मीच माझी शिल्पकार अंतिम भाग

Motivational story of women.

मीच माझी शिल्पकार भाग अंतिम

पूर्वभाग थोडक्यात...
खरंच गं ही कल्पना माझ्या डोक्यातच आली नाही.काय भन्नाट डोकं चाललं तुझं रसिका? आजच मनीष कडे शेवटचे पैसे मागते दागिने बनवण्यासाठी साहित्य आणावे लागेल ना म्हणून मग मला सारखे सारखे हात पसरावे लागणार नाहीत. 
रसिका तू सांग...तुझ्या घरातून या तुझ्या कामाला पाठिंबा
आहे?........"

भाग ६ अंतिम
"नाही ग सई!मीच माझी संघर्ष करून उभी राहिले.माझ्या सासूबाईंना तर वाटते की स्त्री घराबाहेर अशी पडली की मर्यादा ओलांडते,वाया जाते.पण असे एकही उदाहरण नाही ग !उलट स्त्रीया आत्मनिर्भर झाल्या, यशस्वी झाल्या तर त्या स्वतः सह इतरांचाही विकास करतात. स्वतः स्त्री असूनही स्वतःमधील शक्तीची जाणीव सासूबाईंना नाही की मी बाहेर पडले तर घर सांभाळावे लागेल म्हणून आडकाठी घालतात त्याचं त्यांनाच माहीत. प्रतापरावांचा म्हणशील तर मी यशस्वी झाले काय आणि नाही झाले काय त्यांना काही फरक पडत नाही. कसलच कौतुक नाही आणि अभिमानही नाही. मनीष सारखेच कधी स्वतःहून माझ्या खाजगी गरजांसाठी पैसा स्वतः दिला नाही मग मीच माझी उठले.माझ्या स्वप्नांची,कर्तृत्वाची मलाच जाणीव झाली आणि पुढचे सगळे तुझ्या समोरच आहे".

"किती वेळ झाला रसिका? आपण गप्पाच मारत आहोत. माझा मुलगा वाट पाहत असेल.मी निघते परवा आपल्या कॉलेजमध्ये तुझ्या सत्कार समारंभाला भेटू चल निघते मी."

कॉलेजच्या व्यवस्थापन मंडळाने रसिकाच्या कार्याची दखल घेऊन तिचा जाहीर सत्कार सोहळा कार्यक्रम ठेवलेला होता तशी बातमी माहिती वृत्तपत्रात जाहीर केली होती.

घरातील काम, सासू-सासर्‍यांची सेवा,वेगळ्या विषयांवर प्रबोधनपर लेखन,प्रशिक्षण केंद्राची जबाबदारी सगळे वेळेचे नियोजन करून रसिका समर्थपणे सांभाळत होती. कोणाला तक्रार करण्याची जागा तिने सोडली नाही. करुणा बाई मधून मधून खुसपट काढून कारण शोधायच्या पण तक्रार पोकळ असे.


छानशी नाजूक काठ्यांची गुलाबी इरकली साडी रसिकाने नेसली ,गळ्यात मंगळसूत्र,मोत्याची सर, नाजूक कानातले, हातात एक एक बांगडी सरकवत अशा मोजक्याच दागिन्यात सुंदर तयार झाली .खरा दागिना तर तिचा आत्मविश्वास चेहऱ्यावर झळकत होता म्हणूनच की काय आज तिचे सौंदर्य अधिकच खुललेलं परिपक्व दिसत होतं. प्रतापरावांना काही काम असल्याने ते कार्यक्रमाला येणार नव्हते.करुणा बाईंनी तर गुडघे दुखी चे कारण सांगून टाळल होते.जकातदार साहेब गावी गेलेले होते.


रसिकाने कॉलेजमध्ये पाऊल टाकल्याबरोबर तिच्या आठवणी जाग्या झाल्या.गेल्या काही वर्षांत बरेच बदल झाले होते तरीही आठवणीच्या खुणा जशाच्या तशा रसिकाला भासल्या. टाळ्यांच्या गजरात पुष्पगुच्छ देऊन रसिकांचे स्वागत झाले.ज्या प्राध्यापकांकडून तिने शिक्षण घेतले होते त्यांच्याच नजरेत आपल्या या विद्यार्थिनी विषयी सार्थ अभिमान दिसत होता. रसिका आमची, आमच्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे सांगतानाच त्यांची मान गर्वाने उंचावत होती.

समोरच्याचं खुर्चीत आई, महेशदादा ,मीनावहिनी ,सई बसलेले दिसले .आपलं कौतुक करायला निदान माहेरची मंडळी तरी आहेत म्हणत रसिका सुखावली.

महाविद्यालयाच्या पटांगणावर भव्य मंडप टाकून सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्याने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह इतर  महाविद्यालयातील प्राध्यापक- विद्यार्थी, शहरातील अनेक स्त्री-पुरुष कार्यक्रमास उपस्थित होते.कार्यक्रम आयोजन कर्त्यांचे बैठक व्यवस्थेचे नियोजन कोलमडले होते बरीच मंडळी मागे उभी राहून उपस्थित होते.

कार्यक्रम निवेदिकेने मधाळ निवेदनातून रसिकाची ओळख करून दिली.या यशस्वी वाटचालीत तुम्ही कसे घडलात?, तुम्हाला कोणी घडवले ?या यशाच श्रेय कोणाला जातं ?आपल्या कार्याविषयी तसेच आम्हा सगळ्यांना मार्गदर्शनपर दोन शब्द सांगावे असे उद्गार करत रसिकाला बोलण्यासाठी आमंत्रित केले.

रसिका उभी राहिली जमलेल्या श्रोतेवर्गास नम्रतेने नमस्कार केला.मनोगत व्यक्त करण्यास सुरुवात केली.
सर्वात आधी महत्वाचे सांगते मला कोणी घडवले बीडवले नाही! मीच माझ्या जीवनाची शिल्पकार आहे.असं कोणी कोणाला घडवत नसतं. आपले आई-बाबा गुरु संस्काराची शिदोरी देतात,मार्गदर्शन करतात पण वाट दाखवतात पण वाटेवर आपले आपणच चालायचे असते.यशस्वीरीत्या स्वतःला घडवत असताना हे संस्कार, शिक्षण महत्त्वाचे असतातच पण त्याहून अत्यंत महत्त्वाची असते ती स्वयंप्रेरणा...तहानलेल्या घोड्याला पाण्याजवळ नेले जाते पण पाणी त्याला स्वतः प्यायचे असते.कोणी दुसरे तोंडात पाणी टाकेल याची वाट पहात बसला तर तहानेने जीव जायची वेळ घोड्यावर येईल. बरोबर ना?....

सर्वच स्त्रियांना घर संसार सांभाळत नोकरी करणे शक्य नसते.तेवढ्या नोकऱ्याही आपल्या देशात उपलब्ध नाहीत प्रत्येकिलाच घराबाहेर पडता येतेच असे नाही अशा सख्या घरातूनच दोन तीन मैत्रिणी मिळून अथवा एकटी ही गृह उद्योग चालवू शकते.आपल्या छंदातूनच आर्थिकजग उभारू शकते.प्रत्येक माणसात विशेष असे गुण असतातच.

वेळेसोबत बदलायला हवं नाहीतर वेळ बदलायला शिकायला हवं.नुसत्या अडचणींचा पाढा वाचून यश मिळत नाही.तर प्रत्येक वळणावर येईल त्या परीक्षेस स्वतः खंबीर होऊन पुढे जाणे इष्ट ठरते.चांगली वेळ येईल अशी वाट पाहू नये.ती स्वतः येणार नाही तर ते आपल्यालाच आणावी लागेलं....

फक्त ज्ञान,कौशल्य,शिक्षण, एखाद्या विषयात आवड, असून उपयोग काय? ते योग्य वेळी उपयोगात आणलं तर पाहिजे!तर स्वतःची प्रगती होईल.कोणी दुसरं अथवा तिऱ्हाईत व्यक्ती आपल्याला घडवायला येणार नाही.तशी वाट पाहणे म्हणजे वेळ व्यर्थ घालवणे होय. स्वतःची स्वप्न स्वतःच केली तर यशस्विता पायाशी लोळण घेते.कौटुंबिक जबाबदारी टाळून यशस्वी व्हावे असे माझे म्हणणे नाही कौटुंबिक कर्तव्य आणि आत्मनिर्भरता याच सुवर्णमध्य साधला तर तिला स्वतःची वाट नक्कीच सापडेल आणि त्या वाटेने यश नक्कीच मिळेल.

स्वयंप्रेरणाच नसेल तर स्वतःच्या नशिबाला, परिस्थितीला दोष देऊन उपयोग नाही. उठा मैत्रिणींनो! स्वतःचे स्वप्न स्वयंप्रेरणेने साकार करा! तुम्ही स्वतः तुमच्या भाग्याच्या निर्मात्या आहात !त्यासाठी लागणारा विश्वास तुमच्या मध्येच आहे.स्वतःचे भविष्य-वर्तमान स्वतः बदलू शकता. स्वतःला घडविण्यात आपला अमूल्य वेळ खर्च करा.काहीही करा पण जीव ओतून गुणवत्तापूर्ण काम करण्याचा वसा सोडू नका.अडचणी,इतरांचा आवाजवी विचार अनावश्यक भाग समजून वगळल्यास स्वतःच शिल्प आपण स्वतः घडवू शकतो.मी तेच केलं म्हणून मी आज ताठ मानेने,स्पष्ट बाणे ने म्हणेल मीच माझी शिल्पकार........

रसिका चे भाषण संपले. बरेच श्रोते स्वयंप्रेरित होऊन उत्साहाने नवीन वाटेवर यशस्वी होण्यास सज्ज झाले होते.टाळ्यांच्या गजर उत्तरोत्तर वाढतच होता.रसिकाला आज स्वतःचाच स्वतःला अभिमान वाटला.

              ....... समाप्त .......
   ©® लेखिका 
आपल्या परिचयाच्याच,
 गायत्री चौधरी.
 आपणास कशी वाटली प्रेरणादायक कथा ?रसिका चा चार भिंतीतला स्वयंप्रेरणेने स्वप्नपूर्तीचा वास्तवातला प्रवास? आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
पुन्हा भेटू नवीन विषयासह..... 
          ...........नमस्कार........