Login

मी कात टाकली भाग -5

ध्यासवेड्या मुक्ताची प्रेरणादायी कथा..

मी कात टाकली भाग -5 

©®राधिका कुलकर्णी.

मुक्ता चातकासारखी मुख्याध्यापक गंधे सर तालुक्याहुन कधी परत येतात ह्याची वाट पहात होती.तीन दिवसां नंतर गुरूजी गावी परतले.दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सरांचा माणुस मुक्ताच्या मामाला मुक्तासहीत बोलावू आला.

गंधे सरांचा निरोप आला तसे दोघेही लगबगीनेच सरांच्या घरी पोहोचले.

सरही त्यांचीच वाट पहात होते.

दोघेही येऊन बसले तसे सरांनी थोडा पॉज घेऊन मनात मामांशी कसे बोलायचे ह्याची जुळवाजुळव करून मग घसा खाकरून बोलायला सुरवात केली..

"काय मग मामाऽऽ,काय ठरवलेय मुक्ताबद्दल पुढे??"

मामांच्या मनात काय चाललेय ह्याचा थोडा अंदाज घेण्या हेतुने त्यांनी मामांना प्रश्न केला.

मामाला काय बोलावे हेच सुचेना.मुलीच्या शिक्षणाच्या तो विरोधात नसला तरी बायकोने सांगितलेले संभाव्य धोके आणि पैशांच्या खर्चाचा मेळ ह्या दोनही गोष्टींची सांगड घालणे त्याच्यासाठी दुरापास्तच होते.

सरांनी त्याला चांगलेच कोंडीत पकडले होते.काय उत्तर द्यावे ह्याचा विचार करत होता तो.

त्याने साधलेली चुप्पी पाहुन सरांनी तोच प्रश्न पुन्हा विचारला..,"मामाऽऽ मी काय बोलतोय तुमचे लक्ष कुठेयऽऽऽ…??

काय ठरवलेय मुक्ता बाबतीत पुढे??"

आता मामाला काहीतरी तर बोलणे भागच होते.

मामा बोलु लागला, "आम्ही गरीब मानसंऽऽऽ,

आम्ही काय ठरवणार मास्तरऽऽ…!!"

"इकडे दोन वेळची हाता तोंडाची हातमिळवणी करता करता नाकीनऊ येतात तिथ पुढचा काय विचार करणार??"

"हिथल्या शाळेत फुकट शिक्षण होतं म्हणुन इतकं तरी शिकवु शकलो.पण पुढचा तालुक्याचा खर्च न्हाई झेपायचा हो आम्हास्नी..."

"बायकोचाबी बाहेर राहुन शिकायला सपशेल विरोध हाय.हेच इतक कसंबसं तिच मन राखून पोरीची हौस भागवली.पण आता पुढचं लई अवघड वाटतयं मास्तर आम्हाला…"

आपल्या मनातली उलघाल एका दमात मामांनी मुख्याध्यापक सरांजवळ बोलुन दाखवली.

मामाचा एक एक शब्द मुक्ताला कोणीतरी कानात तप्त शीशाचा रस ओतल्यागत वाटत होता.डोळ्याच्या कडा कधीच्या पाझरायला लागल्या होत्या.पैशाचा खर्च परवडणार नाही म्हणल्यावर तर तिचे होते नव्हते तेही अवसान गळाले.आता आपली मदत कोण करणार हाच प्रश्न तिला सतावु लागला.इथे सख्खेच आपला विचार करेना झालेत तर परके कोण कशाला आपली मदत करतील???

मुक्ताच्या इवल्याशा मेंदुत असंख्य प्रश्नांची लडी दिवाळीतल्या फटाक्यागत फुटत होती आणि त्यात आपल्या सगळ्या स्वप्नांची पार राख होतानाचे चित्र तिला स्वच्छ दिसत होते.असहाय्यपणे मान खाली घालुन मामांचे बोलणे ती मुकपणे ऐकत होती.

मांमाचे बोलणे संपले तसे मुख्याध्यापक सरांनी एक प्रश्न मामांना केला,"जर तुमची पैशांची अडचण दूर झाली तर!!!"

"पाच पैसेही खर्च न करता मुक्ता पुढे शिकु शकणार असेल तर तुमची काही हरकत असेल का???"

सरांच्या ह्या अनपेक्षित प्रश्नाने मामा आणि मुक्ता खजिल झाले.एकाचवेळी  दोघांनी चमकुन सरांकडे पाहिले.

मुक्ताच्या चेहऱ्यावर एकाचवेळी आनंद आणि आश्चर्याची लहर दौडली.पण मामा मात्र अजुनही संभ्रमीत होता.सरांच्या ह्या प्रश्नावर काय उत्तर द्यावे हे त्याला अजुनही समजत नव्हते कारण पैशांची अडचण सुटली तरी बायकोची कालची वाक्य अजुनही त्याच्या कानात गुंजत होती.कुठल्याही परिस्थितीत ती काही मुक्ताला बाहेर राहुन शिकायला तयार होणार नाही.आणि ह्या बाबतीत तिची समजुत घालायचे धारिष्ट काही मामामधे नव्हते.ह्याच सगळ्या विचारांनी त्याची बोलती बंद झाली होती.

मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव करत मामा बोलले,"पैशाची अडचण सुटली तरी माझ्या बायकोची पोरीला बाहेर शिकायला ठेवायची तयारी नाही.ह्यावेळी तिला समजावणं माझ्याही ताकदीबाहेरचं आहे मास्तर.."

दोन मिनिट पुर्ण शांतता झाली.काही क्षणांपूर्वी  पल्लवीत झालेल्या मुक्ताच्या आशेवर मामाच्या एका वाक्याने पुन्हा पाणी फेरलं.मामीचा एकंदर स्वभाव बघता मामा जे बोलला ह्यात किती तथ्य आहे ह्याची मुक्ताला पुरेपूर कल्पना होती.त्यामुळे ती पुन्हा हिरमुसली.आहे त्या परिस्थितीला शरण जाण्यापलिकडे तिला कुठलाच मार्ग दिसत नव्हता.

त्या शांततेचा भंग करत सर म्हणाले,"हे बघा मामाऽऽऽ,आता मी काय बोलतोय ते नीट शांततेने ऐकुन घ्या."

मुक्ता कान टवकारून सरांचे बोलणे ऐकु लागली.

"त्याचे काय आहे मामाऽ की आपली मुक्ता हुशार मुलगी आहे.तिला असे तिच्या इच्छेविरूद्ध शिक्षण सोडुन घरात बसवणे बरोबर नाही.हांऽ आता अभ्यासात तिला गती नसती तर मीच असा सल्ला दिला नसता पण पोरगी हुशार आहे.घरातली सर्व जवाबदारी पार पाडुन तिने दहावीचे इतके उत्तम यश कमावलेय त्याला असे वाया जाऊ द्यायचे का?तुमची पोटची पोरं असती तरी तुम्ही असाच विचार केला असतात का मामाऽऽ..सांगा मला???"

सरांच्या ह्या वाक्यावर मामाच्या डोळ्यातुन पस्ताव्याचे अश्रु ओघळु लागले.कितीही लेक मानली तरी वेळ आली की मीही परकेपणानेच विचार केला.खरच माझी लेक असती तर मी असा विचार केला असता का???"त्याच्या मनाला त्याने पुन्हा तोच प्रश्न केला.अंतर्मनाने दिलेले उत्तर ऐकुन त्याची त्यालाच लाज वाटली.हे सगळे मानसिक द्वंद्व जरी खरे असले तरी मुळातच मुक्ताविषयी माया नसणाऱ्या आपल्या बायकोला ही जर-तरची भाषा कशी समजावणार हाच प्रश्न मामाच्या मनाला खात होता..

तिकडे सर पुढे बाेलु लागले,"हे बघा मामाऽऽ मी कालच तालुक्याच्या गावी जाऊन आलो.तिकडे माझ्या एका मित्राच्याच कॉलेजात मी चौकशी करून आलो.मुक्ताची अडचण त्याला समजावुन सांगितली.

त्यावर त्याने दोन उपाय सांगितलेत.ते मी तुम्हाला सांगतो.मग आपण चर्चा करून ठरवु त्यातला योग्य मार्ग…"

सरांच्या बोलण्यावर मामांनी होकारार्थी मान डोलावली तसे सरांनी पुढे बोलायला सुरवात केली.

"आपल्याकडे दोन पर्याय आहेत.पहिला पर्याय म्हणजे मुक्ताने डायरेक्ट बारावीकरता बाहेरून परीक्षेचा 17 नंबर फॉर्म भरायचा आणि मग सगळा अभ्यास घरीच करून फक्त परीक्षा द्यायला तालुक्याच्या शाळेत जायचं.

आणि दुसरा पर्याय.तो मित्र माझ्या ओळखीचा असल्याने मुक्ताची त्याच्याच महाविद्यालयात अॅडमिशन घ्यायची अाणि तिने वर्षभर घरीच अभ्यास करून फक्त परीक्षेच्या वेळी तालुक्याला जाऊन परीक्षा द्यायची.

तिचा अभ्यास,तिला लागणारी पुस्तके हे सगळ मी बघेन.त्याचा खर्चही तुम्हाला पडणार नाही.

तुम्ही फक्त इतकंच करायचं की मुक्ताला परीक्षेला जायच्या वेळी कसेही करून तालुक्याला जायला परवानगी काढायची मामींची.

किंवा मग त्यांना ह्यातले काहीच सांगायचे नाही.

परीक्षेच्यावेळी काहीतरी कारण सांगुन मुक्ताला तालुक्याला जायची युक्ती तुम्ही लढवायची.आता ह्यातला कोणता मार्ग तुम्हाला योग्य वाटतो ते सांगा??

मुक्ताचे डोळे पुन्हा आनंदाने चमकले.तिला तर दोन्हीही मार्ग बरेच वाटत होते.पण डायरेक्ट बारावीचा अभ्यास घरी राहुन करणे हे जरा अवघड होते.काय उत्तर द्यावे ह्यावर ती विचार करत होती. 

मामाला तर त्यातले काहीच समजले नाही.मग तो बोलला," आता ह्यात म्या काय बोलणार..मला त्यातलं काय बी उमगत न्हाय.तुम्ही जाणते सवरते आहात,तुम्हीच मुक्तीला विचारून ठरवा योग्य काय ते."

"फक्त एक गोष्ट हाय..माझ्या बायकोला ह्यातले काही कळता उपयोगी न्हाई,नायतर ती मुद्दाम मुक्ताला कामातुन सवडच द्यायची नाही अभ्यास करायला."

मग सरांनी मुक्ताशी बोलुन पर्याय क्रमांक दोनवर शिक्कामोर्तब केले.

सर बोलले,"आपण असं करू.तिची कॉलेजला अॅडमिशन घेऊन टाकु.हुशार परंतु गरीब विद्यार्थ्यांसाठी नादारीची सोय असते त्याचा फॉर्म भरून टाकु म्हणजे तिच्या कॉलेजच्या फीची पण चिंता नाही.

तिची सगळी पुस्तक वह्या मी घेऊन येईन तालुक्याहुन.पण मुक्ताबाई रोज तीन तास अभ्यासासाठी माझ्या घरी यावे लागेल न चुकता..जमेल नाऽऽऽ…!!

कॉलेजमधे सगळ्या विषयाला वेगवेगळे मास्तर असतात पण इकडे मी एकटाच सगळे शिकवणार मग रोज यावे लागेल तरच अभ्यास वेळेत पुर्ण होईल.मामीला न कळु देता हे करणे जमेल नाऽऽऽऽ…?"

सरांच्या प्रश्नावर मुक्ता लगेच म्हणाली सर ती चिंता तुम्ही करू नका.मी बराेबर वेळ काढेल अभ्यासासाठी.तिच्या चेहऱ्यावर आपल्याला पुढे शिकायला मिळणार ह्याचा आनंद ओसंडुन वहात होता.तिचा आनंद बघुन मामाही खुष झाला.लेकराकरता फूल ना फुलाची पाकळी काकणभर का होईना आपला हातभार लागतोय ह्या कल्पनेनेच तो सुखावला.मगाशी सरांनी विचारलेल्या प्रश्नामुळे लागलेली बोच थोड्याफार प्रमाणात का होईना कमी झाली होती आता.दोघेही सगळे ठरवुन आनंदातच सरांच्या घरातुन बाहेर पडले.चेहऱ्यावरचा आनंद लपवुन काही न घडल्यागत घरी मामीसमोर वावरणे हे मोठे दिव्यच होते पण त्यांना हे नाटक वठवावेच लागणार होते.

आज मुक्ता समाधानाने झोपणार होती.निदान घरी राहुनही तिचा शिकण्याचा ध्यास ती आता पुर्ण करू शकणार होती ह्याहुन आनंदाची बाब आजतरी तिच्यासाठी कुठलीच नव्हती.

       ~~~~~~~~~~~~~~~~~

ठरल्याप्रमाणे लवकरच अॅडमिशन प्रक्रीया पुर्ण झाली.सगळा खटाटोप मुख्याध्यापक गंधे सरांनीच केला मुक्ताकरता.

पण तिचे ओळखपत्र बनवण्याकरता तिला एकदा तालुक्याच्या कॉलेजला यावे लागेल असे गंधे सराच्या मित्राने म्हणजेच कॉलेजच्या प्रिन्सिपल सरांनी सांगितले.म्हणजे अजुन महिन्याचा अवकाश होता पण तरीही त्यांनी अगोदरच कल्पना देऊन ठेवली.ते एेकताच मामा आणि मुक्ताला काळजी पडली की मामीला काय कारण सांगुन तालुक्याला जावे???

प्रश्न बिकट होता.पण आत्तापर्यंत जशा समस्या आल्या तसे त्यावर मार्गही सापडलेच नाऽऽ,ह्यावेळीही निघेलच मार्ग.गणोबो संकट देतो तसे त्यातुन मार्गही तोच दाखवतो मग कशाला चिंता करायची..ह्यावेळी मुक्ता खूप स्थिर बुद्धीने विचार करत होती.

महिना होत आला तसे एक दिवस गंधे मास्तरांनी पुन्हा मुक्ता आणि मामाला घरी बोलावले.

दोघेही घरी गेले तसे गंधे सरांनी दोघांना एकच सांगितले.

"आज मी मुक्ताच्या मामीला बोलावुन घेणार आहे बोलण्यासाठी…"

त्यावर मुक्ता कळवळुन गयावया करत सरांना म्हणाली,"गुरूजी प्लिज तुम्ही मामीला ह्यातले काही सांगु नका..ती मला पुढे शिकायला कधीच परवानगी नाही द्यायची.गुरूजी एवढी विनंती ऐका बाकी मी तुम्ही म्हणाल ते एैकेन तुमचे.."

त्यावर चेहऱ्यावर स्मित आणुन ते म्हणाले,"काळजी करू नका मुक्ताबाईऽऽ...सगळे ठिक होईल.फक्त घरी गेल्यावर एक करायचे.तुमच्या मामींनी मी का बोलावलेय विचारले तर माहीत नाही इतकेच सांगायचे..जमेल ना???"

दोघांनीही माना डोलावल्या आणि ते घराकडे निघाले.

मामीला खरचच सरांचा माणुस निरोप घेऊन बोलावु आला.मामीला अगोदर कळेचना खरच सरांनी आपल्यालाच बोलावलेय ना???

पण दुसऱ्याच क्षणी तिच्या डोक्यात ट्युब पेटली.नक्कीच मुक्तानं चहाडी केली असणार मी शिकायला न्हाई म्हणते अशी,म्हणुन माझे मन वळवायला बोलावले असेल मास्तरांनी.

ठिक आहे.सांगावा आलाय तर बघुन तर येऊ काय म्हणत्यात मुक्तीचे मास्तर…

तसे गंधे सरांना सगळा गाव आदराने पाही त्यामुळे त्यांचा निरोप धुडकवण्याची प्राज्ञा कुणातच नसे तशी मामालाही ती नव्हती.

बळजबरी का होईना ती सरांच्या घरी जायला निघाली.जाताजाताच सरांना काय काय बोलायचे ह्याचीही तिने मनातल्या मनात उजळणी केली.

-----------------------(क्रमश:-5)--------------------------------

क्रमश:-5

©®राधिका कुलकर्णी.

नमस्कार मंडळी…..!!!

ध्यासवेड्या मुक्ताला तिच्या शिक्षणाची वाट आज मोकळी झाली.पण खरच तिच्या शिक्षणाची वाट इतकी सुकर असेल???की अजुनही काही संकटे तिच्या मार्गात येणार आहेत???

हे सगळे जाणुन घ्यायचे असेल तर पुढचा भाग नक्की वाचा..

आजचा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा.

लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासहीत ही कथा नक्की शेअर करू शकता.

धन्यवाद.

@राधिका.

🎭 Series Post

View all