मी... दोन हजार तेवीसच्या काळातील स्त्री

दोन हजार तेवीसच्या काळातील स्त्री

मी... दोन हजार तेवीसच्या काळातील स्त्री 

    नमस्कार! आजच्या या आधुनिक 'हाय', 'हॅलो'च्या जगात माझा नमस्कार थोडासा 'आउटडेटेड' वाटला असेल, नाही का? पण काय करणार, स्वतःच्या मुळांना विसरावंसं वाटतच नाही. याचा अर्थ असा नाही बरं की, मी अगदीच जुन्या विचारांचा पगडा असणारी आहे; पण हो, जुन्या आणि नव्या विचारांची सांगड घालून राहणं मला मनोमन आवडतं.

    आज आपण दोन हजार तेवीसच्या काळात वावरतोय; पण आधुनिकता अंगिकारलेल्या या एकविसाव्या शतकात खरंच ती आधुनिकता दिसून येतेय का? मला तरी नाही असं जाणवत! त्यामागचं स्पष्टीकरण मी पुढे देईनच. आपण जगानुसार बदलतोय खरं; पण ते बदल आपल्यापासून सुरू करायची इच्छा खूप कमी लोक मनात आणतात. एक स्त्री म्हणून मला स्वतःलाही कित्येक बाबतीत बरेच बदल अपेक्षित आहेत. स्वतःकडून तर आहेतच; पण इतर स्त्रियांकडूनही त्या बदलांसाठी पुढाकार अपेक्षित आहे.

    स्त्री शब्द उच्चारला की त्याच स्त्रीची विविध रूपं डोळ्यांसमोर येतात. सुंदरता, प्रेमळपणा दाखवणारी असो किंवा मग प्रसंगी झालेली रणरागिणी वा चंडिका, स्त्री प्रत्येक रूपात तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देते. आज ती गृहिणी असली तरी साऱ्या जबाबदाऱ्या लीलया पार पाडताना दिसते आणि नोकरी करणारी असली तरीही दोन्ही जबाबदाऱ्या उत्तमरित्या निभावताना दिसून येते. ती लक्ष्मी, सरस्वती, चंडिका, अन्नपूर्णा, गृहलक्ष्मी, इ. कितीतरी रूपात आपल्यासमोर असते; पण याची योग्य ती जाणीव सगळ्यांनाच आहे का? घराबाहेर कितीही समानता आणि स्त्री हक्कांबद्दल बोललं तरी स्वतःच्या घरीही त्याचं तंतोतंत पालन करणं प्रत्येकालाच जमत नाही. कटू असलं तरी सत्य आहे!

    आज या दोन हजार तेवीस सालात वावरताना आपण नक्कीच पाहू शकतो की, काय नाही येत स्त्रियांना? जवळपास सर्वच क्षेत्रांत आज स्त्री आघाडीवर आहे. “जमणार आहे का तुला?”, “तू नकोच पडू यात”, “तुझं काम नव्हे हे” इथपासून सुरू झालेला प्रवास अगदी ती त्या कामात पारंगत झाल्यावर नाक मुरडण्यापर्यंत सुरूच राहतो. स्त्री सक्षमीकरण, स्वावलंबन यांसारखे मुद्दे आज प्रकाशझोतात आहेत. आजची स्त्री ही स्वतःच्या पायावर उभी आहे. तिला कोणत्याही कुबड्यांची गरज लागेलच असं नाही; परंतु तरीही बरेचदा परिस्थिती अशी असते की, तिला स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडत राहावं लागतं. मुळात तिने काय करावं हा सर्वस्वी तिचा निर्णय आहे. ती गृहिणी राहून स्वतःला शोधत असेल तर तोही तिचा निर्णय आहे आणि करिअर नामक जगात जर तिला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर तोसुद्धा तिचाच निर्णय आहे; पण आजही या दोघांची निवड केलेल्या स्त्रियांना त्यावरून कितीतरी वेळा टोमणे ऐकावे लागतात. गृहिणींना तर बऱ्याच ठिकाणी अक्षरशः गृहित धरलं जातं. तिचं असं काही मत नसतंच. जे घरातील इतर व्यक्ती बोलणार ते निमूटपणे ऐकून घ्यावं हेच जणू तिचं काम आहे. बऱ्याच ठिकाणी याच्याविरुद्ध स्थितीसुद्धा असते. तिला प्रत्येक वेळी विचारात घेतलं जातं; पण तरीही हा कल गृहित धरण्याकडे दिसतोच. हक्काच्या घरात जेव्हा हक्काच्या माणसांकडून आपले विचार डावलले जातात किंबहुना जिथे तिला स्वतःच्या विचार करण्यावर सुद्धा बंधन आहे, अशा वेळी त्या स्त्रीला काय वाटत असावं याचा विचारही मनाला यातना देतो आणि त्यातही जेव्हा ती प्रत्येक गोष्टीसाठी इतरांवर अवलंबून असते, तेव्हा त्या परावलंबित्वाची जाणीव तिला सतत होते. तिचे घरासाठीचे कष्ट मात्र इथे गौण ठरतात. आजही बऱ्याच शिकल्या सवरलेल्या स्त्रियांना इच्छा असूनही नोकरी व्यवसाय करता येत नाही की, स्वतःच्या मर्जीने घरात काही करताही येत नाही. नोकरी करत असली तरी तिच्या स्वतःच्या कमाईवर तिचा काडीमात्र हक्क नाही, अशीही स्थिती असते.

    'ती'चे संस्कार हा मुद्दा तर अतिशय आवडीचा विषय आहे. ती अबोल, सहनशील, अत्याचार सहन करणारी असेल तर तिचे संस्कार चांगले असतात; परंतु तेच जर प्रत्युत्तरादाखल आवाज वाढवला तर मात्र आगाऊपणा तिच्या माथी मारला जातो.

    एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या अधोगतीचं कारण ठरते या वाक्याचा प्रत्यय तर बरेचदा येतो आणि दुःख या गोष्टीचं आहे की, ती दुसरी स्त्री अनेकदा तिची सख्खी आई, बहीण, सासू, मैत्रीणदेखील असते. "आमच्या वेळी नव्हतं असं काही", "काय ती थेरं म्हणायची", "बाईच्या जातीला शोभतं का हे?" अशी कितीतरी वाक्यं एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या बाबतीत वापरते तेव्हा खरंच कीव येते. अपवाद आहेतच; पण म्हणून वास्तव नाकारता तर येत नाही ना?

    स्त्री पुढे गेली म्हणजे डोक्यावर मिऱ्या वाटणार ही मानसिकता आजही बऱ्याच ठिकाणी दिसून येते. स्वतःच्या मेहनतीने पुढे जाऊन यश संपादित करणं चूक तर नक्कीच नाही. मग तरीही निव्वळ ती स्त्री आहे म्हणून पुढे जाऊ नये ही मानसिकता कोणत्या दृष्टीने योग्य दिसते? आज पुरुष कोणतंही काम करू शकतो, कधीही कुठेही जाऊ येऊ शकतो, कामासाठीही बाहेर कुठेही जाऊ शकतो; परंतु स्त्री हे सर्व तितक्याच सहजतेने करू शकते का? कितीही नाही म्हटलं तरी आजही या बाबतीत म्हणावी तितकी सहजता दिसून येत नाही. आजही तिला दुय्यम स्थान आणि वागणूक दिली जाते. स्त्री पुरुष समानता म्हणताना या गोष्टीचा विचार फारच कमी केला जातो.

    स्त्रीजन्माला मिळालेली एक नैसर्गिक देणगी म्हणजे मासिक पाळी! परंतु आजही कित्येक चुकीच्या समजुतींमुळे स्त्रीला बरंच काही सहन करावं लागतं. 'अतिरेक हा अपायकारकच' हा विचार आज या एकविसाव्या शतकातही म्हणावा तितका रुजू शकला नाही हे दुर्दैवच म्हणावं लागेल. आज एकविसाव्या शतकात राहताना सुद्धा जेव्हा स्त्रीभ्रूणहत्येच्या घटना ऐकायला मिळतात, तेव्हा याहून दुर्दैव ते काय असंच मनात येतं. आधुनिक आधुनिक म्हणताना विचार मात्र मागेच राहिले ही गोष्ट कदाचित हे लोकं विसरले असावेत. आजही ती हुंडाबळीची शिकार होतेय आणि आजही ती मूल होत नाही म्हणून अत्याचार सुद्धा सहन करतेय. आजच्या या मॉडर्न म्हणवून घेणाऱ्या जगात सुद्धा ती कौटुंबिक हिंसाचाराला बळी ठरते. आजही ती रंगाच्या भेदभावाच्या विळख्यात सापडते आणि तरीही समाज काय म्हणेल या गोष्टीचा विचार करून तिने हे सारं निमूटपणे ऐकून घ्यावं, सहन करावं हेच या समाजाला अन् कुटुंबाला अपेक्षित असतं. स्त्री म्हणजे उपभोगाची वस्तू हा वैचारिक गंज जोपर्यंत मानवी स्वभावाला चढलेला आहे, कदाचित तोपर्यंत स्त्रीला स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडतच राहावं लागेल.

    असं नाही की स्त्रीला मनापासून मानणारे, तिचा आदर करणारे जगात नाहीत. नक्कीच आहेत! स्त्रीला प्रेरणादायी समजून तिचा यथोचित सन्मान करणारे पुरुष पाहायला मिळतातच; परंतु पुरुषप्रधान संस्कृतीत आजही स्त्री कुठेतरी दुय्यम स्थानीच आहे, हे वास्तव आपण टाळू शकत नाही. सोन्याचा असला तरी पिंजरा हा पिंजराच असतो!

    खरं सांगायचं तर आज या दोन हजार तेवीस सालात मी स्वतःला जितकी मुक्त समजते तितकंच मला दडपणही जाणवतं. 'बाई' म्हणून ज्या नजरा झेलाव्या लागतात आणि जी वागणूक बरेचदा दिली जाते, त्यामुळे मला मोकळा श्वास काय तो घेतानाही विचार करायला लागतोय. मी स्वतःला कितीही स्वावलंबी वगैरे म्हटलं तरी घराबाहेर निघाल्यावर स्वतःच्या काळजीपोटी योग्य त्या गोष्टी लक्षात घेऊन वागावं लागतंच आणि म्हणूनच सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आधुनिकता अंगिकारलेल्या शतकात खरंच ती आधुनिकता दिसून येते का असा प्रश्न उपस्थित केला होता.

    पण हो, हे सुद्धा अगदी खरं आहे की, आज स्त्री अगदीच पूर्वीसारखीदेखील राहिली नाहीये. आधीच उल्लेख केल्याप्रमाणे ती आज जवळपास सर्वच क्षेत्रांत काम करतेय आणि त्या प्रत्येक ठिकाणी तिने तिचं स्थान अगदी बळकट केलंय.‌ वेळेनुसार तिचा प्रगतीचा आलेख उंचावतच आहे. तिचं अस्तित्व ती निर्माण तर करतेयच; पण ते टिकवून ठेवण्यासाठीही ती प्रयत्नशील आहे. बदलती जीवनशैली पाहता आजच्या स्त्रीने स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं ही काळाची गरज झाली आहे आणि प्रत्येक स्त्रीने हा विचार करायलाच हवा. ती सुदृढ असेल तरच ती तिच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, कर्तव्य नीट पार पाडू शकते. तिच्या स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी तिने स्वतः पाऊल उचलायला हवं. परिस्थिती, वेळ, विचार, माणूस हळूहळू बदलत जातात. आपण स्वतःला नक्की कुठे पाहतो, हे शेवटी आपल्याच हाती आहे. स्वतःचं अढळ स्थान निर्माण करायचं असेल तर वर्ष कोणतंही असो, स्वतःचे विचार तितके भक्कम करायला हवे.

-© कामिनी खाने.