मी तुझ्या पाठीशी आहे भाग ६

नातं सासू-सूनेचं

मी तुझ्या पाठीशी आहे भाग ६

स्वप्नाला पुत्ररत्न प्राप्त झालं होतं. स्वप्नाचा मुलगा तीन महिन्यांचा झाल्यावर स्वप्नाने पुन्हा आपले काम सुरु केले. स्वप्नाच्या सोबतीला तिच्या सासूबाई उभ्या राहत असल्याने तिला कसलीच अडचण येत नव्हती.


सगळं काही व्यवस्थित सुरु होतं. अशातचं कोरोनाची पहिली लाट आली. सगळ्यांप्रमाणे राहुलला घरी बसावे लागले होते. आपल्या घरात कोरोनाचा संसर्ग कोणालाही होऊ नये, म्हणून स्वप्नाने आपला बेकरी व्यवसाय पुढील दोन महिने बंद केला होता. 


लॉकडाऊन शिथिल झाल्यावर बऱ्याच लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या, त्यात राहुलची नोकरीही गेली होती. राहुल दुसरीकडे नोकरी शोधत होता, पण त्याला नवीन नोकरी मिळत नव्हती.


राहुल वैतागला होता, त्याची घरात चिडचिड सुरु झाली होती. त्यात अजून भर म्हणून राहुलच्या बाबांना कोरोनाची लागण झाली होती. राहुलच्या बाबांना जवळपास एक महिना हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागले होते. 


बाबांना वाचवण्यासाठी राहुलने खूप पैसे खर्च केले होते, पण राहुलचे बाबा वाचले नाहीत.


लाखो रुपयेही गेले होते आणि राहुलला आपले बाबाही गमवावे लागले होते. हसतखेळत असणाऱ्या घराला अवकळा आली होती. स्वप्नाच्या सासूबाई खचल्या होत्या. 


आधीच नोकरी नाही आणि आता बाबा गेल्याच्या दुःखात राहुल डिप्रेशनमध्ये प्रवेश करत होता. स्वप्नाला हे सगळं जाणवत होतं. कोरोनाची लाट येण्याआधीच राहुलने नवीन प्रॉपर्टी खरेदी केली होती, त्यासाठी बँकेकडून लोन घेतले होते. 


नोकरीचं नाही म्हटल्यावर आता बँकेचे हप्ते कसे फेडायचे? हा प्रश्न राहुलसमोर उभा राहिला होता. राहुल सतत त्याच विचारात होता. एके दिवशी स्वप्नाने राहुलसोबत बोलायचे ठरवले.


"राहुल, तुम्ही असे किती दिवस रुममध्ये स्वतःला कोंडून ठेवणार आहात?" स्वप्नाने विचारले.


"बाहेर येण्याचा मार्गच सापडत नाहीये." राहुलने शून्यात बघत उत्तर दिले.


यावर स्वप्ना म्हणाली,

"राहुल, मार्ग सापडत नाही, शोधावा लागतो."


"स्वप्ना, तुला माझे प्रयत्न दिसत नाहीयेत का? दररोज नोकरी मिळेल या आशेने नोकरी शोधतोय. बाबांच्या कोरोनात सेव्हिंग निघून गेले. प्रॉपर्टी घेतल्याने डोक्यावर बँकेचे लोन झालेय. प्रॉपर्टी विकावी म्हटलं, तर सध्या भाव कमी आहेत. आता विकायला गेलं, तर तोटा सहन करावा लागेल. 


बाबांचा मला खूप मोठा आधार होता, तोही आता राहिला नाही. आईच्या चेहऱ्याकडे बघवत नाहीये. तुझी आणि सोहमची जबाबदारी माझ्यावर आहेचं. मला खूप काही करायचं आहे, पण जमत नाहीये. मला हतबल झाल्यासारखं वाटत आहे." बोलता बोलता राहुलचे डोळे गच्च भरुन आले होते. 


स्वप्नाने त्याला आपल्या मिठीत घेतले. राहुल खूप रडला. इतक्या दिवस मनात साचून ठेवलेले अश्रू बाहेर पडले. एखाद्या लहान मुलाप्रमाणे राहुल रडत होता. स्वप्नाही त्याला मायेने गोंजारत होती. स्वप्नाने राहुलला पूर्ण मोकळं होऊ दिलं.


"राहुल, या घराला आपल्याला दोघांना मिळून सावरावं लागणार आहे. आपल्यापुढे उभे राहिलेले संकट मोठे आहे, पण त्याला संयमाने व धीराने आपल्याला मिळून तोंड द्यावे लागणार आहे. 


बाबांच्या अचानक जाण्याने आई खूप खचल्या आहेत. गेल्या काही दिवसांत आई व्यवस्थित जेवल्या नाहीयेत. आईंची तब्येत बिघडायला नको. तुम्हीच असे खचले तर, आईंना कोण सावरेल? 


आपण दोघे मिळून या सगळ्यातून काहीतरी मार्ग काढू." स्वप्नाने राहुलला आधार देण्याचा प्रयत्न केला.


"मी आईशी एकदा बोलून येतो. बाकी गोष्टींचा विचार करण्यात मी इतका दंग झालो होतो की, आईसोबत बोलावं लागेल, हेच विसरुन गेलो होतो." राहुल बोलून आईच्या रुमच्या दिशेने निघून गेला. 


राहुल आईसोबत बराच वेळ बोलत होता. आईला त्याने समजावण्याचा प्रयत्न केला, पण आई रुमच्या बाहेर पडायला तयार होत नव्हती.


राहुल आईसोबत बोलल्यावर दोन दिवस स्वप्नाने सासूबाई रुमच्या बाहेर पडण्याची वाट पाहिली, मग ती जेवणाचे ताट हातात घेऊन त्यांच्या रुममध्ये गेली.


"आई, जेवण करुन घ्या. फार काही नाही. साधी मुगाच्या डाळीची खिचडी बनवली आहे. खाऊन घ्या बरं." स्वप्ना म्हणाली.


"स्वप्ना, मला जेवण करण्याची इच्छाच उरली नाहीये. मला नकोय." स्वप्नाच्या सासूबाई म्हणाल्या.


यावर स्वप्ना म्हणाली,

"आई, मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं, म्हणून इतक्या दिवस काहीच बोलत नव्हते. बाबा गेल्यामुळे आपलं घर कोलमडल्यासारखे झाले आहे. तुम्ही जर अश्याच एकट्या काही न खातापिता रुममध्ये बसून राहिल्या तर कसं होणार? 


तिकडे राहुलची नोकरी गेली, म्हणून ते उदास चेहरा करुन बसलेले असतात. सोहमचं करण्यात माझा पूर्ण दिवस निघून जातो. आपले पप्पा आणि आजी आपल्यासोबत खेळत का नाहीत? हा प्रश्न त्याच्या डोळ्यात असतो.


आई, मी एकटी हे घर कसं सावरु? मला तुमच्या आधाराची गरज आहे. आई, हे घर असेच टिकून रहावे, म्हणून तुम्ही लग्नानंतर मला सांभाळून घेतलंत ना.


आई, राहुलला सावरण्याची गरज आहे. राहुलला हात धरुन चालायला तुम्हीच शिकवले होते ना? आता पुन्हा त्याचा हात धरुन तुम्ही त्याला चालायला शिकवण्याची आवश्यकता आहे.


आई, बाकी मला काहीच माहिती नाही. तुमच्या जवळील एक व्यक्ती या जगातून गेली असेल, पण तुमच्या मुलाला, नातवाला, सुनेला आणि या घराला तुमची गरज आहे. उठा आणि बाहेर या."


स्वप्नाच्या सासूबाई तिचं ऐकतील का? बघूया पुढील भागात….


©®Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all