मी कात टाकली भाग -14

मुक्ताच्या संघर्षपुर्ण आयुष्याची प्रेरणादायी यशोगाथा.

मी कात टाकली भाग-14

©®राधिका कुलकर्णी.

दोन महिन्यांनी बारावीचा निकाल लागला.ह्या वेळीही तालुक्यातुन आणि कॉलेजमधुन पहिली आली होती मुक्ता.

टोपे सरांच्या डोळ्यातुन फक्त आश्रु झरत होते.जर तेव्हा "प्रिलिम दिली नाही तर बोर्ड परीक्षा देता येणार नाही " ह्या नियमावर बोट ठेवुन मी माझ्या तत्वाला मुरड घालुन मुक्ताची मदत केली नसती तर आज हा यशोदिन माझ्या महाविद्यालयाला खचितच पहायला मिळाला असता…..!

हा झाला स्वार्थ पण त्याहुनही मोठ्ठी गोष्ट म्हणजे मुक्ताने कमावलेला आत्मविश्वास,जो ह्या यशानंतर द्विगुणीत झाला असेल नक्कीच….!!

त्यावेळी जर तिला ही संधी मिळाली नसती तर ती पुन्हा निराशेच्या खाईत लोटली गेली असती.

स्वत:वरचा विश्वास गमावुन बसली असती.आणि जगण्याची उमेदही गमावुन बसली असती.परंतु हे सगळे होण्यापासुन वाचले त्यात माझाही खारीचा वाटा आहे ह्याचेच मला समाधान आहे.

आता ती जीवनात कधीही मागे वळुन पाहणार नाही.तिच्या यशाचा आलेख असाच उंचावत जाईल हे निश्चित..

टोपे सर आज खूप भावूक झाले होते.गंधे सरांची भविष्यवाणी "तुझ्या कॉलेजचे भावी यश तुझ्या केबीनबाहेर वाट पहात आहे " ती आज खरच सत्यात उतरली होती..

रूस्तमकाकांबरोबर मुक्ता बातमीचा पहिला पेढा द्यायला टोपे सरांच्या घरी आली.तिचा तो आनंदाने उजळलेला चेहरा पाहुन खूप समाधान वाटले टोपे सरांना.तिने दिलेला पेढा तिच्याच तोंडात भरवत त्यांनी खूप प्रेमपुर्वक आशिर्वाद दिला,"खूप मोठी हो बाळऽऽ.तुझ्या यशाचा आलेख असाच गगनाला भिडू दे."

एक मात्र नेहमी लक्षात ठेव मुक्ता,पुढील आयुष्यात तु कितीही यश मिळव,कितीही पैसा कमव पण आपल्या जमिनीला कधीही विसरू नकोस.ह्या प्रवासात ज्यांनी ज्यांनी तुला साथ दिली त्यांचा कधीही विसर पडु देऊ नकोस..मी जे बोलतोय ते आज तूला कदाचित नीट समजणार नाही पण पुढील भविष्यात माझी ही वाक्ये तु नेहमी लक्षात ठेव.तेव्हा तुला ह्याचा अर्थ नक्की समजेल..जा पोरीऽऽऽ...अशीच प्रगती करत रहा…"

मुक्ता टोपे सरांचे बोलणे शांतचित्ताने ऐकत होती.टोपे सर खूप भावूक झाले होते आज.टोपे सरांच्या बोलण्यातला गर्भितार्थ नीटपणे समजल्यामुळे असेल कदाचित पण रूस्तमशेठही नकळत भावूक झाले होते.

सगळे वातावरण काहिसे गंभीर झाले होते.हे लक्षात येताच टोपे सरांनीच विषय बदलला आणि मुक्ताला म्हणाले,"बाळ मुक्ता आता तुझा बारावीचा रीझल्टही लागला.आता तरी गंधे सरांशी बोलतेस का?त्याला फार आनंद होईल तुझ्या मेहनतीला मिळालेले यश ऐकुन."

ह्यावेळी मुक्तालाही गंधे सरांची फार फार प्रकर्षाने कमी जाणवत होती.त्यांनी जर तिला वेळोवेळी मदत केली नसती अकरावी,बारावीचा अभ्यास विनामुल्य घेतला नसता तर आजचा दिवस ती पाहुच शकली नसती.तिच्या ह्या यशात सगळ्यात मोठ्ठा वाटा गंधे सरांचाच होता.आणि आता रूस्तमशेठनी मुक्ताला कायदेशीर रित्या दत्तक घेतले असल्याने केदार किंवा कोणीही तिला बळजबरीने घेऊन जाऊ शकणार नव्हता त्यामुळे आता गंधे सरांना फोन करण्यात कुठलाही धोका उरलेला नव्हता.तिने मानेने होकार देताच रूस्तमशेठच्या गाडीतुन तिघेही कॉलेजला गेले.कॉलेजच्या दूरध्वनीवरून टोपे सरांनी आपल्या मित्राला फोन लावला.

पलिकडून फोन उचलला गेला तसे टोपे सर बोलले,"काय रे गजा कसा आहेस?विसरलास का लेका मित्राला?किती दिवसात फोन नाही की काही नाही..बरा आहेस नाऽऽ…?"

त्यावर पलीकडुन अतिशय खोल आवाजात गंधे सर हॅलो म्हणाले.टोपे सरांच्या काळजात चर्रऽऽ झाले तसा खोल गेलेला मित्राचा आवाज ऐकुन.

त्यांनी काळजीनेच विचारले,"काय रे तब्येत बरीय नाऽऽ?काही होतेय का तुला?आवाज का खोल गेलाय?"

त्यावर गंधे सर पलीकडे रडत असल्याचा भास झाला टोपे सरांना..

त्यांनी विचारलेच,"काय रेऽऽ..रडतोएस का?

काय झाले?सगळे ठिक आहे ना घरीऽऽ?"

त्यावर थोडे स्वत:ला सावरत गंधे सर बोलु लागले,"मी ठिकच आहे पण मन खूप विषण्ण झालेय.काल बारावीचा निकाल लागला तेव्हा पासुन मुक्ताची फार आठवण येतेय.जर ती असती तर आज ती नक्की बोर्डात आली असती पण आज तिचा कुठलाच ठावठिकाणा नाही.कुठं गेली पोरं कुणाला माहीत?

सगळ्यात जास्त वाईट ह्या गोष्टीचे वाटतेय की तिचा तो गूंड मवाली भाऊ केदार जेलमधुन घरी परत आला तेव्हाच मुक्ताने मला सांगितले होते की तो तिला त्रास देईल..मला आता पस्तावा होतोय की तेव्हाच मी तिला तालुक्याला तुझ्या किंवा सरूच्या घरी सोडले असते तर तिचा जीव तरी वाचला असता पण तेव्हा मला हे करायला सुचले नाही त्याची किती मोठी किंमत मला भोगावी लागतेय.माझी पोरं कुठे ह्या संसारात गूडूप झाली देवालाच ठाऊक.मी अपराधी आहे तिचा...तिची सुरक्षा नाही करू शकलो.

मी तिचे तेव्हा ऐकायला हवे होते रे..."

गंधे सर आपल्या मनातील सल बोलुन दाखवुन पहिल्यांदाच आपल्या मित्राजवळ मन मोकळे करत होते..टोपे सरांनी त्याला सगळे मनातले बोलु दिले.त्याची खदखद एकदा मनातुन दूर झाली की ही बातमी दिल्यावर त्याचा द्विगुणीत झालेला आनंद त्यांनाही बघायचा होता.

गंधे सर बोलुन शांत झाले तसे टोपे सर म्हणाले बर गजा ऐक आज मी फार आनंदी आहे,का विचार?? कारऽऽण माझ्या महाविद्यालयातील एक विद्यार्थिनी आज बोर्डात पहिली आलीय..

जरा तिच्याशी बोलतोस का तुला बरे वाटेल बघ.."

बघ म्हणतच टोपे सरांनी रिसिव्हर मुक्ताच्या हाती दिला…

मुक्ताने इकडुन हॅलो केल्याबरोबर सरांनी कान टवकारले.आवाज जरासा ओळखीचा वाटत होता.पण पुन्हा त्यांना वाटले की कदाचित आज सतत आपण मुक्ताचा विचार करत आहोत म्हणुन आपल्याला तसा भास होत असेल.

स्वत:ला सावरत त्यांनी मुक्ताचे अभिनंदन केले…

"अभिनंदन मुली!!असेच उत्तरोत्तर प्रगती करत रहा.खूप खूप आशिर्वाद!!"

"काय नाव म्हणालीस बाळ तुझे?"

त्यावर मुक्ता म्हणाली,"गुरूजी ओळखले नाही का मला?"

"मी तुमची लाडकी विद्यार्थिनी…..!"

आता मात्र गंधे सर जरा गोंधळले.

दरवर्षी कितीतरी मुले/मुली त्यांच्या हाताखालुन जातात.पण मग अशी कोणती विद्यार्थिनी होती जी इतकी हुशार असुनही ते तिला विसरले??ह्यावर ते विचारात पडले.

बरंऽऽआवाज तर ओळखीचा वाटतोय आणि ती विचारतेय मला ओळखले का?कोण असेल ही??मुकऽऽऽ….ता…??!! 

मुक्ता तर नसेल ना? 

स्वत:ला सावरतच त्यांनी विचारले,"कोण गं तु??"

त्यांच्या आवाजातला कंप मुक्ताला जाणवला तसे जास्त न ताणता शेवटी मुक्ताने सांगुन टाकले,"सर,मी तुमची लाडकी विद्यार्थिनी मुक्ताऽऽ!"

"कोऽऽऽण?म…..मुक्त….मुक्ताऽऽ…??

तु बोलतेस पोरीऽऽऽ?ख….खरचऽऽ तु मुक्ताच आहेस??"

सरांना भावनावेग आवरत नव्हता.मुक्ता सुरक्षीत आहे इतकेच नाही तर ती परीक्षेलाही बसली आणि बोर्डात पहिली देखील आली हे सगळेच त्यांच्यासाठी एक स्वप्न होतं.

दोन मिनिट पुर्ण शांततेत गेले.बहुतेक गंधे सर तिकडे रडत होते म्हणुन बोलणे खुंटले होते.

मुक्ता तसाच रिसिव्हर धरून वाट पहात बसली सर कधी बोलताहेत ह्याची.

मग रिसिव्हर टोपे सरांनी स्वत:कडे घेत म्हणाले,"अरेऽऽ गजाऽऽ लेका रडतोएस का?आवर ते आश्रु.आज इतका आनंदाचा दिवस.तुझ्या लेकीने इतके उत्तुंग यश मिळवलेय.तिला आशीर्वाद नाही देणारऽ??"

"चल पुस ते डोळे.आणि आनंदाने हसुन कौतुक कर बघु मुक्ताचे.."

टोपे सर इकडून एकटेच बोलत होते कारण त्यांना माहीत होते आपला मित्र ह्या सुखद धक्क्याने भावूक झालाय.त्याक्षणी त्याला सावरण्याचे काम फक्त टोपे सरच करू शकत होते.

"नंद्या तुझे खूप उपकार झाले रेऽऽ..त्या अनाथ लेकराला सहारा दिलास.मला तिच्या काळजीने इकडे झोप लागत नव्हती."

"पणऽऽ मगऽऽ तु मला हे सांगितले का नाहीस की मुक्ता तुझ्याकडे आहे ते???"

"माझ्या डोक्यावरचे अर्धे ओझे उतरले असते.इकडे मी काळजीत असुनही तु हे माझ्यापासुन लपवुन ठिक नाही केलेस नंद्याऽऽ…!!"

गंधे सर आपल्या मित्रावर राग काढत पुन्हा रडू लागले.

त्यावर टोपे सर म्हणाले,"गजाऽऽ तु ऊद्याच तालुक्याला ये मला भेटायला.मग बोलु सविस्तर.असे फोनवर बोलता येण्यासारखा विषय नाहीये हा.चल आता उद्याच भेटु..ये लवकर वाट पाहतोय…"

फोन बंद करतच टोपे सरांनी मुक्ताला सांगितले,"मुक्ता बाळऽऽ तुझे गंधे सर येताहेत उद्या तुला भेटायला.तु उद्या ये.आमच्याच घरी भेटू.."

त्यावर रूस्तमशेठ म्हणाले,"जी अगर बुरा ना लगे तो एक बात कहुँ?"

टोपे सरांनी खुणेनेच काय असे विचारताच रूस्तमशेठ म्हणाले,"अगर कल की मुलाकात हमारे घर हो तो??"उसके दो कारण है। जिस तरह से गंधे सर मुक्ता के लिए चिंतीत लग रहे है उस हिसाब से वो मुक्ता को दिल से चाहते है।तो जाहीर सी बात है वो मुक्ता को लेकर बहुत परेशान होंगे की वो कहाँ रहती है,लोग कौन है,कैसे है?तो मै सोच रहा हुँ की आप दोनो कल हमारे महेमान बनकर खाने के लिए आइए। उस बहाने से मुक्ता से मिल भी लेंगे और हमारा घर देखकर वो निश्चिंत हो जाएंगे मुक्ता के लिए यदि अगर आप ठिक समझो ताे।"

"ठिक है।उसके आने के बाद हम आपके पास आयेंगे।आप अपना पता छोडकर जाइए मेरे पास।"टोपे सरांनी गंधे सरांच्या वतीनेच यायचे वचन देऊन टाकले.

रूस्तमशेठ आणि मुक्ताला आनंद झाला दोघे आपल्या घरी येणार म्हणुन..

    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~

दुसरा दिवस उजाडला.इकडे मुक्ताचे दोन मास्तर जेवायला घरी येणार म्हणुन सकाळपासुन मुक्ताच्या घरी लगबग चाललेली.मालतीबाई किचनमधे त्यांच्यासाठी सुग्रास जेवण बनवण्याच्या तयारीत तर तिकडे गंधे सरांना तर सुचतच नव्हते काय करावे.घाईघाईने स्वत:चे आवरून पहिल्या गाडीनेच ते तालुक्याला जायला निघाले.आठची पहिली गाडी.तीच पकडुन गंधे सर तालुक्याला निघाले.मनात विचारांचे काहूर माजलेले.मुक्ता अचानक अशी गाव सोडून का गेली?टोप्याला ती कशी भेटली?

हा सगळा प्रकार वाटतो तितका सरळ सोप्पा नक्कीच नाही.ह्यात काहीतरी गूढ दडलेय हे नक्की पण नेमके काय? ह्याचा काही केल्या अंदाज लागत नव्हता.ही गुथ्थी तिकडे गेल्यावरच सुलझणार होती.

त्यांना कोण घाई झालेली,कधी एकदा टोप्याला भेटतो.

दोन तासांचा प्रवास ह्याच प्रश्नांनी मेंदुला कुरतडण्यात कधी संपला ते कळलेच नाही.

स्टेशनवर उतरताच टोप्या स्वत: घ्यायला आलेला पाहुन त्यांना आश्चर्यच वाटले.हातातली पिशवी संभाळत सर हलकेच गाडीतुन खाली उतरले.

त्यांची नजर टोप्यासोबत मुक्ताला शोधत होती.पण मुक्ता कुठे दिसत नव्हती.

मग टोप्या मला स्टेशनवर घ्यायला का आलाय?"

त्यांना काहीच टोटल लागत नव्हती.साशंक नजरेनेच ते मित्राकडे पाहु लागले.

टोपे सरांना लक्षात आले की गजाची नजर कुणाला शोधतेय?

त्याचेच उत्तर द्यायला तर टोपेंनी गंधे सरांना इकडे बोलावुन घेतले होते ना…!!!

त्यांचा झालेला गैरसमज की 'मुक्ता टोपे सरांकडे आहे'त्याचाच सविस्तर उलगडा करायला त्यांनी मित्राला आपल्याकडे बोलावले होते.

जुजबी गप्पा मारत मारत दोघेही टोपे सरांच्या घरी पोहोचले.

गंधे सरांना वाटले आता घरी तरी मुक्ता भेटेले.त्यांची नजर मुक्ताला अधिरतेने शोधु लागली ते पाहताच टोपे सरांनी उलगडा केला,"गजाऽऽ तुझी नजर जिला शोधतेय ती मुक्ता माझ्याकडे रहात नाहीऽऽऽ."

आता गंधे सरांचा चेहरा रडवेला झाला आणि मनात पुन्हा प्रश्नांचे वादळ उमटले.हे काय गौडबंगाल आहे?

मुक्ताच्या गायब होण्या बाबतीत असे काय रहस्य आहे??

मुक्ताला जीवंत धडधाकट बघण्यासाठी आसुसलेल्या डोळ्यात पुन्हा निराशा तरळली. त्यांचा रडवेला चेहरा पाहुन टोपे सरांनी आपल्या मित्राची समजुत घालत म्हणाले,"मित्रा, गजाऽऽ तुझी मुक्ता फार धीराची पोरं रेऽऽऽ..तिच्यावर किती संकट,प्रसंग गुदरले पण ती डगमगली नाही हंऽऽ...फार फार सहनशील आहे रे पोरंऽ…!!

मग टोपे सरांनी मुक्तावर झालेले अत्याचार ते ती इकडे कशी पोहोचली ही कहाणी सविस्तर कथन केली.

तिच्या गायब होण्यामागचे इतके भयानक सत्य ऐकुन गंधे सरांच्या डोळ्यातुन पाणी वाहू लागले.

त्या कोवळ्या जीवाला आधीच शारीरिक त्रास काय कमी होते का म्हणुन त्यात ही भर पडली.इतके अमानुष अत्याचार कसे सहन केले असतील त्या लेकराने..??

दोघांचेही डोळे पाणावलेले.दोघेही एकमेकांना आधार देत होते.

मग टोपेंनी पुढे बोलायला सुरवात केली…

"पण गजाऽऽऽ,तिच्या पाठी देव आहे.इतकी संकटे आली पण त्यातुन तिला मार्गही त्यानेच दिला.तिचे नशीब चांगले म्हणुन रूस्तमशेठ सारखा सज्जन माणुस तिला भेटला.त्यानेच तिच्यावर उपचार केले.आपल्या घरी तिला ठेवुन घेतले इतकेच नाहीऽऽ तर मुक्ताला परीक्षेला बसायला माझ्याकडे घेऊन आला.मी त्याच दिवशी मुक्ताला बोललो की तुला फोन लावुन देतो पण तीच नाही म्हणाली.केदारला तिचा ठावठिकाणा कळेल ह्या भीतीने.सावधगिरी म्हणुन मग मी ही तुला काहीच सांगितले नाही…

पण आता ती भीती नाही कारण रुस्तमशेठने तिला कायदेशीर दत्तक घेतलेय."

"आता केदार किंवा कोणीच तिच्यावर बळजबरी करून तिला त्यांच्यापासुन दूर नेऊ शकणार नाही."

"ते सगळे होई पर्यंत हा रिझल्ट लागला बोर्ड परीक्षेचा म्हणुन मग ती तुझ्याशी बोलली…"

"आज तिच्या दत्तक पालकांनी आपल्याला त्यांच्या घरी जेवायला बोलावलेय.आपल्याला तिकडेच जायचेय आता.चल आवर.आपल्याला निघायला हवे.ते लोक आपली वाट पहात असतील."

गंधे सर जरा मागेपुढे होत होते.ते आपल्या मित्राला आपली अडचण सांगत म्हणु लागले,"अरे नंद्याऽऽ,तुला माहितीय नाऽऽ मी परान्न घेत नाही ...मग आताऽऽ..?"

त्यावर आपल्या मित्राच्या खांद्यावर हात टाकत टोपे सर म्हणाले,"अरे ज्या माणसाने तुझ्या लेकीला आधार दिला,मायेचे छत्र दिले प्रेम दिले त्या लेकीचे घर परके थोडीच आहे?

"ह्या कुचकामी विचारसरणीतुन बाहेर ये मित्रा…"

तुझ्यासारखेच मीही नियम तत्त्वांवर बोट ठेवण्यात आयुष्य घालवले पण पहिल्यांदाच मुक्तासाठी त्या नियम आणि तत्त्वांना मुरड घातल्याचा मला सार्थ अभिमान वाटतोय."

"आणि दुसरी महत्त्वाची बाबा ही की 'माणसांसाठी नियम असतात,नियमांसाठी माणुस नसतो रे….'

"वेळप्रसंग पाहुन आपल्या नियमांना शिथिल करता आले पाहिजे.."

"मी तसे केले म्हणुन आज आपल्या जीवनात इतका आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण उगवलाय…"

"आणि साने गुरूंजीची प्रार्थना विसरलास का?

''खरा तो एकची धर्म ,

जगाला प्रेम अर्पावे।"

डोळे पुसत गंधे सर म्हणाले,"आज खरच माझ्या डोळ्यात अंजन पडले.कुठल्या बुरसटलेल्या विचारसरणीला पकडून आपणच माणासाला माणसापासुन दूर करतोय.खरय तुझे माणसांसाठी नियम असतात पण नियमांसाठी माणुस नसतो…!!!"

कधी एकदा तिच्या पालकांना भेटतोय असे झालेय आता…"

    ~~~~~~~~~~~~~~~~~~

सांगितलेल्या पत्त्यावर दोघेही पोहोचले.एका मोठ्या गेटजवळ ते येताच दरवानाला अगोदरच सांगितलेले असल्याने खूण पटताच त्याने गेट उघडले.

गंधे सरांचे डोळे विस्फारले ते वैभव बघुन.इतक्या मोठ्या हवेलीवजा घरात माझी मुक्ता राहते ह्याचे समाधान आणि कौतुक त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होते.

रूस्तमशेठ,मालतीबाई आणि मुक्ता एकत्रच त्यांच्या स्वागतास पुढे आले.

छानशा सलवार कमीजमधे मुक्ता खूपच सुंदर दिसत होती.मधे फक्त काही महिनेच गेले होते परंतु तेवढा काळ एखादे यूग लोटल्याइतका अमुलाग्र बदल मुक्ताच्या राहणीमानात झाला होता.अर्थात हा बदल सुखावहच होता….

अगोदरची ठिगळे लावलेल्या परकर पोलक्यातली,उपासमारीने पोट खपाटीला गेलेली,खंगलेली हिच का ती मुक्ता?असा प्रश्न पडला गंधे सरांना.

पण तिचे दैव बदलले होते.सुखाच्या दिवसांनी तिच्या आयुष्यात प्रवेश केला होता.गंधे सरांना मनातुन खूप तृप्त वाटत होते.शेवटी देवाला दया आली.तिच्या अथक परीश्रमांच्या परीक्षेतुन देवाने तिची मुक्तता केली अखेरीस.

"भगवान के घर देर है,अंधेर नही।" ही म्हण मुक्ताबाबतीत सही साबीत झाली होती.

मुक्ता गंधे सरांच्या पाया पडली तसे सरांना कंठ दाटुन आला.दु:खातिवेगाने त्यांनी तिला जवळ घेतले.कधी नव्हे ते आज मुक्ताने आपले मन रिते करत गंधे सरांच्या कुशीत शिरून रडली.

दोघांनाही आश्रु आवरत नव्हते.अखेरीस टोपे सरांनीच पुढे येऊन दोघांचे सांत्वन करत त्यांना सावरले.

सर्वजण घरात आले.मुक्ताने दोघांना पाणी दिले.

मग रूस्तमशेठनी स्वत:चा मालतीबाईंचा दोघांना परीचय करून दिला.औपचारिक गप्पा झाल्या.जलपान आणायला मालतीबाई आत वळल्या.दोघेही हॉलमधे इकडेतिकडे बघत असतानाच त्यांची नजर भिंतीवरच्या दोन तसबिरींवर थबकली.गंधे सर त्या तसबिरीला निरखुन पहात असताना त्यांना हा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटु लागला….आणि अचानक त्यांना आठवले की त्यांना शाळेत एक गुरूजी शिकवायला होते ज्यांचा चेहरा अगदी असाच होता.पण मग त्यांचे फोटो ह्या घरात कसे? हा प्रश्न त्यांच्या डोक्यात ठणकु लागला.त्यांची ती प्रश्नार्थक नजर पाहुन रूस्तमशेठनी अंदाज लावला की हे नक्की हाच विचार करत असतील की हे कोण?"

मग त्यांनी स्वत:हुनच सांगितले,"ये मेरे माँ-बाप की तस्वीर है।

ह्या उत्तराने तर ते जास्तच बुचकळ्यात पडले.हा काय प्रकार आहे?त्यांना काहीच समजेना.

त्यांनी चाचरतच रूस्तमशेठला विचारले,"इनका नाम क्या है?"

रूस्तमशेठनी सगळी कहाणी थोडक्यात सांगितली तसा त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला.

त्यांना आठवले की जोशी गुरूजी त्यांना शाळेत शिकवायला होते.त्यात रूस्तमशेठ त्यांचा मानसपुत्र म्हणल्यावर त्यांची राहीली साहीली मनातली शंका पण दूर झाली.मुक्ताबाबतीत ते आता पुर्णपणे निश्चिंत झाले कारण इतक्या संस्कारी पुरूषाच्या हाताखाली वाढलेल्या त्यांच्या मुलाच्या हातात माझी मुक्ता मानसकन्या म्हणुन पडली तेव्हा आता तिचा भाग्योदय निश्चित आहे….

दूनिया गोल आहे हे वाक्य त्यांना पुन्हा आठवले.जोशी गुरूजींनी कितीतरी विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन त्यांची आयुष्य घडवली होती त्यातच एक गंधे सरही होते.आणि तोच वारसा आता त्यांचा मुलगा रूस्तम पुढे चालवताना पाहुन त्यांना अतीव समाधान वाटले.चांगले संस्कार कधीच वाया जात नाही ह्याचे प्रत्यंतर पुन:पुन्हा येत होते गंधे सरांना.

जी शिकवण अंगिकारून गंधे सर आपल्या विद्यार्थ्यांना मदत करत आले तीच मदत त्यांनी मुक्ताला केली आणि आता त्यांच्याच एका गुरूबांधवानेही तोच वारसा पुढे चालवत मुक्ताला आधार दिला इतकेच नव्हे तर तिला स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभे राहण्यासाठी शिक्षणाची वाट सोपी करून दिली.अशा उदात्त विचाराच्या पित्याच्या घरी आज मुक्ता सुखाने राहतेय हे पाहुन गंधे सरांचा ऊर भरून आला.

गप्पा जेवणे सगळे उरकले.मुक्ता आणि आपल्या गुरूबंधु/भगिनीला भेटल्याचे अपार समाधान मनात साठवत गंधे सर परतीच्या प्रवासाला लागले.

      ~~~~~~~~~~~~~~~~~

मुक्ताला इतके चांगले मार्क्स मिळाले होते की तिला आता जे ठरवेल ते उच्चशिक्षण ती घेऊ शकणार होती.परंतु लहानपणापासुन आपल्या आईवर,स्वत:वर झालेले अत्याचार पाहुन तिला कायद्याचे शिक्षण घेण्याची अतीव इच्छा तेव्हापासुनच मनात होती.भविष्यात कोणतीही स्त्री अशा पद्धतीने परिस्थितीने नाडली जात असेल,तिच्यावर समाजाकडुन अन्याय होत असेल तर तर तिला न्याय द्यायला एक स्त्रीच तिच्या पाठी उभी असावी आणि ती स्त्री मी असावी हे मनात धरून तिने लॉ चे शिक्षण घ्यायचा निर्णय घेतला.

तिच्या निर्णयाप्रमाणे रूस्तमशेठने तिची पुण्याच्या टॉप लॉ कॉलेजला अॅडमिशन घेतली.

आत्ता कुठे मुलीची माया मिळाली आणि लगेच लेक आपल्यापासुन लांब जाणार ह्या कल्पनेने मालतीबाईंना मुक्तासाठी रडू कोसळले.

रूस्तमशेठनाही तिच्या विरहाचे वाईट वाटत होते परंतु तसे चेहऱ्यावर न दाखवता मुक्ताच्या पुढील भविष्यासाठी मनावर दगड ठेवुन त्यांनी तिला शिक्षणासाठी दूर पाठवण्याचा निर्णय घेतला.

मालतीबाई सैरभैर झाल्या होत्या पण त्यांनाही मुक्ताचे सोनेरी भविष्य घडलेले बघायचे होते म्हणुन स्वत:च्या ममतेला मनातच अडवत होत्या.एकीकडे डोळे पाझरत होते पण दुसरीकडे तिची सगळी जायची तयारीही त्याच करत होत्या.

करता करता मुक्ताचा जायचा दिवस उगवला.

टोपे सर,गंधे सरांसहीत सर्वचजण तिला निरोप द्यायला आले.साश्रुनयनांनी सगळ्याचा निरोप घेत मुक्ता आपल्या सुनहऱ्या भविष्याच्या ध्यास पर्वाकडे वाटचाल करायला मार्गस्थ झाली……………….!!

-------------------(क्रमश:-14)---------------------------------

क्रमश:-14

©®राधिका कुलकर्णी.

नमस्कार मंडळी….!

मुक्ताला सुस्थितीत बघुन गंधे सरांच्या आत्म्याला समाधान मिळाले.रूस्तम हा त्यांचाच गुरूबंधु आहे हाही नविन खुलासा झाला.आपली मुक्ता कुणा परक्या घरी नसुन आपल्याच गुरूबंधुकडे सुरक्षित आहे हे पाहुन निश्चिंत झाले मुक्ताचे सर.

मुक्ताने कायद्याच्या शिक्षणाची वाट तर धरलीय.पुढे तिचा प्रवास कुठे पोहोचतोय हे जाणुन घ्यायचे असेल तर पुढचे भाग नक्की वाचा…

लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासहीत कथा नक्की शेअर करू शकता.

हा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा..

धन्यवाद.

@राधिका.



 

🎭 Series Post

View all