मी परावलंबी?...

गृहिणी खरच परावलंबी असते का?
कथा -  मी परावलंबी?...
विषय - स्त्री आणि परावलंबित्व.      
फेरी - राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा.

                पहाटे पाच वाजता उठून रिमा आपल्या रोजच्या कामाला लागली. आंघोळ करून, देवपूजा झाल्यावर तिने स्वयंपाकघराचा ताबा घेतला. यात काहीच नवीन नव्हते तिच्यासाठी.

          लग्न करून सासरी आल्यापासून रोजचा दिनक्रम ठरल्याप्रमाणे रिमा यंत्रवत आपली कामे उरकत होती.
गॅसवर चहा ठेवून दुसरीकडे दूध तापवले. दूध तापेपर्यंत काल निवडून ठेवलेली भाजी स्वच्छ धुवून घेतली. आणि, पीठ मळायला सुरवात केली.

              मनात देवाचे नाव घेत एक एक काम रिमा हातावेगळे करत होती. बरीच कामं उरकल्यानंतर गरमागरम चहाचा कप घेऊन रिमा गॅलरीत मांडलेल्या खुर्चीत जाऊन बसली.

      चहाचा घोट घेत ती सकाळच्या सुंदर वातावरणाचा आनंद घेत होती. मनात मात्र असंख्य विचार घर करून होते तिच्या.

         परवाच राजशेखर आपल्या काही मित्रांना जेवणासाठी घरी घेऊन आला होता. रिमाने सर्वांचे आदरातिथ्य अगदी मन लावून केले. जेव्हा सगळ्या मित्रांनी तृप्तीची ढेकर देऊन, वहिनीच्या हातचे जेवण खूप आवडले सांगितले. तेव्हा मात्र आपल्या बायकोची स्तुती तर लांबच. पण, "बायकांचे कामच असते ते, चांगला स्वयंपाक करा आणि कुटुंबाला जपा. " असे म्हणत, रिमाच्या दिवसभराच्या कष्टाची अवहेलना केली होती.

           नववीत असलेली दिया रीमाची मुलगी,आपल्या मैत्रिणींना घरी घेऊन आलेली त्यांचा "साडी डे" होता म्हणून. रिमाने सर्वांची छान तयारी करून दिली. सर्व मैत्रिणी खुश होऊन रिमाला धन्यवाद म्हणत होत्या. पण दिया मात्र पटकन बोलून गेली.   " यात काय नवल आहे ? घरातच तर असते आई , तिला दुसरा उद्योग तरी काय आहे ? त्यात एव्हढे कौतुक करण्यासारखे काय?"

असे म्हणत, दिया आपल्या मैत्रिणीसोबत गेली सुद्धा. रिमा मात्र हताश होवून दारात बसली.
इतक्यात उदय, रीमाचा मुलगा. घरी आला. आईला असे बसलेले पाहूनही न पाहिल्या सारखे करत तो घरात गेला.

आणि किचन मधून आवाज दिला, आई भूक लागलीये, पटकन जेवायला वाढ.

अरे स्वयंपाक अजून व्हायचा आहे.

"आई, घरात राहून तुला साधे जेवण बनवायला पण कष्ट पडतात का ग ?

     उदय फार बोललास , एक दिवस तुला वेळेत जेवण मिळाले नाही, म्हणून अश्या पद्धतीने बोलतोस का आईशी ?"

        रिमा आपल्या दोन्ही मुलांच्या वागण्या बोलण्याच्या पद्धतीने हैराण होते. डोळ्यात आलेले पाणी कसे तरी लपवत ती आपल्या रूममध्ये निघून जाते. हे सगळे घडले असताना तिचे सासू सासरे तिथेच उपस्थित असतात. पण दोघेही चकार शब्द काढत नाहीत. रिमाला ते सारे आठवून भरून येते.

      आज रीमाचा वाढदिवस. पण घरातल्या एकाही व्यक्तीला तिला साध्या शुभेच्छा देण्याचे भान नव्हते. प्रत्येक जण आपापल्या कामात मग्न होते. रिमा विचार करत होती की, आपण घरातल्या प्रत्येकासाठी दिवस रात्र राबतो. पण एकालाही ह्या गोष्टीची साधी जाणीव नसावी.

          आज पर्यंत अपेक्षाच काय केली मी सर्वांकडून? जे आहे ते स्वीकारले. कधी कोणत्या गोष्टीसाठी हट्ट नाही केला. सासूबाई आणि मामांजी तर सोडाच, नवरा आणि मुलांना ही माझ्या कष्टाची जाणीव नसावी.
घरात आपल्या माणसांसाठी केलेल्या कष्टाला काहीच महत्व नसते का?
माझे कष्ट, कष्ट नाहीत. असच का वाटते सर्वांना?

त्या दिवशी दियाला "परावलंबित्वचा" अर्थ समजवताना राजनेही माझेच उदाहरण दियाला दिले.
     काय तर म्हणे " जी व्यक्ती काहीच काम करत नाही , जी सर्वस्वी दुसऱ्यावर निर्भर असते अश्या व्यक्तीला परावलंबी म्हणावे."
उदाहरणार्थ तुझी स्वतःची आई

मी ..!   मी परावलंबी ?
मी राजवर , घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर  निर्भर आहे का?
खरंच, अस आहे का?
रिमा स्वतःच्याच विचारत हरवली होती .

            रिमा एक सुशिक्षित स्त्री, पणं कौटुंबिक जबाबदारीत आपले शिक्षण विसरून संपुर्ण वेळ गृहिणी झाली होती.
          तसे रिमाचे कुटुंब सधन होते . घरात सासू सासरे मोठा मुलगा \"उदय \"जो आता नुकताच कॉलेजला जाऊ लागला होता आणि छोटी मुलगी दिया . नवरा कॉर्पोरेशन मध्ये चांगल्या हुद्द्यावर कामाला होता .

             असे हे सहा लोकांचे कुटुंब . पण रिमा बरोबर पाच मिनिट बोलायलाही कोणाकडे वेळ नव्हता .
कधी कधी या सगळ्याचा ताण रिमाला येत असे. पण मनातल्या वेदना तिने कधी कोणासमोर येऊ दिल्या नाहीत.

          रिमा स्वतःच्या विचारात हरवलेली असताना तिचे सासरे तिथे येऊन बसले .

अरे मामंजी तुम्ही कधी उठलात?
बरे आहात ना तुम्ही ?
थांबा मी चहा घेवून येते .

थांब रिमा, बस इथे तुझ्याशी बोलायचे आहे मला.
रिमा जरा अवघडून पुन्हा खुर्चीत बसली.

काय झाले बाळा?
इतका कसला विचार करत होतीस?

काही नाही मामांजी ते आपले असेच .

बेटा , अग वडील नसलो तरी तुझ्या वडीलांपेक्षा मी कमी आहे का ?

रिमा मानेनेच नाही म्हणते.

बाळा , आजपर्यंत तू या घरासाठी खूप केलंस.
स्वतःची स्वप्न, इच्छा, आकांक्षा, शिक्षण , सगळ काही बाजूला ठेवून एक "गृह कर्तव्यदक्ष गृहिणी " बनून राहिलीस तू .

    का ? तर तुझ्या कुटुंबाकडे तुझे दुर्लक्ष होवू नये म्हणून. पण या सगळ्यात तू स्वतःला हरवून बसलीस अस वाटत नाही का तुला ?

     न बोलताही तिच्या मनातले सासर्यानी ओळखल होत.

        रिमाच्या डोळ्यात नकळत पाणी येते. मामांजी ही सगळी माझीच माणसे आहेत मग ह्यांच्यासाठी काही केले तर त्यात एवढे विशेष काय?
आणि तसेही गृहिणी बनून राहण्याचा निर्णय माझाच होता.

      बरोबर आहे तुझे. गृहिणी बनण्याचा निर्णय सर्वस्वी तुझाच होता. पण, तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यात फरक आहे रिमा.

       तेव्हा मुल लहान होती. आम्ही नवरा बायकोही शेतीच्या कामामुळे गावाकडे होतो. राजला त्याच्या कामातून वेळ नसायचा. पणं आता तर सगळे बदलले आहे .

          बाळा आज तुझा जन्मदिवस असूनही सकाळपासून तू कामात आहेस. घरातल्या एकाही व्यक्तीने तुला शुभेच्छा दिल्या नाहीत. याची कुठे तरी तुला खंत वाटत आहे , हो ना.!

रिमासाठी हा दुसरा धक्का असतो. म्हणजे मामांजी तुम्हाला?

बाळा, माझ्या लक्षात आहे. पण मी ही कोणी तरी तुला माझ्याआधी शुभेच्छा देईल म्हणून थांबलो होतो.

तू सगळ्यांसाठी इतकं करतेस, त्यांनाही कधी तरी त्यांची जबाबदारी कळायला हवी की नको. का, जे चालले आहे ते असेच चालू देणार आहेस ?

रिमा तू हुशार आहेस , आपले उच्चशिक्षण बाजूला ठेवून, फक्त घरात लक्ष दिलेस, पण ते कोणाला दिसत नाही. तू घरात असतेस आणि निवांत बसते असच वाटत सगळ्यांना. 
      स्पष्टच बोलायचे तर तू परावलंबित्व जीवन जगतेस असेच वाटते सगळ्यांना.

बेटा माफ कर मला. तुला दुखवण्याचा हेतू नव्हता माझा. पण आता वेळच तशी आली आहे म्हणून बोलतोय मी.

         तू जर आत्ता तुझ्या स्वभावात बदल आणला नाहीस तर, आज तुझा नवरा, मुलं तुला रिस्पेक्ट देत नाहीत, उद्या जगही तसेच वागेल.
तुला काय वाटते, तू खरच परावलंबी आहे ?
  
            ज्या मुलांना हाताला धरून "अ आ इ ई" चा पाठ शिकवलास आज त्यांनाही तू घरात नुसती रिकामी बसून असतेस अस वाटत.

        पण तू कधी त्यांना साधा पाण्याचा तांब्या सुद्धा उचलायला शिकवले नाहीस. असू दे लहान आहेत, म्हणून दरवेळी त्यांना पंखाखाली घेतलेस. पण आज त्याच पंखांना बळकटी येता येता त्यांना आपल्या पहिल्या गुरूचा विसर पडू लागला आहे. हे कळत आहे का तुला?

         "उद्या उच्च शिक्षणासाठी जर ते बाहेर पडले, तर मला सांग त्यांचं सगळ करायला तू ही सोबत जाणार आहेस का?
कारण इथे स्वतःच स्वतः काही करता येत नाही त्यांना. बाहेर काय दिवे लावणार ते?"
दोन दिवस बघतील नाहीतर सगळ सोडून तुझ्या पदराआड येऊन बसतील, चालेल का तुला ते?

रिमा तू एक मुलगी , बहिण , पत्नी , आई , सून अश्या किती तरी नात्यांनी बांधली गेली तरी हे विसरू नकोस की तू एक स्त्री आहेस.

         आज जर तू तुझ्या अस्तित्वासाठी लढली नाहीस तर, उद्या कोणीही येऊन तुला आणि तुझ्या सारख्या किती तरी स्त्रियांना परावलंबी म्हणूनच पाहतील .

            प्रत्येक गृहिणीवर संपूर्ण घर निर्भर असते. खरे परावलंबी तर आम्ही सगळे आहोत. पण तरीही तू त्यादिवशी राजने दियाला तुझ्या बद्दल उदाहरण देताना पाहत होतीस. पण, एका शब्दाने बोलली नाहीस, कि मी परावलंबी नाही.
आता मात्र रिमाला चक्कर येणं बाकी होते.

"जिथे माझी सूनच स्वतःला आत्मनिर्भर असल्याचे जाणवू देत नाही. तिथे मी काय बोलणार?"

मला सगळ दिसत, ऐकू येत, बोलता ही येत. पण तू कधी आवाज उठवणार हे मी पाहत होतो.

        रिमा माफ कर, आज राहवले नाही म्हणून मी बोलून मोकळा झालो. आता इथून पुढे तरी स्वतःला परावलंबी समजणे सोड. आणि, तुझी स्त्री शक्ती जरा जाणवू दे तुझ्या कुटुंबाला.

नाहीतर असंच कायम मनातल्या मनात कुढत बसावं लागेल तुला.

"वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा.
नेहमी आनंदी हसत खेळत खुश राहा.
आयुष्यमान भव.
आणि, आता तूच ठरव हे सगळे बदलायला हवं की नको."

जाता जाता तिला ऐकू जाईल असे बोलतच ते गेले .

         "तू ठरवले तर अजूनही दाखवू शकते की तुझे स्वतःचे वेगळे असे अस्तित्व आहे. तू परावलंबी नसून एक स्वावलंबी स्त्री आहेस."
माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे बाळा.
  
रिमा काही वेळ विचार करत बसली. आणि, एक निश्चय करून पटकन उठली. आपल्या पुढच्या कामांना लागली.

ए आई , माझा गॉगल कुठे आहे ?
प्लीज जरा शोधून देतेस का ?
रिमाच्या मुलाचा आवाज आला ,

 रिमा ए रिमा... अग माझा नवीन शर्ट सापडेना मला.  कोणत्या कप्प्यात ठेवलास नक्की?
प्लीज जरा लवकर शोधून दे. मला ऑफिसला जायला उशीर होतोय. राज बेडरूम मधून ओरडले.

सूनबाई जरा चहा देतेस का?
सासरेबुवा हॉलमध्ये येत बोलले. तोच सासूबाई ही आपली जप माळ घेऊन देव्हाऱ्याकडे जाता जाता \"मला ही एक कप दे ग चहा \" म्हणाल्या.

ए आई , अग माझे गणिताचे पुस्तक सापडेना, मला क्लासला जायला उशीर होतोय, दिया पाय आपटतच किचनमध्ये आली.

ह्या सगळ्यात रिमा मात्र अगदी शांतपणे आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून होती.

सगळ्यांचे आवाज कानी पडत होते. पण, आज रिमाने स्वतःला काही तरी प्रॉमिस केले होते.

     इतका वेळ आवाज देऊन ही, रिमा कोणाच्या हाकेला ओ देत नव्हती, की कोणाच्या मदतीला धावत नव्हती. प्रत्येक जण तिला हाक मारून वैतागून स्वत:च स्वतःचे काम करत होते.

      राहता राहिले सासू सासरे. तर सासूबाईंनी जरा वेळ  चहाची वाट पहिली. पण रिमा नक्कीच कोणत्या तरी कामात बिझी असेल म्हणून त्याच किचनमध्ये गेल्या.

"काय ग रिमा , लक्ष कुठे आहे तुझे .
सगळे आवाज देत आहेत तुला आणि तू मात्र आपल्याच तंद्रीत आहेस.
काही झाले आहे का?"

रिमाने त्यांनाही ऐकून न ऐकल्या सारखे केले.

रिमा काही उत्तर देत नाही म्हंटल्यावर, त्यांनी आपला आणि नवऱ्याचा चहा गरम करून घेतला. आणि, आल्या तश्या हॉलमध्ये निघून गेल्या .

हॉलमध्ये जाताच त्या आपल्या नवऱ्याला म्हणाल्या. अहो , मला वाटते रिमाला आज बरे वाटत नसावे.

इतक्यात राजही स्वतः चे आवरून बाहेर आला. मुलीला आवाज दिला, दिया आवरले का तुझे ?
चल पटकन आवर, तुला क्लासला सोडून मी तसेच पुढे जाईन.

हो बाबा आलेच, बस पाच मिनिट.

     इतक्यात रिमा पोह्यांची प्लेट घेऊन हॉलमध्ये आली.  कोणाकडेही न पाहता टीपॉय वर पाच प्लेट मांडल्या आणि पुन्हा किचनमध्ये गेली.

           राज आणि तिचे सासू, सासरे तिच्याकडे नुसते पाहतच राहिले. दोन मिनिटांच्या अवधीनंतर रिमाच्या सासूबाईंनी टेबल वर मांडलेल्या प्लेट्स एक एक करून सगळ्यांना दिल्या .  

राज , अरे रिमाला काय झाले आहे?
सकाळ पासून पाहतेय मी, ती कोणाशी बोलत नाही की, कोणाचे ऐकत नाहीये.
नक्की काय झाले आहे तिला ?

पोह्याचा घास तोंडात घेतलेल्या राजने उत्तर दिले. काही माहीत नाही ग आई. असेल काही तरी दुखत खुपत. ती कधी सांगते स्वतः हुन?

राजचे बाबा बोलले, हो ती कधी सांगतच नाही .
पण, आपण विचारायचे कधी कष्ट घेतो का?
बघेल तेव्हा तिचे काही ना काही काम सुरू असते.
कधी तिला शांत बसवून तुला काय हवं नको हे तरी विचारण्याचे भान तुमच्यातल्या कोणाला राहिले आहे का?

अरे तिच्या जागी दुसरी कोण असती तर वैतागून माहेरी गेली असती.

पण राज तुझ्याशी लग्न झाल्यापासून तिने स्वतःहून कधी माहेरी जाण्याचा हट्ट केलेला तुला तरी आठवतो का ? 
नेहमी तुझे , मुलांचे आणि आमचे करण्यात ती दिवसरात्र घालवते. तिलाही एखादा ब्रेक द्यावा. असा विचार कोणाच्या मनातही येत नाही.

काय ग निला (राजची आई ) राजच्या लग्नाआधी तू ही सगळ करायचीस ना? तुला कधी कंटाळा आला तर, आपण बाहेर जाऊन जेवण करून यायचो  किंवा एखादा सिनेमा , नाटक बघून तू स्वतःला रोजच्या कामातून ब्रेक द्यायची. कधी कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन करायचो आपण, तर कधी तू तुझ्या मैत्रिणींसोबत फिरून यायचीस, आठवते ना ..!

         आपण मुलांसोबत वेळ घालवावा, रिमालाही थोडा स्वतःसाठी वेळ मिळावा. म्हणून तूच मला म्हंटली होतीस ना आपण इकडे येऊ. पण आल्यापासून पाहतोय मी, त्या पोरीला कामात मदत तर सोडच, उलट आपलीच जास्तीची कामे वाढवून दिली आहेत. अग तू स्वतः एक स्त्री आहेस तिच्या मनातली वेदना तुला कळू नये.

कधी तिला स्वतःसाठी चार क्षण निवांत बसलेले पाहिले आहेस का  तू ?
आणि, " काय रे राज , तू तिच्याशी लग्न केले दोन पोरं पदरात टाकलीस म्हणजे तुझे तिच्यासाठीचे कर्तव्य संपले का ?"

राज आणि आईने मानेनेच नाही म्हणून केले.
दोघेही आपापल्या विचारात हरवली होती.
तोच दिया ओरडत बाहेर आली ,
अहो बाबा, आज्जी आजोबा .
तुम्हाला माहित आहे का आज काय आहे ते ?

काय आहे ? राजने जरा उत्सुकतेने विचारले.

दिया उड्या मारत बोलली, अहो बाबा आज आईचा वाढदिवस आहे. मला वाटतं म्हणूनच ती आपल्यावर रागवली आहे. कारण आपण कोणीच तिला शुभेच्छा दिल्या नाही ना ..

राज डोक्यावर हात मारून घेत बोलतो, \"अरे हो कामाच्या व्यापात मी विसरूनच गेलो होतो \".

सासूबाईही बोलतात, अस आहे होय. म्हणून ती आज शांत दिसतेय तर .

        बाबा बोलले , काय फरक पडतो तिचा वाढदिवस असो किंवा नसो. घरातले सगळे काम तर तिलाच करायचे आहे. वाढदिवस आहे म्हणून तुम्ही थोडीच तिला आराम देणार आहात?

        सकाळपासून ती किचन मध्ये आहे. कोणी तिला साधे \"चहा घेतलास का?  तरी विचारले का ?

            आणि दिया , तू एवढ्या उड्या मारत आलीस आम्हाला सांगायला. तुझा वाढदिवस जर ती विसरली असती तर, आख्खे घर डोक्यावर घेतले असतेस ना ..!

           आईला मात्र गृहीत धरून, तिला काय वाटत असेल हा विचारही मनात न आणता किती सहज बोलतेस, आपण सगळे विसरलो म्हणून.
कधी आईला मदतीसाठी विचारलेस का तू ? नुसत वाढदिवसाला प्रेम उतू घालवून चालत नाही बाळा.तिच्या सारखे समर्पण तुम्हाला जमणे शक्यच नाही.

           तुम्ही सगळेच एका माळेचे मणी आहात. अरे ती पोरगी बिचारी कधी स्वताहून काही बोलत नाही म्हंटल्यावर, आपणही तिला सगळ्या गोष्टीत किती सहज गृहीत धरतो.

           सगळ्यांचं सगळे करते ती पणं तरी तिचं आपल्यावर अवलंबून आहे असा टेंभा मिरवतो आपण. खरंच "ती परावलंबी आहे की तुम्ही? "

विचार करा जरा. ती काही बोलायला गेली, काही सांगायला गेली की, तिला काय कळते बोलून मोकळे होता तुम्ही .

           घरात राहून बाहेरची दुनिया कळत नाही, हा तर राजचा रोजचा टोमणा मी ऐकत असतो. पण तिने जर घराबाहेर पाऊल टाकले तर, तुमच्या सगळ्यांचा हा जो बडेजावपणा आहे तो क्षणात गळून पडेल. हे समजून घ्या तुम्ही.

तिला कमी लेखू नका तुम्ही. ती घरात आहे म्हणून आपण आपले काम वेळेवर करू शकतो.

"ती परावलंबी नाही, तर आपणच तिच्यावर अवलंबून आहोत हे कायम लक्षात ठेवा."

राजला आपल्या बोलण्यातली चूक कळल्याने तो मान खाली घालून फक्त ऐकण्याचे काम करत होता.राजकडे जरा रागात बघतच बाबा बोलले.

रिमा इकडे ये बाळा. सासरे रिमाला बोलवून घेतात.
मग आजच्या तुझ्या वाढदिवसा दिवशी, तू काय संकल्प केलास सांग तरी सर्वांना. तुझा वाढदिवस तर सगळे विसरले होतेच पणं तू स्वतःला विसरली नाहीस ना?

"नाही मामांजी, माफ करा बाबा ; आज पासून मी तुम्हाला बाबाच म्हणणार." आज तुमच्यामुळे मला माझ्यातली मी गवसली आहे. आणि, तिला हरवू न देण्याचा संकल्प मी केला आहे.      

      कोणालाही एक शब्द पुढे बोलू न देता रिमा बोलते .

     आज पासून घरात ही काही नियम पाळले जातील हे सर्वांनी लक्षात ठेवा. उदयला रूम मधून बोलवून घेवून.रीमा सर्वांशी बोलू लागते.
"इथून पुढे घरातली सगळी कामे सगळ्यांनी मिळून करायची आहेत. प्रत्येकाने सुट्टीचा वार कुटुंबासोबत घालवायचा आहे."
इतकेच नाही तर इथून पुढे मी ही माझे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी घराबाहेर पाऊल ठेवणार आहे.\" 
"आत्तापर्यंत स्वतःवर सर्वांना निर्भर ठेवूनही मी परावलंबि जीवन जगत होते."

आता स्वावलंबी जगून दुसऱ्यांना परावलंबित्व म्हणजे काय असते? हे दाखवून देणार आहे मी. सर्वजण तिच्या ह्या नवीन रुपाकडे पाहतच राहिले...
रिमा उत्साही आणि करारी चेहऱ्याने आपल्या रूममध्ये निघून जाते.

       कारण, तिला स्वतःचा शोध घेण्यासाठी बाहेर पडायचे असते.

समाप्त .
©️®️ प्रियदर्शनी देशपांडे.
टीम -  जिल्हा - सातारा. , सांगली.