Feb 23, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

मी तुझ्या पाठीशी आहे भाग १

Read Later
मी तुझ्या पाठीशी आहे भाग १

मी तुझ्या पाठीशी आहे भाग १


"आई, मी नेहाला भेटायला चालले आहे." स्वप्नाने पायात चप्पल घालता घालता आईला सांगितले.


"आता जाण्याची काय गरज आहे? नेहा लग्नाला आल्यावर तुझी व तिची भेट होईलच ना?" आईने आपली प्रतिक्रिया दिली.


"आई, नेहा माझ्या लग्नाला येऊ शकणार नाहीये. तिच्या सासरच्या कोणाचं तरी लग्न आहे. मी एक मैत्रीण म्हणून समजून घेऊ शकते, पण तिच्या सासरचे समजून घेणार नाहीत. तिला लग्नाला यायला जमणार नाही, म्हणूनच आज मला भेटायला बोलावलं आहे." स्वप्नाने सांगितले.


"वेळेचं भान असूदेत. जास्त वेळ गप्पा मारत बसू नकोस. तुझे बाबा घरी यायच्या आत परत ये, नाहीतर ते ओरडतील." आईच्या बोलण्यावर स्वप्ना होकारार्थी मान हलवून निघून गेली.


नेहा स्वप्नाची वाट बघत कॉफी शॉपमध्ये बसलेली होती. नेहाच्या समोर गेल्यावर स्वप्नाने नेहाला मिठी मारली.


"स्वप्ना, ह्या आपल्या अड्ड्याची मला खूप आठवण येते. आतातर आपली पुन्हा कधी भेट होईल काय माहीत?" नेहा नाराज होऊन म्हणाली.


यावर स्वप्ना म्हणाली,

"नेहा, आपण ठरवलं की आपल्या भेटी होत जातील. आपल्याला कोणी अडवू शकत नाही. आपली मैत्री आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत असणार आहे."


"आपली मैत्री तर असणार आहे, पण आपल्याला भेटण्यापासून कोण अडवेल? हे तुला लग्न झाल्यावर कळेल. मीही असंच बोलायचे." नेहा म्हणाली.


"नेहा, तू सासरी खुश नाहीये का? तुला कोणी त्रास देतं का?" स्वप्नाने काळजीने विचारले.


"मी खुश आहे ग, पण सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. प्रत्येक पावलावर घरातील कोण काय म्हणेल? याचा विचार करावा लागतो. अर्जुनचा काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण त्यांना आईला दुखावता येत नाहीत, मग मलाच समजून घ्यावं लागतं.


आता आपल्या मैत्रीबद्दल अर्जुनला सगळं काही माहिती आहे. मला तुझ्या लग्नाला उपस्थित राहण्याची किती इच्छा आहे? याची अर्जुनला कल्पना आहे, पण आईच्या इच्छेसमोर ते काहीच बोलू शकत नाहीत.


दररोज स्वयंपाक काय करायचा? हेही त्याच ठरवतात. एकदाच मी माझ्या मनाने एक भाजी केली होती, तर त्यावरुन त्यांनी इतकं ऐकवलं होतं. स्वप्ना ते घर मला माझं घर असल्यासारखं वाटतंच नाही. घरात कुठे काय ठेवायचं? हेही त्याच ठरवतात.


माझ्या माहेरचे कोणी आले, तर लगेच नाक मुरडतात, त्यांच्या माहेरचे आले की, त्यांना पंचपक्वान्न करुन खायला घालायचे असतात. जाऊदेत, मला आता या सगळ्याची सवय झाली आहे." बोलताना नेहाचे डोळे पाणावले होते.


"नेहा, मलाही असाच त्रास होईल का?" स्वप्नाच्या चेहऱ्यावर टेन्शन होते.


"माहीत नाही ग. सुरुवातीला तर एवढं काही होणार नाही. हळूहळू सासूचा रंग दिसायला सुरुवात होईल. तुझी सासू माझ्या सासूइतकी खाष्ट नसली, तरी ती खूप सरळ असेल, ही अपेक्षा सोडून दे.


सासू ही कधीच आई होऊ शकत नाही, हे लक्षात ठेव. आधीपासूनच मनाची तयारी असेल, तर मानसिक त्रास कमी होतो." नेहाने सांगितले.


"लग्नानंतर सासरच्यांसोबत कसं वागायचं असतं? जरा काही टिप्स दे ना." स्वप्ना म्हणाली.


यावर नेहाने तिला काही टिप्स दिल्या. पुढील बराच वेळ नेहा व स्वप्ना गप्पा मारत होत्या. नेहाने स्वप्नासाठी आणलेले गिफ्ट तिला दिले. दोघींनी मोबाईलमध्ये एकमेकींसोबत फोटो काढले. 


बराच वेळ झाल्याने नेहा व स्वप्नाने एकमेकींचा निरोप घेतला.


स्वप्ना घरी गेली, तर बाबांची घराबाहेर गाडी बघून ती घाबरली होती. स्वप्नाने घरात पाय ठेवताच तिचे बाबा जोरात ओरडून म्हणाले,


"चार दिवसांवर लग्न आलंय आणि तू गाव उंडारत बसली होतीस. सासरी गेल्यावर अशी बाहेर फिरत बसलीस, तर आमच्या संस्कारांचा उद्धार होईल. स्वप्ना एकच सांगून ठेवतो, सासरी व्यवस्थित वागायचं. आमच्या नावाला काळीमा फासायचा नाही. मला कुठलीही तक्रार ऐकून घ्यायची नाहीये. मुलगी थोडी चुकली, तरी तिच्या आई वडिलांचा उद्धार केला जातो. आमचा उद्धार होणार नाही, याची काळजी तुला घ्यायची आहे."


आपल्या बाबांची बडबड ऐकून स्वप्नाच्या डोळयात पाणी आले. ती डोळे पुसत पुसत आपल्या रुममध्ये निघून गेली. 


स्वप्नाची सासूबाई खाष्ट असेल का? बघूया पुढील भागात....


©®Dr Supriya Dighe
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//