Login

मी कात टाकली भाग -8

मुक्ताच्या संघर्षपुर्ण आयुष्याची रोमहर्षक कथा.

मी कात टाकली भाग -8

©®राधिका कुलकर्णी.

मामाचे दिवसपाणी उरकले तसा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला पैशांचा.मामाचा जो काय थोडा जमीनीचा तुकडा होता त्यात ते घरापुरतं धान्य काढत असत आणि मामी दुसऱ्याच्या वावरात रोजंदारीवर जाई. आज ह्या वावरात तर उद्या त्या.ज्याच्याकडं काम मिळेल तिकडे मामी कामावर जात असे पण आता त्यांच्या शेतावर मामाऐवजी कोण जाणार हाच प्रश्न आ वासुन ऊभा राहीला.मुक्ताने जरा विचार करून स्वत:हुनच मामीला म्हणाली,"मामीऽऽऽ…..तु असं कर आपल्या घरच्या वावराचे काम तु बघ अन् तुझ्या जागी रोजंदारीवर म्या जात जाईन.म्हंजे घरच्या खर्चाचा प्रश्नही सुटेल अन् आपल्या वावराची बी हाळ होणार न्हाय.."

पोरीचे ते समंजस मोठ्या माणसागत बोलणं ऐकुन मामीच्या डोळ्याला धारा लागल्या.राहुन राहुन तिला मामाचे म्हणजेच आपल्या नवऱ्याचे शब्द कानात आठवु लागले.पोरीला शाळेत जायला मामी नको म्हणत होती तेव्हा मामा बोलले होते तिला 'की एक दिवस येईल तेव्हा हिच पोर आपला आधार होईल.केदारचा काय भरोसा न्हाय…' नवऱ्याचे ते वाक्य तंतोतंत खरे ठरत होते.उलटपक्षी पोरगाच नवऱ्याच्या मृत्युला कारण बनला होता तर पोरीच्या ओळखीमुळेच मामाची पोलीसांनी सुटका केली होती.ऐनवेळी गंधे मास्तर मधे पडले नसते तर पोलीसांनी मारून मारून तिकडेच मामाचा जीव घेतला असता.ज्या पोरीला आपण सतत फडफड केली,गुरासारख सतत दावणीला बांधुन काम करवुन घेतले तिलाच आपल्यासाठी प्रेमाचा पाझर फुटला नाहीतर ज्याच्यासाठी नऊ महिने पोटात कळा सोसुन जन्म दिला त्याने आईबापाच्या तोंडाला काळिक फासण्यात कुठलीच कसर सोडली नाही.मनातल्या मनात विचार करून मामी पश्चा:त्तापाचे आश्रु रडत होती.

पोरीला वावरात पाठवायची भीती वाटत होती पण दुसरा कुठला मार्गही दिसत नव्हता त्यामुळे नाईलाजाने का होईना मामी मुक्ताच्या प्रस्तावावर राजी झाली.दिवस पाणी उरकले तसे रोजच्यापेक्षा अजुन लवकर उठुन मुक्ता घरची सर्व कामे पुर्वीप्रमाणेच उरकुन मामीच्या ऐवजी तिच्या कामाला जाऊ लागली.तिला ह्या कामांची सवय नव्हती पण बाकीच्या बायका कसे करतात त्याचे निरीक्षण करून ती त्याप्रमाणेच काम करू लागली.

लवकरच ती त्या कामातही वाकबगार झाली.इतर बायका गप्पाटप्पा टंगळमंगळ करत वेळ काढत काम करायच्या.न्याहारीसाठी वेळ लावायच्या त्या सगळ्या वेळात मुक्ता मात्र वेगाने कामाचा सपाटा लावायची.मग ते तुरीच्या शेंगा वेचणे असो की कापसाची बोंड उचलणे असो त्यामुळे इतरांपेक्षा तीचा माल जास्त भरायचा दिवसाच्या शेवटी.मग तिला मजुरीही जास्त मिळायची. मामीला त्याच वेळात जितके पैसे मिळायचे त्यापेक्षा मुक्ताला जास्त पैसे मिळु लागले पण ह्या सगळ्या नादात तिचा अभ्यास मात्र मागे पडला.असा तसा महिना झाला  सरांकडे शिकवणीला जाणे जमलेच नव्हते तिला.

घराची आर्थिक बाजु सावरताना तिचे शिक्षणाचे स्वप्न कुठेतरी धुसर होताना दिसत होते.ती रात्रंदिवस ह्यातुन कसा मार्ग काढावा ह्याचा विचार करत होती पण पर्याय मात्र सापडत नव्हता.अशातच तिची वार्षिक परीक्षा तोंडावर येऊन ठेपली.

एके दिवशी वावरातुन घरी जात असताना वाटेतच गंधे सर भेटले.त्यांनी शिकवणीला का येत नाही विचारल्यावर तीने सर्व हकिकत सांगितली आणि म्हणाली," सरऽऽ….आता ह्या वक्ताला जर मी माझ्या मामीच्या पाठीमागे मदतीला उभी नाही राहीले तर काय उपयोग माझ्या असण्याचा?

कसेही असले तरी तिने आधार दिलाय मला तिच्या घरात म्हणुन मी आज दिसतेय तरी नाहीतर कुठे गेले असते काय केले असते देवालाच ठाऊक?

तिच्या उपकाराची ऊतराई व्हायची वेळ आत्ता आलीय तर मलाही तिच्या मागे उभ राहणं माझ काम आहे ना सरऽऽ…?

देवाचीच ईच्छा दिसते की मी पुढे शिकु नाही म्हणुन तो एकावर एक अशा अडचणी माझ्या मार्गात आणतोय.

 मी कितीही हातपाय मारले तरी माझ्या नशिबाला बदलु शकत नाही म्हणुन मीही आहे त्या परिस्थितीला स्वीकारलेय सर.." 

म्हणता म्हणताच रडू लागली मुक्ता..

सरांनाही तिच्या असहाय्यतेची किव आली.

देव एखाद्या निष्पाप जीवाची का सतत कसोटी बघत असेल बरं..?

काय गुन्हा केलाय त्या अजाण पोरीने कुणाचा म्हणुन देव तिच्या मार्गात सतत असे काटे पेरून ठेवतो…?"

सरही सगळे ऐकुन हताश झाले होते मनातुन पण तसे चेहऱ्यावर न दाखवता ते म्हणाले, "मुक्ताबाई तुम्हाला हिंदीतली ती कविता आठवते का…

"कोशिश करने वालों की कभी हार नही होती।।"

ती मुंगी कितीवेळा भिंतीवर चढताना पडते पण ती हार मानते का…?नाही..

ती पुन्हा प्रयत्न करते,पुन्हा पडते,पुन्हा चढते आणि शेवटी ती यशस्वी होते.

तम्हीही त्या मुंगीला गुरू माना आपला.

तिच्यासारखी जिद्द आणि चिकाटी मनात ठेवुन प्रयत्न करत रहा..बघा यश नक्की मिळेल.काही ना काही मार्ग सापडेल..असे निराश होऊन कसे चालेल…?मग हसा पाहू…"

सरांच्या हिम्मत देण्याने थोड्यावेळ का होईना मुक्ता मागचे सगळे विसरून हसली.सर म्हणाले ,"उद्या वावरात जाण्याआधी माझ्या घरी चक्कर मारा तोपर्यंत मी पण काही विचार करून बघतो.बघु काही सुवर्णमध्य सापडतोय का???

"चला आता शांत मनाने घरी जा.तुमच्या चेहऱ्यावरचे दु:ख मामीला दिसु देऊ नका नाहीतर ती एक म्हणता दहा प्रश्न विचारून हैराण करेल.त्यांच्या डोक्यात संशयाला जागा नको…काय..!"

त्यावर मुक्ताने मान हलवत आपला मूड ठिक केला आणि घराकडं निघाली.

      ~~~~~~~~~~~~~~~

दुसऱ्या दिवशी ती वावरात जाण्याआधी काल ठरल्याप्रमाणे सरांच्या घरी पोहचली.

सरांनी तिला एक चिठ्ठी तिच्या मुकादमाला लिहुन दिली आणि सांगितले ही त्याला नेऊन दे.

तीने गेल्या बरोबर सरांची चिठ्ठी त्याला देत रोजच्या कामाला लागली.

संध्याकाळी तिचा माल बघुन मुकादमाने तिची रोजंदारी हातावर ठेवतच म्हणाला,"हे बघ मुक्तेऽऽ तु बाकी लोकांपेक्षा जास्त काम करते. कमी वेळात जास्त काम करते,तर रोज तुला त्यांच्या इतके लवकर यायची गरज नाही.तु दोन तास उशीरा आलीस तरी चालेल.मुक्ताला हे ऐकुन आश्चर्यच वाटलं कारण तो फार खडूस मुकादम होता.वेळेपेक्षा थोडा जरी उशीर झाला तरी तो लगेच पैसे कापायचा.हा नक्की सरांच्या चिठ्ठीचाच परिणाम असणार हे समजुन चुकली मुक्ता.ती बर म्हणत आनंदातच सरांच्या घरी पोहोचली.सर वाटच पहात होते.ती आल्याबरोबर सरांनी तिच्याकडे स्मित चेहऱ्याने बघितले.

मुक्ता खूपच आनंदी दिसत होती.ती सरांना म्हणाली,"सर त्या मुकादमाने मला रोज दोन तास उशीरा यायची परवानगी दिलीय.आता मी उद्या पासुन रोज सकाळी शिकवणीला येत जाईन..एवढा वेळ पुरेसा आहे ना सर माझा राहीलेला अभ्यास भरून काढायला.?"

त्यावर गंधे सर म्हणाले,"खूप झाला.आता काही फार शिकवायचे राहीलेले नाहीये आणि काही पुस्तकाचे मथळे मी अधोरेखित करून देईन ते तु घरी वाचुन काढ.आता अजुन दोन महिन्यांनी मेन परीक्षा आहे.तेव्हा जोमाने कामाला लागायचे ...कायऽऽऽ!!!!"

मुक्ताची कळी खुलली होती आपल्याला ही परीक्षा देता येणार कळल्यावर..ती त्या आनंदातच घरी पोहोचली.रोजच्या प्रमाणे सगळी कामे उरकुन मामीची वाट पहात बसली.

त्या रात्री अति आनंदात तिला झोप लागेना.कधी सकाळ होतेय अन् मी शिकवणीला जाते असे झालेले मुक्ताला..

    ~~~~~~~~~~~~~~~~~~

दिवस असेच भराभर निघुन गेले.म्हणता म्हणता मुक्ताची अकरावी संपुन ती आता बारावीत पोहोचली.अकरावीचा निकालही यथायोग्य लागला.इतक्या अडचणीतुनही तिने अकरावी चांगल्या मार्कांनी पास केली.आता बारावी बोर्ड परीक्षा आणि करीअर साठी महत्त्वाचा मानला जाणारा टप्पा.त्याुमळे तिला तर ह्यावर्षी काहीही करून बारावी चांगल्या मार्कांनीच पास करायची होती.इतर मुले जेव्हा सुट्टंयामधे इकडे तिकडे सैरसपाट्याला जात होते तेव्हा मुक्ता मात्र बारावीचा अभ्यास करत होती.तेही घर आणि बाहेरची कामे संभाळुन.आता तिने जवळपास घराचा तर पुर्ण ताबा स्वत:कडेच घेतला होता.शक्यतो मामीला घरातल्या कुठल्याच कामाचा भार पडु देत नसे ती.

मामीचेही हळुहळु ह्रदय परिवर्तन होत होते मुक्ता बाबतीत.एवढे सगळे होऊनही स्वत: इतकी थकलेली असुनही मामीचे हातपाय चेपुन द्यायचे काम ती नित्य नियमाने करत असे.कधी कधी मामीलाच दया येई.एवढ्या लहान वयात लेकरू घरचं बाहेरच सगळ काम बिनबोभाट करतं.कधी तक्रार नाही की कामात आळस नाही आन् तरीबी पुन्हा रात्री आपलेच हातपाय चेपुन देते.

देवाऽऽऽ खरच म्या पापिणीने कोणते असे पुण्य केले की ही पोर माझ्या सेवेस पाठवली तु..??

मामीला कधी कधी भावना अनावर होई मग ती अशीच स्वत:शीच विचार करत राही.मुक्ताला मात्र ह्या सगळ्यामागे एकच हेतु हाेता मामीचे मन जिंकुन घेणे.कधी ना कधी तो दिवस उगवेल जेव्हा मामी स्वत:हुन मला मायेने जवळ घेईल.प्रेमाने माझी चौकशी करेल.माझ्या कामाचे कौतुक करेल.त्या क्षणाच्या प्रतिक्षेत तिची अव्याहत तप:श्चर्या चालु होती.

सरांनी सांगितल्याप्रमाणे "कोशिश करनेवालों की कभी हार नही होती" हे तिला पटले होते.

      ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

एक दिवस नेहमीप्रमाणेच वावरातले काम उरकुन संध्याकाळची ती घरी आली तर घराच्या आंगणाचे फाटक उघडे.मामी तर इतक्यात येत नाही मग कोण आलेय फाटक उघडून आत.

दबक्या पावलांनीच ती अंगणात आली.अंगणात कोणीच नव्हते पण दाराशी एक तुटकी मोठ्या आकाराची पुरूषी स्लिपर दिसली तशी ती घाबरली.घरात कोण चोर तर नसल शिरला??

पण चोर असा भरदिवसा फाटक उघडून सरळ रस्त्याने कशाला येईल?मग नेमके कोण असलं घरात...केदार…??????"

नुसत्या विचारांनीच तिच्या अंगाचा थरकाप झाला.जर तिची शंका खरी असेल तर मामी नसताना एकटे घरात जाणे म्हणजे अजुन एका संकटला आमंत्रण देण्यासारखे होते.ती दाराशीच मिनिटभर विचार करत थांबली.पण आधी खात्री तर करायला हवी ना की खरच केदारच आहे की आणखी कोणी…

तीने आंगणाला वेढा घालुन मागच्या परसात आली.त्या दोघी बाहेर जाताना फक्त समोरच्या दरवाजालाच कुलूप घालत असत.मागचा परसाकडे उघडणारा स्वैपाकाच्या खोलीचा दरवाजा आतुन कडी असली तरी तो नुसता पुढे केला की त्याच्या फटीत हात घालुन आतली कडी अनामत उघडता येत असे आणि ही गोष्ट फक्त घरात राहणाऱ्यांनाच माहितीची होती.

म्हणुन खात्री करायला ती मागील परसात आली.तिच्या डोक्यात चाललेल्या विचाराप्रमाणेच कडी उघडून कोणीतरी आत शिरलेले होते.ती गुपचूप चाहूल न लागू देता आत गेली तर आतल्या बाजेवर कोणीतरी तरणाबांड मुलगा पालथा झोपलेला होता.आता तर तिची खात्रीच पटली हा नक्की केदारच असणार कारण मागची कडी बाहेरून उघडायचे तंत्र मामी आणि ती सोडता फक्त केदारलाच अवगत होते.

तिची भीती खरी ठरली होती.

केदार जर ह्या घरात राहिला तर आपले जगणेच मुश्कील..!!

काय करावे तिला काहीच सुचत नव्हते.

ती तशीच आल्या पावली माघारी फिरली.खूप विचार केल्यावर तिला मामांना पोलीसांनी सोडले तेव्हाचे एक वाक्य आठवले.." अगर आपका बेटा कभी भी घर आया तो फौरन हमे इत्तला करो.अगर उसके घर आने की बात आपने छिपाई तो आप सबको जेलमे डाल देंगे इतना याद रखो।"

ते दर्डावलेले हुकूमी आवाजातले पोलीसांचे वाक्य आठवुन तिला उगीचच भीती वाटली.जर केदार आलेला आपण लपवल्यामुळे मामीसहीत आपल्यालाही अटक झाली तर????

माझे शिक्षण तर तिकडेच संपुष्टात येईल…नाहीऽऽ नाहीऽऽ हे होता कामा नये...

त्यापेक्षा ही गोष्ट पोलीसांत कळवलेलीच बरी.

मनाचा विचार पक्का होताच पोलीस ठाण्याच्या दिशेने तीची पावले झपाझप पडू लागली.

पोलीसांत वर्दी देऊन तिने विनंतीही केली की साहेब ही बातमी मी दिली हे प्लिज घरी कळु देऊ नका.त्यावर पोलीस इन्चार्जनी काही खास प्रतिक्रीया देणे टाळले आणि आम्ही येईपर्यंत त्याला घराबाहेर पडू देऊ नका असेही बजावले.

घरातल्या कामांचे मुक्ताला कधीच काही वाटत नव्हते.कितीही श्रम करायची तिची तयारी होती मामीकरता फक्त केदारच्या वासनेचे भक्ष बनणे तिला मंजुर नव्हते.

जर पोलीस त्याला पकडुन वर्ष सहा महिने कोठडीत टाकले तर तिची बारावी सुरक्षित पार पडेल अशी भाबडी आशा होती तिला.

विचारांच्या तंद्रीतच ती घरी आली.

ह्या खेपेला पुढले कुलूप घातलेले दार उघडे होते म्हणजे मामी पण वावरातुन घरी आली होती.तिने एक सुटकेचा नि:श्वास टाकला.घरात शिरणार इतक्यात माय-लेकात काय बाेलणे चाललेय हे एेकायला तिने कान टवकारले.ती दारातच गुपचूप उभी राहुन मामीचा केदारशी चाललेला संवाद ऐकु लागली.मामी केदारला म्हणत होती…..

मामी- अरे लेकराऽऽऽऽ कुटं वनवन भटकत हाईस..तुझा बा मेला तुज्या करनीनं तरी बी तुला अक्कल आली न्हाई का रंऽऽऽ..??

काय नाय तर आपल्या मायचा तरी इच्चार कर की जराऽऽ...हेच तु नीट वागला असता तर आता पावेतो तुज लगीन लावुन दिल असतं म्या मुक्ती संगट.तु आपल्या वावरात बघितलं असतं, म्या अन् मुक्तीनं रोजंदारी केली असती पर तुला नाय ती कसली दुर्बुद्धी सुचली अन् नसतं कसल बालंट आनलस बघ सवतावर बी आन् ह्या घरावर बी..अजुन बी येळ गेलेली न्हाय.तु कबुल कर की चांगला सुधरून वागशील तर म्या आत्ता बी तुजं लगीन लावुन द्यायला तयार हाय.मुक्ती काय आपल्या शब्दाबाहेर न्हाई…"

एकिकडे मुक्ताशी लग्नाची गोष्ट एेकुन केदारच्या तोंडातुन लार टपकत होती तर दुसरीकडे मामीचे एक एक शब्द मुक्ताच्या काळजावर सूरे फिरवत होते.केदारशी लग्न करण्यापेक्षा मरण बरे असेच त्याक्षणी मुक्ताला वाटुन गेले.मामीच्या मनातले मनसुबे एेकुन तिच्या पायाखालची जमीनच सरकली.तरीही काहीच माहित नाही अशा अविर्भावात मुक्ता घरात आली.मामी आणि केदारने एकाचवेळी मुक्ताकडे पाहीले.केदार तर मुक्ताला जवळजवळ वर्षभराने बघत होता.

मुक्ताचे मुसमुसलेले तारूण्य बघुन तर केदार पार वेडापीसा झाला त्यात आईने मुक्ताशी लग्नाची गोष्ट बोलल्याने तर त्याला आत्तापासुनच मुक्ता आपल्या हक्काची वाटू लागली.त्याची ती वासनांध बुभुक्षित नजर मुक्ताला आतंर्बाह्य जाळुन काढत होती.तिला नखशिखांत न्याह्याळत मनात तिला मिळवण्याची स्वप्न पाहत होता केदार.

मुक्ताला आसपास वावरताना देखील त्याच्या नजरेचा तो पाठलाग नकोसा होत होता.

मनातल्या मनात देवाचा धावा करत ती एक एक काम उरकत होती.मामी जवळच असल्याने आत्ता जरी तिला केदारपासुन भय नसले तरी केदारची नजरच सांगत होती की तो कधीही तिच्या अब्रुवर हात टाकेल.नुसत्या विचारांनीच मुक्ता भयभीत झाली.

इकडे केदार तिच्याकडे तिरपा कटाक्ष टाकुन मुद्दाम मामीला म्हणजेच आपल्या आईला म्हणाला,"आयेऽऽ...तु मगा बोललीस ते सारं मला पटलयं..माज चुकलचं.लई वंगाळ वागलो म्या तुज्यासंगट बा संगट.परं आता म्या सुदरायचं ठरवलय.आता मी चुकीच पाऊल अजाबात टाकनार न्हाय.तु म्हणशीला तस म्या उद्या म्होरनच आपल्या वावरात कामाला जात जाईन.फकस्त तु म्हनल्या परमान माझ लगीन लावुन देशील नाऽऽऽ…???

तुजी पसंत तिच माजीबी पसंद हाय...मी बी लई थकलोय पळुन पळुन.आता मलेबी स्थीर आवुष जगावस वाटाय लागलया…"

त्याच्या ह्या अघळ पघळ गोड रसात डुबलेल्या गप्पा खऱ्या मानुन मामी भावुक झाली.खरच पोरगं सुधरतय असे वाटु लागले तिला.पण हे सगळे काेणत्या स्वार्थासाठी चालले होते हे फक्त मुक्ताच जाणत होती.मामीला त्याने व्यवस्थित गुंडाळले होते आपल्या गोड बोलण्याने पण मुक्ताला मात्र त्याचा हा मानभावीपणा का अन् कशासाठी चाललाय हे पक्के ठाऊक होते.तिचे ह्रदय तेज गतीने धडधडु लागले.असेच मामीला उल्लु बनवुन जर केदारने आपला मनसुबा पूरा केला तर माझे काय??

मी तर मामीला नाही पण म्हणु शकणार नाही.पण मग हा लांडगा तर रोज गिधाडासारखे लचके तोडत राहील माझे....नाहीऽऽ   नाऽऽही..!!काही करून ह्याच्या तावडीतुन सुटायलाच हवे.देवा लवकरात लवकर पोलीस पाठव रेऽऽ..ह्या लांडग्यापासुन मला वाचव रे देऽऽवा…"

मनोमन देवाची प्रार्थना करतच तिने स्वैपाक उरकला.केदारसाठी मामीने मुद्दाम स्वत: ताट वाढले.किती दिवस खायला न मिळाल्यागत अधाशासारखा तो जेवणावर तुटून पडला.मामी वाढत गेली तो खात गेला आता डोरल्यात फक्त एकच भाकरी उरली.तिला कळुन चुकले की आज तिला उपास घडणार आहे.काही न बोलताच तिने मामीचे ताट वाढले आणि ती भांडे घासायला गेली.मामीचे जेवण उरकले.तोपर्यंत तीचेही भांडे घासणं झाले.एक एक मिनिट युगासारखा वाटत होता तिला.रात्री केदारच्या उपस्थितीत घरात झोपायची तिला प्रचंड भीती वाटत होती.पोलीसांना वर्दी देऊन तासाच्या वर उलटला होता तरीही अजुन पोलीस त्याला पकडायला कसे आले नाहीत हाच विचार करत तिने मामीची खाट टाकली.मामा गेल्यापासुन त्यांच्या खाटेवर मामी झोपू लागली होती.तिने बाजेवर घोंगडी हांथरताच मामी म्हणाली,"आज केदार झोपेल बाजेवर.ती खाट अंगणात टाक." त्यावर हुश्श करत तिने निश्वास सोडला.म्हणजे केदार बाहेर बाजेवर झोपणार होता.

त्यातल्या त्यात समाधान मानत तिने बाज अंगणात टाकली.घाेंगडी हांथरताना केदार आला.त्याने घोंगडीचे दुसरे टोक मुद्दाम धरून ठेवले.त्याला अचानक तिकडे पाहुन मुक्ता घाबरून गेली.तीच्या शरीराला अनामिक कंप सुटला.पण तेवढ्यात मामी आल्याने केदारने घोंगडीचे टोक सोडले.मुक्ताने घोंगडी आंथरून तिकडुन बाजुला झाली.ती आत आपल्या अंथरूणावर बसुन पुस्तक वाचु लागली.

तेवढ्यात एक दोन जण अचानक घरात आले.आत येताच त्यांनी केदारला पकडले.अचानक कोणीतरी मजबूत हातांनी पकडताच केदारची भीतीने गाळण उडाली.मामीलाही कळेना अचानक ही कोण माणस घरात घुसुन केदारला पकडुन नेताहेत.मामीने गोंधळ करून विचारताच त्यांनी सांगितले की आम्ही साध्या वेशातले पोलीस तुमच्या घरावर पाळत ठेऊन होतो.हा फरार गुन्हेगार आहे.बरा सापडला आज..असे म्हणतच त्यांनी त्याला तिकडुन पकडुन नेले.मुक्ता घराच्या उंबऱ्यात उभे राहुन बघत होती.मामीने मुलाच्या विरहात टाहोच फोडला.तिलाही खूप दु:ख होत होते मामीकरता परंतु केदार सारख्या सापाला पोसुन तो मामीलाही एक दिवस डसल्यावाचुन राहणार नाही हे मुक्ताला कळत होते पण मामी तर बिचारी बोलुन चालुन माय होती लेकराची.

तिच्या मनात का पाप येईल.ती तर मनापासुनच प्रेम करत होती.त्याचे जीवन मार्गी लागावे म्हणुन प्रयत्न करत होती.

रागाने खाऊ की गिळु अशा भेदक नजरेने मुक्ताकडे रोखून बघत बघतच केदार दिसेनासा झाला.

मुक्तासाठी आजच मरण उद्यावर टळलं होतं एवढेच काय ते समाधान पण सुडाने पेटलेला केदार काय पाऊल उचलेल हे कुणालाच ठाऊक नव्हते...

आपल्या स्पर्शाने मामीला सावरून आधार देत मुक्ता मामीच्या पायाशी रात्रभर बसुन राहीली.

एकीकडे मामीतल्या आईकरता दु:ख तर स्वत:च्या सुटकेचा आनंद अशा संमिश्र भावनांमधे अडकली होती मुक्ता……..!

----------------------(क्रमश:-8)-------------------------------

(क्रमश:-8)

नमस्कार मंडळी………!

एका संकटातुन मार्ग काढेपर्यंत दुसरे फणा काढुन उभे रहात आहे मुक्तापुढे.आता तर केदारला दाट संशय आहे की आपली येण्याची बातमी मुक्तानेच कळवली असणार,ह्याचा परिणाम पुढे काय होणार?

मुक्ता कोणत्या नवीन संकटात सापडणार?

त्यातुन ती स्वत:ची सुटका करू शकेल का…..?

हे सगळे जाणुन घ्यायचे असेल तर पुढचे सगळे भाग जरूर वाचा..

आजचा भाग कसा वाटला ते कमेंट मधे जरूर कळवा.

लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासहीत कथा नक्की शेअर करू शकता..

धन्यवाद.

@राधिका.

🎭 Series Post

View all