Login

मी कात टाकली भाग -3

मुक्ताच्या आयुष्यातील संघर्षाची रोमहर्षक कहाणी.

मी कात टाकली भाग -3 

©®राधिका कुलकर्णी.

आजकाल मामीलाही जाणवत होतं की मुक्ताच काहीतरी बिघडलयं. तीचं कामात मन नसायचं.कुठेतरी विचार करत बसलेली उदास चेहऱ्याने बघत रहायची.कोणी समोर आलं की दचकायची.काय झालं विचारले की घुम्यासारखी मान हलवायची फक्त.

मामी घरकाम मुक्तावर टाकुन वावरात कामाला जायची.एरवीच्या दिवशी काही वाटायचे नाही पण ज्या दिवशी शाळेला सुट्टी असेल त्या दिवशी तिला घरात एकट्याला थांबायची भीती वाटायची.मामीला वावरात जाऊ  नको म्हणायची सोय नाही आणि तिच्याबरोबर वावरात येते म्हणायचीही अडचण.मग घरचे काम कोण करणार?आणि वर मामीला तर आयतीच संधी मिळेल माझी शाळा सोडायची...नाही ऽऽऽनाहीऽऽ.शाळा तर सुटली नाही पाहिजे पण मग घरात एकटी असताना केदार घरी आला तरऽऽ…….!!!

विचारांनीच कापरं भरलं तिला.

मुक्ता वयात आली तशी आंगोपांगी तिच्या स्त्रीत्वाच्या खूणा ठसठशीत उठुन दिसायला लागल्या होत्या.

कोवळी निरागस मुक्ता यौंवनाच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताना अधिकच निखरत होती.

तिचा काळा सावळा रंग,टपोरे बोलके डोळे लांबसडक काळेभोर केस आणि अंगात रूतणारी तिची काचोळी…

कुणालाही वेड लागेल असेच तिचे रूपडे.

लहानपणचा कोवळेपणा जाऊन केदारही आता पुर्ण पुरूषात परिवर्तित झालेला.अंगाबांध्याने हट्टाकट्टा दिसायलाही बराच होता…

पण वाईट संगतीत नको-नको त्या गोष्टी बघुन आधीच भ्रष्ट झालेली त्याची नजर मुक्ताच्या मोहरून आलेल्या कायेवर न पडली तरच नवल होते.

त्याची आशाळभूत वखवखलेली नजर जेव्हा तिच्या शरीरावरून फिरायची तेव्हा अंगावर 

हजारो साप लोटताहेत असे वाटायचे तिला...

कपडे असुनही त्याची नजर आरपार भेदून तिला अनावृत्त करतेय की काय असे वाटायचे….

त्या भेदक नजरेची शिसारी यायची तिला.

तरूण वयात वाया गेलेला केदार संधी मिळताच तिला एकट्यात गाठायचा प्रयत्न करू लागायचा.कधी तिच्याशी लाळघोटेपणा करायचा तर कधी सलगी करायचा प्रयत्न करायचा.

कधी मागच्या अंगणात कपडे धुवायला गेली की तिच्या ओणव्या छातीकडे नजर रोखुन बघायचा.

तिला मेल्याहुन मेल्यागत होई.ती तिकडुन जायला निघाली की उगीचच हात धरणार असे त्याचे चाळे दिवसेंदिवस वाढतच चालले होते.पण तक्रार करायची सोय नव्हती.

मामाला सांगितले गुपचूप आणि नंतर मामाने काही गोंधळ केला तर मामीला कळणार.

न जाणो तिने माझ्याच चारित्र्यावर संशय घेऊन पोराला पाठीशी घातले तर…???

माझा जगातला एकमेव आधार म्हणजे हे डोक्यावरचे छप्पर पण जाईल…..ह्या भितीने ती केदारबद्दल कुणाला काही बोलुही शकत नव्हती.

काय करावे तिला काहीच सुचत नव्हते.घरातही शक्यतो ती मामीच्या आसपासच घोटाळत काम करत रहायची त्यामुळे केदारला मामींसमोर जास्त काही करायला मिळायचे नाही.पण एकदा त्याने कहरच केला.

तिच्या अडचणीच्या काळात मामी तिला वेगळ्या अडगळीच्या खोलीत रहायला सांगत असे.

त्या खोलीला दार नव्हते.फक्त एक तरटाचा जाड पडदा होता.खोलीच्या कोपऱ्याला लागुन एक उघडी नहाणी होती.एक दिवस ती तिकडे नहात असतानाच तिला पडद्याशी हालचाल जाणवली.

नीट निरखुन बघितले तर केदार तरटाला डोळे लावुन त्यातल्या बारीक छिद्रातुन तिला न्याहाळत होता.ती जागच्या जागी थरथरू लागली.भीतीने पांढरीफटक पडली.तिथेच अंगाचं मुटकुळं करून ती बसुन राहीली.मनात विचारांचे काहूर माजले.

आज हा न्याहाळतोय उद्या त्याने अजुन काही केले तरऽऽऽ….???

ती भितीने कापु लागली…नुसत्या विचारांनीच!!!!

असेच काही दिवस गेले.एक दिवस शाळेतुन येत असतानाच मागुन अचानक केदार सायकलवरून आला.रस्त्याच्या मधेच सायकल आडवी घालुन त्याने तिची वाट रोखली.

आणि तिला म्हणाला,"चल सायकलवर ..तुला घरी सोडतो."

शाळेचे दप्तर छातीशी कवटाळुन ती मान खाली घालुन फक्त उभी राहीली.तिची बोलतीच बंद झाली होती.हातापायात कापरं भरलं होतं.

मनातल्या मनात देवाचा धावा चाललेला… देवा आता ह्याच्या तावडीतुन तुच माझी सुटका कर..

तो एव्हाना तिच्या अगदी जवळ आला.तिचा हात धरून मनगटाशी हलकेच दाबत तो म्हणाला,"अगं इतकी काय घाबरतेस?मी काय खाणार आहे का तुलाऽऽऽ..चल बैस गुमानं डबलसीट.सोडतो घरी."

त्यावर धीर एकवटुन ती म्हणाली,"नाही नकोऽऽ..मी जाईन पायी पायी.मला सायकलवर बसायचं भ्या वाटतं…"

त्यावर छद्मीपणे हसत तो म्हणाला,"अगं मी असताना काय घाबरायचं!!!"

"मी तुला अास्सं माझ्या दोन्ही हातांनी पकडुन ठेवेन मग कशी पडशील तु..!! हे म्हणत असतानाच त्याने आपल्या हातांच कडं करत तिच्याभोवती वेढा घातला.त्याच्या हातांचा तो रासवट स्पर्श तिला नकोसा वाटत होता.शिसारी येत होती पण ती असहाय्य होती,विरोधही करू शकत नव्हती.

तिच्या डोळ्यातुन घळघळा आश्रु ओघळत होते.

'देवाऽऽऽ काहीही करून वाचव रे मला ह्याच्यापासुन….!!'

तिच्याभोवती अस हाताच कडं करून उभा असतानाच मागुन कोणीतरी जोरदार फटका लगावला केदारला.त्याच्यावर अचानक झालेल्या ह्या वाराने तो गांगरला.मागे वळुन बघितले तर भागामावशी.भागामावशी अगदी देवासारख्याच धावुन आल्या होत्या.मुक्ताने मनोमन गणोबाचे आभार मानले.

केदारचा कान पिरगळुन त्या त्याला म्हणाल्या,"भन हाय नव्ह रं तुझीऽऽ.मग आड रस्त्यात तिची वाट काय आडिवतोस अशी?"

"चल गप गुमानं हो बाजूला मधुन,,नाहीतर घरी येवुन तुझ्या मायला सांगीन तुझे प्रताप…"

भागामावशीच्या कानपिळीने आणि तात्पुरत्या तंबीने आत्ता तरी तो बाजुला झाला पण पुढेही तो त्रास देणे थांबवेल की नाही ह्याची काही खात्री देता येत नव्हती.

लहानपणी ज्या केदारवर ती भावासारखी माया करायची.ज्याच्या सोबत शाळेला जायची आज त्याचीच सावली तिला नकोशी होत होती.

केदारही इतका कसा बदलला की आपल्या बहिणीतही त्याला फक्त स्त्री देहच दिसत होता???

मनातले विचार काही संपत नव्हते.भराभर पावले उचलत ती घराकडे जात होती.

भागामावशीही घरापर्यंत तिला सोबत करत तिच्या बरोबरच राहील्या घर जवळ येईपर्यंत.

तिने घरात जाता जाताच भागामावशीला घरी मामीला ह्यातले काही सांगु नका अशी कळकळीची विनंती केली.

तिचा रडवेला सूरच तिची असहायता स्वच्छ सांगत होती भागामावशींना.त्याही समजुत घालत तिला हसतच म्हणाल्या, " अगं खूळीऽऽ का काय तुऽऽ!!! म्या असं कशाला सांगल तुझ्या मामीला.ते आपलं त्याला घाबरायपुरतं बोलले म्याऽऽऽ...नगं चिंता करूस..काय मदत लागली तर मला सांग.मी हाय बरं पोरीऽऽऽ...चल जाऽऽ घरलाऽऽ मामी वाट बघत आसनं तुझी…"

त्यावर सुटकेचा निश्वास सोडत मुक्ता घरात गेली.

पण झाल्या प्रसंगाने सुडाला पेटलेला केदार पुढे काय करेल हे कोणालाच माहित नव्हते.

काही दिवस तरी त्याने मुक्ताला छेडणे बंद केल्याचे नाटक सुरू केले.

आजकाल तो घरीही फक्त जेवायपुरता येई.बाकी वेळ बाहेरच कुठेतरी तरफडलेला असे.घराबाहेर अंगणातच एक बाज टाकलेली असे.रात्री कधीतरी येऊन तो बाजेवरच झोपत असे.

मामा मामी त्याच्या ह्या वागण्यानी कंटाळले होते.रात्र रात्र घरी येत नाही दिवसभर बाहेरच भटकत असतो म्हणुन चिंता करत असत पण मुक्ता मात्र आता मनातुन खुष होती.भीतीच्या सावटात सतत वावरण्याची आता तिला गरज उरली नव्हती.खऱ्या अर्थाने आत्ता मुक्ता सुटकेचा श्वास घेत होती ….

पण तिला कुठे माहित होते की ही येणाऱ्या वादळापुर्वीची शांतता होती………..!

तिला कुठे माहित होते की तिच्या पुढ्यात एका नव्या संकटाने आकार घ्यायला सुरवात केली होती. 

काय होते ते संकट?

मुक्ता खरच ह्या संकटातुन मुक्त होणार होती?

तिचा जगण्यासाठीचा हा संघर्ष कुठे जाऊन थांबणार होता??

एका भयानक प्रश्नांच्या विवरात मुक्ता फसत चालली होती….

अगम्य….अकल्पित….अतर्क्य…. प्रवास.…!!!! 

----------------------(क्रमश:-3)---------------------------------

क्रमश:-3

©®राधिका कुलकर्णी.


 

नमस्कार वाचकहो…..!

मुक्ताच्या जीवनाचा प्रवास हळहळु खडतर होत चाललाय.

काय होणार पुढे…???

मुक्ता ह्या सगळ्यातुन कशी वाट काढेल???हे जाणुन घ्यायचे असेलतर पुढचा भाग नक्की वाचा..

लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासहीत नक्की ही कथा शेअर करू शकता.

धन्यवाद.

@राधिका.

🎭 Series Post

View all