बनून मीच माझा शिल्पकार

We Can Be Sculpturer Of Our Life
कवितेचे नाव :मीच माझा शिल्पकार

कवितेचा विषय: मीच माझा शिल्पकार


मानवदेह दिला देवाने,झाले मोठे उपकार
आकार देण्यास आयुष्याला कुमतिशी लढलो अपार
स्वतः घडविले स्वतःलाच आत्मसात करून सद्विचार
सद्विचारांचा मनावर कोरला संस्कार
बनून मीच माझा शिल्पकार……..

अंधश्रद्धा व असंगाविरुद्ध लढलो झुंजार
दूर केले सर्व दुर्गुणी दोस्त यार
पचवला हलाहलसमान शब्दांचा मार
हलाहल पचविण्याचा मनावर कोरला संस्कार
बनून मीच माझा शिल्पकार…….

दगा फटका धोका आप्तेष्टांनी केला फार
तरी निमूटपणे पुढे चाललो होऊन बेदरकार
ढळलो नाही जराही विपरीत परिस्थितीने केला हाहाकार
अढळतेचा मनावर कोरला संस्कार
बनून मीच माझा शिल्पकार…….

सुखांचा चा गुणाकार, दुःखांचा चा भागाकार
असे आत्मसात केले जीवनाचे सार
गर्वात राहू नका कधीही गर्व दु:खा पेक्षा अंगार
निगर्वतेचा मनावर कोरला संस्कार
बनून मीच माझा शिल्पकार………

भ्रष्टाचारी वृत्तीला गुद्दे हाणून दिला मार
प्रश्न केला मनाला,हेच का मातापित्यांचे संस्कार?
बुद्धीला बजावले सदा रहा ईमानदार
ईमानदारीचा मनावर कोरला संस्कार
बनून मीच माझा शिल्पकार…….

सद्वर्तनाची धरली कास सोबत सज्जनांचा आधार
समाधानी रहा असे संतवचन पूर्वापार
आत्मसंतुष्ट राहून आयुष्याला दिला आकार
आत्मसंतुष्टेचा मनावर कोरला संस्कार
बनून मीच माझा शिल्पकार…….


सारिका गडे

ठाणे विभाग