मी स्वतः माझ्यासाठी...

तुमचा मान पान महत्वाचा की माझ काम, तुम्ही अस काहीही बोलता कश्याला सगळ्यां समोर, सगळ्यांच व्यवस्थित होत आहे घरी,



मी स्वतः माझ्यासाठी...

कथेच नाव.. मी स्वतः माझ्यासाठी

विषय.. स्त्रीला समजून घेणं खरंच कठीण असतं का हो?

फेरी.. राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा

©️®️शिल्पा सुतार

नाशिक टीम
...

तू कधी बघणार स्वतः कडे, कधी लक्ष देणार स्वतःच्या गरजांकडे, कधी महत्त्व देणार स्वतःला, तुझी किती धावपळ झाली तरी तुला सगळ करण आहे, कोणाला काही घेण देण नसतं, शेवटी स्वतःचा आनंद तुला स्वतःला शोधायचा आहे, दुसर्‍या कडून अपेक्षा सोड आता,

तुम्ही स्त्रीला समजून घेणार नाही का? , ती किती करते घरच्यांसाठी, स्वतः च अस्तित्व विसरून रमून जाते संसारात, कधी काळी ती ही घरची लाडकी मुलगी होती , तिला ही एखादा पदार्थ आवडत होता , ते सगळ ती बाजूला ठेवते, घरच्यांसाठी दिवस रात्र काम करत रहाते, या बदल्यात काय मिळत तिला? साध कोणी समजून ही घेत नाही,

मायाच्या शाळेत आज प्रोग्राम होता, ती तिथे टीचर होती, बालवाडीत शिकवत होती ती , असे प्रोग्राम नेहमी होत होते शाळेत, एक मॅडम आल्या होत्या, स्त्रियांनी स्वतःला महत्त्व द्यायला पाहिजे, स्वतःच्या आरोग्याची मनाची काळजी घ्यायला पाहिजे, या विषयावर त्या खूप छान बोलत होत्या, माया सगळ ऐकत होती, एकदम बरोबर सांगता आहेत मॅडम, पण नुसत आपल्याला सांगून उपयोग नाही, घरच्यांना ही सांगायला हव हे.

शाळेतून दमून माया घरी आली, चहा पाणी झाल, मुलांचा अभ्यास झाला, स्वयंपाक जेवण झालं,

आज ही नेहमी प्रमाणे मायाला किचन कामाला उशीर झाला , लगेच उद्या सकाळी परत शाळा.. मुलांची तिची ही, किती वेळा घरच्यांना सांगितल आठ वाजता जेवून घेत जा, सगळ तयार असून कोणी येत नाही, रात्री उशिरापर्यंत काम पुरत, लगेच पहाटे पाच वाजता उठाव लागत, खूप कंटाळा आला होता तिला,

काय करणार पण कोणाला सांगणार, मूल लहान, नवरा समजून घेत नाही, सासुबाई सासरे असे वागतात जसे काही सूनबाई त्यांच्या सेवेसाठी आणली आहे, नौकरी करायची तर कर पण आमच सगळ करुन जा, सगळे कर्तव्य सगळ्या आशा हिच्या कडून होत्या जश्या,

माया थकून बेडरूम मध्ये आली, राहुल आरामात झोपलेला होता, किती चांगल नशीब आहे याच, स्वतः च्या घरात आरामात पडला आहे, आई बाबां सोबत रहायला मिळत, छान हव ते हातात मिळत, मी पुढच्या जन्मी मुलगा होणार नको हा स्त्री जन्म,

अस राहुल समोर म्हटल तर किती चिडायचा तो, काय कमी आहे तुला? भांड्यांना बाई आहे, कपड्यांना वॉशिंग मशीन आहे, स्वयंपाक तर करायचा असतो फक्त, ते ही नीट होत नाही तुझ्याने

बस इतक असत स्वयंपाक म्हणजे, मी इथे कायम किचन मधे उभी असते, त्या बदल्यात काय ऐकायला मिळत, ही भाजी का केली, एकाला तिखट हवी दुसर्‍याला फिकट, एकाला भात हवा दुसर्‍याला नको, एक नाश्त्याला पोहे मागणार दुसर्‍याला सांजा, शाळेच्या डब्यात रोज काय देणार? परत आई बाबांचे पथ्य, त्याच्या नावावर वेगळी साधी भाजी करून घेणार आणि आपली भाजी त्या सोबत खाणार, काही बोलता येत नाही सगळ्यांसमोर, चमचमीत खायच तर मग मला का दमवतात?

शाळेत नौकरी आहे ते तरी बर आहे, या सगळ्यातून थोडा वेळ तरी सुटका होते, नाही तर सुट्टीच्या दिवशी काय हाल होतात, काम संपत नाही,

सासुबाई पूर्वी यातून गेल्या आहेत, त्या त्रास कमी करू शकतात ना माझा, पण नाही त्या ही मुद्दाम काम वाढवतात, समजून घ्यायच नाही त्यांना

सकाळी माया उठली रोजची धावपळ सुरू झाली, सगळा स्वयंपाक झाला, सगळ्यांना वस्तु हातात देवून झाल्या, मूल शाळेत गेली, तिला नाश्ता करायला वेळ मिळाला नाही, पटकन तयार झाली ती,.."राहुल थांबा तुम्ही मला ड्रॉप करा ना शाळेपर्यंत" ,

"मला उशीर होतो आहे माया लगेच निघत असशील तर चल",.. राहुल

माया तशी घाईने शाळेत निघून गेली

सासुबाई किचन मध्ये आल्या, बाई बाई काय पसारा करून ठेवला आहे, काय घाई असते मायाला काय माहिती? कशाला करते ती बालवाडीची नौकरी? एवढासा तो पगार, अजिबात लक्ष नाही हीच घरात, आता हा मागचा पसारा कोणी आवरायचा? आज मी बोलणार आहे, येवू दे राहुलला

मायाची शाळा नऊ ते चार असायची, घरी आल्यावर चहा पाणी झाल्यावर मूलांसोबत ती थोडा वेळ घालवायची नंतर त्यांना अभ्यास करायला सांगून एक बाजूला स्वयंपाक करायला घ्यायची

मदत तर नाही कोणाची पण उगीच हे किती घेतल ते किती टाकल अस सुरू असायच सासुबाईंच, कधी कधी माया उत्तर द्यायची नाही

राहुल घरी आला की जो काही त्यांना प्रेमाचा उबाळा यायचा एकमेकांवर अगदी आई बाबा खूप आजारी असल्यासारखे करायचे, मग राहुल त्यांना आधी जेवायला दे, त्यांना फळ कापून दे, त्यांच्याशी बोलत बस, त्यांना काही वेळेवर दिल नाही तर मायाला ओरड अस सुरू असायच, अरे आता सात वाजता खाल्ल त्यांनी काही दोन दिवसा पासुन उपाशी नाहीत ते, कोण सांगेन..

किती वेळा सांगितल होत राहुलला निदान मुलांचा गणित विषय तरी घेत जा, पण नाही त्यांना वेळ नव्हता आमच्या तिघांसाठी, आई बाबा आणि ते सुखी होते, मग लग्न का केल माझ्याशी? मुल ही का होवू दिली? , तुम्ही तिघांनी राहायच होत आनंदात तर ,

घर काम करायला फुकट बाई मिळाली त्यांना, एवढच महत्व होत मायाला, महत्वाच्या कोणत्याही निर्णयात तिचा सहभाग नव्हता,

"राहुल अरे आता हल्ली आमच्या कडून काम होत नाही",.. आई

"नको करत जावू मग आई तुला कोणी संगत का काम?",.. तो माया कडे रागाने बघत होता

"नाही रे माया काही सांगत नाही, तू नको ओरडू तिला, पण ती सकाळी शाळेत जाते घरच अर्ध काम तस पडून राहत, झाकपाक नाही की नीट आवरत नाही, मला नाही बघवत, ते मी करायला जाते काम, पण हे शरीर साथ देत नाही आता हल्ली",.. आई

" माया इकडे ये आधी, तुला मागे ही सांगितल होत की शाळेची नौकरी तुला घर सांभाळून करावी लागेल, हे काय ऐकतो आहे मी, तूला नीट आवरण नसेल जमत तर सोडून दे नौकरी, तुझ्या एवढ्याश्या पगारावर घर चालणार आहे का आपल? , आई बाबांची गैरसोय झालेली मला चालणार नाही, समजत ना" ,... राहुल

" अहो पण मी नीट काम करून जाते, पहाटे पाच वाजता उठते मी, तुम्ही लोक रात्री लवकर जेवत नाही, झोपायला उशीर होतो अजून काय काय करू मी",.. माया

" तेच म्हणतो आहे मी, नसेल जमत तर सोडून दे काम",.. राहुल

" नाही मला चांगल वाटत तिकडे शाळेत मी नौकरी सोडणार नाही",. माया

आई बाबा एकमेकांकडे बघत होते,..

राहुलला खूप राग आला होता,.." माया एक तारखेपासून शाळेत जायच नाही, माझा निर्णय झाला आहे ",

माया तेव्हा काही बोलली नाही, नंतर तिने खोलीत सांगितल.. "मी जाणार शाळेत, मी पूर्वी पासून नौकरी करते आहे, आणि घरात किती ही काम केल तरी कमी आहे, मी जरी घरी असली काय नसली काय काहीतरी काम बाकी राहणारच, स्वयंपाक करून जाते मी उरलेल काम बाईच असत, आई का करत बसतात, त्यांनी आरामात रहाव ना, तुम्ही अस तडका फडकी निर्णय घेवू नका, माझा ही विचार करा जरा",..

"नको करू धावपळ एवढी",.. राहुल

" नाही धावपळ अशी नाही मला छान वाटत शाळेत, माझा स्वतःचा वेळ आहे तो, माझ काम आहे ते, माझा विरंगुळा आहे ",. माया

राहुल तेव्हा काही बोलला नाही,

आठ दिवस गेले मधे, दुसर्‍या दिवशी एक तारीख होती,

" आज शेवटचा दिवस मग शाळेचा माया? ",.. राहुल

" नाही कस काय शेवटचा? ",.. माया

" तू नौकरी सोडते आहेस ना? ",.. राहुल

नाही..

" आई बाबांना कस वाटेल तू माझ ऐकत नाही",.. राहुल

"तुमचा मान पान महत्वाचा की माझ काम, तुम्ही अस काहीही बोलता कश्याला सगळ्यां समोर, सगळ्यांच व्यवस्थित होत आहे घरी, उगीच टेंशन घेवू नका, आणि अजून एक बोलायच होत.. तुम्ही जरा मुलांकडे माझ्या कडे ही थोड लक्ष देत चला, मुलांचा अभ्यास घेत जा जरा रोज , आणि तुमचे आई वडील यांच तुम्ही करायला हव,
सगळ काम मला देवू नका, आणि ते काही त्रासात नाहीत, आता संध्याकाळी तुम्ही येण्या आधी खाण झाल आहे त्यांच, उगीच अति करताय तुम्ही, जरा दुसर्‍याला सुसह्य होईल अस वागत जा, मी पण एक माणूस आहे जरा माझ्या आणि मुलांच्याही मनाचा विचार करत जा, घरात तुम्ही तिघे असल्यासारखे वागत नका जावू, आम्हाला तुमच्यात सामावून घ्या, आम्हाला ही प्रेमाची गरज आहे, समजून घ्या जरा, नसेल पटत तर मी मुलांना घेवून माझ्या आई कडे निघून जाईल, या पुढे उगीच माझ्या मागे लागायच नाही आणि आई बाबा समोर काही बोलायच नाही मला नाही तर मी पण तिथेच उत्तर देईन, तुम्हाला अपमान झाला तर मला सांगू नका ",.. माया

राहुलला माहिती होत हीच दिवसभर काम सुरू असत, ही चिडली रागवली तर काही खर नाही, त्या पेक्षा ठीक आहे जे सुरू आहे ते, मी मुलांकडे लक्ष देत जाईन

" आज जाते का माया शाळेत ",.. आई

हो आई..

" तू सांगितल होत ना तिला नको जावू, खूप गैरसोय होते रे",.. आई

"अग तिला आवड आहे शिकवायची, तीच काम आहे ते, आई तू ही असू दे तू ही काम, त्या बाईच काम तू नको करत बसु",.. राहुल

हा सासुबाईना खूप मोठा धक्का होता, कस काय हे आश्चर्य झाल, मी एवढ बोलली तरी फरक पडला नाही, काय अस,.." राहुल अरे पण एवढ्याश्या पैशा साठी किती सगळ्यांची फरफट होते ",

" कुठे होते फरफट आई, काय प्रॉब्लेम आहे, चहा नाश्ता मिळत नाही का तुम्हाला ",.. राहुल

मिळतो..

"दुपारचा स्वयंपाक रेडी नसतो का? ",.. राहुल

रेडी असतो

"संध्याकाळी खाण होत ना",.. राहुल

हो

" तुमच्या गोळ्या औषध नीट मिळतात ना ",.. राहुल

हो

" मग आता काय करणार अजून, मायाला करू दे नौकरी, आई खर तर तु समजून घ्यायला हव मायाला",.. राहुल

"अरे आमचे वय तर बघ",.. आई

" आपण तुम्हाला सांभाळायला एक मदतनीस ठेवू दिवसा ",.. राहुल

" काही गरज नाही",.. आई

"असू दे आई सोबत हव कोणी तरी",.. राहुल

आता घरी एक मदतनीस आहे लक्ष द्यायला, मायाचा जॉब सुरु आहे, राहुल अजूनही आई बाबांच्या मागे असतो, अधून मधून घेतो तो मुलांचा अभ्यास, पण आता मायाला काही प्रॉब्लेम नाही, तिला कोणी त्रास देत नाही, तिने तिचा स्टँड घेतला स्वतः साठी.