Login

मी कात टाकली अंतिम भाग -16

मुक्ताच्या संघर्षपुर्ण आयुष्यची प्रेरणादायी यशोगाथा.

मी कात टाकली अंतिम भाग-16

©®राधिका कुलकर्णी.

मुक्ता चालत चालत त्या म्हातारीपाशी आली.भर उन्हात अंगावर कुणाची तरी सावली पडलेली पाहुन म्हातारीने वर पाहिले.उन्हाची किरणे सरळ डोळ्यात घुसत असल्याने तिने डोळ्यांवर हाताची वाटी करून सावली देत मुक्ताकडे पाहिले.किलकिल्या डोळ्यांनी ती ह्या कोण बाई?अशा प्रश्नांकीत चेहऱ्याने मुक्ताकडे बघत होती.मुक्ता आता तिच्या अधिकच जवळ जाऊन तिच्यासमोर आेणवी बसत विचारली,"कोण बाई तुम्ही?इतक्या उन्हाचं इथे का बसलाय?तुम्हाला कुठे जायचेय का?मी सोडू का?"

मुक्ताच्या चौकशीने तिच्या डोळ्यात चमक निर्माण झाली.कितीतरी दिवसांनी कोणीतरी मायेने विचारपूस करतेय हे ऐकुन ती जरा भावूक झाली.डोळ्यातली टिपे फाटक्या पदराने टिपत तिने थरथरत्या हातानेच तो वर्तमानपत्राचा कागद मुक्तापुढे सरकवला आणि म्हणाली,"बाईसाहेब...ह्या पेपरात जो फोटू दिसतोय न्हवं ती म्हाई भाच्ची हाय.किती दिस महिने वणवण भटकत म्या कसबसं हिथवर पोहोचलेय.मले कुनीतरी म्हनलं की ह्या फोटुतली पोरगी हिकडं ऱ्हातीया म्हनुनशान तिला एकदा भेटाया आले परं ह्यो गेटवरचा कुत्रा भेटू बी देईना तिला..म्या रोज हिकडं येते.सांज होईस्तोर हिकडं बसुन असते.कदी चुकुन माकुन ती गेटजवळ आली तर मले दिसल म्हुन पर आज महिना व्हईल एक बारीला बी कुनाच दर्शन न्हाय.लई आशेने आले गं पोरीऽऽ म्या हिकडं."

म्हातारी बोलता बोलताच रडू लागली.बरेच दिवसाची उपाशीही वाटत होती.मुक्ताने गाडीतुन पाण्याची बाटली काढुन तिला प्यायला पाणी दिले.तिला हाताला धरून आपल्या ऑफीसमधे घेऊन आली.थंड वातानकुलीत चेंबरमधे तिला आपल्या समोरच्या खुर्चीत बसवुन मग तिने वॉचमनला बोलावु पाठवले.

मुक्ताला त्याचे हाडतुड करून बोलणे मुळीच आवडले नव्हते.त्याला त्याच्या ह्या वागणुकीची समज देणे आवश्यक होते.

वॉचमन दोनच मिनिटात हजर झाला.मुक्ताने त्याची म्हातारी समोरच कानउघाडणी केली.

"ही महिला समिती दिन-दुबळ्या आधारहीन स्त्रीयांसाठी आपण चालवतो हे विसरलास का?" 

"इतके दिवस झाले रोज ही बाई आपल्या दाराशी येते आणि तुला हे एकदाही मला सांगावेसे वाटले नाहीऽऽ?"

मुक्ताने त्याला भरपूर खडसावले.

"ह्यापुढे जर असे वागलास तर नौकरीवरून निलंबीत करेन "

अशी तंबी देऊन त्याला म्हातारीसाठी काहीतरी खायला आणायला पाठवले.

वॉचमन खूपच घाबरला.सॉरी मॅडम म्हणतच तो तिकडुन बाहेर पडला.

पाणी पिऊन पेक्षाही त्या मग्रुर वॉचमनला मुक्ताने दिलेल्या तंबीमुळे म्हातारी जास्त सुखावली.

तिच्या चेहऱ्यावर समाधान पसरले.ही कोणीतरी मोठी साहेबीण बाई दिसतेय.आता ही नक्की आपलं काम करेल अशी आशा तिच्या मनात पालवली.

मुक्ताने तिला हातानेच बसायचा इशारा करून मघाचचा वर्तमानपत्राचा तुकडा पहायला हातात धरला.त्यातला फोटो बघुन ती स्तिमित झाली.

तो फोटो दहावी बोर्डात तालुक्यातुन पहीली आली तेव्हाचा मुक्ताचाच फोटो होता.तिच्या पायाखालची जमीन सरकली कारण हा फोटो माझ्या भाच्चीचा सांगुन जर ती फिरत असेल तर ही आपली मामी आहे!!!????

मुक्ताच्या चेहऱ्यावर एकाचवेळी आश्चर्य आणि प्रश्नांची गर्दी उत्पन्न झाली.जवळपास दहा पंधरा वर्षापूर्वीचा तिचाच भूतकाळ तिच्यासमोर इतक्या नाटकीय पद्धतीने असा समोर येईल असा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता.तिने त्या म्हातारीचे नीट निरीक्षण केल्यावर काही खूणा जसे कपाळावरची आडवी गोंदलेली चीरी,नाकातली नथनी,आणि मामीच्या उजव्या बाजुला मानेवर एक मोठा चामखीळ होता जो पदराआड मगाशी तिला दिसला नव्हता पण इकडे चेंबर मधे आल्यावर तिने डोईचा पदर खांद्यावर घेतला तसा तो चामखीळही तिला स्वच्छ दिसला.त्या सर्व खाणाखूणा हे पटवुन देत होत्या की ती तिची मामीच होती पण तरीही एक प्रश्न तिला सतावतच होता.हिची इतकी फाटकी अवस्था कशी काय झाली?गाव सोडून,आपलं घर सोडून ही अशी भिकाऱ्यांच्या अवस्थेत का फिरतेय?

मधल्या काळात जितके वर्ष उलटले त्यात मामीचा चेहराही इतका सुरकुत्यांनी भरला होता की मुक्ता तिला ओळखु शकली नाही तसेच मुक्ताच्या आताच्या राहणीमानातही इतका बदल झाला होता की मामीनेही तिला ओळखले नाही.

मुक्ताचा बराच मेकओव्हर झाला होता.लांब वेण्या जाऊन केसांचा खांद्यावर रूळणारा स्टेपकट,गळ्यात छोटसं नाजुक हिऱ्याचे पेंडंट असलेले मंगळसुत्र,कॉटनसिल्कची रीच इंग्लिश कलर साडी त्यावर मॅचिंग स्लिव्ह्जलेस ब्लाऊज,हातात एकच हिरे जडवलेले सोन्याचे ब्रेस्लेट,दुसऱ्या हातात तसेच उंची घड्याळ आणि डोळ्यावर रीमलेस ग्लासेस.एकंदरीतच तिच्या पोस्टला साजेशी भारदस्त,शांत,धीरगंभीर मूद्रा.तितकेच शालीन सोज्वळ पण करारी रूप..

तिच्या लहानपणी तिला ओळखणारे आज हिच ती मुक्ता सांगितले तरीही अजिबात ओळखू शकले नसते त्यामुळे मामी तर तिला ओळखणे शक्यतेच्याही पलीकडचे होते ह्याचाच फायदा घेत मुक्ताने अगोदर मामीची सर्व कहाणी त्रयस्थ म्हणुन ऐकायची ठरवली.

तेवढ्यात वॉचमन एका पॅकेटमधे इडली सांबार चटणी घेऊन आला.

मुक्ताने तिच्या पुढ्यात ते ठेवताच तिने कधी न पाहील्यासारखे अगदी अधाशासारखे ते पटापट खाऊन फस्त केले.खाऊन पाणी पिऊन तोंडावरून हात पुसत ती जरा स्थीर झाल्यावर मुक्ताने विचारले,"बाई तुम्ही म्हणताय की ही तुमची भाच्ची पण नाव काय हिचे आणि हा पेपर खूप जूना आहे,म्हणजे आता ती खूप मोठी झाली असणार तुम्हाला वाटते का तुम्ही तिला ओळखू शकाल?"

मुक्ताने मुद्दाम तिरके प्रश्न विचारले तसे ती बोलायला सुरू झाली.आधी तर घळघळा डोळ्यातुन आश्रुच यायला लागले तिच्या.तिला बोलायलाही सुचेना.मुक्ताने तिचा हात हातात घेऊन तिचे सांत्वन केले.तिला आधार दिला.मनातुन तिला दया येत होती परंतु सत्य जाणल्या खेरीज स्वत:ची ओळख द्यायची नाही ह्यावर ती ठाम होती.

आता बहर थोडा ओसरल्यावर ती म्हणाली,"आता काय सांगु बाय तूला माझी कहानी...म्या लई वंगाळ वागले गं ह्या पोरीशी त्याचीच फळं भोगतेय म्या.लई गुणाची होती माझी मुक्तीऽऽ..मुक्ता..मुक्ता नाव होतं पर म्या मुक्तीच म्हनायचे.लई हुशार होती बुक वाचण्यात परं म्या हमेशा तिचा दुस्वास केला.तिला बुक शिकु देऊ नये म्हणुन लई त्रास दिला.पर तीनं कधी मला उलटून एक सबुत बी बोलली न्हाई.लई माया होती तिच्या पोटात परं मला कदी तीची माया दिसलीच न्हाई गं."

मुक्ताच्या डोळ्यातही आश्रु येत होते पण तिने ते प्रयत्नपुर्वक रोखले.

तिने मामीला विचारले,"हो ते सगळे ठिक आहे.पण मग तीचा फोटो पेपरात कसा? "

त्यावर म्हातारी खूप कौतुकाने सांगू लागली, "माझी मुक्ती दहावीला आमच्या गावातुन पहिल्या नंबरान पास झाली व्हती तवाचा फोटू हाय.लई वरीस झाली आता त्याला.

पर म्या तिचं शिक्षण रोखलं.मले वाटायचं शिकुन ही हातुन गेली तर माझ्या हाताखालचा हक्काचा गडी जाईल म्हुन स्वार्थापायी म्या तिला शिकु बी दिले न्हायी नायतर ती बी आज मोठ्ठी हाफीसर झाली असती.माज्या लई मनी व्हतं तिला सुन करून घ्याच परऽऽऽ………..!!"

म्हातारी पुन्हा बोलायची थांबली.तिच्या डोळ्यातुन पुन्हा पाणी वाहू लागलं.मुक्ताला कळेना की मामी बोलता बोलता का रडतेय.काय सलतेय तिच्या मनात?

मुक्ताने तिचे रडू ओसरल्यावर पुन्हा विचारले,"मगऽऽ...काय झाले पुढे?का थांबलात बोलता बोलता?

"बोला मोकळे पणाने.मला जी जमेल ती मदत मी नक्की करेन तुम्हाला.पण त्याआधी मला सगळे खरे खरे सांगा."

"आता कस सांगू बाईऽऽ..बोलताना जीभ झडल की काय अस वाटतयांऽऽ…"

"माझा एकुलता एक ल्योक केदार.माझा लई जीव व्हता त्याच्यावर.पर लई वाया गेलतं पोर.वाईट संगतीला लागुन पार बिगडलं व्हतं.मले बिचारीला वाटे की लेकरू हाय सुधरन आज ना उद्या म्हुन म्या त्याला नेहमी गोंजारत ऱ्हाइले.माजा धनी हमेशा सांगे आपलं पोरगं काय कामाच न्हाय पर ह्या पोरीले माया केलीस तर तिच तुजा म्हातारपनचा आधार व्हईन पर म्या मंदबुद्धीला त्यांच कधी खरच वाटलं न्हाई आज त्याचीच फळं भोगतीया म्या...ज्या पोरावर माया केली त्यानंच माझी अशी अन्नान्न दशा करत मला घरा ब्हाएर हाकलुन लावलं."

म्हातारीच्या डोळ्यातले आश्रु थांबायचं नाव घेत नव्हते.मुक्ताला अजुनही बरेच काही ऐकायचे राहीले होते.म्हणजे ती कशी गायब झाली ह्यावर मामी काय बोलतेय हे सगळे मामीच्या तोंडुन ऐकायचे होते.

मग तिने मामीला पुन्हा प्रश्न केला,"पण मग तुमची भाच्ची होती ना सोबत ती कुठे गेली?का पोरानं तिला ठेवुन घेऊन फक्त तुम्हालाच हाकलले?"

त्यावर मामी म्हणाली,"ती बी एक येगळीच कहाणी हाय.लई साल झालं तवा मुक्ती दहावी होऊन एकाद वरीस उलटुन गेल अासन.माज पोरगं बी तवा नुकतच जेलातुन सजा संपुन परत आल व्हत घरला.त्याला पोलीसांनी गांजा फुकतय म्हुनशान पकडल व्हत तर त्यो पळुन गेला पोलीसांच्या हातुन तवाच पोलीसांनी सांगितल व्हतं की हा कदी बी घरला आला तर पोलीसात वर्दी द्याची.तसा तो घरला आला एक दिस.तर मुक्तीन पोलीसात वर्दी देऊन पोलीस त्याला पकडून नेले.मला हे त्याने जेलातुन एक पत्र धाडल त्यातुन कळलं.त्यामुळ म्या तिचा जास्तच राग राग करू लागले.लई काम लावू लागले मुद्दाम.बिचारी हुं का चुं न करता सारे सहन करी.मग एक दिस माज पोरगं सुटुन घरला आलं.तवा सारे वंगाळ धंदे सोडल म्हनल व्हतं.म्या बी लई खुस जाले.त्याचे मुक्तीसंगाट लगीन लावुन देते म्हनले तसा तो लई खुस झाला.त्याला बी मुक्ती आवडायची पर एक दिस ती वावरातुन सांजची घरलाच आली न्हाई‍.म्या लई धुंडलं तिला पर कुटच गावली न्हाय तसा केदार बोलला अगं ती गेली आसन घर सोडून तिचे लई यार होते गावात.गेली असन कुनासोबत पळुन.कशाले चिंता करतीस जाऊदे गेली तर."मले काय खर वाटना परं जवा दोन दिस ती घरला आली न्हाय तवा माजा बी पोराच्या बोलन्यावर इश्वास बसला.लई दिस झाले.एक दिस म्या वावरातल्या खोलीत चारा ठुवायला गेले तर तिकडं मला रगात पडलेल दिसलं गवताच्या गंजीवर.लई घाबरले म्या.अजुन नीट धुंडाळले तर बाजुलाच काचंच्या फुटलेल्या बांगड्या दिसल्या अन् मुक्तीच्या ड्रेसचा फाटलेला तुकडा बी दिसला.मुक्तीच्या मायन तिच्या गळ्यात लहानपनीच एक तावीज बांधला व्हता काळ्या धाग्यात.मुक्ती दरसाली त्या धाग्याला बदलुन तो ताईत मायची याद म्हुन गळ्यात घाली त्यो बी तिकडच तुटुन पडलेला तवा माझ्या ध्यानात थोडं थोडं येवु लागलं.हो न हो माज्या पोरानच तिच काही काळबेरं केल नसन नाऽऽऽ..???

म्या लई घाबरले.घाबऱ्याघाबऱ्या खोलीबाहेर पडतच होते की माह्य पोरगं तिकड आलं.माज्या चेहऱ्याकडं पाहुन त्याला समजल मला कायतरी संशव आलाय तस त्यानं मला तिकडच माह्यं नरडं दाबत म्हनला,"खबरदार तोंडातुन आवाज बी काढशीला तर,हिथच गाडून टाकील.ती मुक्ती सुटली पर तुला म्या जीत्ता न्हाय सोडनार…"

त्याच्या धमकीन म्या चूप बसले पर पोरीसाठी लई वाईट वाटल.माह्या पोरान त्या पोरीला नासीवली होती.तिलाही जीत्ताच मारायचा पर ती पळुन गेली ह्याच्या तावडीतुन.तवा पासुन पोरीसाठी लई वाईट वाटायचं.कुट अासन?जीत्ती हाय का मेली ते बी कळायला पत्ता न्हाय.म्या तिकडच पोराला घाबरून रहात होते.एक दिस लई खुसीत पोरगं घरी आलं.मला म्हनलं,"माय वऽ.म्या तुज्या संगट लई वंगाळ वागलो.मले माफी कर.आता म्या पुन्यांदा अस काय बी वागनार न्हाय.नीट राहीन.आपन अस करू आपल्या घराचं छत खराब झालय त्याला दुरूस्त करून घेऊ.आजच बाजारला जाऊन वावरात पिकवायला बी बीयानं बी आनतो.तु ह्या कागदावर आंगठा उठव म्हंजी हे पत्र दाखवुन आपल्याला पैसं आणतो मग थोड थोड करून वापीस करू साहुकाराचं.म्या बी त्याच्या गोड बोलन्याला भुलुन त्याने म्हनला तिथ आंगठ दिलं.

नंतर काही दिवस गेले पोरगं घरातुन गायब झालं ते थेट दोन महिन्यांनीच उगवलं.येताना एक कुनीतरी भटक भवानी सोबत घेऊन आला.म्हनला आजपासुन ही हिकडच ऱ्हाईन आपल्या सोबत.मला लई राग आला.म्या त्याला बोलले हिकडं न्हाय रहायचे ह्या भटक भवानीला घेऊन.तर त्यानं माज्याच अंगावर हात टाकला.त्या बाहेरच्या पोरीसमोर मला मार मार मारला अन् अंगच्या कपड्यावरती घराबाहेर घालवुन दिलं.मी रातभर तिकडच बसुन राहीली पर त्याे मला घरात बी घेतला न्हाई अन् वावरात बी जाऊ देईना.मग म्या काही दिवस देवळात राहुन कसेबसे मजुरी करून जगू लागले.परं एक दिस घरला कुलूप घालुन त्यो त्या भटकभवानी संगट कुटतरी निघुन चाललेला दिसला.तस म्या हिम्मत करून त्याला घराची चाबी पुसली तर म्हनला,म्या सगळ घर वावर इकुन गाव सोडुन चाललोया.तु तला जिकडं जायच तिकड जा.माह्या पायाखालन जमीनच सरकली.आता म्या कुट जाऊ,काय खाऊ‍.मग काही दिस गावातच मोलमजुरी केली.पर आता वय झाल काही होईना.कोनी म्हऩलं तालुक्याला जा तिकड काही मिळल. मग अशीच हिकडं आली आज ह्याच्या दुकानी उद्या त्याच्या वावरात तर परवा मंदीरात अस करत दिस काढले.असेच कोनीतरी हातात काहीतरी खायला दिले ते एका पेपरात गुंडाळले व्हते.म्या कागद उघडला तर ह्यो फोटू पाहिला तसे माझे डोळे चमकले.तवापासुन हा कागद संभाळुन प्रत्येक येनार-जानाराला पुसत ऱ्हाते की ह्या फोटुतल्या पोरीला कुनी पाहीले का? पाहीले का?

तवा कुनीतरी हिकडं आनुन सोडल.म्हनले की हिकडं भेटन.तवा धरन रोज हिकड येतीया पर अजुन माजी पोर भेटली नाय ग मला...मला फकस्त एकदाच भेटुन तिची माफी मागायची हाय.लई वंगाळ केलं माज्या पोरानं तिच्यासंगट.पर म्या चांडाळणीन तिलाच वाईट ठरवल तवा.तिलाच भलंबुर बोलुन दुषणं लावली.आता पोर कशी असन?कुट असन देवालाच ठाव…….?."

मामीने सांगीतलेला शब्द न शब्द खरा होता.केदारने जिथे आपल्या सख्या आईला नाही सोडले तिकडे त्याने मुक्ताला काय सोडले असते.बरे झाले मुक्ताने पळुन जायची हिंम्मत केली तेव्हा नाहीतर आज ती ह्या जगातही दिसली नसती.

मुक्ता आता भानावर आली.मामीच्या डोळ्यातले पस्ताव्याचे आश्रु ती किती खर सांगतेय ह्याची साफ खूण पटवत होते.आता तिला ही आपलीच मामी आहे ह्याबाबतीत कुठलीच शंका उरलेली नव्हती.कदाचित तिचा पश्चा:त्ताप खरा होता म्हणुनच परमेश्वराने मामीची मुक्ताशी भेट घडवुन आणली होती.

तिने मामीला धीर दिला आणि म्हणाली,"तुमची भाच्ची इकडेच राहते.बरोबर सांगीतलेय तुम्हाला ज्याने सांगितलेय.तुम्ही जरावेळ इकडेच बसा. मी तिला बोलावुन आणते."

मामीला आपल्या चेंबरमधे बसवुन मुक्ता बाहेर गेली.आधी डोळ्यात आलेले आश्रु पुसले आणि मग पुन्हा आत आली ह्यावेळी आत येताना ऑफीसच्या खिडकीचे पडदे तिने बंद केले.खूप धीर करून तिने मामीला आवाज दिला,"मामीऽऽ...मी मुक्ता.."

आवाज एेकताच मामीने खुर्चीतुन मान वळवुन मागे पाहीले तर मगाचीच साहेबीण बाई.मग आपल्याला मामी कोणी म्हणलं.ती चक्रावुन मुक्ताकडे बघत होती.खोलीत दुसरे कोणीच तर नव्हते मग आपल्याला भास झाला का असेही वाटले मामीला.प्रश्नार्थक नजरेने तिने मुक्ताकडे पाहीले त्याबरोबर मुक्ताने पुन्हा हाक मारली,"मामीऽऽ..!!"

मामीला क्षणभर विश्वास बसेना.आपण स्वप्नात तर नाही ना?असे तिला वाटले.

खुर्चीतुन उतरून ती मुक्ताच्या जवळ आली आणि मुक्ताच्या पायावर डोक ठेवत रडू लागली.

"पोरी…..तु खरच मुक्तीच आसशीन तर मला माफी कर.म्या लई छळलं तुला.माझ्या लेकराने तुझ्यासंगट लई खराब काम केलं.त्याची माय म्हुन मी पन गुन्हेगार हाय तुजी.मले माफी कर मुक्ते माफी कर…."

मुक्ता काही बोलणार इतक्यात मामी तिकडेच मुर्छीत पडली.

तिने लगेच घाईघाईने तिला हॉस्पीटलला नेले.डॉक्टरांनी तपासले.काही विशेष नव्हते.मनावर आकस्मिकपणे एखादा ताण आल्याने बी पी हाय झाल्याने ही चक्कर आलीय.बाकी विशेष काही नाही हे कळल्यावर मुक्ताचा जीव भांड्यात पडला.

तासाभराने मामीला शुद्ध आली तशी ती सावरली.मुक्ताने तिला हलकेच मिठी मारली.मामीच्या डोळ्यात अजुनही पाणी होते.दुसरीकडे आश्चर्यही वाटत होते मुक्ताला इतक्या चांगल्या अवस्थेत पाहुन.पण मग घर सोडल्यावर ती कुठे गेली,काय केली हे सगळे प्रश्न मामीच्याही डोक्यात घोळतच होते परंतु ती शांत होती.

मुक्ताने तिला आधार देऊन आपल्या गाडीत बसवल.तसे मामीने विचारलंच,"माय व मुक्तेऽऽ..ही मोटार तुजी हाय का?"

त्यावर हलकेसे स्मित करत मुक्ताने मानेनेच होकार दिला.मुक्ता इतक्या मस्त सफाईदार मोटार चालवते हे पाहुन मनातुन खूप कौतुक वाटत होत मामीला.मुळात मुक्ता अशी इतक्या चांगल्या अवस्थेत भेटेल असे मामीला वाटलेच नव्हते.अजुनही हीच मुक्ता का ह्यावर शंका होती मामीला.ती गुपचूप आडून आडून मुक्ताचे बारकाईने निरीक्षण करून ही आपलीच मुक्ता आहे का ह्या खाणाखूणा तपासत होती.मुक्ताला मामीची भिरभिरलेली नजर सगळे काही सांगत होती परंतु तिने घरी जाईपर्यंत मौन राखले.

गेटजवळच गेटमनने दार उघडताच मुक्ताची गाडी तिच्या बंगल्यात शिरली.प्रशस्त चहुबाजुंनी मोकळे अंगण.अंगणाभोवतीने केलेली सुंदर बाग.त्यात वेगवेगळी शोभिवंत झाडे लावलेली.मधोमध एक झोपाळा केलेला बसायला.बाजुलाच एक छत्री त्यात दोन किंवा तीन जण बसुन चहा पीऊ शकतील असे टेबल आणि खुर्च्यांची सोय केलेली.माळी लॉन कट करत होता.

मुक्ता खाली उतरून मामीच्या बाजुचे दार उघडून तिला खाली उतरायला मदत केली.तिचा हात धरून तिला घरात आणले.

मुक्ताचा तो इतका मोठा बंगला,नोकर-चाकर,ते वैभव पाहुन मामीला आश्चर्याचे धक्क्यावर धक्के बसत होते.एका बाईने दार उघडले.दोघींना पाणी आणुन दिले.पाणी पिऊन शांत झाल्यावर मुक्ताने मामीला हाताला धरून सगळे घर फिरवुन दाखवले.

घर पाहुन होईपर्यंत मगाचीच बाई चहा बिस्कीटे घेऊन आली‍. मुक्ताने खुणेनेच मामीला चहा घ्यायला सांगितले.मामीच्या डोळ्यात पाणी तरळले गतस्मृती आठवुन.मामी जेव्हा वावरातुन घरी येई तेव्हाही मुक्ता अशीच हातात आयता चहा द्यायची तिला.चहा पिऊन होताच तिने मामीला बाथरूममधे नेले.गरम पाणी सोडुन दिले बादलीत.बाजुलाच सुगंधीत साबण ठेवला.तिला आंघोळ करून यायला सांगितले.कितीतरी दिवस झाले असतील तिच्या अंगाला पाणी देखील लागले नव्हते.तिने छानपैकी अंग घासुन स्वच्छ स्नान केले.लहान मुल जसे पाण्यात डुंबत रहाते तसेच मामी नळ उघडले की गरम पाणी येतेय पाहुन सारखा नळ उघडुन अंगावर पाणी घेत राहीली.

मुक्ता जवळ काही नऊवार पातळ नव्हते.आता उद्या बिद्या ती ही खरेदी करावीच लागणार होती पण सध्या तात्पुरती एक सहावार साडी तिने मामीकरता काढुन ठेवली.मनसोक्त स्नान झाल्यावर मामी बाहेर आली.मुक्ताने काढुन ठेवलेल्या साडीवर तीची नजर पडली. मामीने त्या मऊसूत साडीवर हात फिरवुन तो स्पर्श मनात साठवुन घेतला.नंतर व्यवस्थित साडी नेसुन ती बाहेर आली.मगाचपेक्षा आता ती बरी दिसत होती.स्नानामुळे चेहऱ्यावर तकतकी आली होती.

मग तिने मामीला एका खोलीत नेले आणि म्हणाली,"मामी ही तुझी खोली.आजपासुन तु इकडेच रहायचे माझ्या सोबत."

"आवडले ना घर तुला?" 

तिने मामीला सहजच प्रश्न विचारला.त्यावर मामीचे डोळे पुन्हा भरले,"पोरीऽऽ घर कसले महाल हाय महाल..नशीब काडलस होऽऽऽ पोरीऽऽ...अशीच सुखात रहा.लई आशीर्वाद हाय माझे तुला."

"बर मामी तुझ्या जावयाचा फोटो बघायचा का?" म्हणतच मुक्ताने सतिश आणि तिचा लग्नातला फोटो दाखवला.

सतिशचे राजबिंडे रूप पाहुन मामी खूप खुष झाली.

"जोडा लई झ्याक हाय पर हे बाजुला उभ हायसा त्ये कोन म्हनायचे?तुजे सासु सासरे हाय का?"

"मामी ते माझे आईबाप आहेत.."

मग मुक्ताने सगळी कहाणी सविस्तर सांगीतली. ते ऐकुन मामीचे डोळे पुन्हा भरून आले.

मुक्तानेही खूप सोसले होते.पण तिच्या चांगल्या वागणुकीचे फळ म्हणुन परमेश्वर नेहमी तिच्या पाठी राहिला हर प्रसंगात.

आज मुक्ताने त्याचीच परतफेड मामीकरता केली.

तेवढ्यात काहीतरी आठवले तसे मामीने दंडात गुंडाळलेला एक धागा सोडत मुक्ताला दिला.

"मुक्तेऽऽ हे घे.लई जपून ठुली बग तुझ्या मायची आठवण म्हुन.भेटली कदी तर द्यायकरता जपली व्हती."

मुक्ताने तो ताईत प्रेमपुर्वक हातात घेतला.

डोळ्यात पुन्हा आईच्या आठवणीने आश्रु जमा झाले.तिने त्या ताईताचे चुंबन घेतले आणि स्वत:जवळ ठेऊन घेतले.

तेवढ्यात सतिश ऑफीसहुन घरी आला.मुक्ताने रूस्तमकाका आणि मालती काकीलाही बोलावुन घेतले.रात्री जेवायला मस्त पुरणपोळीचा बेत केला.सगळ्यांशी मामीची ओळख करून दिली.मामीलाही सगळ्यांना भेटुन अतीव समाधान मिळाले.

मुक्ताने कधीच कुणाचे वाईट केलं नाही म्हणुन परमेश्वराने तिलाही हर प्रसंगात चांगल्या माणसांची सोबत दिली.

"कर भला तो हो भला।" हि उक्ती मुक्ताबबत सार्थ ठरली.

     ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

हळुहळु दिवस महिने उलटले तसतसे मामीही त्या घरात तिथल्या माणसांत रूळली.नवखेपण दूर होऊन दूधात साखर मिसळावी तसे मामी मुक्ताच्या घरात मिसळुन गेली.

मुक्ता मामीलाही मुक्तांगणला घेऊन जात असे.तिथल्या तिच्यासारख्याच बायकांशी गप्पा मारून तिला बरे वाटे.मग कधी कधी भजन गाणी ह्यात मामीही हिरीरीने भाग घेई.मुक्ता मुद्दाम मामीला त्या सर्व अॅक्टीव्हीटीजमधे गुंतवुन ठेवे म्हणजे तिला एकटेपण जाणवणार नाही.मामीलाही जमेल तसे ती मुक्तांगणमधे छोट्या छोट्या कामात सहभागी होऊ लागली.

लोणची,पापड बनवणे,सांडगे,कुरडया अशा कामात तिला प्रचंड रस होता.तीही इतर बायकांसोबत कामात मदत करू लागली.

     ~~~~~~~~~~~~~~~~~~

मुक्ताच्या आयुष्यात जन्मापासुनच इतक्या चित्र विचित्र प्रसंग/घटना घडत आल्या होत्या की रूस्तमशेठ आणि सतिश सतत तिला मागे लागले होते की तुझ्या आयुष्यावर एक पुस्तक लिही आत्मकथनपर.पण तिने ते फारसे मनावर घेतले नव्हते परंतु मामीची भेट,तिच्या आयुष्यात तिने भोगलेला त्रास,रूस्तमकाका,सतिश हे तिच्या आसपासचे सगळेच लोक आपापल्या आयुष्यात संघर्ष करत करत एका यशाच्या शिखरावर पोहोचले होते त्यामुळे आताशा तिला प्रकर्षाने वाटायला लागले होते की माझ्या आयुष्यातील ह्या सर्व लोकांना मानवंदना द्यायची असेल तर मी माझे आत्मचरीत्र लिहीलेच पाहिजे.मग ती झपाट्याने त्या कामाला लागली.

वेगवेगळ्या लोकांशी भेटुन बोलुन चर्चा करून आपले लिखाण एका लेखनिकाला सुपुर्द करून त्यातल्या तांत्रिक बारकाव्याकडे लक्ष देण्यास सुचवले.कथानकाला कोणताही धक्का न लागता तो ही तांत्रिक बाजु संभाळत होता.

त्यांच्या सांगण्याप्रमाणे हवे तसे बदल करत इतर सर्व व्याप संभाळुन मुक्ता लिखाणही करत होती.

अशीच वर्षे निघुन गेली.आता रूस्तमशेठ ऐंशीच्या घरात पोहोचलेले.मामी आणि मालतीकाकीही सत्तरी आलांडलेल्या.

स्वत: मुक्ताच आता पन्नाशीला पोहोचली होती.

आणि आज तो दिवस उजाडला ज्याची सर्वच जण आतुरतेने वाट पहात होते.मुक्ताने आपले घर,मुले,मुक्तांगणचा पसारा,स्वत:ची वकिलीची प्रॅक्टीस,रूस्तमकाकांची फॅक्टरी हे सर्व व्याप संभाळुन जवळपास पाच दहा वर्ष खपुन आपले आत्मकथनपर पुस्तक लिहुन पूर्ण केले.

मेहता पब्लिशींग हाऊसने त्याची छपाई आणि वितरणाची सर्व जवाबदारी स्वीकारली.

पुस्तक विमोचनासाठी एक सुयोग्य मुहूर्त हवा होता आणि लवकरच मुक्ताला तो मुहूर्त सापडला.मुक्तांगण सेवा समितीचा वर्धापन दिन.

येत्या काही दिवसातच मुक्तांगणला चाळीस वर्ष पुर्ण होणार होते.त्यानिमित्त मुक्तांगणच्या आवारातच एक भव्य सोहोळ्याचे आयोजन करायचा निर्णय घेतला गेला होता.शहर आणि शहराबाहेरील सर्व प्रतिथयश लोकांना कार्यक्रमासाठी आमंत्रीत केले गेले होते.त्यासाठीची जय्यत तयारी सर्वच स्तरावर चाललेली होती.

मग ह्याहुन सुंदर दिवस तो कोणता असणार पुस्तकाच्या उद्घटनासाठी!!!

तिने मनोमन ठरवले ज्या व्यक्तीने तिच्या आयुष्याला परीसस्पर्श करून ते सोन्याचे केले त्या व्यक्तीच्या हातुनच तिला पुस्तकाचे विमोचन करायचे होते आणि ती व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसुन खुद्द तिचे मानसपिता रूस्तमकाका होते.

त्यांच्याच हातुन आपल्या पुस्तकाचे उद्घाटन व्हावे हा आपला मानस तिने सतिश,

मालतीकाकी आणि मामीला बोलुन दाखवला.

सर्वानीच ती कल्पना उचलुन धरली.

म्हणता म्हणता दिवस पटापट कापरासारखे उडुन गेले आणि आज तो सोनियाचा दिनु उजाडला.

रूस्तमकाकांनी चाळीस वर्षापुर्वी रूजवलेल्या छोट्याशा संकल्पनेतुन ही इतकी मोठी सेवादायी समिती उदयास आली होती.त्याचाच कौतुक सोहोळा म्हणुन हा सर्व कार्यक्रम आयोजित केला गेला होता.त्यांनी ही समिती स्थापण्या अगोदर पासुनच समाजातील दिन दुबळ्यांची केलेली सेवा त्यांना दिलेला मदतीचा हात ह्याचा गौरव तर व्हायलाच हवा होता.

रूस्तमशेठ सारखे समाजात काही लोक जरी जन्माला आले तरी त्यांच्या परीस स्पर्शाने मुक्तासारखी कितीतरी आयुष्य घडतील.हाच विचार मनात ठेवुन आजच्या कार्यक्रमाची योजना भव्य स्वरूपात आखली गेली होती.

    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मुक्तांगण महिला सेवा समितीच्या प्रांगणाला आज उत्सवाचे स्वरूप आले होते.संपुर्ण पटांगण फुलांच्या माळा आणि पताकांनी सुशोभित केले गेले होते.सर्व महिला कार्यकर्त्या उत्साहात आपल्याला दिलेली कामे पार पाडत होत्या.

प्रवेशद्वारावर मुक्तांगणच्या कार्यक्रमाची तपशीलवार माहिती येणाऱ्या जाणाऱ्यांना कळेल अशा स्वरूपात एका मोठ्ठ्या फलकावर  लावण्यात आली होती.प्रवेशद्वाराची कमानही फुलांच्या माळा अंब्याची तोरणे आणि लाईंटींगनी सुशोभित केली होती.सर्व परीसरात शांत मंजुळ सनईचे सुर ऐकु येत होते..

सर्व आमंत्रित पाहुण्यांनी स्थान ग्रहण करायला सुरवात केली होती.हळुहळु परिसर माणसांनी गजबजुन गेला.जो तो कार्यक्रम सुरू होण्याची आतुरतेने वाट पहात होता.

आपल्या लाडक्या मुक्ता ताईंची आत्मकथा आज जगापुढे पुस्तक रूपाने प्रसिद्ध पावणार म्हणुन सर्वच महिलांना विशेष कुतुहल आणि उत्सुकता होती..

सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत रंगमंच सजला होता.गंधे सर,टोपे सर,मामी आणि मालतीकाकीही आज त्याच पंक्तीत स्थान भुषवत होत्या.रूस्तमकाकांची ओळख करून देण्याचे काम स्वत: सतिश जातीने करणार होता.

कार्यक्रमाची वेळ झाली.मुक्तांगणच्या महिलांनी ईशस्तवन गाऊन कार्यक्रमाची सुरवात केली.गंधे सर आणि टोपे सरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले.सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ हार घालुन औपचारीक स्वागत झाले.

आणि आता तो क्षण समीप येऊन ठेपला ज्याची सर्वांना आतुरतेने प्रतिक्षा होती.

सतिश डायसवर आला.सर्व मान्यवरांची थोडक्यात ओळख करून दिल्यानंतर तो त्याच्या मुख्य गोष्टीकडे म्हणजेच रूस्तमकाकांची ओळख आणि त्यांचा परीचय करून देण्याकडे वळला...

सतिशने सुरवातीला रूस्तमशेठचे बालपण व त्यांच्या आयुष्यातील ह्रुदयद्रावक प्रसंग ह्यावर बोलण्यास सुरवात केली.

"आज इथल्या ह्या सगळ्या लगबगीचे कारण तर तुम्हाला माहितच आहे.आज मुक्तांगण महिला सेवा समितीचा वर्धापन दिन महोत्सव आहे.जवळपास चाळीस वर्षांपुर्वी ह्याच दिवशी रूस्तमशेठंनी ह्या महिला समितीची स्थापना केली.एक/दोन गरजू अनाथ स्त्रीयांना मदत करता करता हे इवलेसे रोपटे आज एका वटवृक्षात रुपांतरीत झाले आहे आणि ह्याचे सर्व श्रेय रूस्तमशेठना जाते.आज हजारो गरजु महिला ह्या समितीच्या आश्रयाने मानाचे जीवन स्वयंपुर्णतेने जगत आहेत.

समाजाने,परिवाराने टाकलेल्या दुर्लक्षित केलेल्या कितीतरी अनाथ पोरक्या स्त्रीयांना आज मुक्तांगणने हक्काचे माहेर देऊ केले आहे.

मुक्तांगणच्या छायेने त्यांना फक्त आश्रयच दिला नाही तर त्यांच्या अंगी असलेल्या उपजत कलागुणांना वाव देऊन त्यातुन उत्तमोत्तम वस्तु त्यांच्याकडुन बनवुन त्यांना विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्द्ध करून दिली.त्यांच्या प्रॉडक्ट्सना ब्रँड व्हॅल्यु मिळवुन देऊन पार सातासमुद्रापलीकडेही त्याची विक्री होऊन ह्या सर्व स्त्रीयांना स्वत:च्या अर्थाजनाचे खुले व्यासपीठच उघडे करून दिले आहे मुक्तांगणने.

रूस्तमशेठबद्दल काय बोलावे!!

शब्द अपुरे आहेत त्यांची कार्यगाथा सांगायला.माझ्या अल्पमातीनुसार जे जमले ते तुमच्यापुढे ठेवण्याचा हा तुच्छ प्रयत्न करत आहे.

त्यातच दुग्ध शर्करा योग म्हणजे माझी सुविद्य पत्नी तसेच समितीच्या सर्वेसर्वा,ट्रस्टी अॅडव्होकेट डॉ.सौ.मुक्ता तारे ह्यांच्या आत्मकथनपर पुस्तकाचे विमोचनही आज ह्याच कार्यक्रमात होणार आहे.

महिला सेवा समितीचे फाऊंडर मेंबर,ट्रस्टी,

समितीचे सर्वेसर्वा मायबाप,बंधु,सखा सारे काही असलेले रूस्तम शेठ ह्यांच्या हस्तेच ह्या पुस्तकाचे विमोचन होणार आहे.

      ~~~~~~~~~~~~~~~~

पंच्याहत्तर ते ऐंशीच्या घरात पोहोचलेले रूस्तमशेठ आता डायसवर आले.ह्या वयातही त्यांचा कामाप्रती उत्साह अगदी तरूणांना लाजवेल असाच होता.

पांढराशुभ्र सलवार कमीज.अत्यंत शांत धीर गंभीर मुद्रा.साडेसहा फूट उंची,गौरवर्ण आणि भव्य भालप्रदेशावर पांढऱ्या भस्माचा टिळा असे भारदस्त व्यक्तिमत्त्व रूस्तम शेठ बोलायला उभे राहताच टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी त्यांचे स्वागत केले.

मुळच्या प्रसन्नमुद्रेवर किंचित स्मित आणुन त्यांनी सभोवार बघितले.विनम्रपणे हात जोडुन सगळ्यांना अभिवादन करून त्यांनी आपल्या भाषणाला सुरवात केली.सगळा भगिनीवर्ग त्यांचे भाषण तल्लीनतेने ऐकत होता.

सगळ्या महिलावृंदाला आणि अतिथीगणांना संबोधित करून झाल्यावर आजच्या दिवसाच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर ते येऊन पोहोचले.त्यांचा ऊर अभिमानाने भरून येत होता.होऽऽऽ..कारणही तसेच होते.आज त्यांच्या मानसकन्येच्या म्हणजेच मुक्ताच्या पुस्तकाचे विमोचन त्यांच्याच हातून होणार होते.

एका पित्याचा ह्याहून मोठा सन्मान तो काय असु शकत होता!!!!!

एकीकडे चेहऱ्यावर हसु आणि दुसरीकडे डोळ्यात आनंदाश्रु अशी त्यांची अवस्था होती.

रूस्तमशेठ मुक्ता बद्दल भरभरून बोलत होते तर

मुक्ताचे डोळे मात्र पाणावले होते.

टाळ्यांच्या गजरात रूस्तमशेठनी मुक्ताचे नाव पुकारले तसे मुक्ता मंचावर आली.

रूस्तमकाकांच्या पायावर डोके ठेवुन तिने नमस्कार केला.वातावरण खूप भावुक झाले होते.टाळ्यांचा कडकडाटातच टोपे सर,गंधे सरही मंचावर आले.

पुस्तकावरच्या मुखपृष्ठावर एक फित बांधलेली होती.रूस्तमकाकांनी आपल्या थरथरत्या हातांनी ती फीत कापुन पुस्तकाचे अनावरण केले आणि पुस्तकाचे मुखपृष्ट सर्वासमोर हवेत उंचावुन सर्वांना दाखवले.सर्व मान्यवरांच्या हातात पुस्तकाची एक एक प्रत देण्यात आली.

मुक्ताच्या जन्मापासुन आत्तापर्यंतच्या आयुष्याचा सारा जमावडा म्हणजे हे पुस्तक होते.

मुक्ता मंचावर उभी राहीली.

ती नेहमीच सर्वांशी छोट्या मोठ्या कार्यक्रमानिमित्ताने महिलांशी भाषणाद्वारे संवाद साधतच असे पण आजचा दिवस वेगळा होता. आज ती स्वत:विषयी काहीतरी बोलणार होती.तीचा जीवनपट उलगडताना शब्द मुके झाले होते.मन भरलेले असले की शब्द सुचत नाहीत तसेच काहीसे झाले होते मुक्ताचेही.

काही वेळ शांततेत गेला आणि मग मुक्ता बोलु लागली.

माझ्या मुक्त सख्यांनो........!

अशी सुरवात करताच सर्व महिलांनी टाळ्यांच्या गजरात ह्या संबोधनाचा स्वीकार केला.

मग पुढे कितीतरी वेळ मुक्ता बोलत राहीली.

सर्वजण तिचे ते उद्बोधक विचार मंत्रमुग्ध होत एेकत राहीले.

जीवनाच्या वाटा कधीच सरळ नसतात,

वाट म्हणले की दगड धोंडे,काटे कुटे आलेच परंतु.कवी अनिल म्हणतात तसे

"वाटेवर काटे वेचीत चाललो,

वाटले जसा फुलाफुलात चाललो।"

तसे आपल्या वाटेवर काटे असणारच.काट्यांवर स्वार होऊन काट्यांचा स्पर्श फूलासमान झेलत ते काटे वेचत वेचत ती वाट तुम्ही चालत राहीलात तर एक ना एक दिवस मार्गातले अडथळे म्हणजेच संकटरूपी काटे नक्कीच दूर होतील ह्यात शंकाच नाही.

हेच माझ्या पुस्तकाचेही सार आहे.

"Every Lesson Gives a Pain, 

And Every Pain Gives a Lesson…" 

- A.P.J.Abdul Kalam

ह्या कलाम सरांच्या विधानाप्रमाणे आयुष्यात संघर्ष अटळ आहे.जीवनातील प्रत्येक व्यथा आपल्याला काहीतरी शिकवण देत असते.तो धडा ती शिकवणच त्या दु:खांना दूर सारायलाही शिकवते आणि आपला पुढचा मार्गही सुकर करत असते.म्हणुन कधी संकटाला घाबरू नका.हार मानुन त्यापुढे झुकु नका.

"झुकला तो हारला आणि हारला तो संपला."

म्हणुनच आयुष्यातील संघर्षातुन,संकटातुन प्रेरणा घ्या नव्या जिद्दीने आयुष्याला सामोरे जा.  साप जसा जूनी त्वचा फेकुन कात टाकतो आणि पुन्हा सळसळत्या यौवनाने पूढे सरकतो.

काय वाटते तुम्हाला कात टाकताना त्याला वेदना होत नसतील???होतात!!! सृजन हे सोप्पे नसतेच.

त्यालाही कात टाकताना प्रचंड वेदना होतात. मुद्दामहुन काटेरी झुडूपातुन अंग घासत जावे लागते जुनी त्वचा सोडताना तेव्हा कुठे ती गळुन पडते आणि नवा जन्म होतो त्याचा.

तसेच आपणही ह्या जीवनात संघर्ष करत असताना आपल्या मनावर आलेल्या मरगळीची नैराश्याची कात टाकुन सळसळत्या उत्साहाने नवी दिशा चोखाळायला हवी तेव्हाच ईप्सित धेय्य गाठता येते.

म्हणुनच माझ्या आत्मकथेचे शीर्षकही तसेच आहे

              "मी कात टाकली."

हे पुस्तक म्हणजे फक्त माझ्या एकटीची कथा नसुन समाजात अशा असंख्य मूक्ता जीवनाशी लढत आहेत संघर्ष करत आहेत.त्या सगळ्यांच्या संघर्षाचे प्रातिनिधिक रूप म्हणजे माझी कथा आहे.

ह्या पुस्तकामुळे कुण्या एका स्त्री किंवा पुरूषाला जरी लढायची प्रेरणा मिळाली,,त्याने किंवा तिने आयुष्यात न हारता ह्या पुस्तकातुन प्रेरणा घेऊन यशाची उंची गाठली तर मी समजेन की माझ्या लेखणीचा उद्देश सफल झाला..

जाता जाता निदा फाजली ह्या प्रसिद्ध शायर कवींच्या दोन आेळी सांगुन मी माझ्या मनोगताची सांगता करते.

ते म्हणतात

"दरिया हो या पहाड़ हो टकराना चाहिए 

जब तक न साँस टूटे जिए जाना चाहिए ।

यूँ तो क़दम क़दम पे है दीवार सामने 

कोई न हो तो खुद से सुलझ जाना चाहिए। "


 

धन्यवाद सख्यांनो…..

               

              "मी कात टाकली"

-----------------------(समाप्त)--------------------------------

समाप्त -16

©®राधिका कुलकर्णी.

नमस्कार मित्रहो………..!!!!

आज मुक्ताच्या आयुष्याची इतिकर्तव्यता पार पडली.तिचे जीवन आता स्थीर झालेय.मुक्ताची कथा तर पुर्ण झाली आज.

परंतु समाजात आजही अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांच्या आयुष्यात सतत दु:ख आणि अडचणी येत असतात.तसे तर आपण सगळेच रोज नव्या अडचणींशी सामना करतच असतो.आपल्यापैकी कुणालाही संघर्ष चुकलाय का?  नाही...संघर्ष तर अटळ आहे फक्त व्यक्तिपरत्वे त्याची तीव्रता कमी अधिक असु शकते.ही कथा लिहीण्यामागचा माझा उद्देशही हाच होता की संकटे तर पावलोपावली येत राहणार मित्रहो,परंतु त्याच्याशी दोन हात करून लढले पाहिजे.

Everytime you are not getting free meal in your plate..

You have to  fight and struggle for it…. 

प्रत्येक व्यक्ती मग ती स्त्री असो की पुरूष त्यांनी परावलंबत्वाची कात टाकुन स्वावलंबी बनले पाहिजे.स्वत:ला सावरत असताना दुसऱ्या कुणाला मदतीचा हातही दिला पाहिजे.

"एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ।"

 ह्या उक्तीनुसार आपल्या उत्कर्षासोबतच इतर दीन,दुबळे,पिडीतांना त्यांच्या उत्थानासाठी सहाय्यभूत होण्याचा आपण जिथे शक्य असेल तिथे अगदी मुंगीच्या पावलाने खारीचा वाटा घेऊन का होत नाही पण प्रयत्न केला पाहिजे.ह्या कथेतुन हा ही संदेश मला माझ्या वाचकवर्गाला द्यायचा होता म्हणुन हा लेखन प्रपंच.

काही चुकले असल्यास मोठ्या मनाने माफ कराल ही अपेक्षा.

कशी वाटली ही कथा ?

विशेषत: मुक्ता हे पात्र?

तुमच्या सविस्तर प्रतिक्रीया वाचायला नक्की आवडतील.

कथा आवडल्यास माझ्या ब्लॉगला फॉल करायला विसरू नका.

लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासहीत कथा नक्की शेअर करू शकता……

धन्यवाद.(चूक भूल द्यावी घ्यावी.)

@राधिका.

🎭 Series Post

View all