Login

मी कात टाकली भाग -15

मुक्ताच्या संघर्षपुर्ण आयुष्याची प्रेरणादायी रोमहर्षक कथा.

मी कात टाकली भाग -15

©®राधिका कुलकर्णी.

पाच वर्षांचा काळ हा हा म्हणता सरला आणि आज मुक्ता लॉ ची पदवी विशेष प्राविण्यासह अर्जित करून आपल्या आई वडीलांकडे परत आली.

एलएल.बी. नंतर तिने पुढे एल एल एम करायचे ठरवले."फॅमिली लॉ" ह्या विषयात स्पेशलायझेशन करून तिने पुढे एल एल एम ही पुर्ण केले.एल एल एम शिकत असतानाच्या दोन वर्षाच्या कालावधीत सतिशची ओळख झाली.

त्याचा क्रिमिनल लाॅ विषय. दोघांचे स्पेशलायझेशनचे विषय वेगळे असले तरी बाकी कॉमन क्लासेसच्या वेळी भेटी होत.भेटीचे ओळखीत आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात कसे झाले दोघांनाही कळले नाही.

सतिशचा भूतकाळही खूप हालापेष्टांनी भरलेलाच होता.जीवनाशी सतत संघर्ष करत अर्धवेळ काम करून रात्रशाळा करून त्याने बारावी पुर्ण केले होते.इकडे अॅडमिशनसाठीही वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी आर्थिक सहाय्य करून तो इथपर्यंत फक्त अथक परीश्रम आणि बुद्धीमत्तेच्या जोरावर पोहोचला होता.जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर प्रेम वगैरे सारख्या फुटकळ गोष्टींवर वेळ खर्च करण्याइतकी ना त्याची ऐपत होती ना त्याच्याकडे वेळ होता.अशीच काहीशी मानसिकता मुक्ताचीही होती.

पण दोन समदु:खी जीव एकत्र आल्यावर सुखदु:खाच्या गप्पा करता करता कधी एकमेकांमधे गुंतत गेले त्यांचे त्यांनाच समजले नाही.

सतिश दिसायला रूबाबदार,देखणा,जरासा खडूस,अॅटिट्युडवाला असे सगळे म्हणत पण लवकरच मुक्ताला कळले की हे त्याने ओढलेले पांघरूण होते आपल्या मूळ स्वभावावर.

मुळातला जो सतिश मुक्ताने पाहीला होता तो खूप मनमिळावु आणि संवेदनशील होता.पण आपण मऊ राहीलो की लोक मऊ माती कोपराने खणायला पाहतात आणि त्याच्या देखण्या व्यक्तिमत्त्वाला भूलुन कित्येक श्रीमंताच्या मूली आसपास घोटाळायच्या.त्याला ह्या सगळ्यात अडकुन आपल्या करीअरचे नुकसान होऊ द्यायचे नव्हते म्हणुन हा खडुसपणाचा अॅटिट्युडवाला बुरखा पांघरून तो वावरत असे.पण मुक्ता करता सतिश खूप वेगळा होता.त्यालाही कळायचे नाही की मुक्तासमोर आपले सगळे मुखवटे गळुन का पडतात?

ह्या सगळ्यामागे काय कारण हे जेव्हा त्याने शोधायचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या लक्षात आले की ज्या गोष्टीची भीती वाटत होती तेच घडलेय.तो मुक्तामधे गुंतत चाललाय.जितका तिच्यापासुन दूर जायचा प्रयत्न करे तितका आधिकाधिक तिच्याकडे ओढला जाई.दोघेही स्वत:च्या करीअरला पहिले प्राधान्य देत असल्याने लग्नाबिग्नाचा विचार त्यांच्या मनात दूरदूर पर्यंत आला नव्हता.मुक्ताला तर लॉ एवढ्याच साठी शिकायचे होते की ती समाजातील अबला,पिडीत महिलांसाठी काही समाजोपयोगी कार्य करू शकेल.त्यामुळे मनात तसे काही नव्हते पण जेव्हा एकमेकांशी बोलणे व्हायचे नाही तेव्हा अस्वस्थता जाणवायची.हे का होतेय ह्याचा अर्थ लावल्यावर मुक्तालाही धस्स झाले.सतिश सारखा इतका देखणा आणि हुशार मुलगा त्याला काय मुलींची कमीय..तो कशाला माझा विचार करेल?

त्यात माझा भूतकाळ……… ! तो माहित झाल्यावर कोणी वेडाच माझ्यावर प्रेम करेल.

नाहीऽऽ...नाही…!प्रेम बिम ह्या गोष्टी आपल्या नशिबात नाही.असा विचारही मनात येता कामा नये.आपल्याला ह्या समाजाचे खूप काही देणे चुकवायचेय.ह्या प्रेमाबिमा सारख्या निरूद्योगी गोष्टींकरता वेळ तरी कुठेय आपल्याकडे?

दोघेही आपापल्या जागी स्वत:च्या मनाची समजूत घालुन पटवुन देत होते की कसा तु प्रेमाच्या लायक नाही पण त्यांना दोघांनाही हे समजत नव्हते की मनाला हे समजवायची वेळ येतेय म्हणजेच तुम्ही कितीही नको म्हणत असला तरी जे घडायचेय ते घडून चुकलेय.तुमचे ह्रदय कधीचेच कुणाचे तरी होऊन बसलेय.आता त्याचा कंट्रोल तुमच्या हाती नाहीये.कॉलेज संपवुन निघायची वेळ आली.दोघेही आपापल्या गावी परत गेले.मनात एकमेकांविषयीची ओढ तशीच दाबुन ठेवुन दोघेही काहीच न बोलता आपापल्या वाटेनी निघुन गेले.रीझल्ट अजुन बाकी होता त्याआधीच एका अॅडव्होकेट फर्ममधे तो प्रॅक्टीसकरता असिस्टंट लॉयर म्हणुन रूजु झाला.त्याला आपले म्हणणारे कोणीच नव्हते.पण कधीकधी मुक्ताची आठवण मनात ठसठस निर्माण करायची.पण तिचे आई वडील इतके श्रीमंत.ते कशाला माझ्या सारख्या फाटक्या मुलाशी लग्न लावुन देतील मुक्ताचे.?.मनातल्या मनात तो विचार आला की मन उदास व्हायचे.इकडे रूस्तमशेठ मुक्ताला आडुन आडुन लग्नाविषयी विचारत पण ती सतत नाही म्हणत असे.मला लग्नच करायचे नाही हा एकच घोषा लावायची.मालतीबाई आणि रूस्तमशेठनाही कळत नव्हते इतकी उच्च  विद्याविभूषीत दिसायला सुंदर तरीही ही लग्नाबाबतीत इतकी उदासीन का?पण उत्तर मिळत नव्हते.तिने चुकुनही सतिश बद्दल घरी काही सांगीतले नव्हते.

शिकायला बाहेर रहायला लागल्यापासुन मुक्ताला डायरी लिहायची सवय जडली होती.तीच सवय पुढेही कंटीन्यु राहीली.जेव्हा मन सतिशच्या आठवणीने उदास होई तेव्हा कधीतरी ती आपल्या मनाची अवस्था डायरीत उतरवत असे.ह्रदयाच्या एका कोपऱ्यात सतिशला दिलेले स्थान तिने मनाच्या तळकप्प्यात जतन करून ठेवले होते.

ते फक्त तिचे गूपीत होते.

एक दिवस ती बाहेर गेलेली असताना मालतीबाई सहज तिची खोली साफ करायला आल्या असता त्यांची नजर त्या अर्धवट पालथ्या टाकलेल्या डायरीवर पडली.डायरी नीट करत ठेवताना सहज काय लिहीले हे त्यांनी उत्सुकतेपोटी वाचले.त्यात सतिश नावाचा उल्लेख त्यांना आश्चर्यचकीत करून गेला.तिच्या मनातली सगळी सल तिने तिथे लिहुन ठेवली होती.मालतीबाईंनी डायरी होती तशीच ठेवुन तिथुन सटकल्या.रूस्तमशेठ घरी आल्यावर त्यांच्याशी एकांतात सर्व प्रकार सांगितला.

आपल्या भूतकाळामुळे कोणी आपल्याला नकार देऊ नये म्हणुन मुक्ताने स्वत:च स्वत:ला एका दालनात बंद करून घेतलेय जे अयोग्य आहे.तिलाही जीवनाचा भरपूर आनंद घ्यायचा अधिकार आहे.

जर ती आपले मन उलगडुन बोलत नसेल तर आपणच त्या मुलाशी बोलुन बघायला काय हरकत आहे.जर त्याच्याही मनात मुक्ताविषयी काही भावना असतील तर चांगल्या मुहुर्तावर लग्न लावुन देऊ दोघांचे...मालतीबाईंचे बोलणे रूस्तमशेठला पटले.मुलाचा ठावठिकाणा शोधुन त्याला भेटायचे रूस्तमशेठनी ठरवले.मुक्ताच्या कॉलेजमधुन सतिशच्या गावचा पत्ता मिळवुन रूस्तमशेठनीच त्याला मुक्ताच्या नावे एक पत्र लिहीले..त्याला आपल्या गावी भेटायला बोलावले.मुक्ताचे पत्र पाहुन त्यातला मजकूर वाचुन तो हरखून गेला.लगेच त्याच पावली मिळेल ती बस पकडुन तो मुक्ताच्या घरी आला.मालतीबाईंना लक्षात आले की हाच सतिश तसे काहीतरी कारण काढुन त्यांनी रूस्तमशेठना त्याला एकट्यात त्याच्या मनातले काढुन घ्यायला लावले.रूस्तमशेठनी नाव, गाव,घरी कोण वगैरे जुजबी चौकशी केली तेव्हा कळले की तो अनाथ होता.त्याला कोणीच नव्हतं आपलं म्हणण्यासारखं.म्हणुनच तो मुक्ताला मनातली गोष्ट सांगत नव्हता.

रूस्तमशेठनी त्याला बरोबर घोळात घेऊन मुक्ताविषयी त्याच्या काय भावना आहेत ते जाणुन घेतले.तेवढ्यात मुक्ता तेथे आली.

सतिशला अचानक समोर पाहुन तिला धक्काच बसला.हा असा अचानक आपल्या घरी का आलाय?तिला काही समजत नव्हते.आणि तिकडे त्याला वाटत होते स्वत:च प्रेमाचा कबुलीजबाब देऊन आपल्या घरी बोलावुन मुक्ताने सरळ सरळ मला तोफेच्या तोंडी देऊन स्वत: मस्त आरामात आत जाऊन बसलीय.

आता हिचे वडील काय काय विचारतात काय माहित?

पुन्हा मी असा अनाथ,ना घर ना दार...काय ठरवतील आई वडील देव जाणे..?

दोघेही मनातल्या मनात विचार करताहेत.पण बोलत कुणीच नाही.रूस्तमशेठ आणि मालतीबाई मात्र त्यांचे ते भिरभिरलेले चेहरे बघुन आतल्या आत हसत होते.रूस्तमशेठ मुद्दामच काहीतरी निमित्त करून आत गेले.तिच संधी साधुन सतिश मुक्ताला म्हणाला,"मला पत्र धाडून बोलावुन घेऊन स्वत:च बरी गायब होतेस गंऽऽ.?इकडे तुझ्या बाबांच्या तोफेला मी तोंड देत बसलो आणि तु मस्त लांबुन मजा बघत होतीस होय नाऽऽ.?"

मुक्ताला काहीच समजत नव्हते नेमके तो काय बोलत होता कसले पत्र?कसले बोलावणे?

ती त्याला तेच बोलली,"पत्र?आणि मी तुला धाडले??कधीऽऽऽऽ..!!!"

"मी तर असे कोणतेच पत्र तुला पाठवले नाहीये."

आता तर सतिश जाम घाबरला.त्याने घामेजल्या हातानेच पँटच्या खिशातुन पत्र काढुन तिला दाखवले.

"बघ हे पत्र.हे तुच पाठवलेस ना मला??मग आता का शब्द फिरवत आहेस?"

मुक्ताने पत्र बघीतले.तिच्या नावाने कुणीतरी तोतया पत्र लिहीलाय हे साफ कळत होते पण मग घरचा पत्ता इतका करेक्ट कसा काय?"

तिला काहीच कळेना.फक्त एक गोष्ट ह्या सगळ्यात सुखावणारी होती ती म्हणजे फक्त मुक्ता नाव टाकुन पाठवलेल्या पत्राची कुठलीही शाहनिशा न करता सतिश सारखा हुशार मुलगा फक्त मी बोलावलेय म्हणुन धावत पळत मला भेटायला आला ह्याचा अर्थ………….!!!!!???

पण मग हा कॉलेजमधे असताना कधीच का नाही बोलला.?दोघेही एकमेकांसमोर शांतपणे विचार करत बसलेले.सतिशच्या डोक्यात चाललेले..मुक्ताच्या मते तिने पत्र लिहीले नाही मग हे पत्र बरोबर माझ्या पत्त्यावर कोणी पाठवले?माझा पत्ता कुठुन मिळाला?आणि मुक्ताचाही पत्ता ह्यावर कोणी टाकला.???

दोघांनाही हे कोडे काही केल्या उलगडत नव्हते.

इतक्यात चहा बिस्कीट्स घेऊन मालतीबाईंसह रूस्तमशेठ बैठकीत आले.मालतीबाईंनी सगळ्यांना चहा दिला.

चहा उरकताच रूस्तमशेठनी बोलायला सुरवात केली.

"हे बघा पोरांनोऽऽऽ,मला माहीतीय तुमच्या मनात खूप सारे प्रश्न पडलेत.सतिशला प्रश्न पडलाय की त्याला हे पत्र कोणी लिहीले?मुक्ता म्हणतेय हे पत्र तिने लिहीले नाहीये,मग त्याच्याच पत्त्यावर कसे गेले बरोब्बर???"

"हे बघा.शांत होईन नीट ऐका."

"सतिश हे पत्र मीच मुक्ताच्या नावे तुला पाठवले.दोघेही संभ्रमीत होऊन रूस्तमशेठकडे पहात होते.त्यांच्या मुद्रेवर प्रश्न होताच की हे असे काम त्यांनी का केले?"

मग रूस्तमशेठ पुढे सरसावुन बोलत म्हणाले,"ठिक आहे मी आता तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे देतो.नीट लक्षपुर्वक ऐका दोघेही." तीन चार दिवसांपुर्वी मुक्ता बाहेर गेलेली असताना सहज मालती तिच्या खोलीत सफाई करता गेली असता तिची डायरी उघडीच पडलेली होती.त्यात तिने तुझ्या नावाचा उल्लेख केलेला दिसला.आम्हाला माहितीय कुणाची पर्सनल डायरी वाचणे गुन्हा आहे पण आज तो गुन्हा मालतीने केला म्हणुन आम्हाला निदान हा खुलासा तरी झाला एरवी मुक्ताला लग्नाविषयी विचारले तर नाही नाऽहीच म्हणत असे.

मग हा सतिश कोण?हा प्रश्न आम्हाला पडला.

मग आम्ही मिळुनच हा प्लॅन केला.तुला मुक्ताच्या नावे खोटे पत्र धाडून इकडे बोलावुन घेतले.

आणि ज्याअर्थी मुक्ताच्या स्वाक्षरी शिवाय फक्त नाव टाकलेले पत्र पाहुन तु लगेच धावत पळत इथवर आलास त्याअर्थी आमची शंका खरी आहे.

"कसली शंकाऽऽऽ?" न राहवुन सतिश लगेच उद्गारला.

स्मित करतच रूस्तमशेठ म्हणाले,"हेच की तुला मुक्ता आवडते.तु तिला मनापासुन प्रेमही करतोस,बोल हे खरेय की खोटे??"

त्यावर त्याने मान खाली घातली.आपली चोरी पकडली गेली हे जाणुन तो गोरामोरा झाला.इकडे मुक्ताचीही अवस्था काही वेगळी नव्हती.आता रूस्तमशेठ मुक्ताकडे वळत म्हणाले, " आणि तु गंऽऽ..आम्ही तुला मुलगी म्हणुन प्रेम देण्यात कुठे कमी पडलो का?म्हणुन तु तुझ्या मनातली इतकी मोठी गोष्ट लपवुन ठेवलीस?

तुला जर सतिश आवडतो तर तसे मन मोकळे का नाही केलेस आमच्याजवळ?निदान तुझ्या काकीजवळ तरी बोलायचे नाऽऽ..?

आज तु आम्हाला खरच व्यथित केलेस मुक्ता!"

रूस्तमशेठच्या डोळ्यात पाणी जमा झाले.तीस वर्ष मागे त्यांना सतिश आणि मुक्ताच्या जागी ते स्वत: दोघे दिसत होते.मालतीबाईंनीही अशीच मनातली भावना वडीलांना दु:ख होऊ नये म्हणुन तळकप्प्यात दडवली होती आणि त्यांनी स्वत:नी मालतीच्या मनात काय माहीत नसल्याने आपल्या भावना दडवल्या होता.आज तीस वर्षांनी त्याचीच पुनरावृत्ती घडताना ते बघत होते.

त्यांचे तराळलेले डोळे पाहुन मुक्ता त्यांच्या जवळ गेली.त्यांचे डोळे आपल्या हाताने पुसत म्हणाली,"काका तुम्हाला असे वाटलेच कसे की मी तुम्हाला परके समजुन माझे अंतरंग उघडे केले नाही?मी जे वागले त्याला कारण हा ….हा मुलगा आहे..कॉलेजचे अख्खे वर्ष संपले तरी त्याने कधीच त्याच्या मनातली भावना मला बोलुन दाखवली नाही मग मी तुम्हाला काय सांगणार होते?त्यात माझा भूतकाळ…....!

तो कळल्यावर त्याने मला नकार दिला असता तर ते दु:ख मी कधीच पचवु शकले नसते काका...म्हणुन माझ्या मनातली व्यथा मनातच ठेवायचा निर्णय घेतला मी..ह्यात माझे काय चुकले तुम्हीच सांगा…!

आता सतिशला पहिल्यापेक्षा जास्त अपराधी वाटू लागले.मेल्याहुन मेल्यागत अवस्था झाली त्याची.

तरीही धीर करून तो मुक्ताला म्हणाला,"थांब मुक्ताऽऽऽ..माझ्यावर असले आरोप करू नकोस."

काका मी सांगतो जसे मुक्ताकडे एक कारण आहे ना तसेच मलाही एक कारण होते माझ्या भावना लपवायचे.मी लहानपणापासुन अनाथ.

सकाळी काम रात्री रात्रशाळेत जाऊन शिकलो.

अभ्यासात गती होती.त्यामुळे पुढे शिकत गेलो.बारावी नंतर काही सामाजिक संस्थांनी मदत करून मी लॉ केले.नंतरही स्कॉलरशीप नादारी अशा दयेवरच माझे शिक्षण झाले.

मुक्ता तुमच्या सारख्या तालेवार घरातली मुलगी.माझ्यासारख्या फाटक्या माणसाशी तुम्ही थोडीच तिचे लग्न लावुन द्याल हाच विचार करून मी माझ्या मनातल्या भावना लपवुन ठेवल्या. 

लग्नानंतर मी तिला पुर्ण सुखी ठेऊ शकेल इतका आर्थिकरीत्या सक्षम झाल्यावरच तिला माझ्या मनातले सांगायचे ठरवले होते मी म्हणुनच माझ्या भावना व्यक्त केल्या नव्हत्या…"

"आताही मी जिथे नौकरी करतोय तिथे मला फक्त पाच हजार पगार देतात ते.आता तुम्हीच सांगा इतक्या कमी रकमेत आमचा संसार होईल का?"

"माणसाने स्वप्न जरूर पहावीत पण खोट्या आशेवर जगु नये आणि वास्तवाचे भान तर कधीही विसरू नये…!

त्याचे बोलणे सगळ्यांनी शांत चित्ताने ऐकुन घेतले.रूस्तमशेठना कौतुक वाटले.सतिश इतक्या गरीब परिस्थितीत असुनही अतिशय स्वाभीमानी,परखड पण प्रामाणिक होता.

त्याच्या ह्या गुणांनीच रूस्तमशेठ प्रभावीत झाले.सतिश जावई म्हणुन त्यांनी केव्हाच फायनल करून टाकला होता.आता मुक्ताच्या मनातली भीती ..तिचा काळा भूतकाळ…!!

सतिशला त्याचा काहीही फरक पडणार नाही हे रूस्तमशेठला कळुन चुकले होते परंतु मुक्ताची खात्री होणे गरजेचे होते.कुठलीही गोष्ट लपवुन किंवा अंधारात ठेवुन कुठलेच नाते त्यांनाही जोडायचे नव्हते.त्यामुळे हा खुलासा सतिशला होणे गरजेचेच होते.त्यांनी दोघांना मुक्ताच्या खोलीत बोलण्यासाठी पाठवले.

इतक्या वेळचा भांबावलेला सतिश आत्ताशी कुठे स्थिरस्थावर झाला तशी त्याची नजर मुक्ताच्या घरावर पडली.ज्या ज्या गोष्टींचे आश्चर्य मुक्ताला पहिल्यांदा ह्या घरी आल्यावर वाटले होते तेच सगळे भाव सतिशच्याही चेहऱ्यावर दिसत होते.मुक्ताने त्याला आपल्या खोलीत नेले.तिची एकटीची खोली इतकी माेठी होती की सतिश सध्या रहात असलेल्या घराच्या दुप्पट होती.पण आता त्याला खात्री पटली होती की मुक्ताचे आईवडील माणसांना पैशाच्या तराजूत तोलणारे मुळीच नाहीएत त्यामुळे तो निश्चिंत झाला.

मग इकडच्या तिकडच्या गप्पा करून मुक्ता मूळ विषयावर आली,"हे बघ सतिश आपण एकमेकांवर प्रेम करतो तेव्हा पुढील नात्यात बांधले जाण्याअगोदर मला तुला माझ्या अायुष्याची ती काळी बाजू सांगायचीय जी मी कधीच तुला सांगू शकले नाही मनात असुनही.

मला हे सांगुन आपली मैत्री गमवायची नव्हती.

मला भीती होती की माझा भूतकाळ कळल्यावर कदाचित तु माझ्याशी बोलणे टाळशील म्हणुनच मी आजवर माझ्या तुझ्या विषयीच्या भावनाही  व्यक्त करू शकले नाही पण आज सांगते.ते ऐकल्यावर तु जो निर्णय घेशील तो मला मान्य असेल.तुझ्यावर कुठलीच बळजबरी नसेल हे नात जोडायला….!

तिला मधेच थांबवत सतिश म्हणाला,"तुझा भूतकाळ काय आहे हे जाणुन घेण्यात मला खरच काहीही रस नाहीये मुक्ता.तु जशी आज आहेस तशीच मला माझ्या आयुष्यात हवीय.हाऽऽ...पण फक्त हे सांगुन तुला मोकळ वाटणार असेल तर सांग मी ऐकायला तयार आहे परंतु त्या सांगण्यावर माझा निर्णय अवलंबुन नाही हे ही तु लक्षात ठेव...हम्मऽऽ आता तु सांग काय सांगायचेय…"

सतिश मुक्ताचा हात आपल्या हाती घेत तिला आधार देत तिच्या जवळ येऊन बसला.

मुक्ताचा चेहरा गंभीर झाला होता.कोणीतरी काळाच्या जखमांवरची खपली ओरबाडल्यावर ती जखम पुन्हा रक्ताळावी तसे तिला वाटत होते.उदास चेहऱ्यानेच तिने आपली सगळी कहाणी आणि सोबतच केदारने केलेले पाशवी अत्याचार सगळेच सांगीतले.डोळे पाण्यानी भरले होते मुक्ताचे.सतिशने तिला जवळ घेतले.तिचे डोळे पुसले.त्याने तिला अलगद आपल्या मिठीत घेतले आणि तिचे सांत्वन केले.सतिशच्या मिठीत तीने आपले सर्व दु:ख मोकळे केले.थोडी सावरताच ती त्याच्या मिठीतुन दूर होऊ लागली तसे त्याने तिला पुन्हा आपल्या जवळ ओढले.तिचा चेहरा वर करून  तिच्या डोळ्यात डोळे घालुन रोखुन तिच्याकडे पाहिले.त्याची ती भेदक नजर बरेच काही बोलत होती काहीही न बोलता..ती त्याच्याकडे बघुन लाजली तसे त्याने तिला पुन्हा मिठीत घेतले.ती मिठीतुन सुटू पहात होती आणि त्याने ती अधिकच घट्ट केली.

"सतिशऽऽऽ...सोड नाऽऽ..काका-काकी बघतील ...सोडऽऽ…!

तिची त्याच्या मिठीतुन सुटायची धडपड पाहुन तो म्हणाला,"आता जवळ घेतलेय ते सोडण्यासाठी नाही मुक्ता मॅडम…!!

आता तु कायमची माझी आहेस.माझ्या हक्काची...लव्ह यु मुक्ता..खरच किती उशीर लावला हे बोलायला मी..

रिअली सॉरी डिअर…!!

त्याचेही डोळे पाणावलेले दिसत होते.मुक्ताने त्याचे डोळे टिपले आणि काही न बोलता फक्त त्याच्या कपाळावर आपले ओठ टेकवले आणि हळुच त्याच्या कानात कुजबुजली,"आय लव्ह यु टु सतिश..!!अँड आय डोन्ट वॉन लूज यु…!"

दोघांचेही एकमेकांशी सविस्तर बोलणे होऊन आनंदी चेहऱ्यानेच दोघे बाहेर आले.मुक्ताच्या गालावर फुललेले गुलाब,तिचा तो लाजराबुजरा चेहराच सर्व काही सांगुन गेला तरीही रूस्तमशेठनी दोघांनाही त्यांचे मत स्पष्टपणे सांगण्यास सांगितले.

दोघांचीही लग्नाला संम्मती मिळाली.रूस्तमशेठ आणि मालतीबाईंना तर आकाश ठेंगणे झाले.लवकरच ह्या घरी सनईचे सूर वाजणार ह्या कल्पनेनेच हरखून गेले दोघे.

     ~~~~~~~~~~~~~~~~

म्हणता म्हणता मुक्ता सतिशच्या लग्नाची तारीख फायनल झाली.दोघेही आपापल्या करीअरमधे सेटल होत होते.

मुक्ता तर आता तीन तीन आघाड्यांवर काम पहात होती.तिचे स्वत:चे ऑफीस.

रूस्तम काकांची फॅक्टरी आणि रूस्तमकाकांनी अनाथ गरीब दीन पिडीत महिलांसाठी एक समिती स्थापन केली होती.बघता बघता त्याचा पसारा इतका वाढला की त्यांच्या एकट्याच्याने हे सगळे सांभाळणे त्यांना दिवसेंदिवस कठीण होऊ लागले होते.त्यामुळे मालतीबाई पण महिला समितीचा कारभार थोडाफार पहायच्या पण त्यांनाही सवय नसल्याने झेपत नव्हते.त्यामुळे मुक्ताच तिकडेही लक्ष घालत होती..तिला ह्या महिला समिती बाबत खूप सारे प्लॅन्स होतेे.ते सगळे तिला आंमलातही आणायचे होते परंतु सध्या तिचा तिच्या स्वत:च्या व्यवसायात जम बसवण्यावर भर होता.

यथावकाश सतिश मुक्ताचे लग्न झाले.सतिशही त्याच्या क्षेत्रात वरवर जात होता.तो आता एक नामांकीत क्रिमिनल लॉयर म्हणुन कमी वेळातच प्रसिद्ध पावला होता.त्याने स्वत:चे मोठे घर ,गाडी ह्या सर्व वस्तु स्वत:च्या जीवावर घेतल्या.

रूस्तमशेठना खूप कौतुक होते सतिशचे.

 कुणाचेही उपकार न घेता समाजात आपले एक स्थान,पद,प्रतिष्ठा आणि जोडीला पैसाही कमावला होता त्याने.

असेच वर्ष पुढे जात होते.मुक्ताने महिला समितीतील अनेक स्त्रियांच्या व्यथा पाहुन तसाच विषय घेऊन पीएचडी करायचे ठरवले. 

"लैगिक शोषण-महिला सबलीकरण-कायदे आणि अधिकार" हा विषयावर यथावकाश पीएचडी पुर्ण करून मुक्ता आता अॅडव्होकेट डॉ. मुक्ता सतिश तारे झाली होती.सतिश आणि मुक्ता दोघे मिळुन रूस्तमकाका आणि मालतीकाकींची काळजी घेत होते.

मुक्तांगणच्या महिलाश्रमात ती सर्व महिलांमधे कोणकोणते विशेष गुण आहेत हे हेरून त्याप्रमाणे त्यांना त्याचे विशेष ट्रेनिंग देई.कोणी चित्र काढते तर कोणाला चांगले चांगले पदार्थ बनवता येतात.काही जणींना लोकरी पासुन स्वेटर्स  विणणे.कोणी स्टिचिंग तर कोणी काय.तिने त्या त्या प्रमाणे वर्गवारी करून त्यांचे गट केले.त्यांना कच्चा माल देऊन त्यापासुन विविध वस्तु बनवायला प्रोत्साहित केले.

त्यांच्याकडुन बनवलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्द्ध करून दिली.त्यांच्या वस्तुंना चांगलीच मागणी येऊ लागली.तसतसे त्यांना आवश्यक मशिनरीचे टेक्निकल ज्ञान देऊन कमी वेळात जास्त वस्तुंची निर्मिती कशी होईल ह्याकडे तिने लक्ष दिले.एक मार्केटींग टिम सेट केली.त्यांनी बनवलेल्या वस्तुंच्या विक्रीतुन आलेली रक्कम सरळ त्यांच्या प्रत्येकीच्या अकाऊंटवर जमा होऊ लागली.अशाप्रकारे तिथल्या स्त्रिया ज्या एकेकाळी पिडीत अबला म्हणुन समाजाने धुत्कारल्या होत्या त्यांनाच मुक्तांगणने आत्मनिर्भर बनवुन मानाचे स्थान मिळवुन दिले.

उन्हाळ्यात लोणची,पापड,जाम,सॉस तसेच इतर चिप्स सांडगे कुरडया असे टिकाऊ खाद्य पदार्थ बनवुन मुक्तांगणच्या ट्रेडमार्कवर ते बाजारात तसेच परदेशातही विक्रीसाठी जाऊ लागले.तिथे राहुन स्त्रियांना आपले हक्काचे घरच रूस्तमकाकांनी आणि आता मुक्ताने मिळवुन दिले होते.

      ~~~~~~~~~~~~~~~~~~

दूपारची वेळ.मार्चचे रणरणते ऊन.मुक्ता आपली कामे उरकुन मुक्तांगणच्या ऑफीसकडेच निघाली होती.गेटजवळ वॉचमन कुणावर तरी ओरडून बोलत असावा असे मुक्ताला जाणवले.

आपल्या ए.सी. गाडीची काच खाली घेऊन तिने अंदाज घेतला तर तो एका म्हाताऱ्या बाईला गेटमधुन बाजूला हो सांगत हाकलत होता.

मुक्ताने त्याला काय भानगड आहे असे विचारताच तो धावत मुक्तापाशी आला आणि म्हणाला,"जी मॅडम कुछ नही।ये बुढीयाँ कई दिनोंसे रोज यहाँ आकर एक न्युजपेपर का फोटो दिखा के कह रही है की वो फोटो की लडकी अपने यहाँ रहती है और उसे उससे मिलना है। मै उसे समझा समझाकर हार गया की उसकी बेटी यहाँ नही है पर वो रोज यहाँ बैठती है। इसलिए मै उसे हकाल रहा था।"

वॉचमनने सांगितलेली गोष्ट तिला खूपच इंटरेस्टींग वाटली.तिला कुतुहल जागृत झाले त्या महिलेबद्दल.ती गाडीतुन खाली उतरली.

ती म्हातारी रणरणत्या उन्हात अनवाणी पायाने तिथेच एका आडोशाला बसुन होती.टिपीकल खेड्यात रहाणाऱ्या स्त्रियांप्रमाणे काष्टा पातळ घातलेली होती.अंगावरची चोळी बाह्यांवर फाटलेली,डोईवरचा पदरही ठिकठिकाणी झीरझीरीत झालेला,काळी त्वचा उन्हाने जास्तच काळवंडलेली होती.नाकात एक मोठ्या आकाराची गोल नथ सोडता अंगावर कोणताही दागीना नव्हता.कपाळावर एक आडवी रेघ गाेंदलेली,हातात दोन काचेच्या बांगड्या आणि हातात एक जीर्ण झालेला,धुळीने माखलेला जूना पेपर.त्याच पेपरच्या घडीने ती स्वत:ला मधुनच वारा घालत होती.

मुक्ता चालत चालत तिच्यापर्यंत पोहोचली…………..!

------------------(क्रमश:-15)--------------------------------- 

क्रमश:-15

©®राधिका कुलकर्णी.

नमस्कार मंडळी…..!!

मुक्ताच्या आयुष्यात सतिशच्या रूपाने चांगला प्रेमळ जोडीदारही आला.तिची सर्वांगिण प्रगती झाली.मुक्तांगणलाही ती आपलेपणाने बघत आहे.

आणि आज तिला ही एक म्हातारी भेटलीय...कोण आहे ही म्हातारी??हा कोणता नविन टर्न आहे?

हे जाणुन घ्यायला पुढचे भाग वाचायला विसरू नका. 

कसा वाटला हा भाग?कमेंट्सद्वारे नक्की कळवा.

लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासहीत कथा नक्की शेअर करू शकता.

धन्यवाद.

@राधिका.

🎭 Series Post

View all