Feb 23, 2024
नारीवादी

मीच आहे मार्ग माझा - भाग 2

Read Later
मीच आहे मार्ग माझा - भाग 2
तिच्या आईची तब्येत ठीक नव्हती म्हणून ती गावी गेली असं समजलं. आता मोठा यक्षप्रश्न उभा..मानसीला सकाळी 7 वाजता घरातून निघावं लागे. त्या आधी दोघांचे डबे , नाश्ता आणि जेवण बनवणं कठीण होतं. पण मानसीने विचार केला, सासूबाई करतील मदत, थोड्याच दिवसांचा तर प्रश्न आहे. हेही आव्हान पेलू.

ती सकाळी 5 ला उठत गेली. सगळं तयार करत 6 वाजले. मग छानपैकी तयार होऊन 7 ला ऑफिसला गेली. सगळं अगदी वेळेत झालं म्हणून तिला आज विशेष समाधान होतं. सासूबाई मदतीला आल्या नाहीत, पण असो, काही अडलं नाही. तिची ही तत्परता बघून नवरा आणि सासरे तिचं कौतुक करू लागले. सासूच्या मनात मात्र असुरक्षितता निर्माण झाली. मग तिच्या जेवणात काहीतरी कुरापत काढणे, अगदी निघायच्या वेळी काहीतरी बनवायला सांगणे, कालच्या जेवणाची कुटाळी करणे असे उद्योग सुरू झाले.

एके दिवशी नेहमीप्रमाणे सासूबाई सकाळी 6 ला किचनमध्ये आल्या आणि बघितलं की काय काय बनवलं आहे..

"अगं बाई,पोहे..पण खाईपर्यंत गार होतात की..आणि हे काय, वांग्याची भाजी? ऍसिडिटी होते त्याने..मला थालीपीठ करून ठेव बरं.."

मानसी हसली,

"सासूबाई गरम गरम पोहे वाढायला मी घरात तरी असेन का? आणि त्या भांड्यात पोहे ठेवले आहे ना त्यात गरम राहतात पोहे...आणि ऍसिडिटी चं कालच सांगितलं असतं मला तर नसती केली वांग्याची भाजी, तुम्ही आत्ता सांगताय मला? आणि थालीपीठ बनवणं आता शक्य नाही..कारण एक तर ते खाईपर्यंत गार होतील आणि दुसरं म्हणजे मला आता उशीर झालाय..आजच्या दिवस तुम्ही बनवून घेतलं तरी काही हरकत नाही.."

तिच्या या उत्तराने सासूबाई गार पडल्या, ती चुकीचं काही बोलतच नव्हती..पण दुसरी एखादी असती तर गपगुमान मान खाली घालून ऐकलं असतं हे त्यांना वाटू लागलं.

मानसी समोरच्याचं चुकलं तर ऐकून घेत नसे..
तिच्या करियरच्या आलेखावर चढता क्रमच दिसत होता. कुठल्याही कारणाने करियरच्या बाबतीत तडजोड केली नाही.
अश्यातच तिला दिवस गेले.

तिने अगदी आठव्या महिन्यापर्यंत काम केलं. सासूबाई कश्याही असल्या तरी नातवासाठी आसुसलेल्या होत्या. या काळात त्यांनी मानसीची विशेष काळजी घेतली. मानसीला सुद्धा या बदलाने छान वाटलं.

नवव्या महिन्याच्या अखेरीस मानसीला कळा सुरू झाल्या, दवाखान्यात तातडीने नेण्यात आलं. मानसीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. घरात आनंदाचं वातावरण पसरलं. सासूबाई बाळाचं मन लावून सगळं करत होत्या. कारण एकुलता एक मुलगा धीरज, त्यानंतर कितीतरी वर्षांनी घरात लहान बाळ आलेलं.

मानसीने maternity leave वर होती. सहा महिन्यांनी पुन्हा ऑफिस जॉईन करायचं होतं. त्यामुळे त्या पद्धतीने ती नियोजन करत होती. बाळाला जास्तीत जास्त वेळ आजी आजोबांसोबत असू द्यायची जेणेकरून त्याला सवय होईल.

जसे सहा महिने होत आले तसं तिने घरी सांगितलं..

"आता मी ऑफिस जॉईन करेन परत..बाळाला सवय झालीये आजी आजोबांची त्यामुळे काही प्रॉब्लेम होणार नाही.."

ती हे बोलताच धीरज आणि सासूबाई चमकल्या. त्यांना वाटलेलं की आता नोकरी वगैरे मानसी डोक्यात आणणार नाही. सासूबाईंनी पुन्हा आपले रंग दाखवायला सुरवात केली..

"मला नाही बाई जमणार पूर्णवेळ त्याला सांभाळायला, वयानुसार नाही जमणार मला.."

"आई इतके दिवस दिवसभर तुम्हीच तर सांभाळत होतात ना?"

"हो, पण आता शक्य वाटत नाही.."

धीरजला सुदधा आता मानसी घरी असण्याची सवय झालेली. स्वयंपाकिण अजून परतली नव्हती, त्यामुळे मानसीचा पूर्णवेळ बाळासाठी आणि घरातल्या कामात जाई. याच रुटीनची सर्वांना सवय झालेली. पण आता, हे रुटीन सोडायला इतर लोकं तयार नव्हती.

धीरज आणि मानसी मध्ये खटके उडू लागले, धीरजच्या मते आता घर आणि बाळ हीच तिची प्रायोरीटी असायला हवी. नोकरीचा विचार तिने करू नये..दुसरीकडे मानसीला ऑफिसमधून सतत फोन यायचे, सोबतच इतर कंपन्यांच्या ऑफर्स यायच्या. घरी बसून तिलाही चुकल्या सारखे झालेले.

एके दिवशी एका कंपनीने तिला उच्च पदाची आणि पगाराची नोकरी ऑफर केली. ती घरी खोटं सांगून मुलाखत द्यायला गेली आणि तिची निवडही झाली. घरी येताना तिला तिची जुनी स्वयंपाकिण दिसली, ती तिला पाहून चमकली..

"काय गं सुधा? इकडे कधी आलीस? कळवलं नाही?"
क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Sanjana Ingale

CEO at irablogging

CEO (Ira Blogging)

//