Feb 28, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

मी तुझ्या पाठीशी आहे भाग ४

Read Later
मी तुझ्या पाठीशी आहे भाग ४


मी तुझ्या पाठीशी आहे भाग ४

सासूबाईंचं वागणं बघून स्वप्नाच्या मनात असणारी भीती पळून गेली होती. जवळपास एक आठवडा स्वप्ना व राहुल फिरायला गेलेले होते. घरी परत येताना स्वप्नाने सासू-सासऱ्यांसाठी खरेदी केली होती.


घरी परतल्यावर सासूबाईंनी स्वप्नाला चार दिवस माहेरी जाऊन येण्यास सांगितले. माहेरी गेल्यावर स्वप्नाच्या आई-वडिलांना तिच्या चेहऱ्यावरील आनंद बघून समाधान लाभलं होतं. 


नेहाला फोन करुन स्वप्नाने तिच्या सासूबाईंचं भरभरुन कौतुक केलं होतं. 


"स्वप्ना, आता ज्यांचे गोडवे तू गात आहेस, काही दिवसांनी त्यांचे गाऱ्हाणे माझ्याकडेचं करशील." 


नेहाची प्रतिक्रिया ऐकून स्वप्ना म्हणाली,

"नेहा, सगळ्या सासू वाईट नसतात. माझ्या सासूबाई खरंच खूप चांगल्या आहेत." 


"स्वप्ना, हे फक्त चार दिवसांचं कौतुक आहे. कायमस्वरुपी टिकून राहत नाही. असो तुला आत्ता हे समजायचं नाही. जसजसे दिवस जातील तसतसे तुला हळूहळू समजेल. चल मला स्वयंपाक करायचा आहे. अजून जरावेळ किचनमध्ये दिसली नाही, तर माझ्या सासूबाई घर डोक्यावर घेतील." नेहाने एवढं बोलून फोन कट केला.


चार ते पाच दिवसांनी राहुल स्वप्नाला घ्यायला तिच्या माहेरी गेला. वाटेत नाश्ता करण्यासाठी ते एका हॉटेलच्या इथे थांबले होते.


"राहुल, तुम्हाला राग येणार नसेल, तर एक विचारु का?" स्वप्नाने विचारले.


"माझ्याशी बोलताना तुला चक्क विचार करावा लागतोय. विचार ना." राहुल म्हणाला.


स्वप्ना पुढे म्हणाली,

"राहुल, मी लग्न झाल्यापासून बघतेय की, आई मला सांभाळून घेत आहेत. घरातील एकाही कामाला त्या हात लावू देत नाहीये. माझ्यावर कोणतीच बंधनं त्यांनी लादली नाहीयेत. आई खरंच अश्याच आहेत की, चांगलं वागण्याचं त्या नाटक करत आहेत?" 


यावर राहुल हसून म्हणाला,

"मला वाटलंच होतं की, तू हा प्रश्न मला कधीतरी विचारशील म्हणून. स्वप्ना, आई जसं दाखवतेय तशी ती इतकी सरळही नाहीये. 


आईची एक जिवलग मैत्रीण आहे, पहिले ती आपल्याच कॉलनीत रहायला होती. आता काही महिन्यांपूर्वी दुसरीकडे रहायला गेली. तिच्या मोठया मुलाचं लग्न झाल्यावर पहिल्या दिवसापासून सासुरवास सुरु केला. पुढील एका महिन्याच्या आता मुलगा व सून घराबाहेर पडले, ते पुन्हा माघारी फिरलेच नाहीत. 


दुसऱ्या मुलाच्या बाबतीतही तेच झाले. पूर्ण कॉलनीत तिच्याबद्दल वाईट साईट बोललं जात होतं. आईची मैत्रीण स्वभावाने इतकीही वाईट नव्हती, पण सासूगिरी दाखवण्याच्या नादात सगळंच गमावून बसली. दोन्ही मुलं वडिलांना सांभाळायला तयार आहेत, पण आईला सांभाळायला कोणीच तयार होत नाहीये. 


आपलं लग्न जमल्यावर एक दिवस आईने मला विचारलं होतं की, "माझं आणि स्वप्नाचं पटलं नाही, तर तुही तिला घेऊन घर सोडून जाशील का?"


मी क्षणाचाही विलंब न करता आईला उत्तर दिले की,

"हो. तू जर तिला अतित्रास दिला, तर मी घर सोडून जाईल. आई, ती तिच्या आई-वडिलांचं घर सोडून माझ्यासाठी इकडे येणार आहे. नवीन नवीन तिला इथे काही सुचणार नाही. आपल्या रुढी परंपरा अंगिकारायला तिला वेळ लागेल. एक नवरा म्हणून मी तिला त्यात मदत करणे, हे माझं कर्तव्य आहे. 


आई, मला तुला सोडायचे नसेल, पण तुझ्यामुळे जर तिला दुःख होणार असेल, तर मग माझ्यापुढे पर्याय नसेल."


माझं उत्तर ऐकल्यावर आईला थोडा धक्का बसला होताचं. आई तुला त्याचमुळे सांभाळून घेत आहे. तू माहेरी आल्यावर आई स्वतःहून मला म्हणाली की, 


"आपली स्वप्ना खूप समजूतदार आहे. तिच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसते आहे, ते बघून माझे मन भरुन पावले. आपल्या घराची शांती टिकवून ठेवायची असेल, तर मला तिच्याशी असंच वागावं लागेल."


पुढच्याच ठेच मागचा शहाणा ही जी म्हण आहे ना, त्याप्रमाणे आईच्या मैत्रिणीला ठेच लागल्याने आई शहाणी झाली आहे.


आता याबद्दल कधीच आईला विचारणा करु नकोस. जसं आहे तसं चालूदेत."


"मी आईंना काहीच विचारणार नाही. राहुल, माझ्यात आणि आईंमध्ये कितीही मतभेद झाले, तरी आपण हे घर सोडून जायचं नाही. आपलं घर असं कोणी सोडून जातं का? मुली काहीही निर्णय घेतात." स्वप्ना म्हणाली.


क्रमशः


©®Dr Supriya Dighe
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//