लेखनसमृद्धी योजनेअंतर्गत एक प्रेरणादायी कथा " मिहीर- एक सुंदर भेट "

लेखनसमृद्धी योजनेसाठी कथा. मिहीर ला मीराने खूप कष्टाने वाढवले. कारण एक स्पेशल मुलगा पूर्णपणे सामान्य मुलांसारखा व्हावा यासाठीची तिची जिद्द अनोखी होती,आणि तिने ती सार्थ ठरवली हे मिहिर ने एका प्रसंगातून तिला दाखवून दिले.
मिहीर – एक सुंदर भेट
      “अरे मिहीर, तूझ्या शर्टचा टाय बांधलास ना नीट?आज तुझा जॉब इंटरव्ह्यू आहे, कॅम्पस मध्ये सिलेक्शन ची ही सुवर्ण संधी आहे बाळा.. तुला तुझे १०० पर्सेंट द्यायचे आहे, तरीही कुठलही टेंशन घेऊ नकोस. फक्त आत्मविश्वासाने समोरच्या माणसाला जिंकायचं शिक,नोकरी तुला मिळालीच समज,” मिहीरची आई (मीरा)मिहीरला समजावत होती. मिहीरने नुकतच इंजिनिअरिंगच शिक्षण पूर्ण केलं होतं आणि कॉलेज कॅम्पसमध्ये विविध नावाजलेल्या कंपन्या होतकरू आणि हुशार तरुणांना नोकरीच्या संधी देऊ पाहत होत्या. मिहीरची पहिलीच वेळ असल्याने ,आई त्याला समजावत होती. पण मिहीर मात्र त्याच्याच तंद्रीत होता, त्याला आधीच टेन्शन आलं होतं आणि आई मात्र नेहमी प्रमाणे त्याला खूप गोष्टी समजावत होती.
       “ बास ना आई आता, किती डोकं खाशील माझं? प्रत्येक गोष्ट समजावून सांगतेस मला सारखं सारखं.. आता मला माझे निर्णय घेता येतात. कुठली परिस्थिती कशी हाताळायची हेही समजतं. त्यामुळे इथून पुढे प्लीज मला सर्व समजावून सांगत जाऊ नकोस .मी आता सर्वार्थाने स्वावलंबी झालोय.मला आता कोणाचा आधार नकोय.”असे म्हणून मिहीर हातातील काठी घेऊन चालू लागला.
      मीराला (मिहीरची आई) मात्र आज मिहीर खरच मोठा झालाय याचा आनंद झाला. पण जरा वाईटही वाटलं. खरंतर मिहीरला इथपर्यंत आणण्यात मीराने आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं.सेरेब्रल पाल्सी हा मेंदूविकार जेव्हा मिहीर दोन महिन्यांचा असताना डिटेक्ट झाला, तेव्हा मीरा व समीरची पायाखालची जमीनच घसरली. जणु दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला होता. कारण मेंदू विकारामुळे मुलांची बौद्धिक व शारीरिक प्रगती सर्वसामान्य मुलांपेक्षा किमान दोन ते तीन वर्ष मागे असते हे डॉक्टरांनी स्पष्ट केले होते,शिवाय या मुलांना सर्वसाधारण मुलांप्रमाणे बनवणे हा केवळ पन्नास पन्नास टक्के चान्स असतो असेही डॉक्टर म्हणाले होते.पण मीरा माघार घेणाऱ्यातली नव्हती. इंजिनियरिंगची पदवी असतानाही गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून तिने मिहीरला सर्वसामान्य मुलांप्रमाणे नक्कीच बनवणार ,हा निश्चय मनाशी केव्हाच पक्का केला होता.त्याप्रमाणे दररोज घरातली कामे आटोपून पाच ते सहा तास रोज मिहीरची फिजिओथेरपी ती घेत असे. या सगळ्यात मात्र तिने स्वतःला पूर्णपणे झोकून दिले होते.
             कधी कधी मात्र तिची खूप चिडचिड व्हायची. कारण चार वर्षे झाली होती,हा नित्यक्रम तिने कधीच सोडला नव्हता.पण तरीही मिहीर मात्र व्यवस्थित बसत नव्हता,रांगत नव्हता. त्याच्या शरीराचे बॅलेंसिंग व्यवस्थित होतच नव्हते. मग तिने मिहीरच्या फिजिओथेरपी सेंटर च्या सरांना फोन करून मनातील हलकल्लोळ सांगितला.सर म्हणाले “मॅडम हीच वेळ जर आपण लहान असताना आपल्यावर आली असती तर?आणि आपल्या पालकांनी जर अशीच हार मानली असती तर? लक्षात ठेवा,परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही हे जे मिहीरवर परिश्रम घेत आहात याचे फळ नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. हवं तर तुम्ही संदीप माहेश्वरी सरांचे मोटिवेशनल व्हिडिओज नक्कीच बघत जा, कारण कुंभारच आपल्या मातीच्या मडक्याला योग्य पद्धतीने घडवत असतो.” सरांचे हे बोल लक्षात ठेवून मीरा परत कामाला लागली व मिहिरला पुर्णपणे एकरूप होऊन, अनेक उपक्रमांमध्ये गुंतवून ठेवून त्याची शारीरिक व बौद्धिक प्रगती कशी होईल ,याचा अभ्यास तिने सुरू केला व त्यानुसार त्याची दिनचर्या ठरवली. मात्र संदीप माहेश्वरी सरांची एक गोष्ट तिने कायम लक्षात ठेवली. “आपल्या मागे कितीही ताण तणाव असू देत ,आपल्याला आवडते ती एक गोष्ट ज्यातून उत्साह, ऊर्जा मिळते ती रोज करावीच.”म्हणून तिने लेखन चालू केले. कारण महाविद्यालयीन जीवनापासून लेखनाची आवड असल्याने तिने अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या. केवळ तिला उत्साह मिळावा, म्हणून लेखनाचा छंद मात्र ती जोपासत होती. ठीकठिकाणी तिचे लेखन ऑनलाइन प्रकाशित झाले होते आणि ते पाहून एका कंपनीने टेक्निकल रायटर म्हणून तिला नोकरी ऑफर केली होती. पण तीही तिने नम्रपणे नाकारली. कारण मिहीरने स्वावलंबी व्हावे हा एकच ध्यास तिने मनाशी बाळगला होता. या दरम्यानच मिहीरची कोणाशी तरी भावनिक देवाणघेवाण व्हावी, म्हणून तिने सेकंड चान्स घेण्याचे ठरवले व कैवल्यचा जन्म झाला.
     आता मात्र मिहीर आणि कैवल्य मध्ये रमून ती जास्त आनंदी वाटत होती, कारण कैवल्यच्या जन्माने ती त्याच्या बाललीला ,जसे पहिले पाऊल,पहिल्यांदा आईचे बोट धरणे, हे सर्व अनुभवून फार सुखावली होती आणि नकळतच तिला वेगळाच उत्साह मिळाला होता.असेच दिवसामागून दिवस जात होते आणि मिहीर हळूहळू बऱ्याच गोष्टी स्वतः च करायला लागला होता, तसेच बौध्दिक व शारीरिक दृष्ट्या स्वावलंबी होत चालला होता .आज मागे वळून पाहिल्यावर मीराला हा सर्व जीवनपट अगदी लख्ख दिसत होता.
   अशातच फोनची रिंग वाजली .”आई, मिहीर बोलतोय.अगं,शेवटचा इंटरव्यू राऊंड आहे माझा आधीचे दोन राउंड म्हणजे एप्टीट्यूड टेस्ट आणि ग्रुप डिस्कशन पार केले त मी, पण आता शेवटचा राउंड आहे, म्हणून टेन्शन आलय जरा.सॉरी आई, मला कोणाचाच आधार नको, असं मी म्हणालो.रागाच्या भरात मी पूर्णपणे स्वावलंबी झालोय असेही मी म्हणालो.पण नाही आई.तुझे शब्द, मार्गदर्शन माझी ताकद वाढवतात. मी खरच तुझ्याशिवाय परिपूर्ण बनू शकत नाही. मी कितीही मोठा झालो,तरीही तू मला आधार म्हणून हवीच आहेस आई.. खरच सॉरी! मला प्लीज माफ करशील का?”
      " अरे वेड्या जे झालं ते झालं .जे घडलं ते सर्व तू विसरून जा आणि तुझ्या इंटरव्यू राऊंडसाठी सज्ज हो..लक्षात ठेव ! तुझा आत्मविश्वासच तुला सर्व स्पर्धांमध्ये यश देईल . जेही विचारतील त्याची निर्भिडपणे उत्तर दे .माहित नसतील तर नम्रपणे सॉरी सर असे म्हण.पण तू तुझे बेस्ट देण्याचा प्रयत्न कर.. माझ्या बाळा,हा जॉब तुला मिळाला आहे,अशी डोळ्यासमोर कल्पना करून इंटरव्यू ला सामोरे जा.. तू नक्कीच सिलेक्ट होशील.” “थँक्यू आई!!मी आता निश्चिंत झालो आहे .. तू सांगतेस ना, तसंच करतो.बघ तुझा मिहीर नक्कीच सिलेक्ट होऊन दाखवणार.” “ओके बेटा,चल बेस्ट ऑफ लक .. आता पटकन स्वतःला फ्रेश कर.. चेहऱ्यावर स्मितहास्य ठेव आणि आत्मविश्वासाने येणारी वेळ, चॅलेंज फेस कर, स्वीकार!!”  
           “ठीक आहे आई,” असे म्हणून मिहीर आत गेला व सर्व प्रश्नांची मिहीरने आत्मविश्वासाने उत्तरे दिली, आणि मिहिरला खूप मोठ्या कंपनीत,भरपूर पॅकेज असलेली नोकरी मिळाली. मीरा मनोमन सुखावली व आपला मिहीर आज खरोखरच स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे याचा तिला अत्यानंद झाला. सोबतच मिहीरने आपण दिलेले संस्कार जोपासले आहेत, हे तिच्या लक्षात आले .आपण आज पर्यंत त्याच्यावर घेतलेले कष्ट सार्थ ठरले व देवाने खरंच मिहीर सारखा विशेष मुलगा एक सुंदर भेट म्हणून मला दिला,असे मनोमन तिला वाटले आणि तिच्यातील मातृत्व खऱ्या अर्थाने भरून पावले..