मी तुझ्या पाठीशी आहे भाग २
नेहाच्या सासरची कथा ऐकून स्वप्ना आधीच घाबरलेली होती, त्यात बाबांची बडबड ऐकून तिला भीती वाटत होती. स्वप्ना विचार करत करत रुममध्ये गेली.
"ओ स्वप्ना मॅडम, आतापासूनच कोणाच्या तरी विचारात इतक्या दंग झाल्यात का?"
स्वप्नाने आवाजाच्या दिशेने बघितले व ती जोरात आनंदाने ओरडली,
"दिपाताई, तू कधी आलीस?"
"अर्धा तास झाला असेल. तू कसला विचार करत आहेस? काकांचं बोलणं तुला नवीन आहे का? काकांचा स्वभाव तुला ठाऊक आहेच ना?" दिपाने विचारले.
स्वप्ना म्हणाली,
"बाबांच्या बोलण्याचा एवढा विचार करत नाही, पण वाईट वाटतंच ना. माझी मैत्रीण नेहा आहे ना, मी तिला भेटायला गेले होते. तिच्या तोंडून सासूबाईबद्दल ऐकलं, म्हणून मला टेन्शन आले आहे ग.
दिपाताई, तुझी सासूही तुला त्रास देते का? तुझ्या इच्छेचा तिथे कोणीच विचार करत नाही का?"
दिपा हसून म्हणाली,
"ये वेडाबाई, असं काही नसतं. स्वप्ना टाळी ही एका हाताने वाजत नाही. नेहाची सासू जर तिला त्रास देत असेल, तर त्यात नेहाचं काहीतरी चुकत असेल ना?
एका घरात रहायचं म्हटल्यावर थोडेफार मतभेद हे होणारचं. आपण दुसऱ्याच्या घरात जातो, तेथील परंपरा, सवयी वेगवेगळ्या असतात. आपण अगदी शंभर टक्के सगळं आत्मसात करावं, अशी त्यांची इच्छा नसते, निदान आपण तसा प्रयत्न करतो आहोत, हे त्यांना दिसायला हवे.
आता इथे तुला काका किती रागवत असतात, तरी तू त्यांचं बोलणं मनावर घेतेस का? नाही ना, मग सासरी गेल्यावर समजा तुझे सासरे तू घरी उशीरा आल्याबद्दल काही बोलले तर त्याचाही तुला राग यायला नको.
स्वप्ना, आत्तापासून कोणाबद्दल मनात तिढा निर्माण करुन ठेऊ नकोस. कोरी पाटी घेऊन त्या घरात जा आणि संसाराला सुरुवात कर. सगळ्यांचे स्वभाव जाणून घे, त्याप्रमाणे वागायला सुरुवात कर. आपली मैत्रीण असं म्हणते, म्हणून तसं वागायला जाऊ नकोस.
तुझं काही चुकलं असेल, तर उलट उत्तर न देता ऐकून घ्यायचं. समजा, तुला तुझी बाजू मांडायची असेल, तर अतिशय शांतपणे बोलण्याचा प्रयत्न करायचा.
आपल्या आई-वडिलांना त्यांच्या सुनेने समजून घ्यावे, प्रेमाने सांभाळावे असं वाटतं ना? मग आपल्या नवऱ्याच्या आई-वडिलांना समजून घेण्याची तयारी दाखव. तुझ्या सासरची मंडळी कदाचित खूप चांगली असतील.
आता निगेटिव्ह विचार करुन तुझा चांगला मूड खराब करु नकोस. तुझं लग्न एकदाच होणार आहे, तर त्यातील सर्व विधींचा मनमुराद आनंद घे."
"ताई, तू किती छान समजावून सांगितलं. नेहाचं बोलणं ऐकून मला जाम टेन्शन आले होते." स्वप्ना म्हणाली.
पुढील काही दिवसांत स्वप्नाचं लग्न झालं. लग्न झाल्यावर तांदळाचं माप ओलांडून तिने सासरच्या घरात प्रवेश केला.
घरात पाहुणेमंडळी असल्याने स्वप्ना व तिच्या सासूचा एवढा काही संपर्क आला नव्हता. नवी नवरी असल्याने घरातील काही कामं करण्याची स्वप्नाला गरज पडली नव्हती.
सत्यनारायण पुजा झाल्यावर स्वप्ना तिच्या माहेरी गेली. माहेरी गेल्यावर नेहाने स्वप्नाला फोन करुन सासूबाईंच्या स्वभावाबद्दल चौकशी केली.
दुसऱ्या दिवशी स्वप्नाला तिचा नवरा राहुल माहेरी घ्यायला आला होता.
राहुलसोबत असल्याने स्वप्नाला टेन्शन नव्हते, पण तरी मनात सासू या नावाबद्दल भीती वाटत होती. घरातील सर्व पाहुणे आपापल्या घरी परतले होते.
घरात आता स्वप्नाचे सासू-सासरे, राहुल व स्वप्ना असे चौघेचं होते. स्वप्ना घरात गेल्यावर पहिले तिने सासू-सासऱ्यांच्या पाया पडून नमस्कार केला.
स्वप्नाला पाया पडणे मुळातच आवडत नव्हते, पण तशी प्रथा असल्याने ती पाळत होती.
"स्वप्ना, दरवेळी घरातून जाताना किंवा येताना आमच्या पाया पडण्याची गरज नाहीये. तुला आईने तसं सांगितलं असेल ना? तू आता फ्रेश होऊन ये, मग आपण गप्पा मारुयात."
स्वप्ना आपल्या रुममध्ये गेली. फ्रेश झाल्यावर साडी घालू की ड्रेस घालू? या विचारात स्वप्ना होती, तोच तिच्या सासूबाई रुममध्ये येऊन म्हणाल्या,
"काय घालावं? हे कळत नाहीये का?"
आपल्या मनातील गोंधळ यांना कसा कळला? हे भाव चेहऱ्यावर आणून स्वप्नाने तिच्या सासूबाईंकडे आश्चर्याने बघितले.
स्वप्नाच्या सासूबाईंनी तिला हात धरुन आपल्याजवळ बसवले.
"स्वप्ना, तू माहेरी असताना ड्रेस घालायचीस ना? मग इथेही ड्रेसचं घालत जा. एवढा विचार करण्याची गरज नाहीये. सणासुदीला, लग्न समारंभात साडी घालायची. स्वप्ना हे घर तुझंही आहे. इथे तुला काय घालायचं? हे तुच ठरवणार आहेस. तू मला घाबरते आहेस का?"
स्वप्नाने नकारार्थी मान हलवली.
"मी आपल्यासाठी चहा ठेवते. तू ड्रेस घालून बाहेर ये. आपण चहा पिता पिता गप्पा मारुयात." स्वप्नाच्या सासूबाई बोलून बाहेर निघून गेल्या.
स्वप्नाच्या सासूबाई व तिच्यात काय बोलणं होईल? बघूया पुढील भागात...
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा