसवे.

त्याच्यात अचानक झालेला हा बदल एकीकडे सुखावह वाटत असला तरी दुसरीकडे ह्यात त्याचा काही डाव तर नाही ना अशी शंकाही मुक्ताच्या मनात येई.त्यामुळे ती अतिशय सावधगिरीने वावरत होती.

 

असेच दिवस सरत होते.काम आणि गुपचूप अभ्यास अशी तारेवरची कसरत चाललेलीच होती.

साधारण महिना झाला होता केदारला घरी रहायला येवुन.तो बऱ्यापैकी सुधरून वागल्याचे दिसत तरी होते त्यामुळे मुक्ताही आताशा त्याला घाबरून न वागता मोकळेपणानी वावरू लागली होती.

एक दिवस ती वावरातुन सायंकाळची घरी येत असतानाच वाटेत केदार भेटला.तिला बघताच त्याने सायकल थांबवली आणि खुणेनेच तिला सायकलवर बस सांगितले.ती घाबरतच मागच्या सीटवर बसली.

घरी पोहोचताच त्याने सायकल बाजुला लावुन माठातले ग्लासभर पाणी मुक्ताला आणुन दिले.मुक्ताला कळतच नव्हते की केदार इतका सज्जनतेचा मुखवटा घेऊन का वागतोय.माझी इतकी काळजी का करतोय ???

मनातल्या विचारांना बाजुला सारत ती घटाघट पाणी प्यायली.

थोडावेळ गेला.जेव्हा डोळे उघडले तेव्हा ती कुठल्यातरी एका अंधाऱ्या खोलीत दिसत होती.जडावलेले डोळे किलकिले उघडले तर समोर केदार.तिला काहीच समजेना.आपण कुठे आहोत,इथे कसे आलो???

भीतीयुक्त नजरेने ती केदारकडे बघु लागली.

त्याचे डोळे तिच्यावरच रोखलेले होते.त्याने कसली तरी नशा केल्याने तो तर्राट दिसत होता.तिला समजत नव्हते की ह्याने आपल्याला इकडे कुठे आणलेय?काय चाललेय ह्याच्या डोक्यात??

तिने घाबरतच विचारले,"हि कोणती जागाय?

मला इकडे कुठे आणले आहेस तुऽऽऽ?मामी वाट पहात अासनं,चल घरलाऽऽ."

त्याच्या मनातलं काळंबरं आपल्याला समजले नसल्याचे दाखवत निरागसपणे मुक्ता केदारला बोलली तसा तो छद्मिपणे हसु लागला मुक्तीकडे पाहुन.

त्याच्या कुत्सीत हास्यातुन कुठल्यातरी शडयंत्राचा आभास होत होता पण काय होते केदारच्या मनात??

ती प्रश्नार्थक नजरेने केदारकडे बघत होती.आता केदार तिच्या अधिकच जवळ आला.इतका की त्याच्या श्वासांची स्पंदने तिला स्पष्ट जाणवु लागली.मुक्ता त्याच्या जवळ येण्याने प्रचंड घाबरली.तिच्या काळजाचा थरकाप उडाला.काय आहे केदारच्या मनात हे कळायला मार्ग नव्हता.गेल्या काही दिवसांपासुन त्याचे बदलेले वागणे,तो घेत असलेली काळजी बघुन वाटायचे की हा बरा सुधरलाय पण जर ते वागणे खरे मानले तर मग आता जे वागतोय ते काय आहे?का मग ते सगळे एक नाटक होते,दिखावा होता चांगुलपणाचा माझे मन वळवण्यासाठी???

आता मात्र ह्या विचारांनी घाम फुटला मुक्ताला.

केदार अजुनही वासनांध नजरेने मुक्ताला न्याहाळत होता.तो मुक्ताच्या जवळ सरकुन खेटुन बसला.तिच्या चेहऱ्यावर जमलेले घर्मबिंदू हलकेच आपल्या हातानी पुसुन त्याने अचानक तिच्या हनुवटीला धरून तिला आपल्या जवळ खेचले.त्याच्या बलदंड हातांच्या मजबुत पकडीसमोर मुक्ताची कुठलीच ताकद काम करेनाशी झाली.तिच्या चेहऱ्यावर भीती पसरली होती.तोंडातुन शब्द फुटत नव्हता तरीही कशी बशी हिंम्मत करून तिने केदारला विचारले,"केदार काय करतोएस हे?मला का आणलेस इकडे?मामी मला शोधत असल.तिला कळले तर ती तुला खूप चिडेल..सोड मलाऽऽऽ.जाऊदे घरला..खूप काम पडलीएत घरला…"

त्यावर केदारने चिडुन तिला धक्का मारला तशी ती जमिनीवर उताणी पडली.तो चपळाईने तिला तसेच पकडुन तिच्यावर ओणवा झाला.ती प्रचंड घाबरली.केदारचा इरादा नेक नव्हता.

इतक्यावेळ काही न बोलणारा केदार बोलायला तोंड उघडताच कसलातरी उग्र भपकारा त्याच्या तोंडातुन बाहेर पडला.तिला त्या वासाने मळमळुन उलटी येतेय की काय असे वाटु लागले.तिने आपल्या हाताने तोंड दाबले.

आता केदार बोलु लागला,"एऽऽ मुक्ते..माझी बायकु ना तु.!! होण्णारीऽऽ!!"

"माय म्हनली मला,,मुक्ती संगट लगीन लावुन देईन.त्या दिसापासुनच म्या तुला बायकु मानुन टाकलं पर तु सारखी नवऱ्यापासुन अशी लांब लांब पळतेसऽऽ,काऽऊन??"

"मग आज ठरुनच आणल हिकड.म्हनलं चला जरा नवरा बायकुचा खेळ खेळावा तुझ्यासंगट."

"लहानपणी किती खेळायचो नाऽऽ आपन...पर त्यो खेळ खोटा खोटा होता.आता खरा खेळ खेळु..म्या तुला सांगतो.नवरा कसा असतो.बायकु कशी असते.नवरा जे करेल ते बायकुन निमुट करून घ्यायचं असतय..कळलं नाऽऽ..??चुपचाप ऐकायचं…!!"

तसे म्हणतच त्याने आपल्या हातांच्या बोटांच्या चिमटीत मुक्ताच्या आेठांना कुस्करले.त्याच्या हाताच्या पकडीने वेदना होऊ लागल्या मुक्ताला.डोळ्यात पाणी येऊ लागले होते पण त्याने तिला असे काही जखडून ठवले होते की ती हालचालच करू शकत नव्हती.तोंड दाबल्यामुळे आवाजही काढता येत नव्हता.एखाद्या खाटकाच्या दुकानात बांधलेल्या असहाय्य जनावरासारखी केविलवाणी अवस्था झाली होती मुक्ताची.त्याच्या पंजातुन सुटण्याची व्यर्थ धडपड करत होती पण तिला तसुभरही हालचाल करता येत नव्हती.

केदारने तिची सुटण्यासाठीची धडपड बघुन तिला सोडले.तसे ती धक्का देऊन पळायचा प्रयत्न करताच त्याने तिचा पाय जोरात खेचला तशी ती पुन्हा त्याच्या पुढ्यात येवुन पडली.तो पुन्हा छद्मिपणे हसत म्हणाला,"कसे वाटतेय आता??आता कळले ना कुणाला पकडुन डांबुन ठेवले की कसे वाटते???लई मजा वाटली असन नाऽ मला पोलीसात पकडुन देताना….?"

"तु...तुच माझी तक्रार पोलीसात केली होतीस नाऽऽ?

तुझ्याऽऽमुळे...फक्त तुझ्यामुळेचऽऽ मला इतके दिवस जेलमधे सडावे लागले.तेव्हाच ठरवले एक ना एक दिवस ह्याची किंमत वसुल करायची तुझ्याकडुन.पर संधी गावत नव्हती ती आज भेटली."

"जसं मला डांबुन ठेवले होते ना पोलीस कोठडीत तसेच मी पण तुला इथे डांबुन ठेवणार आणि रोज नवरा-बायकुचा खेळ खेळणार तुझ्या संगट."

"तशी पन तु मला लई आवडतीस.तुला बघुन पार येडं लागतय मला.माय म्हनली तस तुजं मन वळुस्तर वाट बघायचे कबुल केल्ते म्या पर काल तुला नहाताना पाहिली तवापासुन टक्कुरच सरकलय माझ.इतक सुगंधीत फुल अन् निसतच दुरून बघत ऱ्हायचं.न्हाय जमनार.लई रोखल मनाला पर म्हनलं बास झाल आता वाट बघणं,,,आता म्या मला हवं तेव्हा हव तस हे फूल हुंगणार,कुस्करणार अन मन भरोस्तार ह्या फुलाचा भोग पनं घेणार.जरऽऽ काऽऽ आऽऽवाज केला तर इकडच गाडुन टाकलं तेव्हा चुपचाप मला जे हवे ते द्यायचे…"

विस्फारलेल्या डोळ्यांनी मुक्ता फक्त केदारचे ते राक्षसी रूप बघत होती.डोळ्यातुन घळघळ आश्रु ओघळत होते पण केदारच्या डोळ्यात रक्त उतरले होते.बदल्याच्या भावनेने पछाडला होता केदार.कसलीतरी नशेची पुडी खाऊन मतीभ्रष्ट झालेला वासनांध केदार लिंगपिसाट झाला होता.मुक्ता खोलीभर नजर टाकुन आपल्या सुटकेसाठी हाताला काही लागतेय का बघत होती पण तेवढ्यात केदारने तिची आेढणी खेचली.मुक्ता असाहय्यतेने गयावया करत राहिली पण केदारच्या डोक्यात बदल्याचे भूत सवार झालेले त्यात वासनेची भूक मुक्ताचा आक्रोश त्याच्या कानापर्यंत पोहोचुच देत नव्हती.जाळ्यात सापडलेल्या तडफडणाऱ्या हरीणी सारखी मुक्ता सुटकेसाठी धडपडत होती.पण केदार एखाद्या हिंस्त्र श्वापदाने सशाची शिकार करावी तसा तिच्यावर तुटुन पडला होता.ती विनवण्या,गयावया करून आपल्या सुटकेसाठी हातपाय पसरत होती पण तो मात्र महाभारतातील दु:शासनासारखे तिचे चिरहरण करत होता.त्याने आपला सगळा जोर लावला तिच्यावर…………..

आणि एक आर्त भेसूऽऽर किंकाळी……..!!

त्या किंकाळीने आसमंत हादरला पण केदार मात्र तिच्या शरीराचे लचके तोडत आपल्या वासनेची भूक शमवतच राहिला.

मुक्ताच्या किंकाळ्या,तिचे क्रंदन दूर दूर पर्यंत कुणालाच ऐकु जाणार नाही अशा निर्जन स्थळी केदारने तिला डांबुन ठेवले होते.

त्या संध्याकाळी सायकलवर जेव्हा ते दोघे एकत्र घरी आले तेव्हाच त्याने ह्या संधीचा फायदा घ्यायचा ठरवले.मुक्ता आजारी असताना मामीने औषध आणायला पाठवले तेव्हाच त्याने झोपेच्या गोळ्याही विकत घेतल्या.त्या त्याने योग्य संधीची वाट पहात स्वत:कडेच ठेवुन घेतल्या.

गेले महिनाभर सुधरल्याचे नाटक करून मुक्ताला गाफील ठेवले.तिचा विश्वास बसुन ती आपल्याबरोबर मोकळेपणाने वागेपर्यंत त्याने संयम ठेवला आणि आज नाही नाही म्हणणारी मुक्ती जेव्हा काहीही विरोध न करता सायकलवर बसली तेव्हाच त्याने त्याचा प्लॅन आकाराला आणायचे ठरवले.त्याने प्यायला आणलेल्या पाण्यात गुंगीचे औषध मिसळुन तिला आणुन दिले.ते पिताच ती काही वेळातच बेशुद्ध झाली. तसे तिला घेऊन तो ह्या निर्जन जागी आला.

आज अखेर इतक्या दिवसांनी त्याची मुक्ताला भोगण्याची मनिॆषा त्याने पुर्ण केली.

निपचित पडलेली मुक्ता फक्त रडत ओरडत राहीली पण तिचा आक्रोश,तिचा टाहो ऐकायला कोणीच नव्हते.जाताजाता त्याने कसलीशी पूडी पाण्यात मिसळुन बळजबरी तिच्या तोंडात ओतली.तशी ती पुन्हा ग्लानीत गेली.

असे किती दिवस झाले माहीत नाही पण रोज केदार यायचा तिला भोगायचा.तिच्या शरीराला ओरबाडुन त्याचे मन शांत झाले की पुन्हा तिला गुंगीचे औषध पाजुन निघुन जायचा.त्यानंतर तिलाही कळायचे नाही की ती किती वेळ झोपलेली असायची.

 

आज केव्हातरी जाग आली तेव्हा मीट्ट काळोख पसरलेला चहुकडे.डोळ्यात बोट घातले तरी हे आपलेच बोट आहे का हा प्रश्न पडावा इतका अंधार माजलेला.मुक्ताचे सारे अंग वेदनेने ठणकत होते.क्षणभर आपण कुठे आहोत ह्या जाणीवेच्याही पार पल्याड गेली होती तिची स्मृति..

वेदेनेने कण्हत कुंथत कसेतरी तिने डोळे उघडझाप करून उघडायचा प्रयत्न केला.दाराच्या फटीतुन अलगद येणारी तिरिपही डोळ्यांना सहन होत नव्हती.

दिवस-रात्र,वेळ-वार,तारीख-महिना ह्या कशा-कशाशी कित्येक दिवसात तिचे नातेच तुटले होते जणु.

स्वत:ला प्रयत्नपुर्वक मानेला एक जोराचा हिसडा देत बोटे भूमीवर घट्ट रूतवुन त्याच्या आधाराने उठुन बसायचा तिने प्रयत्न केला तशी कमरेतुन एक तीव्र सणक गेली वेदनेची आणि ती पुन्हा कोलमडून जमिनीवर पडली.तिची वेदना तिच्या आक्रसलेल्या कृष चेहऱ्यावर उमटली तरीही धीर करून तिने डोळे उघडले.मेंदुवर जोर देऊन आठवायचा प्रयत्न केला.

किती दिवस झाले मी अशी ह्या अंधार कोठडीत खितपत पडुन आहे?

गवतावरच्या गंजीवरून महतप्रयासाने वेदनेला दूर सारून ती उठुन बसली.गवतावर सगळीकडे रक्ताचे डाग पडले होते.तिच्या अंगावरही बऱ्याच जखमा होत्या आेरबाडल्याच्या.ठिकठिकाणी काळेनिळे चट्टे उमटलेले.कमरेखालचा भाग तर जणु सून्न पडला होता.

खोलीभर एक कुबट वास पसरलेला होता.तिला आत्ता कुठे त्या दुर्गंधीची जाणीव झाली.

अंगावरच्या फाटक्या ओढणीने तिने आपले नाक दाबले.आणि अंधारातच त्या बंद खोलीचा मागोवा घेऊ लागली.

चारीबाजुंनी बंद भिंतीला फक्त एक छोटी लाकडी खिडकी होती पण ती ही बाहेरच्या झाडीझुपटींनी पुर्ण झाकुन गेलेली होती.

दरवाजा…!!!

नीट डोळे ताणुन बघितल्यावर भिंतीच्या एका गोल दिवडीत एक मजबूत लाकडी अगदीच खूजा,लहान दिंडी दरवाजा बाहेरून जाड जुनाट साखळ्ंयांनी घट्ट कुलूपबंद केलेला होता.

ती कशीबशी अंगात अवसान आणुन उठली आणि खुरडत खुरडतच दरवाजापर्यंत पोहोचली.दरवाजावर थाप मारून अंदाज घेण्याचा प्रयत्न केला पण पलिकडे कोणतीही सजीव हालचाल जाणवत नव्हती.

ती हताशपणे तिथेच दरवाजाला टेकुन बसली.थोडावेळ गेल्यावर त्या खोलीतल्या एक एक गोष्टी तिच्या नजरेला अंधुक अंधुक दिसु लागल्या.दरवाज्याला लागुन दुसऱ्या कोपऱ्यात एक मडक दिसत होतं.बहुदा तिला तहान लागली तर पाण्याची सोय म्हणुन तो माठ ठेवला असावा.

ती खुरडतच त्या गाडग्याजवळ पोहोचली.त्यात पाणी होतं.बाजुलाच एक तुटका प्लॅस्टीकचा ग्लास पडलेला होता.तिने त्या ग्लासाने मटक्यातुन पाणी काढले आणि थोडे चेहऱ्यावर शिंपडले तशी तिला तरतरी आली.उरलेले दोन घोट पाणी गळ्याखाली उतरवले आणि ती तिथेच बसुन विचार करू लागली.आपण इथे ह्या अवस्थेत कसे आलोय???

जरा विचार केल्यावर तिला शेवटची केदारची भेट आठवली.इथे आणल्यावर आपल्यावर अमानुष अत्याच्यार करण्यापुर्वीची त्याची वाक्ये तिला आठवली.सुडभावनेने पेटलेला केदार बदला घेण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो.न जाणो आपल्यावर केलेले अत्याच्यार उघडकीस येऊ नये म्हणुन तो आपल्याला जीवे मारायलाही कमी करणार नाही.काहीही करून इकडुन पळ काढायला हवा पण कसा??तिला काहीच मार्ग सुचत नव्हता. अखेरीस महतप्रयासाने ती उठुन उभी राहीली.लाकडी खिडकीशी जाऊन हातांनी त्या लाकडी दांड्याना हलवुन हलवुन पकड सैल करायचा प्रयत्न केला.जरा जास्त हिसका दिल्यावर एक मधली फळी अर्धवट तुटली.मग अजुन प्रयत्न करून तशाच एक एक फळीला मोडण्यात तिने यश मिळवले.पण आता मुख्य अडचण ही होती की खिडकी पर्यत पोहोचायचे कसे.चढायला आधाराला काहीच दिसत नव्हते.जरा विचार करून तिने सगळा गवताचा भारा खिडकी खाली सरकवत आणला त्यावर पाण्याचा माठ ठेवला आणि त्यावर पुन्हा गवताची गंजी टाकली जेणेकरून तिच्या वजनाने माठ तुटणार नाही.मनातल्या मनात देवाचे नाव घेत ती कशीबशी खिडकीपर्यंत चढली पण खिडकीच्या फळ्या वेड्यावाकड्या तुटल्यामुळे खिडकीतुन जायला सरळ वाट नव्हती.तरीही वर चढुन जोर लावुन तिने मधल्या दोन दांड्या बऱ्यापैकी तोडण्यात सफलता मिळवली.अंधारात खिडकीखाली जमिन आहे की नाही हेही माहित नव्हते तरीही मनावर दगड ठेवुन तिने खिडकीतुन स्वत:ला हळुहळु एक एक अवयव बाहेर ढकलत बाहेर उडी मारली.सुदैवाने खिडकीखाली बराच गवताचा कचरा जमा झाल्याने तिला पडल्यावर फारसे लागले नाही.पण आता आपण कुठे आहोत आणि आपल्याला पुन्हा आपल्याच गावात जायचे नाही तर कुठे जायचे हे ठरवायचे होते.ती अंधारात वाट फुटेल तशी चालत राहीली.थोड्या अंतरावर तिला केदारची सायकल दिसली.सायकल इथे आहे म्हणजे केदार इकडेच आसपास तर नसेल..नुसत्या विचारांनीच तिला कापरं भरलं.इतक्या प्रयत्नांनी केलेली सुटका तिला वाया जाऊ द्यायची नव्हती.तिने झपझप पावले टाकत त्याच्या सायकलवर टांग मारली आणि सायकल दामटत रस्ता दिसेल तिकडे पळवत राहीली सायकलला.

एक एसटी महामंडळाची गाडी बाजुने धावत होती.तिने गाडीवरची पाटी वाचली तर ती तालुक्याच्या गावी जाणारी गाडी होती.तिने गाडीच्या मागेच आपली सायकल दामटली.किती तास ती तशीच सायकल पळवत राहीली.

शरीरातली वेदना आणि श्रमाने तिला थकवा आला होता.सायकल चालवायची तिच्यात जराही ताकद उरली नव्हती तरीही कुठल्याही क्षणी जर केदारला कळले की आपण पळुन गेलोय तर पाठलाग करत तो आपल्याला नक्की गाठेल हा विचार करून ती जीवाच्या आकांताने धावत राहीली धावत राहीली….

सायकल चालवता चालवता अचानक जोरदार हिसका बसुन ती जमिनीवर आदळली.कच्च्या पक्क्या सडकेवरच्या दगडधोंड्यात पडुन तिला डोक्याला मार लागला.त्यातुन रक्त वाहू लागले.तिने तसेच उठुन जवळची माती डोक्यावरच्या मारावर दाबली तसा रक्तप्रवाह काही वेळात थांबला.सायकलची चेन तुटल्यामुळे ती पडली होती.आता सायकलपण निकामी झाल्याने तिकडेच झाडीत सायकल फेकुन ती तशीच अंधारात वाट कापत राहिली.सर्वांगाला ठिकठिकाणी झालेल्या जखमांतुन रक्त येत होते.वेदनेनी शरीर ठसठसत होते परंतु त्या कशाचीही तमा न बाळगता तिला फक्त तालुक्याची वाट दिसत होती.

ती धावत होती.धावता धावता ठेचकाळुन पडत होती,पुन्हा उठुन पुन्हा चालत होती.अंधारातुन मिणमिणत्या प्रकाशात जितके दिसेल तितके ती रस्ता पकडून चालत होती.आता चालुन चालुन थकली होती.डोळ्यापुढे अंधारी येऊन ती तिथेच रस्त्याकडेला असलेल्या झाडाखाली चक्कर येऊन पडली.अतिश्रमाने शुद्ध हरपली होती तिची…….

उद्याचा सूर्य तिच्या आयुष्यात उगवेल की नाही हे पण तिला ठाऊक नव्हते.हा प्रवास कुठे नेऊन सोडणार होता मुक्ताला????

-----------------(क्रमश:-10)---------------------------------

क्रमश:-10

©®राधिका कुलकर्णी.

 

नमस्कार मंडळी…….!!!

मुक्ताच्या कोवळ्या जीवाशी नियतीऩेही किती क्रुर खेळ खेळला.हरप्रकारे तिची अवहेलना होतेय तरीही मुक्ता हार मानत नाही.तिच्या कसोटीवर ती खरी उतरेल का?

इतक्या एकावर एक मानसिक,शारीरिक आघातानंतर मुक्ता स्वत:ला खरच सिद्ध करू शकेल का??????

हे सगळं जाणुन घ्यायचे असेल तर पुढचे सगळे भाग नियमीत वाचा..

कसा वाटला आजचा भाग? हे मला ऐकायला नक्की आवडेल.

हा भाग लिहुन झाल्यावर नेहेमीप्रमाणे त्याचे वाचन करत असताना माझ्या डोळ्यातुन कधी आसवं ओघळायला लागले माझे मलाच कळले नाही.तुम्हालाही असा काही अनुभव आला तर इकडे जरूर शेअर करा.

माझ्या नावासहीत कथा नक्की शेअर करू शकता.

धन्यवाद.

@राधिका.

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..