मीच माझी शिल्पकार भाग ५
पूर्वभाग थोडक्यात...
पहिल्या लेखाचे मानधन हाती आले तेव्हा रसिकाला मनस्वी आनंद झाला.पैसाच सारे जग आहे असे नाही पण जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा त्यासोबतच पैसा आज-काल मूलभूत गरज झाली आहे.हा विचार करून मी माझी मूलभूत गरज स्वतः आत्मनिर्भर होऊन भागवू शकते याचा अभिमान तिला वाटला....आणि ठरविलेले दुसरे पाऊल उचलण्यास सज्ज झाली......लेखणीस जोम चढलाच होता.
भाग ५
आता कितीही अडचणी समोर उभ्या राहिल्या तरी त्यांच्यावर मात करण्याची प्रचंड इच्छाशक्ती,आत्मविश्वास जागृत झाला.जे सत्य आहे,स्वप्न आहे ते प्रत्यक्ष करून दाखवण्याची धमक स्वतःचीच स्वतः विकसित आपण करू शकलो पण माझ्यासारख्या किती स्त्रिया असतील त्यांची स्वप्न,काहीतरी नवीन करण्याची उमेद घराभोवतीच फिरत असतील.अशा स्त्रियांसाठी आपण काहीतरी ठोस असं कार्य करायला हवं मनात म्हणत रसिकाने कार्याचा आराखडा तयार केला.
मंदरची यंदा दहावी झाली होती पुढील शिक्षणासाठी तो दुसर्या शहरात गेला त्यामुळे रसिकाला बराचसा मोकळा वेळ मिळू लागला. त्या वेळेचा सदुपयोग करत स्त्री जागृतीची घोडदौड सुरू केली.लेखांमधून जनजागृतीचे काम तर जोमाने चालूच होते त्यासह घरातल्या घरात करता येतील असे लघु उद्योग प्रशिक्षण आधी स्वतः घेतले त्या विषयी संपूर्ण ज्ञान मिळविले घरगुती लघुउद्योग विषयी अभ्यास करून.प्रत्यक्ष सखोल ज्ञान मिळविले.
सावित्रीबाई फुले जयंतीच्या शुभ दिनी स्त्रीयांसाठी
"मीच माझी शिल्पकार घरगुती लघु उद्योग प्रशिक्षण केंद्र"मुहूर्तमेढ रोवली.घरच्याच बाजूच्या खोलीत प्रशिक्षण केंद्र सुरू झाले.सुरुवातीला प्रशिक्षण घेणाऱ्या भगिनींची संख्या कमी होती जशा प्रशिक्षण घेतलेल्या सख्या आत्मनिर्भर होऊ लागल्या तशी प्रशिक्षणार्थींची संख्या वाढू लागली.त्यातूनच काही भगिनी निवडून रसिकाने प्रशिक्षण कार्याच्या मदतीस घेतल्या.
मुली स्त्रियांना प्रशिक्षण देत असतांना तिला प्रकर्षाने जाणवले केंद्रात शिकवल्या जाणार्या बर्याच वस्तू,गोष्टी त्यांना आधीच अवगत असतात जसे कापडापासून पिशव्या,झबले,ड्रेस शिवणे,शोभेच्या वस्तू बनविणे,मेहंदी काढणे,रंगीबिरंगी मण्यांपासून दागिने बनविणे.अशा बऱ्याच गोष्टी बहुदा पूर्वीचे ते त्यांचे छंद असतात. घर संसार मुले बाळे त्यांच्यात स्वतःचे छंद पडद्याआड दडवून ठेवतात.आत्मानंद,आत्मनिर्भरतेला मुकतात.वाट पाहतात कोणी आपल्याला म्हणेल तुला जे ज्ञान हवे आहे ते अवगत करून घे.स्वतः च्या पायावर उभी रहा.आतून स्वयंप्रेरणा ही काही गोष्ट आहे हे त्या विसरतात असाव्यात.
स्त्रियांच्या स्वयंप्रेरणेने विषयी रसिकाने लेखणीतून बरेच विचार लिहिले.वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अशा स्त्रियांशी संवाद साधला त्याचीच परिणीती आज तिच्यासारख्याच पाचशे स्त्रिया स्वतःच्या घरातच यशस्वी लघुगृहउद्योग चालवत आत्मनिर्भर झाल्या होत्या.
आज तिच्या महाविद्यालयातील मैत्रीण सई रसिकाला भेटायला आली दोघी बऱ्याच वर्षांनी भेटला होत्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या.
बापरे रसिका किती मोठी झालीस ग? तुझे लेख वृत्तपत्रात मी नेहमी वाचतच असते.काल आलेली बातमी वाचून थक्क झाले ग!मला तू माझी मैत्रीण आहेस म्हणून खूप खूप अभिमान वाटला .योगायोगाने इकडे मावशीकडे येणे झाले म्हटलं आधी तुला भेटावं म्हणून तडक इकडे आले.
नाही ग सई !मी कसली मोठी झाले.माझ्या कार्याची दखल आपल्या महाविद्यालयाने घेतली हे चांगलेच आहे पण त्यापेक्षा मला मी प्रशिक्षित केलेल्या ,माझ्या विचारांनी प्रेरित होऊन एखादी स्त्री घर सांभाळून आत्मनिर्भर होते तेव्हा तिच्या चेहर्यावरील आनंद हेच माझ्यासाठी मिलियन डॉलर पेक्षा मोठे आनंददायी असते .तू सांग तुझं काय चालू आहे ?काय करतेस ?
माझं काय छान चाललं आहे ).दोन मुलं ,नवरा आणि घर. सर्व इच्छा,हव्या असलेल्या वस्तू मिळतात मग काय !फक्त मला नेहमी एकाच गोष्टीचे लाज वाटते.
कोणत्या ग?खाजगी असले तरी मला सांगू शकते हं! आपण दोघी नक्कीच मार्ग काढू. नाहीतरी याबाबतीत संपूर्ण कॉलेजमध्ये आपण माहीर होतोच .रसिकाने सईला टाळी देत चिडवत हसून म्हटले.
खाजगी असं काही नाही ग ! मी गृहिणीच पैसाअडका संपत्ती काही कमी नाही म्हणून दोन मुलांच्या संगोपनात रमून गेले.काही करावेसे वाटले नाही. पण थोड्या थोड्या गोष्टीसाठी मनीष कडे पैसे मागण्याची मला लाज वाटते. आपण आपल्या गरजा त्याच्या जीवावर पूर्ण करतोय अशी मनाला कुठेतरी खंत वाटते. तो जीव तोडून मेहनत करतो पत्नी म्हणून त्यांच्या मिळकतीवर माझा काही अधिकार असला तरी स्वतंत्र व्यक्ती सापेक्षता म्हणून मनाला नाही पटत ग!
आलं लक्षात माझ्या .मग सई तू मनीषा एकदा सांगून टाक ना! की ठराविक पैसे मला महिन्याला माझ्यासाठी म्हणून देत जा म्हणजे सारखे सारखे मागण्याची गरज भासणार नाही आणि तुझं मन हे तुला खाणार नाही.
मनीष तसा समजूतदार आहे ग! एक-दोन वेळा आम्ही तू सांगतेस तसेही करून पहिले तीन-चार महिने त्याने स्वतःहून माझ्यासाठी काही पैसे दिले ही. काही दिवसांनंतर परत तेच चालू झाले.विसरतो म्हणून की मी त्याच्याकडे मागायला जावे म्हणून पुन्हा ये रे माझ्या मागल्या!आणि हे मागणे म्हणजे भिकाऱ्या होऊन भिकाऱ्यासारखे वाटते ग! कुठेतरी आत्मसन्मान दुखावला जातो.मनीष ला हे स्वतःहून कळायला हवे ना?
वर सहज म्हणतो माझं काय आणि तुझं काय सारखच आहे तुला जेव्हा हवे तेव्हा जितके लागतील तितके मागून घेत जा.
सई बरोबर आहे तुझे.मागणं म्हणजे परावलंबित्व दर्शवत ते स्त्रीच्या हळव्या स्वभावाला कणखर मनाला न पटण्यासारखे असते मग तो दाता स्वतःचाच नवरा का असेना.स्त्रीयाखर्चिक असतात,उधळपट्टी करतात असा ठपका ठेवून आपली आर्थिक मिळकत स्त्रीच्या हाती देणं नेहमी टाळलं जातं म्हणून अपरोक्ष स्वतःच सर्व आर्थिक व्यवहार पार पाडली जातात.आर्थिक व्यवहार स्वतः सांभाळण एक अर्थी बरोबरच आहे.आर्थिक व्यवहार तुम्ही सांभाळा पण आपलीच बायको तिच्या ही काही खाजगी गरजा असतात त्याचे भान ठेवून आपल्या संसाराचा अविभाज्य भाग समजून तिच्या मागण्याची वेळ येऊ न देता स्वतःहून मिळकतीचा फक्त पाव भाग स्वच्छेने जरी तिला दिला तर आपल्याच घरादाराला सांभाळण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घालणाऱ्या तिचा आत्मसन्मान जपला जाईल हे बहुदा या लोकांना कळत नसावे.
असे झाले नाही की मग स्त्री नोकरी करण्याचा, आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा हट्ट करते मग हीच लोक तिच्या आर्थिक मिळकतीवर घराचे,नवीन गाडीचे अथवा इतर वस्तू चे कर्ज घेतात आणि तीही स्वेच्छेने स्वतःची आर्थिक मिळकत यासाठी खर्च करते कारण तिला अहंकारी जगणे पटत नाही.
हो ग रसिका ! माझ्या जेठा नेही जावेच्या नोकरीच्या पगारावर नवीन कारसाठी कर्ज काढले आहे.ती ते अजूनही फेडते आहे.माझे काका बाकी याबाबतीत देव माणूस आहे.त्यांच्या मिळकतीतील ठराविक रक्कम मावशी च्या हाती नाही तर तिच्या कपाटात न चुकता प्रत्येक महिन्याला ठेवतात .मग मावशीला त्या पैशांचं काय केलं?कधीही विचारत नाहीत. मावशी पण स्वतःचा खर्च भागवून उरलेल्या पैशाची बचत करते त्यातूनच तिने काकांना वाढदिवसानिमित्त नवीन दुचाकी घेऊन दिली त्यांची गाडी खूपच खराब झाली होती म्हणून.
सई तुझ्या काका सारखे समजूतदार माणसं खूप कमी आहेत ग जगात.
रसिका मला दागिन्यांची किती हौस होती.दागिन्याशिवाय माझं पान हलत नसे.तशी गुंतवणूक म्हणून सोन्याचे एक-दोन वर्षात दागिने आम्ही करतो.हौसेने इंटीमेशन ज्वेलरी जरी घ्यायची म्हटले तरी मनीष कडे पैसे मागावे लागणार म्हणून माझी हौस करणंच मी बंद केलं.
खरंच गं वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरीचा तुझ्याकडे खजाना असायचा त्यातली काही तर तू स्वतः आवडीने तयार केलेले असायचे.किती सुंदर बनवायची ग!आता नाही बनवत का? तुझ्यात ती कला आहे,अलंकार सौंदर्याची जाण आहे.त्यातूनही घरच्या घरी तू अर्थार्जन करू शकते की! हल्ली तर अशा दागिन्यांना खूप मागणी आहे."
"खरंच गं ही कल्पना माझ्या डोक्यातच आली नाही.काय भन्नाट डोकं चाललं तुझं रसिका? आजच मनीष कडे शेवटचे पैसे मागते दागिने बनवण्यासाठी साहित्य आणावे लागेल ना म्हणून मग मला सारखे सारखे हात पसरावे लागणार नाहीत.
रसिका तू सांग...तुझ्या घरातून या तुझ्या कामाला पाठिंबा आहे?........"
क्रमशः..........
©®
आपल्या परीचयाच्याच
गायत्री चौधरी.
आपल्या प्रतिक्रिया लेखणीत उत्साह भरत असतात .म्हणून आपली प्रतिक्रिया मोलाची आहे.द्यायला विसरू नका.
पुन्हा भेटू......
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा