Login

मी कात टाकली भाग -13

मुक्ताच्या संघर्षपुर्ण आयुष्याची प्रेरणादायी रोमहर्षक कथा.

मी कात टाकली भाग -13

©®राधिका कुलकर्णी.


 

रूस्तमशेठची कहाणी ऐकुन सुन्न झाली मुक्ता.क्षणभर तिला काय प्रतिक्रीया द्यावी हेच कळेना.

गप्पांच्या ओघात जेवणाची वेळ झाली.

मालतीबाईंनी लगेचच जेवणाची तयारी केली.जेवणं उरकल्यावर तिघेही पुन्हा हॉलमधे एकत्र जमले.

ठरल्या प्रमाणे आता मुक्ताला आपल्या पूर्वायुष्याबद्दल सांगायचे होते.पण नेमकी कुठुन कशी सुरवात करावी मुक्ताला समजत नव्हते.

मालतीबाई मुक्ताच्या जवळ येऊन बसल्या. तिच्या पाठिवरून मायेने हात फिरवत म्हणाल्या,"मुक्ताऽऽऽ घाबरू नकोस.जे घडलेय ते मोकळेपणाने बोल.तु जोपर्यंत काही सांगणार नाहीस आम्हालाही कसे कळणार की तुला हा त्रास का झाला?का तु घर सोडून बाहेर वणवण फिरते आहेस?कोण जवाबदार आहे ह्या तुझ्या अवस्थेला?तुझा आम्हां दोघांवर विश्वास आहे नाऽऽऽ??"

मालतीबाईंच्या शेवटच्या प्रश्नाने मुक्ताला गलबलुन आले.तीने मालतीबाईंच्या कुशीत शिरून मन भरेपर्यंत रडुन घेतले.मालतीबाईंनीही तिला मनसोक्त रडू दिले.तिच्या मनातील भावनांचा निचरा होणे गरजेचेच होते.मन जरा शांत झाल्यावर ती म्हणाली,"तुमच्यावर विश्वास आहे का हा प्रश्न विचारून तुम्ही लाजवताय मला काकी.मी कोण कुठली,माझ्याबद्दल काहीही माहिती नसतानाही तुम्ही माझ्यावर उपचार केलेत,माझ्यावर विश्वास टाकुन तुमच्या घरी घेऊन आलात.मुलीसारखी माया केलीत आणि तरीही जर माझा तुमच्यावर विश्वास नसेल तर मग जगात अशी कोणतीच गोष्ट नसेल ज्यावर मी विश्वास ठेवु शकेन.रूस्तमकाकांनी मला मुलगी मानली.आपल्या घरात स्थान दिले.तुम्हीही माझी इतकी काळजी घेतलीत.

खरच मागल्या जन्मीचे काहीतरी पुण्यच असेल की देवाने माझी तुमच्याशी गाठ घातली.मला कळत नाहीये कशी उतराई होऊ ह्या मायेची…

मी तर हे स्वीकारूनच चालले होते की ह्या जगात मला कोणीही नाही.ह्यापुढे असेच आला दिवस ढकलत जीवन जगायचे...मरणाची वाट पहातऽऽऽ….!!

पण तुम्ही भेटलात आणि कळले की जगात देव आहे.तुम्ही मला देवासारखे भेटले नसता तर माझे हाल कुत्र्याने खाल्ले नसते…

कसे सांगू?माझे मलाच समजत नाहीये की कुठुन सुरवात करू…..

मग मुक्ताने हळुहळु सारा जीवनपट आई वडीलांची आत्महत्या,मामीचा छळ,मामाचा मृत्यु,केदारची वाईट नजर ते त्याने केलेले पाशवी अत्याचार इथपर्यंत सर्व कहाणी कथन केली.

मुक्ताने इतक्या कोवळ्या वयात किती हाल,किती विटंबना सहन केली हे ऐकुन रूस्तमशेठ आणि मालतीबाईंच्या काळजाचे पाणी पाणी झाले.दोघेही जागेवरच थिजले.कोणत्या शब्दात तिची समजूत घालावी हे ही त्यांना समजेना.

मालतीबाई कितीतरी वेळ तिला आपल्या कुशीत घेऊन थोपटत राहील्या.

त्या सगळ्यातही तिची शिक्षणाविषयीची तळमळ,जिद्द तिने केलेला संघर्ष ऐकुन तर दोघेही दिङमुढ गेले.सर्व प्रतिकुल परिस्थितीवर मात करत,हालापेष्टा सोसत दहावीत मिळवलेले उत्तुंग यश खरचच कौतुकास्पदच होते.

त्यावरून रूस्तमशेठना एकदम एक गोष्ट आठवली तसे त्यांनी  मुक्ताला विचारले,"बेटी अगर इतने अच्छे नंबरसे तुम पास हुई हो तो तुम्हे आगे जरूर पढना चाहिए। क्या सोचा है आगे?"

त्याबरोबर मुक्ताने आपली कॉलेजची अॅडमिशन कशी झाली तेही सांगितले.बारावीसाठी खरे तर इथेच येऊन परीक्षा द्यावी लागणार होती पण आता ते स्वप्न धुसर दिसत होते तिला कारण 

मधे किती वेळ गेलाय?

परीक्षा कधी आहे ?

हे काहीच तिला माहित नव्हते.उदास मनाने मुक्ताने सगळी हकीकत कथन केली.ते ऐकल्यावर काहीतरी आठवुन रूस्तमशेठ घाईने कोचावरून उठुन बाजुच्या खोलीत गेले.मागल्या तिन चार दिवसातले सर्व वर्तमानपत्र घेऊन ते बाहेर आले आणि म्हणाले,"मैने परसों ही बारहवी कक्षा की परीक्षा की अंतिम तिथी पेपरमे पढी थी लेकीन अब याद नही आ रहा।जरा तुम भी इसमे वो खबर ढुंढो। अगर परीक्षा की तारीख को समय है तो तुम अभी भी परीक्षा दे सकती हो। "

तिघेही तिन चार दिवसातील सर्व बातम्या शोधु लागले.एका वर्तमानपत्रात मुक्तालाच ती बातमी सापडली.चार मार्च बारावी बोर्ड परीक्षेची तारीख डिक्लिअर झाली होती.

"आज काय तारीख आहे?" तिने सहजच विचारले.गेल्या कित्येक दिवसात वेऴ वार तारीख कशाशीच संबंध आला नव्हता तिचा.

तिला गंधे सरांचे एवढे एकच वाक्य आठवत होते की फेब्रुवारीत प्रिलिम परीक्षा आणि मार्चमधे बोर्ड परीक्षा आहे परंतु मधल्या काळात किती वेळ गेला होता कुणास ठाऊक त्यामुळे प्रिलिम परीक्षा झालीय की नाही हे ही तिला माहित नव्हते.

रूस्तमशेठनी कॅलेंडरच समोर ठेवले.

"देखो ..आज फेब्रुअरी की पंधरह तारीख है। मतलब तुम बोर्ड परीक्षा दे सकती हो। हम कल ही तुम्हारे कॉलेज जाकर बात करेंगे प्रिन्सिपल साहब से।

आपल्या हातात अजुन पंधरा दिवस आहेत अभ्यासाला हे ऐकुन मुक्ताचा चेहरा आनंदला.

त्या रात्री खुषीत तिला झोपच लागली नाही.

कधी सकाळ होतेय अन् कधी आपण कॉलेजला जातोय असे झाले होते मुक्ताला.

तेवढ्यात एक प्रश्न मुक्ताच्या मनात आला आणि चेहरा काळजीने वेढला.बारावीची प्रिलिम परीक्षा तर आपण दिलीच नाही.ती झालीय की व्हायचीय अजुन?जर परीक्षा होऊन गेली असेल तर मग सर आपल्याला बोर्ड परीक्षेला बसु देतील का?

त्यांनी जर नाही बसु दिले तर मग मी काय करू?

नुसत्या विचारांनीच तिचे डोळे भरून आले.मनातल्या मनात गणोबाचे स्मरण करून तिने झोपायचा प्रयत्न केला.

       ~~~~~~~~~~~~~~~

"मालतीऽऽ जरा मुक्ता के लिए कोई अच्छे से कपडे सिलवा लो अपने दर्जी चाचा से।उसे कॉलेज जाना पडेगा तो कब तक युँ तुम्हारी सारीयाँ पहनती रहेगी?"

रूस्तमशेठ आपल्या पत्नीला म्हणाले.तसे मालतीबाईंनीही सांगितले," हा विचार कालच माझ्या डोक्यात आला होता.घरात एक दोन चांगल्या साड्या आहेत माझ्या त्याचेच सलवार कमीज शिवुन द्यायचा विचार करतच होते मी.दोन-तीन दिवसात देईल शिवुन तो तोपर्यंत घालु दे साडी."

दोघांचा संवाद चाललेला तोवरच मुक्ता आपली आंघोळ वगैरे उरकुनच बाहेर आली.आज ती प्रचंड उत्साहात होती.कॉलेजला जायला मिळणार.परीक्षा देता येईल की नाही हे पुढचे पुढे पण पुन्हा एकदा शिक्षणाशी जोडले जाणार ह्या कल्पनेनेच तिचे मन आकाशात उंच भराऱ्या घेऊ लागले.

तिला कोण घाई झाली होती कॉलेजला जायची.

मालतीबाईंनी दिलेला चहा-नाष्टा उरकुन ती कालचीच साडी नेसुन तयार झाली.मालतीबाईंना लक्षात आले की तिला घालायला दुसरे चांगले कपडे नाहीत आणि आपल्याजवळ मागायला संकोच वाटत असणार म्हणुन कालचेच कपडे चढवुन बसलीय ही.

मग त्यांनी तिला आपल्या खोलीत नेले.खोलीत भिंतीतच आढ्यापर्यंत उंच असे लाकडी दरवाजाचे कपाट होते.दार उघडताच एखादे साडीचे दूकान असावे तसे कप्प्या कप्प्यांतुन विविध रंगाच्या,वेगवेगळ्या पोताच्या साड्या क्रमाने सजवुन नीटनेटक्या ठेवलेल्या होत्या.साड्यांचे ते भव्य कपाट बघुन मुक्ताचे डोळेच विस्फारले.आजपर्यंतच्या तिच्या आयुष्यात ठिगळं लावलेली पोलकी आणि जीर्ण झालेले घागरे हेच काय ते तिला माहित.तिसरा कपडा तिला माहीत नव्हता.एक अंगावर दुसरे दांडीवर.नविन कपड्यांचा वास कसा असतो हेही तिला माहीत नव्हते आणि इकडे मालतीबाईंच्या कपाटात साड्यांचा हा ढिग बघुन चकीत झाली मुक्ता.

मालतीबाईंना पहिल्या पासुनच साड्यांचे प्रचंड वेड.त्यात रूस्तमशेठही हौशी.व्यवसायानिमित्त वेगवेगळ्या शहरात फिरताना बायकोची आवड लक्षात घेऊन जिथे जातील तिथुन वेगवेगळ्या तिथल्या खास वैशिष्ट्य असलेल्या साड्या ते घेऊन येत असत.त्यामुळे वेगवेगळ्या डिझाईन प्रकारांनी त्यांचे कपाट गच्च भरलेले होते.

त्यातलीच तिच्या आवडीचा कलर विचारून एक छानशी कलकत्ता कॉटन साडी त्यांनी बाहेर काढली.त्यांचे थोडे लहान मापाचे पोलके मुक्ताला अगदी अंगाबेत झाले.त्यांनी तिला छान साडी नेसवुन दिली.तिच्या लांबसडक दाट केसांना तेल लावुन छानशी तिपेडी वेणी घालुन दिली.हे सगळं आपली लेक झाली तर मायेनं करायची कितीतरी स्वप्न त्यांनी पाहीली होती पण इतक्या वर्षांनी आज त्यांची इच्छापूर्ती होत होती.विचार करता करताच वेणी पुर्ण झाली. परसातल्या अबोलीचा सुंदर गजरा तिच्या वेणीवर त्यांनी माळला.

मोठी गोड दिसत होती मुक्ता त्या पेहरावात.

लेकराला आपलीच दृष्ट लागते की काय म्हणत मालतीबाईंनी आपले हात तिच्या चेहऱ्यावरून फिरवुन कानशिलावर मोडतच तिची दृष्ट काढली.

मालतीबाईंनी दोन दिवसात घेतलेली काळजी आणि औषधांचा परीणाम म्हणुन की काय मुक्ताच्या चेहऱ्यावर जरा तकतकी आली होती.

जखमाही कोरड्या पडल्या होत्या.वेदनाही जरा कमी झाल्या होत्या आता.

एकंदरीतच तिच्यात वेगाने फरक पडत होता.

मुळातच दिसायला गोड मुक्ता आज साडीत जास्तच सुंदर आणि शालीन दिसत होती.

सगळे आवरून दोघेही तिच्या कॉलेजकडे निघाले.

थोड्याच वेळात ते कॉलेजच्या भव्य कमानीपाशी पोहोचले.ती कमान पाहताच मुक्ताला गंधे सरांसोबतचा तो पहिला कॉलेजचा दिवस आठवला.टोपे सरांनी घेतलेली चाचणी,केलेले कौतुक सारे सारे आठवले.पण त्याबरोबर आता ही भितीही होतीच की प्रिलिम परीक्षा दिली नसेल तर बोर्ड परीक्षेला बसु देतील का?जास्त विचार न करताच ती रूस्तमकाकांसोबत कॉलेजच्या इमारतीत प्रवेशली.गाडीचे वळण घेत रूस्तमशेठनी शेडमधे गाडी पार्क केली आणि सरळ प्रिन्सिपल केबीन कडे वळले.मुक्ताच्या मनात भीती दाटुन आली.आता टोपे सर किती रागवतील?काय म्हणतील?परीक्षा का दिली नाही विचारले तर काय सांगु?अनेक प्रश्नांनी तिच्या मनात गर्दी केली.विचारांच्या तंद्रीतच ते प्रिन्सिपल केबीनपाशी पोहोचले.

        ~~~~~~~~~~~~~~~~~

केबीन बाहेरील चपराशाला आपले नाव सांगत प्रिन्सिपल सरांची अर्जंट भेट हवीय असा निरोप रूस्तमशेठनी दिला.तो निरोप देऊन जरावेळ बसा असे सांगितला.

दहा मिनिटांनी चपराशाकरवी रूस्तमशेठना आत बोलावल्याचा निरोप मिळाला तसे दोघेही सोबतच अात गेले.

सरांनी रूस्तमशेठला ओळखले नाही पण मुक्ताला मात्र त्यांनी लगेच ओळखले.गंधे सरांसोबत कळकट जराशा भेदरट अवतारात तेव्हा भेटलेली हिच ती मुक्ता का ?असा त्यांना क्षणभर प्रश्न पडला.

मुक्ताचा सगळा अवतार बदललेला होता ह्यावेळी.

अंगावर परकर पोलक्या ऐवजी ऊंची परीटघडीची साडी,दोन वेण्या ऐवजी एक वेणी,केसात माळलेला गजरा आणि सोबतचा अनोळखी इसम पाहुन टोपे सरांची खात्रीच पटली की नक्कीच गंधे सरांकडुन मिळालेल्या  माहितीप्रमाणे मुक्ता घर सोडुन पळुन गेली हे तिच्या मामीचे सांगणे जे गंधे सरांना खोटे वाटत होते ते खरेच असणार.कारण सोबत आलेला इसमही परीटघडीच्या वस्त्रात होता.म्हणजे मुक्ताने ह्या इसमाबरोबर पळुन जाऊन लग्न तर केेले नसेल ना???बंद गळ्याच्या पोलक्यामुळे मंगळसुत्र दिसत नव्हते.तिकडे गंधे सरांना तर वाटत होते की तिच्या मामी आणि त्या गूंड भावानेच हिचे काहीतरी काळबेरं केलं असणार.पण तसा कोणताही पुरावा नसल्याने गंधे सरांनी पोलिसात कंम्प्लेंट नोंदवली नव्हती.पण आत्ता टोपे सर जे रूप बघत होते ते पाहता त्यांना गंधे सरांची शंका फोल वाटू लागली.तुर्तास आपल्या मनातील विचारांचा गूंता बाजुला सारून त्यांनी रूस्तमशेठकडे पहात विचारले,"बोला...काय काम आहे आपले माझ्याकडे?"

त्यावर रूस्तमशेठनी एक दिर्घ श्वास घेतला आणि म्हणाले,"जी काम वैसे मेरा नही मेरी इस बेटी का है।"

मग त्यांनी मुक्ताबाबत घडलेला ऋदयद्रावक प्रसंग,त्यातुन तिने त्यांच्या तावडीतुन करून घेतलेली सुटका तिथपासुन ते ती त्यांना कशी भेटली इथपर्यंतच्या सर्व घटना क्रमाने सांगितल्या.

ते सगळे ऐकुन टोपे सरांना काही वेळापूर्वी आपण केलेल्या अनुमानाची लाज वाटली.

एवढ्या सगळ्या प्रसंगातुन जाऊनही तिची शिकण्यासाठीची उमेद पाहुन टोपे सरांना मुक्ताचे खूप कौतुक वाटले.

आपले डोळे रूमालानी पुसतच त्यांनी मुक्ताला जवळ बोलावले.तिच्या डोक्यावर हात ठेवुन आशिर्वाद देत म्हणाले,"बाळ मुक्ताऽऽ..खरच तुझ्या जिद्द आणि धाडसाचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.परंतु कॉलेजचेही काही नियम आहेत.प्रिलिम परीक्षेचा आजच शेवटचा पेपर होता.तो काय आत्ताच सुरू झालाय.आणि प्रिलिम दिल्या खेरीज तुला हॉलतिकिट मिळणार नाही….कसे करायचे…??"

टोपे सर विचारात पडले होते.मुक्तासारख्या गुणी आणि हुशार मुलीची सर्वतोपरी मदत करायची त्यांना फार इच्छा होती पण कॉलेजच्या प्राचार्यासारखे महत्त्वाचे स्थान भुषवत असताना कुठलाही नियमभंगही होऊ द्यायचा नव्हता.मग ह्यातुन एखादी पळवाट कशी शोधता येईल ह्याचाच ते विचार करत होते.पण मुक्ता मात्र लगेच म्हणाली,"सर तुम्ही परवानगी देत असाल तर आजचा चाललेला पेपर मी आत्ताही सोडवायला तयार आहे.माझा अभ्यास गंधे सरांनी पुर्ण करून घेतला होता.मी प्रयत्न करते पेपर लिहायचा."

ते ऐकताच सरांना ती कल्पना आवडली.त्यांना एक युक्ती सुचली.

ते उत्साहातच म्हणाले,"तु अस कर मुक्ताऽऽऽ….माझ्या केबीनमधेच मी तुझी पेपर लिहायची सर्व व्यवस्था करतो.तु आज एका दिवसात किती पेपर्स सोडवु शकतेस?"

मुक्ताने लगेच उत्तर दिले,"सर मी दोन पेपर आज सोडवेन.."

सरांनी शिपायाकरवी त्यांच्याच केबीन मधे सर्व व्यवस्था लावुन मुक्ताला आजच्या विषयाचा पेपर सोडवायला दिला.

तिने पटापट पेपर वाचुन लिहायला सुरवात केली.अवघ्या अडीच तासात सर्व पेपर सोडवुन तिने तो सरांकडे सोपवला.टोपे सर आज पहिल्यांदाच तिचा पेपर प्रत्यक्षपणे तपासत होते.तिने कुठलीही तयारी नसताना अचानकपणे पेपरला बसुनही अतिशय उत्तम पेपर सोडवलेला पाहुन टोपे सरांना तिच्या असामान्य बुद्धिमत्तेच कौतुक वाटलं.

मनाशी त्यांनी काहीतरी ठरवले.

जसे मुक्ताने दोनही पेपर्स लिहुन पुर्ण केले तसे त्यांनी तिला सांगितले,"हे बघ पोरी तुझ्यावर गुदरलेला प्रसंग आणि त्यातुनही तुझी शिकण्यासाठीची तळमळ बघुन तुझे वर्ष वाया जावे असे काही मला वाटत नाही म्हणुन उभ्या आयुष्यात कधीही नियमांना आणि तत्वांना मुरड घालुन कुठलेही नियमबाह्य काम न केलेला मी आज तुझ्यासाठी एक निर्णय घेतोय वाकडी वाट करून फक्त तुला मदत म्हणुन.

तु माझ्या ह्या मदतीची जाण ठेवुन प्रामाणिकपणे पेपर सोडवण्याची हमी देत असशील तर मी अजुन दोन पेपर्स घरी जाऊन लिहायची परवानगी देतो.

म्हणजे आज चार आणि उद्या दोन मिळुन तुझी सर्व प्रिलिम परीक्षा पुर्ण होऊन जाईल.पेपरचे सर्व गठ्ठे अजुनही माझ्याकडेच आहेत त्यामुळे मी ते त्या त्या गठ्ठ्यात टाकुन मगच तपासनिसांकडे वाटप करेन.

तुला उद्याही कॉलेज मधे येऊन राहीलेले दोन पेपर्स सोडवावे लागतील...आहे कबुल??"

सरांनी विचारताच मुक्ता लगेच तयार झाली.टोपे सरांनी प्रश्नपत्रिका,उत्तरपत्रिका,पुरवणीपेपर्स,

पेपर व पुरवणी जोडण्यासाठीचा धागा असे सर्व दोन पेपर्सचे साहित्य बांधुन तिला दिले.उद्या येताना ते सोडवुन आणायचे होते तिला.

तसेही तिची कहाणी ऐकता तिच्याजवळ किंवा ज्या घरात रहात होती त्यांच्याकडेही बारावी परीक्षे संदर्भातले कुठलेही अभ्यासकीय साहित्य जसे की पुस्तके,नोट्स असे काहीच घरात उपलब्द्ध असण्याची दूर दूर पर्यंत शक्यता नव्हती त्यामुळे कुठलीही कॉपी करण्याची भीती नव्हतीच आणि दुसरे असे की मुक्तासारखी हुशार प्रामाणिक मुलगी असल्या कुठल्याही गैरमार्गांचा अवलंब करणार नाही ह्याची त्यांना खात्री होती.म्हणुनच त्यांनी इतके मोठे धाडसी पाऊल उचलुन मुक्ताची मदत करायचा निर्णय घेतला होता.

संध्याकाळ झाली होती.आज सकाळी निघताना मुक्ताला कल्पनाही नव्हती की संध्याकाळ होईल घरी यायला.दोन पेपर सलग सोडवुन मुक्ता घरी आली ती आनंदाने उड्या मारतच.टोपे सरांच्या मदतीमुळे ती प्रिलिम परीक्षा देऊ शकणार होती ह्याचाच तिला विशेष आनंद होता.

सकाळपासुनची उपाशी असुनही तिला तहान भूक सगळ्याचा विसर पडला होता आज.घरी आल्याबरोबर हातपाय ताेंड धुवुन मुक्ता लगेच पेपर सोडवायला बसली.

दिवस दिवस काही न खाता पिता रहायची तशीही तिला सवयच होती.परंतु मालतीबाई आणि रूस्तमशेठना मात्र तिच्याविषयी काळजी वाटत होती.त्यांच्या प्रेमळ आग्रहाला मोडवेना मुक्ताला.घाईघाईत कसेबसे चार घास पोटात ढकलत ती पेपर सोडवायला बसली.तिची पेपर सोडवतानाची तल्लिनता बघुन मालतीबाईंना आपले कॉलेजचे दिवस आठवले.त्याही अशाच ध्यासाने अभ्यास करायच्या.

रात्री बराच उशीरा पर्यंत बसुन मुक्ताने दोन्ही पेपर्स सोडवले आणि झोपी गेली.दुसऱ्या दिवशीही लवकरच कॉलेजला पोहोचुन उर्वरीत दोन पेपर्सही तिने मन लावुन सोडवले अशा तऱ्हेने इतर मुलांची दहा दिवस चालणारी परीक्षा मुक्ताने केवळ दोनच दिवसात पुर्ण केली.जो तो पेपर ज्या त्या गठ्ठ्यात जाऊन पडला तसे हायसे वाटुन मग सर मुक्ताशी जरा मोकळेपणाने गप्पा मारण्यासाठी तिला आपल्या केबीनमधे बसवुन घेतले.

    ~~~~~~~~~~~~~~~~~~

"बाळऽऽ मुक्ता कशी आहेस? हे कोण आहेत ज्यांच्याकडे तु सध्या रहात आहेस?"

तुला जर त्यांच्या घरात रहायला काहीही अडचण वाटत असेल तर सांग.माझ्या घराचे दार सदैव उघडे आहे तुझ्यासाठी.अजिबात संकोच करू नकोस."

टोपे सर मनातुन बोलत होते.

मुक्ता सरांना म्हणाली,"सर आज मी तुमच्यासमोर धड अवस्थेत उभी आहे ती केवळ आणि केवळ रूस्तमकाकांमुळेच.त्यांनी जर योग्यवेळी मला हॉस्पीटलमधे नेऊन उपचार केले नसते तर आज कदाचित तुम्हाला मी जीवंतही तुमच्या समोर दिसले नसते.रूस्तमकाका देवमाणुस आहेत अगदी.त्यांनी माझी मुलीप्रमाणे काळजी घेतली.मला इकडे परीक्षेसाठी घेऊन आले.मी त्यांचे उपकार जीवनभर विसरू शकत नाही."

मुक्ताला कंठ दाटुन आला बोलताना.

टोपे सर विषय बदलावा म्हणुन म्हणाले," एक काम करूयात का,तुझ्या गंधे सरांशी बोलतेस का,तु सुखरूप आहेस हे ऐकुन त्याला खूप आनंद होईल.फार काळजीत आहे गं तो तिकडे.तु शिकवणीला गेली नाहीस म्हणुन तुझ्या घरी सहजच चौकशीला गेला तेव्हा तुझ्या मामीनी खूप गोंधळ घालुन पोरीनी कसे तोंड काळे केले ते रंगवुन रंगवुन सांगितले गंधेला...त्याने खूप शोध घेतला पण गावात तुझा कुठेच ठावठिकाणा लागला नाही तसे त्याला तुझ्या घरच्यांवर संशय येवु लागला की त्यांनीच तुला जीवानिशी मारून पळुन गेल्याचा कांगावा करताहेत की काय..मला त्याने फोन करून ही बातमी दिली तेव्हा मी ही खूप व्यथित झालो होतो.पण आज तुला धडधाकट संपन्न अवस्थेत पाहुन खूप शांती मिळाली बघ आत्म्याला..

गंधेलाही तसाच आनंद होईल.चल तुला फोन लावुन देतो.बोल त्याच्याशी.

असे म्हणतच टोपे सर आपल्या मित्राच्या फोनचा नंबर डायल करणार तोच मुक्ताने त्यांना रोखले..

"सर थांबाऽऽ.मला कल्पना आहे माझ्या अचानक नाहिसे होण्याने गंधे सर किती काळजीत पडले असतील परंतु मला परीक्षेचा निकाल लागे पर्यंत माझ्या ठावठिकाण्याची माहिती गावातल्या कोणालाही द्यायची नाहीये.माझ्यावर एवढी कृपा करा सरऽ….प्लिज ह्यातले एकही वाक्य तुम्ही सरापर्यंत पोहोचु देणार नाही असे वचन द्या मला..माझा तो भाऊ नजर ठेवुन असणार सरांवर.जर का सर मला भेटायला इकडे आले तर केदार माझ्यापर्यंत सहज पोहोचेल आणि हेच मला होऊ द्यायचे नाहीये.तुम्ही कृपया आत्ता ही बातमी कुणालाच सांगु नका…"

टोपे सरांना तिचा मुद्दा पटत होता.गावात जर कुणाला मुक्ताची चिंता होती तर ते गंधे सर त्यामुळे मुक्ताने कुठुनही सरांशी संवाद साधला तर सर नक्की तिला भेटायला तिथे जातील आणि केदारला मग आयताच मुक्ताचा पत्ता मिळेल.तिच्या पुढील आयुष्यात जर काही चांगले घडायचे असेल तर आता तिला आधीचे पाश तोडावेच लागणार होते..

टोपे सरांनी मुकपणे तिला साथ द्यायचे ठरवले..

मुक्ताने सरांकडुन रोज लायब्ररीत बसुन अभ्यास करण्याची परवानगी मागितली.ती त्या कॉलेजचीच विद्यार्थिनी असल्याने तसेही नाही म्हणायचा काही प्रश्नच नव्हता.

त्यांच्या गप्पा संपेपर्यंत रूस्तमशेठ मुक्ताला घ्यायला आले.प्रसन्न मनाने ती घरी गेली.

मग दुसऱ्या दिवसापासुन रूस्तमशेठ जवळपास सकाळी सात वाजताच तिला कॉलेजला सोडू लागले.

पूर्वी मामीकडे घरची सगळी कामे उरकुन मुक्ताला दिवसभरात फक्त दोन ते तीन तासच मिळायचे अभ्यासाला पण आता ईकडे ती दिवसाचे सतरा अठरा तास अभ्यास करू लागली.गेल्या पंधरावीस दिवसाचा जो जो अभ्यास तीचा बुडला होता तो सगळा तिने अवघ्या दोन दिवसात संपवला.त्या विस्तीर्ण लायब्ररीत तिला हवी ती पुस्तके वाचनासाठी उपलब्द्ध होती.ती अक्षरश: पुस्तकांवर तुटुन पडत एकेका दिवसात सबंध पुस्तकाचे वाचन करून आवश्यक त्या नोट्स तयार करत होती.

वाचनालय बंद होईपर्यंत ती तिथेच अभ्यास करे मग वाचनालय बंद व्हायची वेऴ झाली की काही पुस्तके ती घरी नेऊन वाचे.गेल्या तीन आठवड्यात बुडलेला सगळा अभ्यास आणि पेपर्स सोडवणे ह्यावरच तिने भर दिला.

म्हणता म्हणता पंधरा दिवस संपले आणि परीक्षेचा दिवस उजाडला.

एक एक करता मुक्ताचे सर्व पेपर्स संपले.

परीक्षा संपली तसे तिच्यामनावरचे मोठ्ठे ओझे उतरले.

पण अजुनही तिची वैद्यकीय तपासणी राहीली होती.

एक दिवस मालतीबाईंनीच तिला सर्व कल्पना देऊन झाल्या घटनेचे संभाव्य धोके सांगुन तिची तारीख विचारली.खरे तर तिला आता तारीखही आठवत नव्हती.त्यामुळे मालतीबाई तातडीने तिला स्त्रीरोग तज्ञाकडे तपासणी करता घेऊन गेल्या.

तपासणीचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आले म्हणजे कुठलीही गर्भधारणा कर्मधर्मसंयोगाने झाली नव्हती ही समाधानाचीच बाब होती.

आता फक्त बारावीच्या निकालाचीच वाट होती…….

आयुष्यातील एक दुष्टचक्र संपुन आता यशाच्या दिशेने मुक्ताची वाटचाल वेगाने सुरू झाली होती..

येणारा भविष्यकाळ काय घेऊन येेतो हेच पहाणे बाकी होते………!

-------------------(क्रमश:13)-------------------------------

क्रमश:-13

©®राधिका कुलकर्णी.

मुक्ताच्या आयुष्यातील दु:खाचे काळे ढग सरून आनंदाच्या सुखाच्या रिमझिम बरसातीला सुरवात झालीय.

आता मुक्ताचा हा प्रवास पुढे कुठे जाणार हे वाचायचे असेल तर पुढचे भाग नक्की वाचा.

आजचा भाग कसा वाटला हेही कमेंटमधे जरूर सांगा.

लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासहीत कथा नक्की शेअर करू शकता.

धन्यवाद.

@राधिका. 

🎭 Series Post

View all