मी कात टाकली भाग - 6
©®राधिका कुलकर्णी.
तुळसा मामी घामाघुम होत गंधे मास्तरांच्या घरी पोहोचली.
सर खुर्चीत मामींची वाट पहात कसलेसे पुस्तक वाचत बसले होते.
मामी येऊन बसल्या तसे त्यांना पाणी बीणी देण्याचे सोपस्कार आटोपताच सरांनी अगदी सहज गप्पा माराव्यात तसा प्रश्न केला,"काय मुक्ताच्या मामी सगळे ठिक नाऽऽ?"
मामीला हा प्रश्न तसा अनपेक्षितच होता.एवढ्या लांबुन बोलावुन माझी ख्याली खुषाली विचारायला तर मास्तरांनी मला नक्कीच बोलावले नाही,मग मास्तरांना नेमके काय विचारायचे अासलं मला..?
मामी मनातल्या मनातच विचार करू लागली.
वरकरणी मात्र तसे काही न दाखवता म्हणाली,"हाय ..ठिकच म्हणायची आताऽऽ.."
आता मुक्ती चोवीसतास तोंड बुकात घालुन बसायची मंग घरचं अन् दारचं मलाच बघाया लागायचं नाऽऽऽ..पण आता बरं झालं.तिची साळा सपली एकदाची.आता तिला समदं घरकाम शिकवनार हाय म्याऽऽ..आता पोरीच्या जातीला काय करायचं बुकं वाचुन...कितीही शिकली तरी बाईच्या जातीला रांधा वाढा अन् उष्टी काढा चुकलयं का मास्तर मला सांगाऽऽ..??
अन् इतकं शिकुन तिला पोरगं कुठुन मिळणार लगीन कराया…??अन् कुनी भेटलच तर त्याच हाल त्या म्हनीगत व्हायच..
" गाडी वढु वढु बैल गेले थकुन..
अन् कुत्र म्हनतयं घ्या माझ्याकुन शिकुन…."
"म्हनुन म्या साफ बजावलय पोरीला.आता फक्त घरी राहुन समदी काम शिकुन घ्याची..बरोबर बोलले ना गुरूजी म्याऽऽ??"
अत्यंत हुशारीने मामीने आपल्या डोक्यातले विचार सरांनी पुढचा शिक्षणाचा विषय काढण्या आधीच सांगुन टाकले म्हणजे सरांनी त्याच्यापुढे जाऊन पुन्हा काही विचारणेच नको…
वर्गातले तऱ्हेतऱ्हेचे विद्यार्थी हाताळण्यात उभा जन्म गेलेल्या सरांना मामीची ही हुशारी न समजेल असे थोडीच होते.
स्वत:ला बारा गावचे पाणी पिल्यागत हुशार समजणाऱ्या मामीला सरही तितक्याच हुशारीने अत्यंत सहजपणे म्हणाले,"आता ह्यात मी काय बोलणार तुळसा मामी..हा तुमच्या घरचा मामला.तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा…"
सरांच्या ह्या वाक्यानी आश्चर्यचकित व्हायची पाळी मामीची होती.
मास्तर तर आपल्याला मुक्तीच्या शाळंविषयी काहीच बोललं नाही मग मला हिकड बोलावलयं तरी कशापायी..?"
मामीच्या मनात विचारांची गर्दी सुरू झाली.त्यांचा चिंताक्रांत चेहरा बघुन जास्त न ताणता सरांनीच बोलायला सुरवात केली,"तुळसामामी...माझे जरासे काम होते तुमच्याकडे….कराल का?"
भांबावलेल्या मामीचा चेहरा बघण्यालायक झाला होता हे ऐकुन जेव्हा सर म्हणाले की त्यांचे मामींकडे काम आहे..आता ह्या शिकल्या सवरलेल्या मास्तराचं माझ्यासारख्या अडाणी बाईकडं काय बर काम???
आपले विचार मनातच दाबत संभावितपणे मामी विचारत्या झाल्या,"तुमचं.!!अन् माझ्याकडं काऽऽऽम???ते काय बरं? ??"
त्यावर स्मित करत सर म्हणाले,"त्याचं काय आहे की माझी लेक सरोज तालुक्यात दिलीय माहितच आहे की तुम्हाला..तर तिच्या घरी कसली तरी पूजा ठेवलीय.तिने मुक्ताला मदतीकरता बोलावुन घेऊन या म्हणाली मला.आता तशीही मुक्ताची शाळा संपलीय तर ती रिकामीच आहे मग म्हणलं विचारून पहाव तुम्हाला.तुमची परवानगी असेल तर एक दोन दिवसात नेऊन आणुन सोडेल मी पुन्हा घरी."
आत्ता कुठ मामीच्या टक्कुऱ्यात प्रकाश पडला.इतक्यावेळ तिला उगाच वाटत होत की सर मुक्ताला पुुढं शिकु द्या म्हणुन गळ घालायलाच आपल्याला बोलावले पण आता हे तर वेगळच कारण हाय...काय करावं परवानगी द्यावी का?पन आशी निसतीच..बदल्यात काही मिळाया नगं का!!!!
तिला गहन विचारात बघुन सर लगेच पवित्रा बदलत म्हणाले,"तुळसामामी काही घाई नाही.तुम्ही घरी जाऊन विचार करून सांगा.
नसेल जमत तरी काही हरकत नाही.सरोजने मुद्दाम मुक्ताचे नाव काढले म्हणुन विचारले नाहीतर दुसरे बरेच लोक आहेत.माझ्या कामाला कोणी नाही म्हणणार नाही.कोणी ना कोणी मिळेलच.."
सरांचा बदलेला पवित्रा बघुन मामीला वाटले आता जास्त उशीर केला तर आपली संधी हातची जाईल.मुक्तीला कामाला पाठवायच्या बदल्यात काही किडुक मिडुक धान्य-पैका मिळत आसलं तर कशाला सोडाऽऽ…"
मामी लगेच घाईतच म्हणाल्या,"न्हायऽऽ तस न्हाई म्हणायच काय बी कारण न्हाई परं त्याच्या बदल्यात काही धानधुन मिळाल तरऽऽऽ…..!त्याच काय हाय मास्तर, आता मुक्ती घरी नसली म्हंजे समदी बाहेरची घरची काम मलेच बघाया लागतात.मग माझी मजुरी डुबती न्हवं तिकडची त्यामुळं ईच्चारलं…"
मामीनं चाचरतच आपला मनसुबा सांगितला.
मामींचा स्वभाव कसाय ह्याची पुरेपुर जाण असलेल्या गंधे सरांना ही मागणी अपेक्षितच होती.ते लगेच म्हणाले,"होऽऽ..होऽऽ.अहो सरूचे घर चांगले खानदानी आहे.ती नक्कीच काहीतरी दिल्याशिवाय रिकाम्या हाती पाठवणार नाही मुक्ताला..त्याची काळजी नका करू.त्याबाबतीत निश्चिंत रहा.फक्त तुमची परवानगी असेल तर मग मी गावचे टिकीट काढतो.
त्यावर खुष होऊन मामीने तालुक्याला जायची परवानगी देऊन मोकळ्या झाल्या.काही पायली धान्याच्या बदल्यात मुक्ताला तालुक्याला जायचा सौदा झाला.
इकडे मामीला आपल्या हुशारीवर स्वत:चेच कौतुक वाटत होते तर सरांना मुक्ताला कॉलेजला नेता येण्याची नेमकी कळ सापडल्याची खुषी होत होती.ही अशी कळ होती जी कधीही दाबली की मामींकडुन मुक्तासाठी बिनदिक्कत परवानगी मिळणार होती.
मुक्ताला जसे मामीकडुन कळले की सर तिला तालुक्याला कामासाठी नेणार आहेत तेव्हा तिलाही मामी इतक्या खुषीत कशी तयार झाली ह्याचे आश्चर्य वाटले पण तसे चेहऱ्यावर न दाखवता तीने मुकपणे मान हलवुन होकार दिला.
आता दोन दिवसांनी तिला तालुक्याला जायचे होते.तिच्याकडे घरातले दाेन परकर पोलके सोडता तिसरा कपडा नव्हता ठेवणीतला.काय करावे विचार करताच तिची नजर केदारच्या कपड्यांवर पडली.दरवर्षी शाळेतुन गरीब मुलांना मोफत गणवेश मिळत असे पण केदार शाळेतच जायचा नाही त्यामुळे त्याचे गणवेश जसेच्या तसे नविन कोरे करकरीत होते.आता तर ते त्याला लहान झाले म्हणुन मामींनी तसेच वेगळे ठेवुन दिले होते.मुक्ताने हळुच जाऊन त्यातला एक सदरा काढला.तिला तो व्यवस्थित बसत होता फक्त बाह्या उंचीला जास्त होत्या.मग तिने व्यवस्थित त्यांना एक इंच कापुन आपल्या मापात सुई दोऱ्याने शिवुन घेतल्या.त्यावर शाळेचा तिचा पेटीकोट स्वच्छ धुवुन वाळवुन घडी करून ऊशाखाली ठेवला.दोन दिवसात त्याला बरोबर छान इस्त्रीसारख्या घड्या पडल्या.तिला बाहेर जाण्यासाठीचा ड्रेस तयार झाला हे पाहुन तिची तिच आनंदुन गेली.
~~~~~~~~~~~~~~~~~
ठरल्याप्रमाणे सर आणि मुक्ता तालुक्याच्या गावी आले.अगोदर आपल्या मुलीकडे सरोज कडे जाऊन मग पुढे कॉलेजला जावे असा विचार करून सर मुक्ताला घेऊन सरोजच्या घरी आले.सरोजचे घर म्हणजे मोठा वाडाच होता.मुक्ता भिरभिरल्या नजरेने तिच्या वाड्याला बघत रीहीली.तिकडे दोन खाेलीच्या खोपटात आयुष्य गेलेली मुक्ता आज पहिल्यांदाच इतके मोठे घर आतुन पहात होती.ती वाड्याला आपल्या नजरेत सामावत असतानाच सरू समोर आली.बाबांना आलेल पाहुन ती आनंदीत झाली पण सोबत मुक्ताला बघुन जास्तच आश्चर्यचकीत झाली.तिने पाणी देतादेताच खुणेनेच प्रश्न केला.त्यावर सरही थांब सांगतो असे डोळ्यांनीच बोलले.मग मुक्ताला खायला द्यायच्या बहाण्याने आत पाठवुन सरोजने सरांना पुन्हा मुक्ताच्या येण्याचे कारण विचारले.
त्यावर सरांनी तिला तिची सगळी कर्मकहाणी इथ्यंभूत वर्णन करून सांगितली.सरोजला खूप कौतुक वाटले मुक्ताचे.एवढ्या हालाकीच्या परिस्थितीत आलेल्या संकटांवर मात करून किती मोठे यश मिळवले पोरीने.पण मामीला तिचे काहीच कसे कौतुक नाही..तिला खूप वाईट वाटले.
तिकडचा पाहुणचार उरकुन जरा फ्रेश होऊन दोघेही महाविद्यालयाकडे जायला निघाले.
कॉलेजच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचताच मुक्ताची पावले थबकली.त्या विशाल प्रवेशद्वाराकडे ती पहातच राहीली.त्यांच्या गावच्या वेसीची कमान तिला मोठी वाटायची पण ही कमान तर त्याहुनही भव्य होती.प्रवेशद्वाराच्या पुढे विस्तीर्ण मैदान आणि मैदानाला लागुन चहोबाजुंनी गोलाकारात स्थापलेली ईमारत.मधोमध मोठ्ठा पॅसेज.पॅसेज चढुन आत जाताच सर्वात अगोदर प्रिन्सिपल केबिन जिकडे दोघांनाही जायचे होते.आत्तापर्यंत शांत असलेल्या मुक्ताला तो विस्तीर्ण परिसर बघुन आधीच दडपण आलेले त्यात प्रिन्सिपल केबिन जसजशी जवळ येऊ लागली तिची धडधड अधिकच वाढली.
गावाबाहेर कधीही न गेलेल्या मुक्ताला इतक्या मोठ्या भव्य इमारतीला बघुनच दडपण आलेले.त्यात गंधे सरांनी तिला सांगीतले होते की प्रिन्सीपल सर तुझी छोटीशी मौखिक चाचणी घेतील तर न घाबरता तु व्यवस्थिच उत्तरे दे.आता हे नविन सर नेमके काय विचारतील?आपल्याला उत्तर देता नाही आले तर कॉलेजात दाखला मिळेल नाऽऽ..?मनात अनेक शंका आणि प्रश्नांनी गर्दी केली.
विचारांच्या तंद्रीतच ते प्रिन्सीपल केबीन समोर येऊन पोहोचले.
गंधे सरांनी तिला बाहेर बसायला सांगुन ते एकटेच आत गेले.प्रिन्सीपल गंधे सरांची वाटच पहात होते.
मित्रांच्या अनौपचारिक गप्पा उरकल्यावर मग गंधे सर मूळ मुद्द्यावर आले.आपल्या मित्राला मस्करीतच म्हणाले,"तुझ्या कॉलेजचे उज्वल भविष्य ह्या केबीन बाहेर वाट पहात बसलेय नंद्या."(नंद्या हे टोपण नाव...त्यांचे खरे नाव नंदकुमार टोपे.)
"तुला तिच्या हुशारीची काय परीक्षा घ्यायची ती घे.माझ्या शिस्तीत वाढलेली विद्यार्थिनी बघ तुझ्या प्रश्नांची कशी सुट्टी करते ते!!"
बोलता बोलताच प्रिन्सीपल सरांनी बेल वाजवुन केबीन बाहेरच्या चपराश्याला मुक्ताला आत पाठवायचा निर्देश केला.
ती भीतभीतच केबीनमधे गेली.
सरांनी हसतमुख प्रसन्न चेहऱ्याने तिला समोरच्या खुर्चीत बसायला सांगितले पण तीने उभे रहाणेच ठिक समजले.ती म्हणाली,"माझ्या आदरणीय गुरूजनांसमोर मी उभी रहाणेच ठिक आहे सर.." तिच्या ह्या वाक्यानेच टोपे सरांचे मन जिंकुन घेतले तिने.इथेच तिच्या व्यक्तित्वाची पहिली ओळख त्यांना पटली.
मग त्यांनी तिचे नाव,गाव,तिला दहावीत मिळालेले मार्क्स अशा प्रश्नांनी सुरवात केली.
तिने स्वच्छ आवाजात उत्तरे दिली.प्रिन्सीपल सरांची नजर बोलता बोलता त्यांच्या समोरच्या भिंतीवर पडली.तिकडे एक श्लोक संस्कृतात लिहीलेला होता.त्यांना काहीतरी सुचले.त्यांनी मुक्ताला विचारले,"मुक्ता बेटाऽऽ..तुझ्या पाठिमागे भिंतीवर एक श्लोक लिहीलेला दिसतोय.वाचुन सांग पाहु काय आहे?
'विद्या विनयेन शोभते।'
असा तो श्लोक होता.
मुक्ताने तो खड्या आवाजात वाचुन दाखवला.
मग प्रिन्सीपल सर म्हणाले, " ह्याचा अर्थ तुला माहितीय का?
त्यावर तीने होकारार्थी मान डोलावली.
सर म्हणाले व्हेरी गुड पण अशाच अर्थाचा एखादा श्लोक तुला येत असेल तर सांग पाहु..??
तिने जरावेळ आठवायचा प्रयत्न केला.स्वत:च्या मेंदुला ताण दिल्यावर तिला एक संस्कृत सुभाषित आठवले.ती लगेच म्हणाली,"सर,,एक सुभाषित आठवतेय सांगू का…?"
"यस शुअर..गो अहेडऽ..!"
प्रिन्सीपल बोलले..तसे मुक्ताने तो श्लोक खालीलप्रमाणे सांगितला.
"विद्यां ददाति विनयं विनयाद् याति पात्रताम्।
पात्रत्वात् धनमाप्नोति धनात् धर्म तत: सुखम्।।"
त्यावर प्रिन्सीपल सरांनी तिला त्याचा अर्थ विचारला.
मग तिने अर्थ सांगायला सुरवात केली….
"सर ह्याचा अर्थ असा " -
विद्याम ददाति विनयाम् विनयाद् याति पात्रताम् म्हणजे
विद्या म्हणजेच ज्ञानामुळे विनयता प्राप्त होते.विनय आपल्याला योग्यता प्रदान करते.
पात्रत्वात् धनमाप्नाेति म्हणजे
योग्यता मनुष्याला अर्थप्राप्ती करून देते.
आणि धनात् धर्म तत: सुखम्।।
ह्याचा अर्थ
धनाच्या येण्याने मनुष्य धर्माची दानपुण्याची कामे करून सुखप्राप्ती करून घेतो.
"अरे वाह्ऽऽ.!!तुझा संस्कृत विषयाचा अभ्यास बराच लक्षात आहे की..खूप छान!!!"
प्रिन्सीपल सरांनी मनापासुन कौतुक केले तिचे.
त्यावर ती म्हणाली,"सर हा आमच्या अभ्यासक्रमातला श्लोक नाहीये."
"आमच्या दळवी बाई संस्कृतच्या वर्गात रोज एक संस्कृत श्लोक तास सुरू करायच्या अगोदर फळ्यावर लिहायच्या आणि तास संपताना त्याचा अर्थ सांगायच्या.मी ते सगळे श्लोक वहीत लिहुन त्याखाली त्याचा बाईंनी सांगितलेला अर्थ लिहुन ठेवायचे.आणि मग ती सवयच लागली संग्रहाची.
रोज ते वाचुन मी पाठ करायचे.त्यामुळे लक्षात आहे सर…"
प्रिन्सीपल सरांना मित्राचे वाक्य तंतोतंत आठवले.कॉलेजची भावी स्कॉलर विद्यार्थीनी त्यांना खरच डोळ्यापुढे दिसत होती.
तिची वेगळी कुठलीच ओळख आता गरजेची नव्हती.बाकीचे जुजबी प्रश्न विचारून तिची चाचणी संपली तसे ती पुन्हा केबीन बाहेर गंधे सरांची वाट पहात बाकावर बसली.
भारावलेल्या स्वरातच प्रिन्सीपल टोपे सर गंधे सरांना उद्देशुन म्हणाले, "मित्रा गजाऽऽ आजपासुन मुक्ता माझी मानसकन्या झाली.
तिच्या शिक्षणाचा सगळा खर्च मी करणार.ह्यापुढे तुला मुक्ताची काळजी करायची मुळीच गरज नाही.."
प्रिन्सीपल टोपेंना मुक्ताच्या जागी तीस/चाळीस वर्षापुर्वीचे ते स्वत: दिसत होते.त्यांनीही अशाच हालाखीच्या परिस्थितीतुन मार्ग काढत केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्वत:चे शिक्षण नादारीवर पुर्ण केले होते.
त्यावेळी त्यांनाही अशाच एका गुरूंनी मदत केली होती.आज त्याची परतफेड करण्याची संधी त्यांना मुक्ताच्या रूपाने चालुन आली होती.त्यांचे मन गतस्मृतींनी भावुक झाले अचानक.
गंधे सरांनी हलकेच मित्राचा हात दाबुन स्पर्शातुनच आधार दिला.
आता मित्रानेच मुक्ताची सगळी जवाबदारी उचलल्यावर त्यांची पुढची सर्व चिंता मिटली होती.
कॉलेजमधले काम उरकले तसे दोघेही पुन्हा सरोजकडे आले.सरोजने बाबा आले म्हणुन छान गोडाधोडाचा स्वैपाक केला होता.तिने मुक्तालाही प्रेमाने पाटावर बसवुन जेवायला वाढले.
पंचपक्वान्नांनी भरलेले ते ताट बघुन तिच्या डोळ्यात आश्रु आले.कित्येक दिवसात तिने दोन वेळचे पुर्ण जेवण बघितले देखील नव्हते.जेवणे तर खूप दूरची गोष्ट..सकाळी मिळाले तर रात्री नाही अशी गत.
कितीतरी वेळा तर नुसते पाणी पिऊनच आपली भूक मारत ती झोपली होती.त्यामुळे आज ते भरलेले ताटही तिला एका स्वप्नागत वाटत होते.तिने अजुन जेवायला सुरवात केली नाही हे पाहुन सरोजच तिला म्हणाली,"मुक्ता जेवायला सुरवात कर ..सांग बर स्वैपाक जमलाय का तुझ्या ताईला…?"
तिच्या ह्या विनोदावर कसनुसं हसतच मुक्ताने जेवायला सुरवात केली.
तिचे जेवण होईपर्यंत सरांनी आपले जेवण उरकले आणि सरोजला कोपऱ्यात बोलवुन सांगितले,"सरू बाळऽऽ तुझे जुने काही कपडे असतील तर दे मुक्ताला.आणि थोड गोड पण बांधुन दे.तिच्या मामीला मी सांगुन आलोय की तुझ्याकडे मदतीला घेऊन चाललोय.तिला माहित नाही मुक्ता पुढे शिकणार ते.आज ही थाप मारून घेऊन आलोय..त्यावर बरं बाबा म्हणत सरोजने लगेच आपले जुने लग्नाआधी शिवलेले पण आता येत नसल्याने बाजुला ठेवलेले पंजाबी ड्रेस,तिच्या सासुचे एक दोन जुने झालेले पण धड नववारी लुगडे,थोडी ज्वारी,आणि जेवणातले सगळे पदार्थ बांधुन दिले.
सरांनी ते गाठोडे उचलले आणि लगेच परतीच्या गाडीत बसले.
तासा दोन तासातच ते आपल्या गावी पोहोचले.
गाडीतुन उतरून तडक मुक्ताच्या घरी गेले सर.
मुक्ताची मामी वाटच पहात होती.मुक्ताला रीकाम्या हाती बघुन आधी तर तिच डोकच ठणकलं पण मनावर संयम ठेवुन ती मुक्ता घराजवळ यायची वाट पाहु लागली.मुक्ता घराजवळ आली तसे सरांनी आपल्या हातातले गाठोडे आणि पन्नास रूपयाची नोट मामींना देत सांगितले,"हे सरोजनी दिलेय तुमच्याकरता.बघुन घ्या.येतो मी."
मास्तरांची पाठ फिरताच मामीने पैसे अगोदर कनवटीला लावले मग आधाशासारखे गाठोडे उघडुन पाहीले.
त्यात मुक्तासाठीचे कपडे तिने बाजुला फेकले. त्याखाली छान जरीटोपाची दोन लुगडी बघुन तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. कितीवेळ तरी ती त्या लुगड्याची घडी गालाला लावुन त्याचा मऊ स्पर्श अनुभवत राहीली.मग लुगडी बाजुला ठेवुन गोठोड्यातले दुसरे छोटे गाठोडे उघडुन बघितले तर त्यात जोंधळेही दिले होते.
खायच्या पदार्थांच्या खमंग वासाने तिची भूक चाळवली.लगेच गुपचूप तिने सगळे थोडे थोडे चाखून पाहिले.इतके रूचकर स्वादिष्ट जेवण तिने किती दिवसात चाखले नव्हते.कुणाचाही विचार न करता तिने थोडी भाकरी कालवण नवऱ्याला बाजुला काढुन बाकी सगळे एकटीनेच संपवुन टाकले.जिच्यामुळे ते मिळाले तिचा विचारही तिच्या मनाला शिवला नाही.
मुक्ताने हा सगळा प्रकार बघुनही काही न बोलताच अंथरूणाला पाठ लावली.भूक तहान ह्या भौतिक सुखाच्याही पलिकडचे सुख आज ती आपल्या स्वत:च्या डोळ्याने पाहुन नजरेत साठवुन आली होती.त्यानेच ती इतकी हरखून गेली होती की आज तिचे पोट आपली नविन शाळा,तिथले मास्तर,त्यांनी केलेल्या कौतुकानेच भरून गेले होते.
कितीतरी दिवसांनी आज मुक्ता समाधानाची झोप घेणार होती……….
तिच्या डोक्यात आज सुधीर फडकेंच्या ह्या गीतांच्या आेळी सतत कानात कीणकीणत होत्या..
घर कसले ही तर कारा,
विषसमान मोती चारा।
मोहाचे बंधन द्वारा,
तुज आडवितो हा जैसा उंबरा...।
सोडी सोन्याचा पिंजरा…
सोडी सोन्याचा पिंजरा….
आकाशी झेप घे रे पाखराऽऽ।
सोडी सोन्याचा पिंजरा।।
तुज पंख दिले देवाने,
कर विहार सामर्थ्याने।
दरी डोंगर हिरवी राने,
जा ओलांडूनी या सरीता सागरा।।
सोडी सोन्याचा पिंजरा……
तिचा पिंजरा सोन्याचा नसला तरी ह्या
कारागृहाला ओलांडून आकाशात उंच भरारी घ्यायचा ध्यास मात्र तिला लागला होता.त्या दिशेने झेप घेण्यासाठी आज अजुन एक पाऊल तिने पूढे टाकले होते……!!
------------------(क्रमश:-6)-------------------------------
क्रमश:-6
©®राधिका कुलकर्णी.
नमस्कार मंडळी……….!
मुक्ताने एक टप्पा तर पार केला.तिच्यातील शिक्षणाविषयीची अतीव ओढ,ध्यास तिला पुढच्या पायरी पर्यंत घेऊन तर गेला पण खरच तिचे नशिब तिच्यावर इतकेच मेहेरबान राहील की पुन्हा एखादे नविन संकट तिच्या मार्गात अडथळा बनेल????जाणुन घ्यायला पुढचा भाग जरूर वाचा.
माझी कथा आवडत असेल तर कमेंटमधे जरूर सांगा.
लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासहात कथा नक्की शेअर करू शकता..
धन्यवाद.
@राधिका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा