मी तुझी

ही कविता एका वीरपत्नी ला समर्पित आहे .

मी तुझी
----------------------


माझे प्रेम किती तुझ्या वर 
तुला कधी कळेल का रे ?
 राती किती त्या जागल्या ,
त्या आसवांनी भरल्या उशी किती 
तुला दिसतील का ? ॥१ ॥
  
संग तुझ्या चालताना कण नाही टोचला, 
 तुझ्याविना अंधारल्या वाटा किती पायदळी गेल्या , 
रुतले किती काटे पायात ? 
 तू पाहशील ना ? 

हसले खुप तुझ्या सोबतीस राजा , 
 रडले किती विरहात तुझ्या ,
तू ऐकशील ना ? ॥ २ ॥

बाहुपाशात तुझ्या सूर्याची किरणे ही सुखावती , 
 तू नसताना चंद्राची छाया किती रे तापली ।
 मृगजळ पाहून  तहान भागवू किती , 
चातका सारखी मी, तू सावन बनून बरसशील ना ? 
 पानझडी सारखे झाले रे जीवन , 
तू येऊन श्रावणा सारखा जीवन  बहरशील ना ? ॥ ३ ॥

ओटीत माझ्या तू भरलेली कळी ,
 पाहा ना ती आहे किती हळवी ; 
गर्दीत ती या शोधते रे तुझा हात , 
निरागस प्रश्न तिचा आई कुठे आहे माझा गं बाप ? 
  दादा म्हणुनी तोच आता मोठा, 
 धरुनी हात बहिणीचा सांगतो तिला ,
बाप त्यांचा दूर नाही तो कसा? ॥ ४ ॥

वीरचक्र घेताना हातात , हात किती ते थरथरते , 
 मग हळूच मनात कुठेतरी वीरपत्नी तू असे स्वतःलाच समजावते , 
  तरी काही रुढीत मीच का दोषी व्हावे?
तू शहीद असताना , कुलक्षणी म्हणून मला का बर हिणवावे ?  ॥ ५ ॥

लाल रंग तो कपाळी चा  माझ्या ,
सीमेवर तू वाहिलास , 
 तुझ्या चितेवरील रंग तो पांढरा ; 
माझ्या अंगावर तू न पाहिलास ,
वचनं सारी तुझी , तुझ्या सोबत राख झाली, 
 आठवणींनी जरी भरले जीवन ,
इच्छा मात्र कायमची रिती झाली ॥ ६ ॥

सख्या आज आठवणीने आले मन भरून , 
समस्त ईरा परिवाराने दिली आदरांजली डोळे भरून । 
 आज्ञा घेते  तुझी मी शेवटचे प्रश्न विचारून । 
 स्वप्नातुनी तू निघूनी पुन्हा येशील ना ? 
तुझ्या फुलांना छत्र बापाचे देशील ना? 
 पुन्हा नव्याने सुरु करू आपल जीवन , तू मला साथ अशीच देशील ना ? ॥ ७ ॥

कर्तव्य देशाचे प्रथम तू निभावले , 
तुझ्या मिठीत तरी सख्या मी सुखावले , 
तू पुन्हा येशील ना? 
 या वेळेस तरी तू फक्त
 'माझा होशील ना?' ॥ ८ ॥
----------------------
कवियित्री (रचना): शगुफ्ता ईनामदार