Nov 29, 2022
// rablogging.com_GGINT //
सामाजिक

मीच माझ्या घराची राणी गं!(लघुकथा)

Read Later
मीच माझ्या घराची राणी गं!(लघुकथा)

मीच माझ्या घराची राणी गं!

(लघुकथा )

 

 

सुधाने दरवाज्यात ठेवलेले माप ओलांडले आणि नवऱ्याच्या सोबतीने ती आत प्रवेशली. दोघांच्याही अंगावरून सासूने भाकरतुकडा फिरवला आणि गेटच्या बाहेर टाकून दिला.

 

"आता हे घर तुझं बरं. ह्या तिजोरीच्या चाव्या घे. घरातल्या लोकांना एकत्र बांधून ठेव. इतकी वर्ष मी साऱ्यांचं निगुतीने केलंय. तो वसा तू सांभाळ!"

 

एखाद्या चित्रपटातील सासुप्रमाणे आपल्या सासूबाईंनीदेखील असे काही म्हणावे हे सुधाने स्वप्नातदेखील मनात आणले नव्हते. कारण कळायला लागल्यापासून घराच्या बाहेर राहून शिकलेली ती. हातात डिग्री आली नि दोनच महिन्यात तिचे लग्न झाले. त्यामुळे घरातील वेगवेगळ्या स्वभावांच्या लोकांना एकत्र बांधण्याची कला तिला काही अवगत नव्हती. इथे हळूहळू सारेच तिला शिकायचे होते. घरातल्या लोकांना आपले करायचे होते. या वास्तूशी प्रेमाचे नाते बांधायचे होते. आणि ती या सगळ्या गोष्टीसाठी खूप उत्सुक होती.

 

सासरी पाय टाकला नि तिची सासू तिची 'आई' झाली. आई शब्दच मोठा गोड. स्वतःच्या आईला ती मम्मी म्हणायची, कारण तिच्यापेक्षा मोठी भावंड तेच म्हणायचे त्यांच्याकडून ती तेच शिकली पण पर्सनली तिला मात्र 'आई' हा शब्द फार आवडे. इथे नवरा, दीर, नणंद आई म्हणायचे, मग तिनेही आनंदाने तो शब्द स्वीकारला.

 

कुणाशी बोलतांना ही सासू कम आई जेव्हा स्वतःच्या लेकरांविषयी भरभरून बोलायची तेव्हा हिलाच भारावल्यासारखं व्हायचं. तिने आपल्या मम्मीला असे कधी बोलताना पाहिले नव्हते. संसाराच्या गाड्यात तिने नवऱ्याच्या बरोबरीने साथ दिली होती. केवळ चूल आणि मूल यात अडकायला वेळच मिळाला नाही. त्याउलट सुधाची सासू. नवऱ्याने घरात आणून टाकायचे आणि तिने घरातले तेवढे बघायचे, हे तिचे काम.

 

ही सासूआई घरातील सगळी कामं स्वतः करायची. सततच्या सतत कामात! एखादी बाई ठेवावी हे कधी रुचलेच नाही. व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा हवा म्हणजे हवाच. मग एकच काम दहावेळा करावे लागले तरी हरकत नाही. घरातल्यांना तिची सवय झाली होती नि त्यामुळे त्यांना फारसे काही वाटत नव्हते. सुरुवातीला सुधालाही याचे अप्रूप वाटे. पण मग हा अतिरेक तिला जाचू लागला.

 

'बाई गं, जरा बस. थोडी विश्रांती घे. काम काय करायचंच आहे. पण शरीराला थोडा आराम नको का?' कित्येकदा सुधाच्या मनात सासूआईला हे सांगावे वाटायचे. पण कसलं काय नि कसलं काय?

 

सासूआईचा 'काम एके काम' हा पाढा संपायचे नाव काही घेईना आणि सुधाचीही हिंमत होईना.

 

कधीतरी तिला वाटायचं, 'राहू दे, या करताहेत न? तेवढीच आपल्याला मदत.'

पण मग हळूहळू तिला कळू लागले की या घरात आपल्याला आपले असे स्थान नाहीच मुळी. मी केवळ स्वयंपाक करण्यापूरती. बाकी सगळे तर या आईंच्याच हातात. घरात तिने झाडू मारला तर आई पुन्हा त्यावरून झाडू मारतील. फरशी पुसली तर त्या कापड ओले करून दरवाजे, भिंती, कपाटं काय काय पुसायला घेतील.

 

'अगं ये बये, थकवा म्हणजे काय कधी कळतच नाही का तुला?' सुधाला कधीतरी ओरडून बोलावेसे वाटे. पण ओरडणार कोणावर? आणि सांगणार तरी कोणाला? नवरा तर जणू अजूनही मम्माज बॉय होता. पगार झाला की आईच्या हातात पैसा टेकवायचा. त्याने सुधालादेखील पहिल्याच रात्री सांगितले होते की दर महिन्याला तुझ्या पगारातील अर्धे पैसे आईला देत जा.

 

"अरे, पण.."

ती काही बोलणार तेव्हा तोच तिला मिठीत घेत म्हणाला, "अगं आईला तेवढेच बरे वाटेल. आणि आम्ही सगळे देतोच की?"

 

तिला जरासे विचित्र वाटले हे. नुकतीच चार महिन्यापूर्वी ती एका प्रायव्हेट कंपनीत कामाला लागली होती. या चार महिन्यात झालेल्या पगारातील रुपया सुद्धा तिने आपल्या मम्मीला दिला नव्हता. मम्मीच बोलली होती की, "कशाला गं? तुझे पैसे तू बचत म्हणून ठेव. तुलाच उपयोगात येतील."

 

आणि इथे नवरा चक्क सासूला पैसे दे म्हणाला तशी सुधा चक्कर येऊन पडायची बाकी राहिली पण नवऱ्याच्या मिठीत विरघळत असताना तिने तो विषय बाजूला ठेवला. हळूहळू ती हे विसरूनही गेली पण पगार आला तेव्हा नवऱ्याने परत आठवण करून दिली. तिनेही गुमान अर्धा पगार सासूआईच्या हातावर ठेवला. "कशाला गं? असू दे तुझ्याकडेच." वरवर तिने म्हटले खरे आणि लगेच हातातील नोटा मुठीत बंदही करून टाकल्या.

 

लाडकी नणंदबाई गावातच रहायची. मग काय? दर रविवारी चिकन मटणाचा बेत आणि जावई मुलीचा थाट. जसे काही मुलगी वर्षानंतर घरी आलीय, असेच त्यांचे वागणे असायचे.

 

"आई किती गं थकलीस तू? कशाला एवढं काम करतेस? आता सून आलीये ना तुला?" मुलीने म्हटले की सासूचा चेहरा पडायचा.

 

"आजकालच्या पोरी कुठे काम करतात गं. होते तोवर करते की मीच. ती मोठी सून फार कामाची होती, वेगळी झाली आणि पुन्हा माझ्या पदरी कामच आलं."

सासूबाईचे नेहमीचे तेच रडगाणे चालायचे.

 

सुरुवातीला त्यांनीच हिला सांगितलेले की मोठी सून खूप खाष्ट होती. भांडण, पोलिसकेस करून नवऱ्याला घेऊन वेगळी झाली. आणि आता तिचेच गोडवे गायले जायचे.

 

"नशीबवान आहेस हं सुधा. तुला इतकी काळजी घेणारी सासू मिळाली." नणंदबाई प्रत्येकवेळी तिच्या नशिबाचा हेवा करायची.

 

हिच्या मनात यायचं, 'एवढा हेवा वाटतोय तर घेऊन जा ना तुम्ही आईंना तुमच्याकडे. स्वतः मस्त राजाराणीचा संसार करताय आणि रविवारी इकडे येऊन मजा मारताय. मला मेलीला रविवारचेही सुख उपभोगू देत नाहीत.' मनात चरफडण्याशिवाय सुधाच्या हातात काहीच नव्हते.

 

कधी तिच्या माहेरचे कोणी आले तरी मनातले बोलायची भीती असायची. सासूआई सोबत असायच्याच. ही आपली स्वयंपाकघरात चहा नाश्ता करण्यात व्यस्त. इकडे सासूआईंच्या दिलखुलास गप्पा!

 

"तुमची मुलगी स्वभावाने बरी आहे हो. पण कामात मात्र भोपळा. काही नीट येत नाही."

 

नाश्ता चहा घेऊन अर्ध्या तासात भेटायला आलेली व्यक्ती निघून जात असे. हिच्या मात्र डोळ्यात पाणी. 'माझ्या माहेरची लोकं मला भेटायला येतात की यांना? मी फक्त किचनमध्येच असते. बोलायला कधी मिळतच नाही. त्यापेक्षा त्यांनी इथे न आलेलेच बरे.'

 

 

आपलेच काही चुकत असेल म्हणून हळूहळू सुधाने बदलायचे ठरवले. नाहीतरी रहायचे तर इथेच आहे मग कशाला मनात वाईट प्रतिमा निर्माण करायची? या विचाराने ती सासूआई सारखे काम करायला लागली.

 

आता झाडू मारताना भिंतीवर तिचा झाडू फिरू लागला. फरशी पुसताना दरवाजे, खिडक्या, कपाटं स्वच्छ होऊ लागली. जेवणाचा मेनू आईला विचारून करू लागली. ही आई चुकून कधी बाहेरगावी गेली तर तिच्यासारखीच अंगण ब्रशने घासून घासून स्वच्छ करू लागली.

 

सासूला मात्र कौतुक नव्हतेच कशाचे. हिने कितीही भिंती झाडल्या तरी यांचा झाडू फिरायचाच. खिडक्या दारावर ओला कापड सरकायचाच. स्वयंपाक छान झाला तर दाद कधीच नसायची.

 

"वांगी खूप गोड होती हो, म्हणून भाजी रुचकर झाली. मी दही घेतले तेच मुळी चांगले होते म्हणून कढी मस्त झाली."

 

जेवताना त्यांचचे 'मी,माझं' सुरू झाले की सुधाच्या डोळ्यात टचकन पाणी येई.

 

"बाई, बाई. दोन दिवस गावाला गेले तर माझ्या घराचं अंगण कसे झालेय?" दारातून अंगणात पाय ठेवल्याबरोबर त्यांची बडबड कानावर यायची. सुधाने घासून घासून स्वच्छ केलेल्या अंगणावर परत ब्रश आणि पाण्याचा स्पर्श होई.

 

आपण कुठे चुकतो आहोत याचे आकलन सुधाला होत नव्हते. आईंना आपल्या हातचे काहीच कसे चांगले दिसत नाही या प्रश्नाचे उत्तर तिला सापडत नव्हते.

 

सरता सरता दोन वर्षांचा काळ लोटला. घरात बाळाची चिमणी पावलं फिरायला लागली.इकडल्या वस्तू तिकडे दिसू लागल्या. 'माझं घर कसं बाळामुळे अव्यवस्थित राहते.' म्हणून सासूआईंची चिडचिड व्हायला लागली.

 

या दोन वर्षात सासूबाईंचे नेमके दुखणे काय आहे हे सुधाच्या लक्षात आले. लग्नाच्या चाळीस वर्षापासून त्यांनी स्वतःला घरकामात झोकून दिले होते. सासुसासरे नव्हते, त्यामुळे त्यांच्या संसारात ढवळाढवळ करणारे कुणी नव्हते. मुलं मोठी होत गेली मुलांच्या हातात सारे काही आयते मिळू लागले तेव्हा त्यांनाही आईचा काही प्रॉब्लेम नव्हता.

 

अडचण झाली, जेव्हा मोठी सून घरात आली. तिने घरात सगळीकडे ताबा मिळवायचा प्रयत्न केला आणि तेव्हा खडाजंगी होऊन मोठा मुलगा आणि सून वेगळे रहायला निघून गेले.

 

सुधा सासरी आली तेव्हा सासूने हुशारी केली आणि हिनेही मोठीसारखी आपल्यावर कुरघोडी करू नये म्हणून स्वतःला पुन्हा कामात झोकून दिले. त्या आजवर घराची राणी म्हणून वावरत होत्या आणि आत्ताही त्यांना तोच मान हवा होता. घरातील सत्ता गेली तर सून आपल्याला विचारणारही नाही या भावनेने त्यांना ग्रासले होते.

 

दोन वर्ष सासूआईच्या घरातील एक व्यक्ती होऊ पाहणाऱ्या सुधाला मात्र अपयश आले आणि मग तिने एक कोडगेपणा स्वीकारला. सासू कोणाला काही सांगू देत, तिने खरोखरीच कामातून अंग काढून घेतले. आपल्या मुलाची काळजी आणि स्वयंपाक या व्यतिरिक्त कुठे रस दाखवणे तिने सोडून दिले.

 

सासूआई आता वयाने थकल्यात, तरीही मीच या घराची राणी म्हणून त्या खूष आहेत. माझं घर म्हणून त्यांचे त्यांच्या घरावर खूप प्रेम आहे. तर या घरात मला कधीच समावून घेता आले नाही म्हणून अलिप्ततेत गेलेल्या सुधाच्या मनात आता त्या वास्तूबद्दल जराही माया उरलेली नाहीये.

*** समाप्त ***

अशा सुधा आणि सासूआई आजूबाजूला नजर फिरवली तर नक्कीच दिसतील. त्यांच्यापैकी कोण चूक कोण बरोबर? या प्रश्नाचे उत्तर सुधासोबत मलाही सापडले नाही. तुम्हाला सुचले तर कमेंटमध्ये नक्की सांगा.

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

साहित्यचोरी गुन्हा आहे.

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now