मी तुझ्या पाठीशी आहे भाग ३

नातं सासू-सूनेचं


मी तुझ्या पाठीशी आहे भाग ३

स्वप्ना ड्रेस घालून बाहेर आली. सासूबाई किचनमध्ये होत्या, म्हणून ती किचनमध्ये गेली.


"आई, मी चहा करते." स्वप्ना म्हणाली.


"स्वप्ना, इथून पुढे तुलाच हे सगळ करायचं आहे. मला आता करुदेत. तू एक काम कर, राहुल व बाबा हॉलमध्ये बसलेले असतील, त्यांना चहा नेऊन दे. आपण दोघी इथेच डायनिंग टेबलवर बसून चहा पिता पिता गप्पा मारु." सासूबाईंनी सांगितले.


स्वप्नाने राहुल व तिच्या सासऱ्यांना चहा नेऊन दिला. तिच्या सासूबाई सोबत ती डायनिंग टेबलवर बसली.


"चहा कसा झाला आहे?" सासूबाईंनी तिला विचारले.


"छान झालाय." स्वप्नाने हसून उत्तर दिले.


"नक्की ना?" 


स्वप्नाने होकारार्थी मान हलवली.


चहा पिता पिता सासूबाई म्हणाल्या,

"स्वप्ना बाळा, घरात वावरताना मनावर दडपण घेऊ नकोस. तुला जर मी बनवलेला चहा आवडला नाही, तर मला तसं स्पष्टपणे सांग. मला जे आवडतं, ते तुला आवडलंच पाहिजे, असा माझा अट्टाहास नाहीये."


"आई, मी दडपण घेत नाहीये, पण मला थोडं अवघडल्यासारखं वाटत आहे." स्वप्ना म्हणाली.


सासूबाई हसून म्हणाल्या,

"नवीन घर म्हटल्यावर ते वाटेलचं. मी फक्त एवढंच सांगेल की, घरातील कामांचा, स्वयंपाकाचं तू टेन्शन घेऊ नकोस. घरातील सर्व कामांना बाई आहे. आपल्याला फक्त स्वयंपाक करण्याचं काम असतं. स्वयंपाक मी तुला हळूहळू सगळा शिकवेल.


उद्या तुम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाणार आहात ना? शॉपिंग झालीय का? नाहीतर राहुलसोबत जाऊन कपडे घेऊन ये. तिकडे पंजाबी ड्रेस घालू नकोस. जिन्स टॉप, वनपीस घालशील. मजा करण्याचे हेच दिवस असतात." 


सासूबाईंच्या या बोलण्याचे स्वप्नाला आश्चर्य वाटत होते.


स्वप्नाच्या चेहऱ्यावरील आश्चर्याचे भाव बघून तिच्या सासूबाई म्हणाल्या,

"तुला माझ्याकडून हे वागणं अपेक्षित नव्हते का? तुझ्या चेहऱ्यावरील भाव बघून तरी मला तेच वाटत आहे."


"आई, अगदीच तसं नाही. मी माझ्या मैत्रिणीकडून तिच्या सासूबाईंबद्दल बरंच काही ऐकलं होतं. लग्नापूर्वी मला तुम्ही कश्या असाल? हाच प्रश्न पडला होता. माझं आणि तुमचं पटेल का? हे कळत नव्हतं. तुम्ही माझ्याशी एकदम मोकळ्यापणाने बोलत आहात, हे बघून थोडं आश्चर्य वाटलं." स्वप्नाने सांगितले.


यावर तिच्या सासूबाई फक्त हसल्या, त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.


रात्रीच्या स्वयंपाकात स्वप्नाने तिच्या सासूबाईला मदत केली होती. चौघांनी एकत्र बसून हसत खेळत गप्पा मारत जेवण केले.


दुसऱ्या दिवशी राहुल व स्वप्नाला हनिमूनला जायचे असल्याने ते दोघे लवकर झोपायला गेले.


घड्याळाचा गजर वाजला तशी स्वप्ना झोपेतून उठली. अंघोळ करुन ती पटकन किचनमध्ये गेली, तर तिच्या सासूबाई किचनमध्ये चहाची तयारी करत होत्या.


"आई, मला उठवायचं ना." स्वप्ना म्हणाली.


चहाचा कप स्वप्नाच्या हातात देत सासूबाई म्हणाल्या,

"निवांत बसून चहाचा आस्वाद घे. राहुल उठला का?"


"मी त्यांना उठवूनचं इकडे आलेय." स्वप्नाने उत्तर दिले.


"चहा पिऊन झाल्यावर बॅग आवरुन घे. तोपर्यंत मी नाश्त्याची तयारी करते. खाल्ल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाही, हा माझा नियम आहे." सासूबाईंनी हसून सांगितले.


सासूबाईंनी स्वप्नाला किचनमध्ये कशालाच हात लावू दिला नाही. चहा पिऊन झाल्यावर रुममध्ये जाऊन स्वप्नाने कपड्यांची बॅग भरली.


"स्वप्ना, तो निळ्या रंगाचा टॉप आणि जिन्स घाल. मी तसंच मॅचिंग घालणार आहे." राहुलने सांगितलं.


"अहो, पण आई-बाबांसमोर ते कसं वाटेल?" स्वप्नाला प्रश्न पडला होता.


"काही वाटणार नाही. तू घाल. आई काही बोलली, तर मी आहेच." राहुल हे बोलून रुमच्या बाहेर निघून गेला.


राहुलच्या आदेशानुसार स्वप्नाने निळ्या रंगाचा टॉप आणि जिन्स घातली. सासू- सासऱ्यांसमोर स्वप्नाला जायला अवघडल्यासारखे वाटत होते. राहुल तिला हात धरुन बाहेर घेऊन गेला.


"आई, स्वप्नाने जिन्स-टॉप घातला, तर तुला काही अडचण आहे का?" राहुलने आईला समोर बोलावून विचारले.


"स्वप्ना, अग किती छान दिसते आहेस. मी तर कालच तिला जिन्स-टॉप घाल म्हणून सांगितले होते." स्वप्नाच्या सासूबाईने सांगितले.


पुढील काही वेळात स्वप्ना व राहुल नाश्ता करुन घराबाहेर पडले. घरातून बाहेर पडल्यावर स्वप्नाच्या मनात विचार आला की,

"आपल्या सासूबाई अश्याच आहेत की, जसं नेहा म्हणते तसं त्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असतील. नवीन नवीन माझ्याशी चांगलं वागतील आणि पुढे जाऊन मला त्रास देतील का?"


स्वप्नाच्या मनात जो प्रश्न उभा राहिला आहे, त्याचे उत्तर बघूया पुढील भागात....


©®Dr Supriya Dighe
🎭 Series Post

View all