मीच माझी शिल्पकार

I Am The Architect Of My Life


राज्यस्तरीय करंडक कविता स्पर्धा
विषय : - मीच माझा शिल्पकार
संघ : - मुंबई
शीर्षक : - मीच माझी शिल्पकार


घडवत राहीले स्वतःला
करून आत्मसात सुविचार
द्यावे का श्रेय कुणाला ?
मीच आहे माझी शिल्पकार

ठेवा संस्काराचा जपला
दिला जो मातापित्यांनी
धडा ज्ञानाचा गिरवला
शिकवला जो गुरूजनांनी

कर्म जे जे तू करशील
येईल तुजपाशी फिरून
बरेवाईट तूच ते भोगशील
बोध मोलाचा महाग्रंथांतून

शिकत राहीले मीच कधी
जगरहाटीच्या शाळेतून
शिकवत गेली नियती कधी
चांगल्या वाईट परिस्थितीतून

सदृढ मन सदृढ शरीर
ठेवण्या राखले श्रम सातत्य
नाही केला उठण्या उशीर
साधना योग ध्यानाची नित्य

मेहनत सचोटी खरेपणा जिद्द
अंगी सदा मुरवत मी ठेवली
जपण्या मातीशी ऋणानुबंध
मशाल मनी तेवत मी ठेवली

केले ज्ञान संपादन मी अद्यावत
जपत सुसंगत सदा जीवनात
प्रेम आदर माणुसकी आचरणात
मानले समाधान जे लाभले त्यात

ठाकले उभे संकट जरी समोर
रोवते पाय त्याच्या छाताडावर
विश्वास तो मनगटाच्या बळावर
गेले न शरण न झाले मी लाचार

घडवले मी माझेच व्यक्तिमत्व
तावूनसुलाखून देत आदर्श आकार
अभिमान का नसावा सांगाया महत्व
मीच आहे माझी शिल्पकार