मी कात टाकली भाग - 7
©®राधिका कुलकर्णी.
कॉलेजला कला शाखेत अॅडमिशन झाली.टोपे सरांनी बरीच सारी पुस्तकेही लायब्ररीतुन देऊ केली.
सगळा पुस्तकांचा बाड गंधे सरांकडेच ठेवला होता.
आता महत्त्वाचा मुद्दा हा होता की मामीसोबत वावरात जाणे कसे टाळायचे??कारण वावरात प्रत्यक्षपणे मामीसोबत दिवसभर जावे लागणे म्हणजे तिचा अख्खा दिवस त्यातच गुंतुन पडणार मग तिला गंधे सरांकडे शिकवणीला जायला वेळ कसा मिळणार…?
प्रश्न गहन होता.कुठलीही टंगळमंगळ मामीच्या डोक्यात संशयाचा किडा घुसायला पुरेशी होती.त्यामुळे हे प्रकरण कसे हाताळायचे ह्याचाच विचार करत होते मुक्ता आणि मुक्ताचा मामा.मुक्ताला एक मात्र कळले होते.घरातले काम बिनबोभाट न सांगता केले की मामी खुष असायची.
त्यामुळे मुक्ता आता मामीच्याही लवकर उठुन सगळी कामे भरभर उरकुन ठेवायची.पोरगी खरच अभ्यासाचं खूळ विसरून घरातल्या कामात जास्त मन लावतेय हे पाहुन मामीचीही खात्री पटली की आता मुक्ताने खरचच पुढे शिकायचा विचार सोडलाय.तशी ती जास्तच खुष झाली.
मुक्ता रोज लवकर उठुन आंगण गोठा साफ करणे,घरातली झाडझूड,पाणी शेंदुन प्यायचे वापरायचे पाणी भरून ठेवणे,सकाळची चूल पोतेर करून चहा करणे इतकी कामे मामी उठायच्या आधीच उरकुन टाकी.आजकाल रोज सकाळी मंजन केले की पायरीवर टेकुन मामी आयता चहा प्यायची.त्यामुळे मुक्तावर ती आता पुर्वीसारखी फडफड करत नसे.म्हणजे प्रेमाने जरी बोलत नसली तरी आता उठसुठ बोलणेही करत नव्हती.सकाळची न्याहारी पण मुक्ताच बनवे.झुणका भाकरं बनवुन झाली की मामी वावराला जायला निघे.
मामी मुक्तालाही घेऊन जायच्या विचारात होती इतक्यात मामांनी तिला जवळ बोलवुन घेतले.
"कुटं वावराला निघालीस का?"
मामांन हळुच विचारलं.तशी मामी पण टेचातच बोलली," हांऽऽ म्हंजीऽऽ…?आता रोजचचं हाय कीऽऽ..आज काय नविन हाय का माझ जाणंऽऽ…?"
त्यावर मामा हलकेच मुद्द्यावर येत म्हणाले,"तसं न्हायऽऽ.मला ठाऊक हाय तुज रोजचच परं म्या काय म्हनत होतोऽऽऽ…………"
मामांनी वाक्य पुर्ण न करता अर्ध्यावरच सोडलं.
तसे मामी परत बोलली,"आता बोला की चटाचटा.मला उशीर व्हायलाय जायला."
मामांनी आवंढा गिळत जरा शब्द जुळवत मामीला ईशाऱ्यातच आपल्या अधिक जवळ बोलवत म्हणाले,"अगंऽऽऽऽ….तुला आठवतेय का मागल्या साली त्या माईमावशीच्या यमीची गोष्ट…?"
मामी विचारात पडली.इथे जायला उशीर होऊन ऱ्हायला अन् बाबाला सक्काळच्या पारी गप्पा बऱ्या सुचुन ऱ्हायल्यात…
जराशी वैतागुनच मामी बोलली,"आता तिच काय मधेच???मला जायला उशीर व्हायलाय अन् तुम्हाला बऱ्या गमजा सुचुन ऱ्हाइल्या.."
"अगंऽ तसं नाहीऽऽ...ती यमी पण आपल्या मुक्ती एवढीच होती नाऽऽ...मागल्या साली कुणीतरी वावरातुन गायब करून दोन दिसानी ऊसाच्या फडात फेकलेलं आठवण हाय का न्हायऽऽ??"
मामानी कसबसा विषय पुढे सरकवला.
मामी अजुनही बुचकळ्यात पडलेली.विचार करतेय की त्या यमीचा काय संबंध आपल्याशी?
तेही आत्ता ह्यावेळी कामाच्या घाईत..?
तिने न समजुन पुन्हा विचारले,"हा ठाव हाय की पर आता त्याचा हिकडं काय संबंध..?मला जायला उशीर होऊन ऱ्हाइलाय अन् ह्ये काय भलतच बोलत बसलाय तुमी..?"
त्यावर मामा हळुच मामीच्या कानाशी बोलला,"अग् डोक्यात काय भुस्सा भरलाय का तुज्या..कळत कसं न्हाय..त वरून ताकभात…?"
मामी अजुनही प्रश्नार्थक नजरेने मामाकडे बघत होती..
मग मामानेच पुढे बोलुन तिच्या विचारांची कोंडी फोडली..
"अगंऽऽऽ ती यमी बी आपल्या मुक्तीच्याच वयाची न्हवती का..?कुणीतरी कशी नासवुन वावरात फेकुन गेले बिचारीला.तेव्हापासुन वेड्यागत पडुन असतीय घरात.त्या माईमावशीच्या डोळ्याच पानी अजुन सुकल न्हाय..म्हनुन म्या काय म्हनत होतो की विषाची परिक्षा कशाला पहा..?उद्या काही ऊच-नीच झाली तर जलमभर ओझं पोसत बसावं लागल, त्यापरीस माझ ऐक...मुक्तीला घरातली कामच करू दे.वावरात नगं नेऊस.कोण्या दुष्टाची नजर पडली तर उगीच होत्याचं नव्हत व्हायचं."
"आपल्या गरीबाला कोन वाली हाय सांग काही झालं तर..आन् ह्याच भीतीपोटी आपन तिची साळा सोडली मंग आता इथ राहुनही काही झालं तर कोन जबाबदारऽऽऽ…? "
मामानी आपल्या परिने विषय समजवण्याचा प्रयत्न करत मामीच्या उत्तराची वाट पहात बसला..तिच्या एकंदर मुद्रेवरून तरी वाटत होते की विषय तिला समजला पण जोपर्यंत ती तोंडानी बोलत नाही खात्री नव्हती.
मामाही पुढे जास्त न बोलता मौन राखुन तिच्या उत्तराची वाट पहात बसला..
मामीला तो विषय लक्षात आल्यावर मामाचा मुद्दा पटला.आणि तिचा मुख्य उद्देश मुक्ताची शाळा सोडवणे हा होता जो पुर्ण झाला होता.ती घरातली सगळी जवाबदारी निगुतीने पार पाडतानाही दिसत होती मग उगीच वावरात नेऊन नसती आफत कशाला मोल घ्या हा विचार करून तीने मामाला होकार भरला..,"बरोबर हाय तुमचं.माझ्या ही गोष्ट कशी टक्कुऱ्यात न्हाय आली..बरं झाल तुमी याद दिली..मुक्तीला घरीच ऱ्हाऊ दे.बरी मन लावुन काम करतीय पोरं.."
आज पहिल्यांदा मामीच्या तोंडुन मुक्ती विषयी समाधानाचे बोल ऐकुन मामाही चकीत झाला आणि मनोमन समाधानही पावला.
चला हिचे मन जिंकले म्हंजे मुक्तीला जरा तरी सवड मिळलं अभ्यास करायला."देवा तुझ लक्ष असु दे रे पोरीवर.."
मामाने मनातल्या मनात देवाकड प्रार्थना केली…
मुक्ता आतमधे काळजीत होती कारण सकाळी उठल्या उठल्याच मामीनं फर्मान सोडलं होतं,"लवकर लवकर कामं उरक वावरात जायचय आपल्याला आजपासुन."
ती आतल्या खोलीत बसुन वाट पहात होती कधी मामी आवाज देतीय जायला.
ती विचार करत होती इतक्यात मामीने आवाज दिलाच,"मुक्ते एऽऽ मुक्तेऽऽ...हिकडं येऽऽ…"
मुक्ता बारीक तोंड करतच बाहेर आली.मामाकडं बघितल तर मामाही मान खाली घालुन खाटेवर बसलेला.ती मामीसमोर मान खाली घालुन उभी होती.मामी काय सांगतेय ते ऐकायला तिने कान टवकारले.
तेवढ्यात मामी बोलली,"हे बघ मुक्तेऽऽऽ मी वावरात चाललेय तोवर तु घरची बाकीची समदी काम नीट करून ठेव.माजी पाठ फिरली की खाटेवर पाय पसरून पडलीस तर बगं उद्यापासुन वावरात नेईन कामाला..आळस करायचा न्हाई..राहील ना लक्षातऽऽऽ…?"
मामीने जोरातच विचारले.मुक्ताने खाल मानेनेच होकार भरला.
मनातुन आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.आता मामी गेली की ती लगेच सरांकडे शिकवणीला जाऊ शकत होती पण मामीचे मन परिवर्तन कसे झाले?हा चमत्कार कसा घडला.ती प्रश्नार्थक नजरेने मामाकडं बघु लागली तसं त्याच्या चेहऱ्यावरचे मिश्कील हास्यच तिला तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊन गेलं..
मनातल्या मनात गणोबाला थँक्यु म्हणत मामाला सांगुन ती पळतच गंधे सरांच्या घरी गेली.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नित्य नियमाने मुक्ताचा अभ्यास सुरू झाला.सरांकडे अभ्यास करूनही तिला वाटे की रात्रीतुन सगळी पुस्तके वाचुन लवकर लवकर अभ्यास शिकुन घ्यावा पण पुस्तक घरी न्यायची सोय नव्हती.तसे करून मामीच्या रागाला आमंत्रण द्यायचे नव्हते तिला.
परंतु पुस्तकांची जाडी बघता सगळे विषय शिकायला हा वेळ कमी आहे हे तिला जाणवत होते.काय करावे … तिच्या मनात विचार चाललेले.
विचारांच्या नादात ती घरी आली.भराभर मामी यायच्या आत घरातली बाकी कामे उरकुन रात्रीचा स्वैपाक पण करून ठेवला.सायंकाळ झाली तशी मामी घरी आली.मुक्ताने लगेच मामीला गरम चहाचा कप हाती दिला.मामी तर मुक्ताच्या ह्या सेवेमुळे भलतीच खुष झाली.मुक्ताने सगळे घर स्वच्छ सारवुन घेतले होते.गोठा स्वच्छ,आंगण पण झाडुन साफ केलेले.सगळे कपडे धुवुन वाळवुन जागच्या जागी गेलेले...मामी तर आता घरच्या कामातुन पुर्ण मुक्त झाली होती.वावरातुन थकुन आल्यावर तिला बिलकुल काम करावेसे वाटत नसे पण आधी तिला कामावाचुन पर्याय नसायचा.परंतु मुक्तामुळे आता ती घरच्या जवाबदारीतुन पुर्णपणे निश्चिंत झाली होती.
हळुहळू मुक्ताविषयीच्या द्वेषाची जागा कौतुकाने घ्यायला सुरवात केली होती.मामी बोलुन दाखवत नसली तरी पुर्वी इतका रागही मनात राहीला नव्हता हे तिच्या वागण्यातुन दिसत होते..
आज मामी जेवण उरकुन अंथरूणावर पडली तशी मुक्ताने तिचे हात पाय दाबायला सुरवात केली.मामी त्या स्पर्शाने ताडकन उठुन बसली.कोण हात-पाय दाबतेय आपले..?
मुक्तीला हातपाय दाबताना बघुन तिचे डोळे भरून आले.
ती काही न बोलता परत लवंडली.मुक्ताने छान तळपायला तेल गरम करून त्याचे मालिश करून दिले.हात पाय चेपुन दिल्याने मामीला कधी झोप लागली तेही कळले नाही.
मामीची इतकी सेवा मुक्ता का करत होती?
काय चालले होते मुक्ताच्या डोक्यात?
निश्चितच मामीचे मन जिंकुन घेण्यासाठी ती ही अतिरिक्त सेवा करत होती.
असेच रोज मामीची सेवा करत ती शाळेत वाचलेल्या कहाण्या वगैरे मामीला सांगे.तिच्या तोंडुन त्या कहाण्या एेकणे माेठे गोड वाटे मामीला.
मग एक दिवस बोलता बोलता मुक्ता मामीला म्हणाली, "मामी एक ईचारायच होतंऽऽऽ."
मामीने सावध पवित्रा उचलत म्हणाली,"ते साळा सिकायच सोडुन काय बी ईच्चारऽऽ…"
त्यावर मुक्ताने लगेच उत्तर दिले,"छ्याऽऽ...छ्याऽऽ! अजाबात न्हाय.आता मलाच साळा शिकायची न्हाय.तु जा म्हनली तरी बी मी जानार न्हाय...मी येगळच ईच्चारणार होते"
पोरगी साळा शिकायला न्हाय म्हणताच मामीचा जीव भांड्यात पडला तसे ती म्हणली,"हाऽऽ मग बोल काय ईच्चारयचय आता?"
त्यावर हलकेच मुक्ता मामीला म्हणाली,"त्याच काय ना मामी दिसभर मी एकटीच असते ना घरात.काम संपली की लई झोप येतीया.पण तुच बोललीस ना दूपारच निजायचं न्हाई मग ईचार आला सरांकडनं राम,कृष्ण,रामायण,
महाभारताच्या गोष्टींची पुस्तक आणु का वाचाया?"
"तेवढच मन रमल माझ देवधर्माच वाचुन.आन् रातच्याला मी तुला तिच कहाणी ऐकवत जाईन…? "
मामी विचारात पडली.देवाची बुक वाचाया न्हाय म्हणणं म्हंजे पाप लागतयं.वाचु दे की काय होतय नुसकान..?"
मनातल्या मनात जसा तिचा विचार पक्का झाला तसे ती लगेच बोलली,"देवाची बुक वाचायला माझी ना न्हाय पर कामं-धामं सोडुन त्यात तोंड घालुन न्हाय बसायचं नायतर त्यापेक्षा वावरात काम केलेल काय वाईट..चार पैसे तरी मिळतील.."
ते वाक्य ऐकुन मुक्ताही लगेच म्हणाली,"न्हाय न्हाय..काम झाल्यावर वेळ मिळाला तरच वाचत जाईन ते पण तु हो बोललीस तर..तु नग म्हनलीस तर न्हाय वाचनारऽऽऽ…"
पोरीचा समंजसपणा बघुन मामी पण विरघळली..,"बरं बरं ..वाचत जाय पर आता झोप..मलाही झोप याय लागलीय..झोपु दे,मला..जा तूऽऽ…."
मामी कडुन पुस्तक वाचायची शिताफीने परवानगी मिळवुन मुक्ताही आनंदीत होती.म्हणजे आता ती देवाच्या कहाणीच्या नावाखाली उरलेल्या वेळात घरीही अभ्यासाची पुस्तक वाचु शकणार होती.
सगळी गाडी हळुहळु मार्गावर आल्यासारखी वाटत होती.
केदार कदीमदी घरी यायचा पण जास्तकाळ घराबाहेरच असायचा…
असेच सहा महिने लोटले...अकरावीचा अभ्यास आता बऱ्यापैकी आटोक्यात आलेला होता.मुक्ताचा शिकण्याचा वेग इतका जास्त होता की सरांना कधीच शिकवलेले पुन्हा रिपीट करावे लागत नसे.
खर तर तिची बौद्धिक क्षमता बघता तिने विज्ञान शाखा घेऊन डॉक्टरच व्हायला पाहिजे होते परंतु बाहेर राहुन शिकण्यावर अाडकाठी आल्याने तिने कला शाखेचा पर्याय निवडावा लागला होता.असोऽऽऽऽ…
त्यातल्या त्यात सुखावह बाब हीच होती की ती निदान पुढे शिकण्याचे तिचे स्वप्न तरी पुरे करू शकत होती.
आता सहामाई परीक्षा होती. पण सरांनी तिचे पेपर्स इकडेच मागवुन सोडवुन घेतले परीक्षे प्रमाणे.
तिचे सर्व पेपर्स तालुक्याला कॉलेजला नेऊन पोहोचवले..
मुक्ताने अतिशय उत्तम पेपर्स सोडवले होते.सहामाही परीक्षेतही ती कॉलेजमधे दुसरी आली होती.घरी अभ्यास करूनही तिचे मिळवलेले हे यश खरच कौतुकास्पद होते….
~~~~~~~~~~~~~~~~~
दिवस महिने पुढे सरकत होते..मुक्ताही घरकाम संभाळुन रात्रीचा दिवस करून जीव तोडुन अभ्यास करत होती.
एक दिवस सकाळी सकाळीच दारात पोलीस आले.मामा-मामी आणि मुक्ता सगळेच घाबरून गेले.
त्यांनी मामाकडं येत केदार कुठेय म्हणुन त्याची चौकशी केली.घरात त्याचा पायच टिकत नसे तर काय सांगणार तो कुठेय? पण मामाने माहीत नाही म्हणताच त्यांनी मामालाच बखोटं धरून ओढल आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेले.मामी मुक्ता दोघी रडत रडतच मामामागे पोलीस ठाण्यात गेले.तिकडे पोलीसांनी मामालाच गजाआड टाकले.मामीने गयावया करून हातपाया पडुन समजावुन सांगितले पण ते काहीही ऐकुन घेण्याच्या मन:स्थितीतच नव्हते.
नेमके झालेय तरी काय??
का केदारच्या नावे अटक वॉरंट काढलेय? विचारल्यावर असे कळले की गैरमार्गाने अफीमचे सेवन करण्याच्या गुन्ह्याखाली घातलेल्या धाडीत केदारही सापडला होता पण तो पोलीसांच्या हातावर तूरी देऊन पळाला होता.त्यामुळे त्याच्यावर फरार गुन्हेगार म्हणुन अटक वॉरंट जारी झाले होते.
आता केदार सापडत नाही म्हणुन त्यांनी मामालाच जेरबंद करून ठेवले होते.
त्यांना असे वाटत होते की मामा पोराचा गुन्हा लपवुन मुद्दाम त्याचा ठावठिकाणा सांगत नाहीये.त्यामुळे संशयावरून मामाला ही अटक झाली होती.
पोलीस काही केल्या कुणाचेच ऐकायला तयार नव्हते.शेवटी हताश होऊन दोघी घरी आल्या.
दिवसभर गावातल्या सगळ्या प्रतिष्ठीत लोकांना मध्यस्थीसाठी मामी हातापाया पडुन आली पण पोलीसांच्या कामात कोणी हस्तक्षेप करायला तयार होईना.अखेरीस मुक्ता शेवटचा उपाय म्हणुन गंधे सरांकडे गेली.त्यांना सर्व हकिकत सांगितल्यावर ते घाईनेच मुक्तासोबत पोलीस स्टेशनात गेले.
हे गेले तर पोलीस मामाला बेदम मारून न केलेला गुन्हा त्याच्याकडुन वदवुन घ्यायला पहात होते.मामाच्या अंगावरचे ते वळ पाहुन मुक्ताच्या काळजाचा थरकाप उडाला.मामाचे तसेही वय झालेले.त्यात इतका मार त्याने कसा सहन केला असलं??
तिला खूप रडू येऊ लागलं.गंधे सरांनी ताबडतोब त्यांच्या एका विद्यार्थ्याचे नाव तिकडे सांगितले.तो पोलीस फोर्समधेच कुठल्यातरी मोठ्या हुद्द्यावर होता.ते नाव ऐकुन सगळेच चपापले.त्यांनी मामाला मारणे त्वरीत थांबवले.पण मामाला सोडत नाही म्हणाले.मग गंधे सरांनी आपल्या विद्यार्थ्याला डायरेक्ट फोन लावला.
तशी थोडी हालचाल झाली आणि रात्री उशीरा त्यांनी मामाला सोडले.
पण मामाची अवस्था बघवत नव्हती.सगळे अंग काळे निळे पडले होते मारामुळे.
अंगावरच्या दिसणाऱ्या जखमेपेक्षाही मनावर झालेल्या जखमेचे वण जास्त गहिरे होते.तेच दु:ख खात होते मामाला.न केलेल्या गुन्ह्यासाठी त्याला उगीचच शिक्षा मिळाली होती.त्याचा गुन्हा इतकाच होता की त्याने एका कुपुत्राला जन्म दिला होता.त्याच्यावर आई-बाप म्हणुन जे संस्कार करायला हवे होते त्यात बाप म्हणुन तो कुठेतरी कमी पडला होता.आज त्याचीच शिक्षा तो भोगत होता.
ह्या घटनेचा मामावर इतका परीणाम झाला की तो कुणाशीच बोलणे बंद झाला.त्याचे खाणे पिणेही बंद झाले.अति मारामुळे त्याला प्रचंड ताप भरला होता अंगात.
मुक्ता दिवसरात्र मामाच्या ऊशाशी बसुन सेवा करत होती.पण तो जणु माणसात उरलाच नव्हता.असेच आठ दिवस गेले.एके दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे रोजच्यावेळी मुक्ता मामाला उठवायला गेली तर तो उठेचना.तिने मामीला आवाज दिला.मामीनेही हलवुन पाहीले पण मामा उठेचनात.दोघीही घाबरून गेल्या.मामीला तिकडेच बसवुन मुक्ता धावत शासकीय रूगणालयात गेली.
एक डॉक्टर नाईट ड्युटी संपवुन नुकतेच घरी चालले होते.तिने कशीबशी विनंती करून त्यांना घरी येण्याची गळ घातली.अखेरीस मुक्ताच्या बोलण्याचा परिणाम म्हणा की त्यांच्या वाटेवरच मुक्ताचे घर होते म्हणा ते यायला तयार झाले.डॉक्टरांनी नाडी तपासुन लगेच सांगितले की त्यांचा मृत्यु झालाय.
मुक्ताला तर आभाळ कोसळल्यागत झाले.
आईनंतर तिच्यावर मनापासुन माया करणारं कोणी असल तर तो मामा होता.त्याच्या पाठिंब्यामुळेच ती आजही मामीला लपवुन पुढे शिकु शकत होती आणि देवाने आता तिच्यावर दुसरा घाला घातला होता…….
खरच जगात देव आहे का???
आणि असलाच तर तो गरीबाच्या/खऱ्याच्या पाठिशी खरच असतो का???
तिच्या मनात प्रश्नांच काहूर माजलं होतं.घरात ती अन् मामी शिवाय तिसर कोणी नव्हतं.मामीची तर शुद्धच हरपली होती मामा गेला कळल्यावर.आजुबाजुच्या आया बाया सगळ्या आधाराला जमल्या.बाप्या लोकांनीच मदतीचा हात देऊन सगळ्या अंतिम विधीची तयारी केली.
केदार मुलगा असुनही त्याच्या नशिबात वडिलांच्या देहाला मुखाग्नि देण्याचेही भाग्य नव्हते किंवा मग मामाला त्याच्या हातुन काहीच नको असेल म्हणुन तर असे घडले नसेल??
प्राक्तन म्हणतात ते हेच का??
मामानी काय पाप केले म्हणुन त्याला असा अपमृत्यु आला?
माझ्या नशिबाचे भोग अजुन संपले नाहीएत का??
म्हणुन तर देवाने माझा एकुलता एक मायेचा आधार काढुन नेला नसेल ना?????
मुक्ताच्या मनात नाना प्रश्न घोंघावत होते परंतु उत्तर मात्र कशाचेच नव्हते…
सगळ्याच 'का' ची उत्तरे कुठे असतात नाहीतरी???
बऱ्याचवेळा आपणच आपली समजुत घालुन प्रश्नांची ओझी मनावर टाकुन तसेच जगत राहतो निरूत्तरीत….उदिष्टहीन….दिशाहीन….!!!
-------------------(क्रमश:-7)-----------------------------------
क्रमश:-7
©®राधिका कुलकर्णी.
नमस्कार मंडळी………!
मामाच्या मृत्युमुळे मुक्ताच्या आयुष्याला कोणती कलाटणी मिळतेय???
काय घडणार पुढे?
मुक्ताच्या आयुष्याचा पुढील प्रवास कुठे जाऊन थांबणार हे जाणुन घ्यायचे असेल तर पुढचे भाग वाचायला विसरू नका…
लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासहीत कथा नक्की शेअर करू शकता.
धन्यवाद.
@राधिका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा