Feb 25, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

मी तुझ्या पाठीशी आहे भाग ७(अंतिम)

Read Later
मी तुझ्या पाठीशी आहे भाग ७(अंतिम)

मी तुझ्या पाठीशी आहे भाग ७ (अंतिम)


स्वप्नाचं बोलणं ऐकल्यावर तिच्या सासूबाई राहुल जवळ जाऊन म्हणाल्या,

"बाळा, असं खचून कसं चालेल? आलेल्या संकटाचा सामना तर करावाचं लागेल ना?"


"आई, पण या सगळ्यातून मार्ग काय काढू? हेच कळत नाहीये." राहुल म्हणाला.


"स्वप्नाच्या व्यवसायात तिला मदत कर. स्वप्नाने कोरोनामुळे केक व बिस्कीट बनवणे बंद केले आहे, ते पुन्हा सुरु करा. मी सोहमला सांभाळेल. तुम्ही दोघे मिळून बेकरी व्यवसाय सुरु करा." राहुलला आईने सुचवले.


"आई, पण त्यात सगळं भागेल का? दर महिन्याचे बँकेचे हप्ते जातील एवढे पैसे त्यातून मिळतील का?" राहुलला प्रश्न पडला होता.


"हे बघ राहुल, तू आता सध्या घरीच आहेस. काहीही न करण्यापेक्षा काहीतरी करणे योग्य राहील ना. सुरुवातीला त्यातून जास्त काही मिळणार नाही, पण सातत्य ठेवल्यावर नक्कीच फायदा होईल. तू नोकरीच्या शोधात रहा. चांगली नोकरी मिळाली की, मग बेकरीकडे लक्ष द्यायला स्वप्ना आहेच." आईने सांगितले.


स्वप्नाला तिच्या सासूबाईंनी आवाज देऊन तिला बोलावून घेतले आणि स्वतःची कल्पना सांगितली.


यावर स्वप्ना म्हणाली,

"आई, हे माझ्या कधीपासून डोक्यात होतं, पण राहुलला आवडेल की नाही? म्हणून मी बोलत नव्हते. राहुल, आपण जर आपल्या बेकरी प्रॉडक्ट्सचे प्रमोशन सोशल मीडियावर केले, तर आपला सेल अजून वाढेल.


राहुल, इथे आपल्याला नवीन इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाहीये. एकदा प्रयत्न करुन बघायला काहीच हरकत नाहीये. 


आसपासच्या परिसरातील ऑर्डर मला मिळतात. आपण जर अजून सोशल मीडियावर जाहिरात केली, तर अजून ऑर्डर मिळतील. तुम्ही ऑर्डर द्यायला जाऊ शकणार असाल, तर आपण दूरच्या ऑर्डर घेऊ शकतो. 


केकचे व्हिडीओ शूट करुन युट्युबवर टाकू शकतो. तुम्ही व्हिडीओ एडिटिंगचं काम करु शकतात. युट्युबवर आपले व्हिडिओ चालले, तर त्यातून आपल्याला अजून इन्कम मिळेल. एकदा आपण कामाला सुरुवात केली, तर अजून वेगवेगळ्या आयडिया डोक्यात येत जातील."


राहुलने लगेच त्याच्या कामाला सुरुवात केली होती. राहुल कामात व्यस्त असताना त्याच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद स्वप्नाला समाधान देऊन जात होता.


सोशल मीडियावर मार्केटिंग सुरु केल्याने स्वप्नाच्या केकला व बिस्किटांना मागणी वाढली होती. आपण काहीतरी करु शकतो, हा विश्वास राहुलला वाटू लागला होता.


राहुल व्हिडिओ एडिटिंग करणे शिकू लागला होता. स्वप्ना न कंटाळता, न थकता राहुलला मदत करत होती. दररोज केक बनवताना राहुल व्हिडीओ शूट करायचा, व्हिडिओ एडिट करुन युट्युबवर पोस्ट करायचा.


हळूहळू युट्युबववरील त्यांचे फॉलोवर वाढायला सुरुवात झाली होती. अवघ्या काही महिन्यातच स्वप्नाच्या केकच्या रेसिपी युट्युबवर प्रसिद्ध झाल्या होत्या. फॉलोवर वाढल्याने युट्युबकडून पेमेंट मिळायला सुरवात झाली होती. 


महिन्याचे इन्कम वाढल्याने बँकेचे हप्ते त्यातून जात होते. एका छोट्याशा व्यवसायातूनही इतकी कमाई होऊ शकते, हे राहुलला जाणवले होते.


सोहमची पूर्ण जबाबदारी स्वप्नाच्या सासूबाईंनी घेतल्याने ती बेकरीच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रीत करु शकली होती.


राहुल व स्वप्ना दिवसरात्र मेहनत करत होते. दरम्यानच्या काळात राहुलला पहिल्या कंपनीकडून नोकरीची ऑफर आली होती. राहुलने ती ऑफर नाकारली. राहुलने आता आपला बेकरी बिजनेस वाढवायचा ठरवला होता.


कमी काळात स्वप्ना व राहुल सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले होते. स्वप्नाचा इंटरव्ह्यू घ्यायला एक रिपोर्टर घरी आली होती. स्वप्नाला तिने तिच्या प्रवासाबद्दल काही प्रश्न विचारले, तेव्हा स्वप्नाने अतिशय छान शब्दात तिला सांगितलं की,


"सुरुवातीला एकच सांगेन की, सगळ्या सासवा वाईट नसतात. लग्नाच्या आधी आपण अनेकांच्या आयुष्यातील सासूबद्दलचे अनुभव ऐकून आपल्याही आयुष्यात असंच काहीतरी घडेल असं वाटत असतं. आपलं सासूसोबत पटणार नाही, हे आधीच आपण गृहीत धरुन बसतो. तसं करु नका.


आज मी जी काही तुमच्यासमोर उभी आहे, ते केवळ माझ्या सासूबाईंमुळे. आयुष्यात काहीतरी करण्याचा सल्ला त्यांनीच दिला होता. मोकळ्या वेळेचा सदुपयोग कर म्हणून त्यांनीच सांगितलं होतं. 


आईंनी माझी प्रत्येकवेळी साथ दिली. आपल्या प्रवासात आपलं कुटुंब आपल्या सोबत असणे फार महत्त्वाचे असते. माझे कुटुंब नेहमीच माझ्यासोबत होते, त्यामुळेच हा इतका मोठा पल्ला मी पूर्ण करु शकले.


नवरा तर साथ देत असतोच, पण जेव्हा आपले सासू-सासरे आपल्या सोबत असतात, तेव्हा असाध्य गोष्ट साध्य करण्याची ताकद आपल्यात निर्माण होते. काही दिवसांपूर्वी माझ्या सासऱ्यांचं निधन झालं. आई त्या दुःखातून पुरेपूर सावरल्या नव्हत्या, तरी मला त्यांची गरज आहे म्हटल्यावर त्या माझ्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या.


मी कधीही खचले तरी त्यांचं एक वाक्य नेहमी ठरलेलं असतं, 'स्वप्ना भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.'


सगळ्याच सासवांनी त्यांच्या सुनांच्या पाठीशी उभं राहिलं, तर त्याही त्यांच्या आयुष्यात माझ्यासारखं वेगळं काहीतरी करु शकतील. बऱ्याच सासवा त्यांच्या सुनांना माझ्यावरुन टोमणे मारतील, ती तिच्या सासूला किती मानते, हे सांगाल. अश्या सासवांना मी एकच सांगेन की, माझ्यावरुन तुमच्या सुनेला टोमणे मारण्यापेक्षा माझ्या सासूबाईंप्रमाणे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या रहा. काही दिवसांनी तुम्ही न बोलता त्या तुम्हाला मान देतील.


माझा हा इंटरव्ह्यू बघून एक-दोन स्वप्ना तयार झाल्यात तरी माझे आयुष्य सार्थकी लागले, असे मला वाटेल."


आयुष्य म्हटले की, त्यात संकटे येतातचं. संकटांचा सामना करण्यासाठी जेव्हा आपली माणसं आपल्या पाठीशी उभे राहतात, तेव्हा आपण ही लढाई लढू शकतो, हा विश्वास येतो. 


राहुल, स्वप्ना व तिच्या सासूबाई एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या, म्हणून त्यांच्यासमोर उभ्या ठाकलेल्या संकटाला ते तोंड देऊ शकले व त्यातून मार्ग काढू शकले.


समाप्त.


©®Dr Supriya Dighe


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//