A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_sessionb9b8467089128da5e5941c8f519dcefd8e2f2773fd2ef60756aabe28fedd4334075d7342): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Mii Kaatt Taaklii bhag - 11
Oct 27, 2020
स्पर्धा

मी कात टाकली भाग -11

Read Later
मी कात टाकली भाग -11

मी कात टाकली भाग -11

©®राधिका कुलकर्णी.


 

दिवस वर आला आणि उन्हाचा चटका बसू लागला तशी मुक्ताला जाग आली.सभोवार नजर फिरवली तर रोडच्या पलिकडे विस्तीर्ण शेत दिसत होते.काल रात्रीच्या अंधारात तिला हे काहीच दिसले नव्हते पण आता मात्र त्या शेताकडे बघुन तिला जरा हुशारी आली.अंग वेदनेने ठणकतच होते.पोटात अन्नाचा कण नव्हता कित्येक दिवस.ती शेतात कुठे पाणी मिळतय का ह्याचा शोध घेऊ लागली.जवळच पिकात सोडलेल्या पाण्याचं एक डबकं तयार झालं होत.तिने पाणी न ढवळु देता अलगद आेंजळीने वेचुन पहिले आपली तहान भागवली आणि मग त्याच पाण्याने आपले उग्र घाणेरड्या आंबट वासाचे किती दिवस पाणीही न लागलेले अंग स्वच्छ केले तसे तिला थोडी तरतरी जाणवली.

जास्तकाळ एका जागी वेळ काढुन तिला कुठलाही धोका पत्करायचा नव्हता म्हणुन ती लगेच तिथुन उठली आणि पायी प्रवासाला लागली.किती किती दिवस ती सतत नऊ-दहा तास अनवाणी चालत रहायची.वाटेत कोणी वाटसरू तिला सहजच काही हातावर देऊन जायचा तेवढेच काय ते पोटात पडायचे एरवी कुठेही पाणवठ्यावर पाणी पिऊन आपली तहान शमवत ती अविरत चालत रहायची.कधी थकुन श्रमाने झोप लागली की कुठेही झोपायची.असाच प्रवास चालत राहीला तिचा.कित्येक दिवस सततच्या चालण्याने तळपायाची सालं निघुन त्याला फोडं आले होते.अंगावरचे कपडे फाटके आणि मलीन झाले होते.अंगाला,कपड्यांना दुर्गंधी सुटली होती.कित्येक दिवसात पुरेसं खायला न मिळाल्याने तिचा देह कृष झाला होता.डोळे खोल गेलेले होते.एके काळी दहावी बोर्डात गावात पहिली आलेली हिच ती मुक्ता असे कुणाला सांगुनही पटले नसते इतकी तिची दयनीय अवस्था झाली होती.अशीच चालता चालता अंगातली ताकद संपल्याने तिच्या डोळ्यापुढे अंधारी आली त्याचवेळी समोरून येणाऱ्या मोटारगाडीचा तिला धक्का बसायला आणि ती चक्कर येऊन पडायला एकच गाठ पडली.

ती पडली तो शितला मातेच्या मंदिराबाहेरचा परीसर होता.

आज मंगळवार त्यामुळे नित्य नियमाप्रमाणे रूस्तमशेठ शितलादेवी मंदिराच्या परिसरात अन्नदान करायला आलेले होते.मंदिरात येणारा प्रत्येक भाविक तसेच मंदिराबाहेर बसणारे भिकारी गरीब गरजु सगळ्यांना त्या प्रसादाचा लाभ मिळत असे.अचानक एक तरूण मुलगी गाडीसमोर येऊन पडल्याचे पाहुन घाबरून ते गाडीतुन खाली उतरून तिच्याजवळ गेले.तिची एकंदर परिस्थिती पाहता तिची अवस्था खूपच दयनीय दिसत होती.गाडीचा धक्का लागण्या आधीच ती चक्कर येऊन पडली होती.एव्हाना बरीच गर्दी जमा झाली तिकडे.सगळे तिला बघत होते.रूस्तमशेठनी मुद्दाम तिला कोणी ओळखते का ह्याची चौकशी केली पण तिला तिकडे कोणीच ओळखत नव्हते हे कळल्यावर त्यांनी तिला तशीच आपल्या गाडीत घालुन दवाखान्यात नेले.

डॉक्टरांनी तपासणी अंती हेच सांगितले की अंगात ताकद नसल्याने चक्कर आलेली दिसतेय.तसेच अंगावरच्या असंख्य जखमा,

चेहऱ्यावरच्या पाठीवरच्या नखांनी ओरबाडल्याच्या असंख्य खूणा तिच्यावर बरेच शारीरिक अत्याच्यार झाल्याचे स्पष्टपणे दर्शवत होते.म्हणुनच कदाचित ती खूप दिवस पायीच प्रवास करत इकडे पोहोचली असावी.तळपायाचे पोपडे आणि रक्ताळलेल्या जखमा त्याची स्पष्ट ग्वाही देत होते.ते सगळे ऐकुन रूस्तमशेठ हळहळले.इतक्या कोवळ्या वयात बिचारीने किती आघात सहन केले ह्या विचारांनीच त्यांना दया आली तिची.

तिच्यावर चांगल्यात चांगले उपचार करायची सुचना देऊन ते डोळे टिपतच दवाखान्याच्या बाहेर पडले कारण आजचा त्यांचा अनेक वर्षांपासुनचा चालत आलेला अन्नदानाचा नेम ते अर्ध्यावर सोडुन इकडे आले होते.

ते परत मंदिरात तर आले पण मन मात्र त्या मुलीतच अडकलेले.कोण आहे ती मुलगी?कोणी तिच्यावर इतके अमानुष अत्याचार केले असतील? त्यांच्या मनात तिच्याविषयी कुतुहल जागृत झाले होते.

मंदिरातला अन्नसोहोळा पार पाडुन ते पुन्हा हॉस्पीटलला गेले.

आता तिला नर्सने हॉस्पीटलचे कपडे चढवुन जखमांवर मलमपट्टी करून सलाईन चढवले होते.ती अजुनही शुद्धीत आलेली नव्हती.

रूस्तमशेठ पुन्हा डॉक्टरांना भेटायला गेले आणि तिच्याविषयी आणखी काही माहिती मिळतेय का हे जाणुन घ्यायचा प्रयत्न केला.

डॉक्टरांनी तपासणी करताना तिच्या शरीरावर पडलेल्या वीर्याचे डाग तिच्या गुप्तांगामधुन झालेला रक्तस्त्राव ह्या वरून हा अनुमान लावलाच होता की तिच्यावर कोणीतरी पाशवी बलात्कार केला असेल.तेच सत्य डॉक्टरांनी रूस्तमशेठना सांगितले.रूस्तमशेठच्या डोळ्यात पाणी तरळले.त्यांनी डॉक्टरांना निक्षुन बजावले की तिच्या उपचारात कुठलीही कसुर होता कामा नये.आणि तिला शुद्ध आल्याबरोबर मला ताबडतोब कळवा.मी येईपर्यंत तिला हॉस्पीटल सोडुन जाऊ देऊ नका.

डॉक्टरांनी होकार दिला तसे रूस्तमशेठ पुन्हा आपल्या कामासाठी बाहेर पडले.

जवळपास चोवीस तासांच्या अवधी नंतर मुक्ताला शुद्ध आली.डोळे उघडुन ती सभोवार बघु लागली.हाताला ठिकठिकाणी बँडेज दिसत होते.दुसऱ्या हाताला सलाईन लावलेले दिसत होते.तिला काहीच समजत नव्हते की आपण नेमके कुठे आहोत.दवाखान्यात असु तर इथे कोणी आणलं आपल्याला?कदाचित केदारच्याच तावडीत तर नाही ना सापडले पुन्हा??

मामीला दाखवायसाठी दवाखान्यात भर्ती केले नसेल कशावरून? ?

नाहीऽऽऽ...नाहीऽऽऽ..आता पुन्हा त्या नष्टचक्रात नाही अडकायचेय मला त्यापेक्षा मी अशीच मेलेली बरी..तिने खटाखट सलाईनची सुई हातातुन उपसुन काढली आणि बेडवरून खाली उतरून आता जायला लागणार तोच नर्स आत आली.तिला सलाईनची सुई काढुन पळुन जाताना बघुन ती घाबरली आणि मुक्ताला घट्ट पकडतच तिने डॉक्टरांना हाक मारली.

मुक्ताने तिला विरोध करायचा भरपुर प्रयत्न केला परंतु अंगात पुरेशी ताकद नसल्याने तिला तेवढ्या झटापटीनेही दमायला झाले,थकवा आला.तिचा श्वास फुलला.मग तिने माघार घेतली.नर्सने पुन्हा तिला व्यवस्थित बेडवर निजवुन सलाईन पुन्हा सुरू केले.तोपर्यंत डॉक्टर रूस्तमशेठना मुलीला शुद्ध आल्याचे कळवुन मुक्ताच्या खोलीत आले.आता मुक्ता पुर्णपणे शुद्धीत आली होती.डॉक्टरांनी नेहमीचे स्मित करत तिची नाडी तपासता तपासताच प्रश्न केला..,"काय कसे वाटतेय आता पेशंटला?"

त्यावर मुक्ता फक्त किंचित हसली पण अजुनही तिला उलगडा होत नव्हता की ती नेमकी कुठे आहे?ती इकडे हॉस्पीटलमधे कशी?कोणी आणल तिला इकडे??

डॉक्टर तिच्या बँडेजला आणि शरीरावरच्या इतर जखमांना चेक करत होते ते पाहुन धीर एकवटुन मुक्ताने प्रश्न केला,"डॉक्टर साहेब मला इकडे कोणी आणलं?आणि हे काेणतं गाव आहे?"

तिच्या प्रश्नांनी डॉक्टरांनी चमकुन तिच्याकडे पाहिले.

आत्तापर्यंत त्यांना ती चक्कर येऊन बेशुद्ध झाली इतकेच वाटत होते परंतु तिला गावाचे नावही आठवत नाही म्हणजे तिची मेमरी गेलीय का अशी शंका चाटुन गेली त्यांना..

आपली शंका खरीय का ह्याची खात्री करायला डॉक्टरांनी तिलाच प्रतिप्रश्न केला,"बाळऽऽ काय नाव तुझं?"

त्यावर मुक्ताने डॉक्टरांना आपले नाव गाव सांगितले. त्यावर मग डॉक्टरांनी जरा धीर एकवटुन प्रश्न केला,"मुक्ता तुझ्या शरीरावर ह्या इतक्या जखमांच्या खुणा कशा?कोणी मारहाण केलीय का तुला?"

त्या प्रश्नासरशी मुक्ताला त्या बंद खोलीतील सगळा अमानुष प्रसंग डोळ्यापुढे आला आणि नकळत डोळे झरायला लागले..

तिच्या मनावर कोणीतरी जबरदस्त आघात केलाय हे जाणवताच डॉक्टरांनीच विषय बदलला,"हे बघ बाळऽऽ घाबरू नकोस. इथे तु पुर्ण सुरक्षित आहेस.तु शिरपूरात आहेस.इथले प्रतिष्ठित उद्योगपती रूस्तमशेठ ह्यांच्या गाडीखाली तु चक्कर येऊन पडलीस म्हणुन त्यांनीच तुला ह्या नर्सिंग होममधे अॅडमिट केलेय स्पेशल रूममधे स्पेशल ट्रिटमेंटसह.तेव्हा शांतपणे आराम कर."

हे बोलता बोलताच डॉक्टरांनी तिला एक पेनकिलरचे इंजक्शन दिले.थोड्याच वेळात तिला पुन्हा झोप लागली.तिच्या शरीराला विश्रांतीचीच गरज होती.थोड्याच वेळात रूस्तमशेठ परत आले.त्यांना कधी एकदा तिला चालतं बोलतं पाहतो असे झालेले परंतु ते येईपर्यंत इंजेक्शनच्या प्रभावाने ती पुन्हा ग्लानीत गेली होती.ते परत डॉक्टरांच्या केबिनमधे आले.डॉक्टर वॉर्डमधे राऊंडला गेले होते.त्यामुळे रूस्तमशेठ तिकडेच अस्वस्थपणे डॉक्टर यायची वाट पहात बसले.

पाच दहा मिनटात डॉक्टर राऊंडवरून केबीनमधे आले.रूस्तमशेठना बघुन त्यांनी मंद स्मित केले.न राहवुन रूस्तमशेठ म्हणाले,"डॉक्टर तुमचा फोन आला तसा मी धावतच इकडे आलो.कशी आहे ती मुलगी आता?शुद्धीवर आल्यावर काही बोलली का ती??"

त्यांची अधिरता पाहुन डॉक्टरांनी त्यांना अगोदर पाण्याचा ग्लास पुढे केला आणि मग म्हणाले,"रिलॅक्स मि.रूस्तम ..She is perfectly fine. तीने तिचे नाव गाव सांगितलेय पण बाकी गोष्टी बद्दल मात्र तिने काहीच सांगितले नाही.सध्या तिला विश्रांतीची गरज आहे.तिचे शारीरिक मानसिक फार श्रम झालेत.म्हणुनच मी तिला पेनकिलर सोबत सिडेटिव्हजचा डोसही दिलाय.. आता ती कमीत कमी आठ दहा तास तरी औषधांच्या प्रभावामुळे उठणार नाही.तुम्ही असे करा.उद्या साधारण ह्याच वेळी या.म्हणजे ती पुर्णपणे शुद्धीवर आलेली असेल."

त्यावर रूस्तमशेठनी विचारले,"तिला हॉस्पीटलमधुन डिस्चार्ज कधी मिळणार?"

डॉक्टर- आज तिला दिवसभर आॅब्जर्वेशन मधे ठेवतो. मग उद्या बघु.परिस्थिती बघुन ठरवु.सगळे ओके असेल तर ऊद्या दूपारी किंवा संध्याकाळी देऊ डिस्चार्ज.."

त्यावर रूस्तमशेठ शांतपणे केबीन बाहेर पडले.एकवार मुक्ताला रूमच्या दरवाज्यातुनच बघितले.ती बेडवर शांतपणे झोपली होती.तिकडुनच आशिर्वादाचा हात उचलुन ते घरी परतले.

     ~~~~~~~~~~~~~~~~~

दुसरा दिवस.सकाळची वेळ.साधारण दहाचा सुमार.अचानक मुक्ताची हालचाल व्हायला लागली.कदाचित आैषधाचा प्रभाव उतरल्याने ती जागी होत होती.नर्स बाजुलाच बसलेली होती.मुक्ताने डोळे उघडझाप केले.अंग झोपुन झोपुन जड पडले होते.मुक्ताला जाग येताच ती कालसारखा प्रकार करेल ह्या भितीने नर्सने डॉक्टरांना आणि डॉक्टरांनी लगेच रूस्तमशेठना कळवले.वेळ न दवडता रूस्तमशेठ ताबडतोब हॉस्पीटलला आले.

इकडे मुक्ताची चुळबुळ वाढली अखेर तिने डोळे उघडले.डोळे उघडताच कालचीच नर्स समोर बघुन तिने एक आेळखीचे स्माईल दिले.हसताना देखील तिच्या चेहऱ्याला ताण पडत होता.नर्सने तिची पल्स चेक केली.बाकीच्या जखमा वगैरे तिचा बीपी सगळ्या प्राथमिक चाचण्या नॉर्मल दिसल्या तसे तिला हायसे वाटले.तेवढ्यात डॉक्टर आणि रूस्तमशेठ एकत्रच मुक्ताच्या रूममधे प्रवेशले.सहा फूट उंची,गोरा वर्ण कपाळावर दोन भुवयांच्या मधे पांढरा भस्माचा टिळा अाणि पांढरा परीटघडीतला झब्बा पायजमा अशा पेहरावातली अतिशय सात्विक तेज:पुंज व्यक्ती समोर पाहुन क्षणभर मुक्ता विचारात पडली,कोण आहे ही व्यक्ती?

कालपासुन नाव ऐकल्यानंतर तीची शुद्धावस्थेत पहिल्यांदाच ओळख होत होती रूस्तमशेठशी.

तिला बघुन रूस्तमशेठनी आेळखीचे स्माईल दिले.प्रतिसादात आपसुकच मुक्ताच्या चेहऱ्यावर हसु उमललं परंतु अजुनही ही व्यक्ती कोण हा उलगडा तिला होत नव्हता.तिचा विचारात पडलेला चेहरा बघुन डॉक्टरांनीच तिची अडचण सोडवली..ते रूस्तमशेठ कडे अंगुलीनिर्देश करत म्हणाले,"मुक्ता हेच ते रूस्तमशेठ.इथले प्रतिष्ठीत उद्योगपती.काल ह्यांच्याच गाडीखाली येता येता वाचलीस तु.ह्यांनीच तुला ह्या नर्सिंग होममधे आणले,तुझ्यावर उपचार केले आणि आता तु एकदम ओके आहेस.त्यामुळे तुला आम्ही इथुन डिस्चार्ज करतोय.

फक्त काही दिवस ह्या जखमांवर मलमपट्टी करावी लागेल.त्यासाठी आठ दिवसांनी परत यावे लागेल.आणि काही औषधेही लिहुन देतोय ती महिनाभर घ्यावी लागतील.बाकी तु आता ठिक आहेस."

मुक्ता मुकपणे सगळे ऐकत होती पण चेहऱ्यावर काळजीचे ढग जमा झाले.आता जायचे कुठे?इथे तर आपले कोणीच ओळखीचे नाही आणि असते तरी तिला आता कुणाही ओळखीच्या जागी जायचेच नव्हते.कुठुनही केदारला आपला ठावठिकाणा कळला तर लगेच तो आपल्या मागावर तिथेही येऊन पोहोचेल..मनात विचारांची ही गर्दी जमा झाली.कुठे जायचे,काय करायचे काहीच माहित नव्हते.पुढे फक्त अंधार दिसत होता.

तेवढ्यात रुस्तमशेठचे वाक्य कानी पडले,"बेटी तुम यही रूको.मै अभी आता हुँ।"

त्यांचे बेटी हे संबोधन एेकुन ती चकीत झाली.मी कोण कुठली.ओळख ना पाळख तरी ह्या माणसाने माझी केवढी काळजी केली.खरच बाप असाच असतो का?मग माझा बाप का इतका राग राग करायचा माझा?असोऽऽऽ..

जगात जिथे माझ्या बापासारखे निक्रंट काळजाचे पुरूष आहेत,जिथे केदारसारखे वैशी नराधम आहेत तिथे गंधे सर आणि आता ह्या रूस्तमकाकांसारखे दयाळु माया करणारे पुरूषही अाहेत.माझे नशिब चांगले म्हणुन जेव्हा एका पुरूषाकडुन माझा छळ झाला तेव्हा दुसऱ्या दयाळु पुरूषाचा आधारही मिळाला.जेव्हा बाप आणि मामी सारखे वाईट लोक मिळाले तेव्हा आई,मामा आणि गंधेसरांनी मायेचा हात डोक्यावरून फिरवला.माझ्या प्रत्येक अडथळ्यांना दूर करून शिक्षणाची वाट सुलभ केली.आताही केदारने शरीराचे लचके तोडून माझी जगण्याची उमेद संपवली तेव्हा हा सत्पुरूष माझ्यावर मायेची पाखर घालायला आला.ही सगळी त्या गणोबाचीच कृपा म्हणुन माझ्या प्रत्येक काटेरी वाटेवर मला एक दिशादर्शक वाटाड्या भेटला.

तिची विचार शृंखला नर्सच्या हाक मारण्याने खंडीत झाली.

नर्सने तिला बाहेरच्या बाकावर बसायची खूण केली.ती बेडवरून स्वत:ला सावरून उठली आणि बाहेरच्या बाकावर जाऊन बसली.

इकडे डॉक्टरांच्या केबीनमधे डॉक्टर रूस्तमशेठना काही सुचना देत होते," रूस्तमशेठ तशी तिच्या तब्ब्येतीची इतर काही तक्रार नाहीये.फक्त एक सल्ला द्यावा वाटतोय डॉक्टर ह्या नात्याने."

रुस्तमशेठनी काय असे विचारल्यावर डॉक्टरांनी एक दिर्घ श्वास घेत सांगितले,"त्याचे असेय की ती बलात्कार पिडीत आहे.तेव्हा तिचे कम्प्लिट मेडिकल चेकअप होणे गरजेचे आहे.वयानेही मुलगी लहान दिसतेय.त्यामुळे नको असलेल्या गर्भधारणेचा धोकाही संभवतो.ती किती दिवस अशी फिरतीय ?

हे होऊन किती दिवस लोटलेत? ह्याची आपल्याला कल्पना नाहीये.अंगावरच्या जखमा ताज्या आहेत त्यावरून अंदाज काढु शकतो पण ह्या गोष्टीत अंदाज लावणे योग्य नाही.त्यामुळे ती मनाने जरा शांत झाली की तिच्याकडुन सगळी माहिती मिळवायचा प्रयत्न करा आणि लवकरात लवकर योग्य ती काळजी घ्या.."

रूस्तमशेठने सुन्न मनाने सर्व ऐकुन घेतले.

नर्सिंगहोमचे बील चुकवुन ते कॉरीडॉरमधे आले जिथे मुक्ता त्यांची वाट पहात बाकावर बसली होती.

जसे रूस्तमशेठ तिच्याजवळ आले तिने त्यांचे पाय धरून नमस्कार केला.ती त्यांना म्हणाली,"रुस्तमकाका…..!तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत.तुम्ही भेटलात देवासारखे म्हणुन माझ्यावर उपचार झाले नाहीतर ह्या वेदनांतच कधीतरी माझा अंत झाला असता.ह्याची उतराई कशी करू मला समजत नाहीये काका."

"मी ह्या गावात नवीन आहे.जोपर्यंत दुसरी काही सोय होत नाही तोवर तुमच्या घरी मला काही काम द्याल का?मी तुमचे पडेल ते सर्व काम करेन घरातले.बदल्यात मला पैसेही नका देऊ फक्त एका कोपऱ्यात निवाऱ्याला थोडी जागा द्या आणि उरलं सुरलं शिळपाक काहीही खायला दिलं तरी चालेल.एकवेळ दिलं तरी चाललं पण एवढे उपकार करा.नाही म्हणु नका.एवढी दया करा.आणि कृपा करून पोलीस मधे माझ्या नातेवाईकांचा शोध घ्यायला कम्प्लेंट नका करू.मला पून्हा मागे वळुन पहायचे नाहीये."

बोलता बोलताच मुक्ताच्या डोळ्यातुन धारा वाहु लागल्या..

तिचे स्वच्छ,सात्विक परंतु काळजाला भिडणारे बोल ऐकुन रूस्तमशेठचे डोळे डबडबले.त्यांना काय बोलावे सुचेना.त्यांनी काही न बोलता खुणेनेच चल असे म्हणाले.

मुक्ता निमुटपणे रूस्तमशेठच्या मागे चालू लागली.

    ~~~~~~~~~~~~~~~~~~

गाडीतही रूस्तमशेठ शांत होते.मुक्ताही शुन्यात टक लावुन बघत होती तर मधेच अवतिभोवतीचा परीसर खिडकीतुन बघत होती.

थोड्याच वेळात गाडी एका मोठ्या लोखंडी नक्षीदार गेटजवळ थांबली.रुस्तमशेठनी गाडीचा हॉर्न वाजवल्याबरोबर आतल्या दरवानाने गेट उघडले आणि गाडी गेटमधुन आत घुसली.

एक गोल वळण घेऊन एका पत्राच्या शेडमधे रूस्तमशेठनी गाडी थांबवली.त्यांनी खुणेनेच मुक्ताला उतरायचा इशारा केला.गाडीचा दरवाजा कसा उघडायचा हे तिला समजत नव्हते त्यामुळे ती भेदरलेल्या नजरेने रूस्तमशेठकडे बघु लागली.कसे समजणार?

आज पहिल्यांदाच ती अशा आलिशान चारचाकीत बसली होती.तिची अडचण ओळखून रूस्तमशेठनीच बाहेर उतरून तिच्या बाजुचा दरवाजा उघडला तसे ती पायउतार झाली.

रुस्तमशेठनी तिला त्यांच्या मागे यायची खूण केली तशी ती पुन्हा त्यांच्या मागोमाग जाऊ लागली.

एक लांबलचक ओसरीवजा आंगण ज्याला उन्हापासुन संरक्षण म्हणुन ग्रीनशीटचे अच्छादन घातले होते.फेब्रुवारीतले ऊनही चांगलेच चटकत होते.पण त्या अच्छादनामुळे तिथे छान गार वाटत होते.अोसरीला तीन लांबरूंद सिमेंटच्या अर्धगोलाकार पायऱ्या होत्या.त्या पांढऱ्या रंगाने रंगवलेल्या होत्या.त्या चढुन ते एका दरवाजापाशी आले.दरवाजाच्या वरच्या चौकटीवर ओमचे चिन्ह अंकीत केलेले पाहुन मुक्ता चकितच झाली.ह्यांचे नाव रूस्तम मग हे ह्यांचेच घर असेल तर दरवाजावर ओम कसे काय लिहीलेय??तिला काही हा उलगडा होत नव्हता.पण सध्या तो विषय तिने बाजुला ठेवला.

बाजूला दरवाजाच्या एका कोपऱ्याला डोअरबेल होती.बेल वाजवताच एका अतिशय देखण्या स्त्रीने दार उघडले.गहु वर्ण,तेजस्वी कांती,कपाळावर भव्य लाल कुंकू,गळ्यात मोठं डोरल्याच मंगळसुत्र,हात भरून बांगड्या,केसाच्या अंबाड्यात छानसा अबोलीचा माळलेला गजरा आणि प्रसन्न चेहरा.तिने हसतमुखाने मुक्ताचे स्वागत केले.हि स्त्री कोण?रूस्तमशेठ ची पत्नी म्हणावी तर मग हिच्या कपाळावर कुंकू कसे?मुक्ताला घरात आल्यापासुन प्रश्नांवर प्रश्न पडत होते पण हे रहस्य काही उलगडत नव्हते.

तेवढ्यात रूस्तमशेठनी तिची त्या स्त्रीशी औपचारिक ओळख करून दिली.

"बेटा मुक्ताऽऽ ये तुम्हारी चाची है और मालती ये है मुक्ता..ये आजसे हमारी महमान है।कुछ दिनों तक यही रहेगी।अभी तुम मुक्ता के नहाने और खाने पिने की व्यवस्था करो तब तक मै जरा फॅक्टरी हो आता हुँ।"

असे म्हणतच ते तिथुन आल्या पावली परत गेले.

ते जाताच मालतीकाकींनी तिला अगोदर गरमागरम चहा दिला.चहा पिऊन जरा तरतरी आली तसे मालतीकाकी तिला घेऊन एका खोलीत आल्या.त्या तिला म्हणाल्या,"बाळ मुक्ताऽऽ,आजपासुन ही तुझी खोली.तु इथेच रहायचेस.खोलीला लागुनच सुंदर प्रशस्त नहाणीघर होते.त्यांनी तिकडे गरम गार पाण्याची सोय असलेले नळ दाखवुन दिले.पण मुक्ताची खरी अडचण ही होती की अंगावरच्या वस्त्रानिशी ती भटकत भटकत इकडे पोहोचली होती.तिच्याकडे तर बदलायलाही कपडे नव्हते.पण ती काहीच बोलली नाही.मालतीबाई बाहेर गेल्या तशी ती नहाणीघरात गेली.ते नहाणीघर इतके मोठे होते की तिच्या मामीच्या घराबाहेर जी पडवी होती त्याच्या दुप्पट मोठे नुसते नहाणीघर होते.आणि नहाणीघर आणि तिची खोली मिळुन मामीचे सगळे घर इतकी मोठी खोली एकट्या मुक्ताला रहायला दिली होती.आज कितीतरी दिवसांनी तिच्या अंगाला पाणी लागणार होत.तिने मालतीबाईंच्या सुचनेप्रमाणे गरम गार नळ सोडुन बादलीभर पाणी भरून घेतले आणि मनसोक्त स्नान केले.तिथे एक सुगंधी साबण ठेवला होता.तिने स्वच्छ सर्वांगाला साबण लावुन स्नान केले.त्यांच्याकडे तर दगडीनेच अंग घासुन कशीबशी कावळे अंघोळ होई.पण आज तर ती दिवाळी असल्यागत सुगंधीस्नान करत होती.तिला खूप मज्जा वाटत होती.आपल्याच अंगाचा वास घेऊन ती तो सुगंध नाकात भरून घेत होती.खूप वेळपर्यंत स्नानाचा आनंद लुटल्यावर ती बाहेर आली तर तिकडे एका सुती धडप्यात साडी ब्लाऊज पेटीकोट गुंडाळुन तिच्याकरता ठेवले होते बदलायला.

अंग पुसुन कोरडे करून ती साडी बदलुन बाहेर आली.तिच्या लांब सडक केसांना आज कितीतरी दिवसांनी पाणी लागले होते.आज तिला खूप मोकळे मोकळे ताजेतवाने वाटत होते.केस सुकवण्याकरता ती अंगणात आली.छान ऊन चटकत होतं.तिने ऊन्हात केस झटकुन त्यातले पाणी झटकुन जरा कोरडे झाले तसे त्यांना सूती धडप्यात गुंडाळुन ती आत आली.

तिच्या खोलीतुन बाहेर पडल्या बरोबर एक पॅसेज आणि बाजुला अजुन एक खोली होती.त्या पॅसेजला पार करून ती हॉलमधे आली.हॉल प्रशस्त होता.तिकडे छान कोच वगैरे बैठक मांडलेली होती.खाली जमिनीवर कारपेट्स अंथरलेले होते.मधोमध एक सेंटर टेबल त्यावर काचेच्या बाऊलमधे खूप सारे रंगीत खडे काचेच्या गोट्या असतात तसे सजवुन ठेवलेले.बाजुलाच फुलदाणीत गुलाब आणि निशिगंधाची फूले सजवून ठेवली होती.त्याचा मंद सुगंध घरभर पसरला होता.हॉलच्या दर्शनी भिंतीवर दोन तसबिरी चंदनी हार घालुन लटकत होत्या.तसबिरीतल्या व्यक्तींचे चेहरे रूस्तमकाकांशी अजिबातच मॅच होत नव्हते.मग हे फोटो कुणाचे असा प्रश्न तिला पडला.एक मात्र साम्य होते.त्या तसबिरीतल्या एका फोटोतील व्यक्तीच्या कपाळावरही तसाच भस्माचा टिळा होता जसा रूस्तमकाका लावत होते.तिने बाकीच्या भागाचे निरीक्षण करता हॉलला लागुनच एका कोपऱ्यात एक लाकडी पार्टीशन सारखी रंगवलेली भिंत दिसत होती.त्याच्या दुसऱ्या बाजुला एक आयताकृती खोली होती ज्याला लाकडाचा शिसवी जाळीदार दरवाजा होता.दरवाजाच्या आतुन 'ॐ नम:शिवाय' असा ध्वनी कोणीतरी जप करावा तसा येत होता.ते देवघर होते.हे सगळे अचंबीत करणारे होते मुक्ताला.

नेमके हे घर कोणाचे आहे हा उलगडा होत नव्हता मुक्ताला.जर मालतीबाई रूस्तमशेठच्या पत्नी म्हणाव्या तर त्या हिंदू स्त्रीयांप्रमाणे पेहराव करतात राहतात मराठी भाषा बोलतात.नावही मालती हिंदू.

रूस्तमशेठही भस्म तिलक लावतात मग ते नक्की हिंदू आहेत की मुस्लिम??? प्रश्न वाढतच होते आणि त्याबरोबर त्यामागचे गूढही.तिला प्रचंड कुतूहल निर्माण झाले होते परंतु तिने मनातल्या प्रश्नांना तात्पुरता विराम देत देवघराचे दार उघडुन देवाला नमस्कार केला.

माझी सुखरूप त्या राक्षसाच्या तावडीतुन सुटका केलीस म्हणुन आभार मानले.ती देवघरातुन बाहेर येताच मालतीबाई तिला म्हणाल्या,"चल तुला भूक लागली असेल ना,जेवुन घे.मला हे सांगुन गेलेत की तुला वेळेत जेवु घाल कारण तुला औषधं पण घ्यायचीत त्यानंतर."

ती धीर करून म्हणालीच शेवटी,"काकी मला इकडे तुमच्या घराचे घरकाम करायला आणलेय रूस्तमकाकांनी तेव्हा आधी मला सगळे काम समजावुन सांगा मग मी जेवते."

त्यावर मंद स्मित करत मालतीबाई म्हणाल्या,"ते सगळे आपण नंतर बघु.तु आजच आली आहेस नाऽऽ मग आजच्या दिवस काम नाही करायचे. उद्या सांगते हं तुझे काम.आज आधी जेवुन घे.त्यांनी तिला त्यांच्या भव्य डायनिंग हॉलमधे नेले.एक खुर्ची ओढुन तिला त्यावर बसवले.ती हे सगळे वैभव पाहुन आधीच बुजली होती त्यात घराची मालकीण तिला स्पेशल कोणीतरी पाहुणा यावा तशी ट्रिटमेंट देतेय हे पाहुन तर अधिकच ओशाळायला झाले.

तोवर मालतीबाईंनी एका मोठ्या ताटात अन्न वाढले.ताट सांग्रसंगीत वाढलेले होते.प्रथम डाव्या बाजुला लिंबाची फोड खोबऱ्याची चटणी,कोशिंबीर, उजव्या बाजूला बटाट्याची भाजी,मधोमध गरम भाताची मूद त्यावर घट्ट वरण आणि साजूक तूपाची धार.एका वाटीत मस्त गरम आमटी तर एका वाटीत शेवयाची खीर.आणि भाताच्या खाली घडीची गरमागरम मऊसूत तूप लावलेली पोळी.असा एकदम शाही थाट होता जेवणाचा.एवढे भरलेले सुग्रास जेवणाचे ताट गेल्या कित्येक वर्षात तिने पाहिले देखील नव्हते.त्यात एवढ्या मोठ्या टेबलावर जेवायला ती एकटीच.तिला थोडं कानकोंड झालं.एकटीच कशी जेवणार???

भीतभीत चाचरतच ती मालती काकींना बोलली," काकी मी एकटी कशी बसु?तुम्ही पण बसा ना माझ्यासोबत.मला एकटीला लाज वाटतेय बसायची.."

त्याबरोबर त्या लगेच म्हणाल्या,"अगंऽऽऽ तुझे काका जेवायचेत ना अजुन ते आले की आम्ही सोबत बसु.तुला औषध घ्यायचीएत ना म्हणुन तु लवकर जेव.."

त्यावर मुक्ता लगेच म्हणाली, "मग ठिक आहे.मी पण रूस्तमकाका येईपर्यंत थांबते.मला एकटीला जेवण नाही जाणार…आणि घरचे मालक/मालकीण उपाशी असताना मी कशी जेवू?हे मला पटत नाहीये आणि मला भूक नाही लागलीय.आपण सगळे एकत्रच बसु काका आल्यावर."

त्यांची दोघींची तु मी तु मी अशी बोलणी चाललेली होती इतक्यात रूस्तमशेठ घरात आले.किती दिवसांनी घरात चिवचिवाट एेकुन त्यांच्या डोळ्यात समाधानाचे आश्रु आले.डोळे पुसतच ते हातपाय धुवुन आत येत म्हणाले,"क्या हो रहा है?कौन खाना नही खा रहा है?"

त्यावर मालतीबाई लगेच म्हणाल्या,"बघा नाऽऽ हिला किती वेळचे समजावतेय की औषधे घ्यायचीएत जेवुन घे पण ती तुम्ही आल्यावर बसु म्हणुन आडुनच बसलीय."

मुक्ताने आणखी एक बघितले की रूस्तमकाका हिंदीत बोलत होते आणि मालती काकी मात्र मराठीत उत्तर देत होत्या आणि रूस्तमकाकांनाही मराठी समजत होते.हे काय गूपीत आहे हे मात्र तिला काही केल्या समजत नव्हते.तिचा तो विचाराधीन चेहरा बघुन रूस्तमशेठ तिला म्हणाले,"मुझे पता है तुम्हारे मन मे बहोत सारे सवाल है लेकिन अभी पहले खाना खायेंगे बाद मे तुमसे बहुत सी बाते करनी है,ठिक है ना बेटा।"

त्यावर निमुटपणे होकारार्थी मान डोलवत तिघेही जेवायला बसले.हसतखेळत जेवणे उरकली.

मालतीबाईंनी आठवणीने तिच्या औषध गोळ्या तिला दिल्या आणि तिच्या खोलीत आराम करायला पाठवुन त्याही आपल्या खोलीत गेल्या.

कितीतरी दिवसांनी केलेले पोटभर जेवण आणि औषधांचा परिणाम म्हणुन तिला अंथरूणावर पडताच डोळा लागला…………

-------------------(क्रमश:11)---------------------------------

क्रमश:-11

©®राधिका कुलकर्णी.

 

नमस्कार वाचक मंडळी……..!

मुक्ताच्या आयुष्यात रूस्तमशेठच्या प्रवेशानी एक नवे पर्व सुरू झाले आहे.

मुक्ताच्या मनात रूस्तमशेठच्या घरात प्रवेश केल्यापासुन खूप साऱ्या रहस्यमय प्रश्नांनी गर्दी केलीय.त्या सगळ्याची उत्तरे तिला मिळतील का? काय रहस्य आहे त्यांच्या कहाणीत?

काय असेल रूस्तमशेठच्या आयुष्याची कहाणी?रुस्तमशेठ का मुक्ताला आपल्या घरी घेऊन आलेत?त्यामागेही त्यांचा काही हेतू आहे का? असला तर काय?हे सगळे जाणुन घ्यायला ह्या पुढचे सर्व भाग वाचायला विसरू नका.

लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासहीत कथा नक्की शेअर करू शकता..

कथा आवडत असेल तर माझ्या ब्लॉगला लाईक शेअर करायला विसरू नका.आपल्या प्रतिक्रीया कमेंटबॉक्समधे जरूर कळवा.

धन्यवाद.

@राधिका.

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..