Oct 16, 2021
नारीवादी

मी नव्याने मला भेटले!

Read Later
मी नव्याने मला भेटले!
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

#मी_नव्याने_मला_भेटले!

माझी कामवाली सखू सांगत होती,"बाई,ती दोनशेपाच नंबरच्या बुलाकात एक म्हातारी नि म्हातारा रहात्यात. म्हाताऱ्याला सगळं अन कसं लिकिड द्यावं लागतं. माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून ती म्हणाली,"अवो म्हंजी मिशरमधी बारीक करुन,तेत पानी घालत्यात नि भरिवत्यात."

"बिचारी दुर्वा आजी,"मी हळहळले.

"अवो तुमास्नी वाटतं तसं काय बी नाय बगा. म्हातारा शीक पडल्यापासना म्हातारी लय चाळे कराया लागलेय. तुमी सोसायटीत नइन हात ना म्हनून तुमास्नी काय ठावं नाय. म्हातारी म्हंजे येक इषयच मिळालाय बघा चघळायला. अवो,सदी साडी नेसनारी म्हातारी..केसाचा बापकट करुन घितलान. हातीत हिरवाकंच चुडा असायचा पयले..आता नाय..आता सोन्याची बांगडी नि घड्याळ घालिते. भायरच्या गाडीर जाऊन गपागपा पानीपुरी,रगडापुरी खाती. कंदी ते डामिनोजची भाकरी मागिवते तर कंदी हाटेलातसून आग्री मटान नि भाकऱ्या मागिवते. साठी नि बुद्धी नाठी म्हनत्यात त्ये खोटं नाय बगा."

आम्हाला या सोसायटीत रहायला येऊन नुकताच पंधरवडा झाला होता. वास्तुशांतीवेळी सोसायटीतल्या सर्व रहिवाशांना आम्ही आगत्याने बोलावलं होतं.  त्यावेळी या दुर्वाआजीची नि माझी ओळख झाली. तिने माझ्यासाठी तिच्या वेलीवरच्या जाईच्या फुलांचा गजरा करुन आणला होता शिवाय राधाक्रुष्णाचं पेंटिंग आणलं होतं,जे आम्हाला दोघांनाही विशेष आवडलं होतं. माझं नाव राधा म्हणून असेल कदाचित.

बऱ्याचदा दुर्वाआजी मला बागेत फिरताना दिसायची. मुलांशी क्रिकेटही खेळायची. अगदी लहान मुलांसारखी..चिटींग चिटींग म्हणून.ओरडायची..मुलांसाठी पेप्सी आणायची आणि त्यांच्यासोबत लॉनवर बसून गारेगार पेप्सीचा आस्वाद घ्यायची. बऱ्याच बायकापुरुषांचा चेष्टेचा विषय होती ती . मला मात्र तिचं तसं जीवन जगणं फार आवडायचं.

आमचं घर तळमजल्यावर..मुलं हक्काने पाणी प्यायला येऊ लागली..त्यांच्यासोबत कुरता,लेगिन्स तर कधी टीशर्टट्राऊजर्स घातलेली दुर्वाआजीही पाणी पाणी करत यायची. मुलांच्या परीक्षा सुरु झाल्या तसं ती येईनाशी झाली. दुर्गाआजी मात्र एकट्याच येऊन बाकावर बसायच्या. एके दिवशी मी ठरवून त्यांच्या गप्पांना जाऊन बसले.

"आज इकडे कठे?" दुर्गाआजी म्हणाली.

"तुमच्याशी बोलावसं वाटलं. अनायासे तुम्ही मोकळ्या दिसलात म्हणून आले..झालं."

मी असं बोलल्यावर दुर्गाआजीच्या चेहऱ्यावर तोंडभर हसू फुललं. त्यांच्या कानातले डाळिंबी खडे चकाकले. डोळ्यांत स्नेहाद्रपणा जाणवला.

"यांचं आवरलं की एकटीच असते गं मी. घरात बसून टिव्ही नैतर मोबाईल..त्याचाही यांना कंटाळा येतो. आताशा आवाज सहन होत नाही यांना. हे खाटीवर नि मी व्हॉट्सअपवर गप्पा मारतेय हेही सहन होत नाही. तरी आधी मीही हट्टाने टिव्ही बघायचे. फोनवर गप्पा मारायचे पण तोचतोचपणा नकोसा वाटू लागला. डॉक्टरांनी यांच्यात काहीच सुधारणा होणार नाही सांगितलं तेव्हा जरा ढासळले होते पण मग एक वेगळाच विचार आला मनात..आपलीतरी आता किती वर्ष राहिली शिल्लक! थोडं मनाप्रमाणे जगून घेऊ. लेक तिकडे सातासमुद्रापार आहे. त्याचा,सुनेचा फोन येतोच गं पण हल्ली मला त्यांचं बोलणंही व्यावहारिक वाटतं."

"आजी तुझ्या माहेरची गं.."

"माहेर..माहेर आईवडिलांसोबत गेलं. वहिनीने कधी आपलेपण दाखवलंच नाही. भाऊ म्हणशील तर राखी नि भाऊबीजेपुरता. तसं माहेरासाठी खूप केलंय मी. आई सतत आजारी असायची. अगदी चौथीत असल्यापासनं स्टोव्ह पेटवून चपात्या,भाकऱ्या करु लागले. कमीअधिक करत करत सगळ्या घरकामात तरबेज झाले. लहान भावाचं सगळं आईप्रमाणे करायचे.  आजुबाजूच्या, आल्यागेल्या कौतुक करायच्या माझ्या वागणुकीचं पण राधे,एक सांगू..यात माझं बालपण मला उपभोगताच आलं नाही बघ.

इतर मुली चुलबोळकी मांडायच्या,लाकूड की पाणी खेळायच्या,फुगड्या घालायच्या,डोंगराला आग लागली पळा पळा,शिवाजी म्हणतो,डब्बा ऐसपेस..ते सारे आवाज,तो मुल़ाचा चिवचिवाट मी कानात प्राण आणून ऐकायचे. कित्येक रात्री मला मी पावसात भिजतेय,मुक्त हुंदडतेय,हसतेय,दोन वेण्या फिरवत डौलात चालतेय अशी स्वप्नं पडायची. गतकाळात जे जे करायचं राहून गेलं होतं ते प्रकर्षाने जाणवू लागलं.

सासरी ही काही वेगळी परिस्थिती नव्हती. प्रत्येक गोष्ट सासूला विचारुन करायला लागायची..सासूच्या हाती यांचा पगार..अगदी मला गजरा आणायचा झाला तरी हे ,आईकडून पैसे मागून न्यायचे. बाहेर फिरायला जाणं,जेवणं दूरच. तिचंही भरपूर केलं मी. जाताना हात जोडून माफी मागत होती पण बोलायला वाचासुद्धा नव्हती. हे सारं बघत होते. नणंदा कार्यापुरतं येऊन राहून गेल्या.

मुलाचं शिक्षण,यांचं खाणंपिणं करण्यात मी माझं मन रमवलं. मुलगा मोठा झाला,नोकरी लागली..परदेशात..त्यानेच त्याचं लग्न जमवलं. लग्न करुन आशिर्वाद घेण्यासाठी एकदा आला. सुनबाई छान आहे..एकशिवडी..तामिळ आहे..तिला मराठी,हिंदी येत नाही. तोडक्यामोडक्या इंग्रजीत मी तिच्याशी बोलते. सगळं बरं चाललेलं नि यांचं हे असं झालं..वर्षभरापासनं बेडरिडन आहेत. पातळ पदार्थ भरवते ते खातात. सगळा ताठा गळून पडलाय. मला म्हणतात,"तुला मी पतंगाला दोरीने बांधून ठेवतात तसं ठेवलं..नोकरी करु बघत होतीस,उद्योग घालू बघत होतीस, पुढे शिकू म्हणत होतीस..मी सगळ्यावर पाणी फिरवलं..जणूकाही तुला माझ्या घरातल्यांच्या सेवेकरता मी विकतच आणलं होतं. आता मात्र तुझ्या मनाप्रमाणे वाग.

मलाही मग हुरुप आला. मी कात टाकली. माझ्या मनावर,देहावर प्रेम करु लागले. फिट रहाण्यासाठी फिरु लागले..या मुलांचा लळा लागला..त्यांचा माझ्यापाशी आलेला चेंडू देतादेता कधी त्यांच्यात सामील होऊन खेळू लागले,सान झाले कळालंच नाही बघ. हल्लीच्या मुलींची फेशन पाहून पातळ झालेल्या शेंडीचा हेअरकट करुन घेतला,जरा सुटसुटीत कपडे घेतले..चेहऱ्याला पावडरलिपस्टीक लावू लागले..खरं सांगू,राधे..खूप प्रसन्न वाटतंय आता मला. ना मुलाची आठवण सतावत,ना काही राहून गेलंय असं वाटत. यांच दीर्घ आजारपण मान्य केलंय मी.

परिस्थितीवर रडत बसण्यापेक्षा तिच्याशी जुळवून घेतलेय,माणसं जशी आहेत तशी त्यांना स्वीकारतेय मी.या रंगीत फुलांपासून,वाऱ्यावर सळसळणाऱ्या पानांपासून उर्जा घेतेय मी..नभाचा व्यापकपणा स्वभावात अंगिकारतेय मी. मी नव्याने मला भेटतेय राधे. दुर्गा आजीच्या डोळ्यातून अश्रूंची दोन फुलं घळकन खाली पडली. मी आजीचे दोन्ही हात बराच वेळ दाबून धरले.

मी काहीच बोलत नव्हते तरीही माझ्या मनातलं सारं काही दुर्गा आजीला न सांगता कळत होतं. कदाचित मीही गतकाळातील दुर्गाआजीच्या भूमिकेत जगत होते आणि माझ्या मनातील द्वंद्वाचं उत्तर दुर्गाआजीच्या बोलण्यातून,अनुभवांतून शोधत होते.

--------सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now