मी पत्र बोलतोय!

नमस्कार,मी पत्र बोलतोय.त्याचं काय आहे आहे ना... सध्याच्या काळात माझा जास्त वापरच होत नाही. पूर्वी कसं, तुम्ही


स्पर्धा : गोष्ट छोटी डोंगराएवढी

विषय : टपाल

शीर्षक : मी पत्र बोलतोय 



नमस्कार,


मी पत्र बोलतोय.
त्याचं काय आहे आहे ना... सध्याच्या काळात माझा जास्त वापरच होत नाही. पूर्वी कसं, तुम्ही सर्वजण एकमेकांच्या भावना माझ्यावर लिहून मोकळे व्हायचे. पण आता विज्ञानाने इतकी प्रचंड प्रगती केली आहे, की लोक मला विसरतच चालले आहेत.
सद्या पोस्ट ऑफीसमध्ये तर फक्त सरकारी कागदपत्रांची देवाण-घेवाणच मोठ्या प्रमाणामध्ये होतांना दिसते.


पण माझी खूप इच्छा आहे बरका... की प्रत्येकाने आज पत्र लिहावं. कारण जे तुमच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना शक्य होत नाही ते कदाचित पत्र करू शकतं. त्यामुळे पत्र लिहिणं खूप गरजेचं आहे.


आता तुम्ही म्हणाल की, पत्र तर लिहायचंय पण ते लिहायचं तरी कोणाला? अन् त्या पत्रात नेमकं लिहायचं तरी काय?


अरे तुम्ही लिहा ना स्वतःला पत्र!
अरे विचारा स्वतःला... की खरच आपण ह्या भ्रष्टाचारी जगात सुखी आहोत?

ह्या देशाच्या नकाशात नावं नसणारी अशी अनेक गावं ह्या देशात आहेत. जिथे खूप साऱ्या उणीवा दिसून येतील. तिथल्या प्रत्येक बेरोजगार माणसाला लिहा ना पत्र!


पाण्यासाठी वणवण करणाऱ्या तिथल्या प्रत्येक माऊलीला लिहा ना पत्र!
अरे लिहा ना पत्र, गावात शाळा नाही म्हणून मोर्चे काढणाऱ्या चिमुकल्यांना!


तुम्ही जो भाजीपाला जेव्हा जास्त किमतीत विकत घेतात तेव्हा ज्या शेतकऱ्याला नावं ठेवतात ना... तोच माल माझा शेतकरी राजा कवडीमोल भावाने विकत असतो.
इयत्ता सहावीत शिकत असलेल्या एका शेतकऱ्याच्या मुलाने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. ते पत्र वाचून कुणाच्याही मनाचा तळ ढवळेल. त्या मुलाने आपल्या भावणांतून सर्व लहान शेतकऱ्यांची जणू जीवन कहाणीच त्या पत्रात लिहिली आहे. त्याला पुरणपोळी खायची आहे म्हणून त्याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले. जो शेतकरी राजा अवघ्या जगाचा पोशिंदा आहे त्याच्या मुलाला साधी सणाच्या दिवशी पुरण पोळी खायला मिळू नये? अरे कशी सांभाळत असेल त्याची माऊली ते घर; कसा तो राजा त्याच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च पेलत असेल?
अरे लिहा ना एखादे पत्र त्या शेतकरी राजाला!

आमच्या राज्यातल्या मंत्र्यांचे एकदम ओक्के मधी राजकारण सुरू आहे. अहाहा... काय ते गुवाहाटी, काय तो दसरा मेळावा... एकदम ओक्के! अहो तुम्ही इतका खर्च करू शकता तर राज्यातल्या सगळ्या गरीब शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणं काय अवघड आहे तुम्हाला?

आज 5G कडे वाटचाल करणाऱ्या आपल्या देशात
जेव्हा शेतकऱ्यांना आर्थिक मदत करायची वेळ येते तेव्हा निधी कमी पडतो ह्यांना. आणि मग देशाला कृषीप्रधान देश ही ओळख देणारा शेतकरी राजाच आत्महत्या करतो.
अरे मग लिहा ना पत्र त्या राजाच्या कुटुंबाला!

आज हे पत्र सांगत आहे तुम्हाला, लिहा पत्र आणि देऊन बघा ना आधार ह्या सगळ्यांना!

बघा जरा त्यांच्या जागी स्वतःला ठेऊन. पत्रात लिहिण्यासाठी शब्द आपोआप सुचू लागतील...
मग लिहिताय ना पत्र?
मी वाट बघतोय तुमची!


                                                               तुमचेच,
                                                                        पत्र.


***

©®कोमल पाटील